श्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय ३

श्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.


अर्जुन म्हणाला -

हे जनार्दना ! जर तुम्हांला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग हे केशवा ! मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात ? ॥१॥

तुम्ही मिश्रितशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की, ज्यामुळे माझे कल्याण होईल. ॥२॥

श्रीभगवान म्हणाले -

हे निष्पापा ! या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्ययोग्यांची निष्ठा ज्ञानयोगाने व योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. ॥३॥

मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगानिष्ठेला प्राप्त होत नाही आणि कर्माचा फक्त त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. ॥४॥

निःसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहात नाही. कारण सर्व मनुष्यसमुदाय प्रकृतीपासुन उत्पन्न झालेल्या गुणांमुळें पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. ॥५॥

जो मूर्ख मनुष्य सर्व इन्द्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंन्द्रियांच्या विषयांचे चिन्तन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो. ॥६॥

परन्तु हे अर्जुना ! जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय. ॥७॥

तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत. ॥८॥

यज्ञानिमित्त केल्या जाणार्‍या कर्माशिवाय दुसर्‍या कर्मांत गुंतलेला हा मनुष्यसमुदाय कर्मानी बांधला जातो. म्हणून हे अर्जुना ! तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. ॥९॥

प्रजापति ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उप्तन्न करुन त्यांना सांगितले की, तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो. ॥१०॥

तुम्ही या यज्ञाने देवतांची पृष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हांला पुष्ट करावे. अशा प्रकारे निःस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल. ॥११॥

यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हांला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील. अशा रितीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतः खातो, तो चोरच होय ॥१२॥

यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासुन मुक्त होतात. पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर - पोषणासाठी अन्न शिजवतात, ते तर पापच खातात. ॥१३॥

सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्ननिर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मामुळे घडतो. ॥१४॥

कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत, असे समज. यावरून हेच सिद्ध होते की, सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. ॥१५॥

हे पार्था ! जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टिचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारा भोगांत रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो. ॥१६॥

परन्तु जो मनुष्य आत्म्यताच रमणारा, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्यातच संतृष्ट असतो, त्याला कोणतेच कर्तव्य उरत नाही. ॥१७॥

त्या महापुरुषाला य विश्वात कर्मे करण्य़ाने काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणिमात्रातही त्याचा जरादेखील स्वार्थाचा संबंध असत नाही. ॥१८॥

म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्यकर्म नीट करीत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. ॥१९॥

जनकादी ज्ञानी लोकही आसक्तिरहित कर्मानेच परम सिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊनदेखील तू कर्म करणेच योग्य. ॥२०॥

श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, त्या त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करातात तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्यसमुदाय वागू लागतो. ॥२१॥

हे अर्जूना ! मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्म करीतच असतो. ॥२२॥

कारण हे पार्था ! जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत, तर मोठे नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्यीच मार्गाचे अनुसरण करतात. ॥२३॥

म्हणुन जर मी कर्म केले नाही, तर ही सर्व माणसे नष्ट - भष्ट होतील आणी मी संकरतेचे कारण होईन. तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन. ॥२४॥

हे भारता ! कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात, त्या रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. ॥२५॥

परमात्मस्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व

कर्मे उत्तम प्रकारे करीत त्याच्याकडूनही तशीच करून घ्यावी. ॥२६॥

वास्तविक सर्व कर्में सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्याचे अन्तःकरण अहंकाराने मोहित झाले आहे, असा अज्ञानी पुरुष ' मी कर्ता आहे ' असे मानतो. ॥२७॥

पण हे महाबाहो ! गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणांत वावरत असतात, हे लक्षात घेऊन त्यांमध्ये आसक्त होत नाही. ॥२८॥

प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणांत आणि कर्मांत आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणार्‍या मंदबुद्धीच्या अज्ञान्याचा पूर्ण ज्ञान असणार्‍या ज्ञान्याने बुद्धीभेद करू नये. ॥२९॥

अन्तर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संतापरहित होऊन तुं युद्ध कर. ॥३०॥

जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अन्तःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात, तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात. ॥३१॥

परन्तु, जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत, त्या मुर्खाचा तुं सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज ॥३२॥

सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयांत कोणाचाही हट्टीपणा काय करील ? ॥३३॥

प्रत्येक इन्द्रियाचे इन्द्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये. कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याणमार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. ॥३४॥

चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसर्‍याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे. पण दुसर्‍याचा धर्म भय देणारा आहे ॥३५॥

अर्जुन म्हणाला -

हे कृष्णा ! तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो ? ॥३६॥

श्रीभगवान म्हणाले -

रजोगुणापासून उप्तन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे, असे तू जाण. ॥३७॥

ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धूळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहाते. ॥३८॥

आणि हे अर्जुना ! कधीही तृप्त न होणार हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रु आहे. त्याने माणसांचे ज्ञान झाकले आहे. ॥३९॥

इन्द्रिये, मन आणि बुद्धी ही याचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी आणि इंद्रीयांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो. ॥४०॥

म्हणुन हे अर्जुना ! तू प्रथम इन्द्रियांवर ताबा ठेवून व ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणार्‍या, मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक. ॥४१॥

इन्द्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते, या इंद्रियाहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे. आणी जो बुद्धीहूनही अत्यन्त पर आहे, तो आत्मा होय. ॥४२॥

अशा प्रकारे बुद्धीहून अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यन्त श्रेष्ठ असा आत्मा आहे, हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करुन महाबाहो ! तू या कामरूप अजिंक्य शत्रुला मारून टाक. ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP