श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय ३४

श्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.


युद्धामध्यें वीरभद्र जळल्यानंतर शंकर शोक करीत बसले. ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षांत येतांच त्याचें अंतःकरण द्रवून गेल. त्यानें विचार केला कीं, ज्या वेळेस गुरुनें मला बदरिकाश्रमास तपश्चर्येंस बसविलें, त्या वेळीं शंकरानें मजविषयीं विशेष काळजी बाळगिली होती व पुष्कळ श्रम घेतले होते. मातेसमान त्यांनीं माझा प्रतिपाळ केला. असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणानें शोक करित असलेला मी पाहावा हें मला शोभत नाहीं आणि हें अयोग्य कर्म मजकडून झालें, असा मनांत विचार आणून गोरक्षनाथ शंकराच्या पायां पडला आणि म्हणाला. वीरभद्राचें तुम्हांस अतिशय दुःख झाले आहे, परंतु जर मला त्याच्या अस्थि आणुन द्याल तर मी वीरभद्रास उठवीन. संजीवनीमंत्राच्या योगानें मी त्यास तेथेंच उठविलें असतें, पण सर्व राक्षसांच्या मेळ्यांत तो जळला असल्यामुळें त्याच्याबरोबर पुन्हां राक्षस उठतील. मग वीरभद्राची हाडें मी ओळखून घेऊन येतों, असें सांगून शंकर समरभूमीवर गेले. जी हाडें शिवनामस्मरण करतील ती वीरभद्राचीं हांडें असें ओळखून गोरक्षनाथाजवळ आणिली. मग गोरक्षनाथानें संजीवनीमंत्र सिद्ध करुन वीरभद्रावर भस्म टाकतांच वीरभद्र उठून धनुष्यबानाची चौकशी करुं लागला व म्हणूं लागला कीं, आतां राक्षसांचा संहार करुन शेवटीं गोरक्षनासहि यमपुरिस पाठवून देतो. तेव्हां शंकरानें त्यास म्हटलें, आतां व्यर्थ बोलूं नका. नंतर त्यास संपूर्ण मजकूर निवेदन केला आणि त्याची व गोरक्षनाथाची मैत्री करून दिली. इतक्यांत वायुचक्रीं भ्रमत असलेले बहात्तर कोटी चौर्‍यांयशी लक्ष शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करुन परत कैलासास गेले. मग गोरक्षनाथाहि मच्छिंद्राचें शरीर घेऊन शिवालयांत आला.

इकडे त्रिविक्रमराजा ( मच्छिंद्रनाथ ) राजविलासांत निमग्न झाला होता. एके दिवशीं तो नित्यनेमाप्रमाणें दर्शनाकरितां शिवालयांत गेला असतां गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचें तुकडे जवळ घेऊन बसलेला दिसला. तेव्हां त्यास राजा प्रीतीनें भेटला. मग राजानें सर्व वृत्तांत विचारल्यावरुन गोरक्षनाथानें त्यास झालेला वृत्तांत निवेदन केला. तो ऐकून त्यास तळमळ लागली. त्यानें गोरक्षनाथास सांगितलें कीं, कांहीं दिवस असाच धीर धरुन राहा. धर्मनाथास राज्यावर बसवुन मग मी येतों. असें सांगुन तो राजवाड्यांत गेला. त्यानें लागलेंच या गोष्टींविषयीं प्रधानाचा विचार घेऊन एका सुमुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला. त्या उत्सवसमयीं याचकांस विपुल धन देऊन संतुष्ट केलें. पुढें एक महिन्यांनंतर एके दिवशीं त्रिविक्रमराजाच्या शरीरांतुन निघून मच्छिंद्रनाथ शिवालयांत ठेवलेल्या आपल्या देहांत गेले. इकडे राजवाड्यांत राजास उठण्यास वेळ लागल्यानें राणी महलांत गेली व हालवून पाहते तों राजाचें शरीर प्रेतवत् पडलेलें. मग तिनें मोठा आकांत मांडिला. इतक्यांत धर्मनाथ धांवून गेला व प्रधान आदिकरुन मंडळी जमली. ह्या बातमीनें नगरांत एकच हाहाःकार होऊन गेला.

त्रिविक्रमराजा मरण पावला, हा वृत्तांत शिवालयमध्यें गोरक्षनाथ होता. त्यास लोकांकडुन समजला. तो ऐकून त्यानें संजीवनीप्रयोगानें भस्म मंत्रून अस्थी, मांस वगैरे जमवाजमव केली तोंच मच्छिंद्रनाथानें देहांत प्रवेश केला व उठून बसला.

इकडे राजाचें प्रेत स्मशानांत नेऊन तेथें सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघर गेले. रेवती राणीनें मात्र मच्छिंद्रनाथाचा देवालयांतुन शोध आणविला होता. तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मरणानें अतिशय दुःख झालें. त्यास अन्न‌उदक गोड लागेना. त्यास आपला प्राणहि नकोसा झाला. तें पाहून रेवतीमातेनें त्यास एकीकडे नेऊन सांगितले कीं, तूं व्यर्थ का शोक करितोस ? बाळ ! तुझा पिता मच्छिंद्रनाथच होय. तो चिरंजीव आहे. तूं आतांच शिवालयांत जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून ये.

मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा, म्हणुन धर्मनाथानें रेवती राणीस विचारल्यानंतर तिनें मच्छिंद्रनाथाच्या परकायाप्रवेशाची समग्र वार्ता त्यास निवेदन केली. ती ऐकून धर्मनाथ लवाजम्यानिशीं शिवालयांत गेला व मच्छिंद्रनाथाच्या पायां पडून त्यास पालखींत बसवून राजवाड्यांत घेऊन आला. तो एक वर्षभर तेथं होता. नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ, चौरंगीनाथ हे तीर्थयात्रेस जावयास निघाले. त्यासमयीं धर्मनाथास परम दुःख झालें. तोहि त्यांच्यासमागमें तीर्थयात्रेस जावयास सिद्ध झाला. तेव्हां मच्छिंद्रनथानें त्याची समजुत केली कीं, मी बारा वर्षांनीं परत येईन; त्या वेळीं गोरक्षनाथाकडून तुला दिक्षा देववीन व मजसमागमें घेऊन जाईन. आतां तूं रेवतीची सेवा करून आनंदानें राज्यवैभवाचा उपभोग घे. अशा रीतीनें मच्छिंद्रनाथानें त्याची समजुत केल्यावर ते तिघे तेथून निघाले.

ते त्रिवर्ग तीर्थयात्रा करीत करीत गोदातटीं धामानगरांत येऊन पोचलें. त्या ठिकाणीं गोरक्षनाथास माणिक शेतकर्‍याचें स्मरण झालें. त्यानें त्या मुलाबरोबर झालेला सर्व मजकूर मच्छिंद्रनाथास कळविला. मग शेताची जागा लक्षांत आणुन तिघेजण माणिकाजवळ गेले. तेथ तो काष्ठासमान उभा असलेला त्यांनीं पाहिला. त्याच्या अंगावर तिळभरसुद्धां मांस नसुन हाडांचा सांगाडा मात्र उरला होता व तोंडानें सारखा राममंत्राचा जप चालला होता. त्याचें तें कडक तप पाहून गोरक्षनाथानें तोंडात बोट घातलें व 'मी म्हणतों तो हाच माणिक' असें त्यानें मच्छिंद्रनाथास सांगितलें. मग तिघेजण त्याच्याजवळ गेले व त्यांनीं त्यास तप पूर्ण करावयास सांगितलें तेव्हा त्यानें त्यांस उत्तर दिलें कीं, तुम्हाला ही पंचाईत कशाला पाहिजे ? तुम्ही आपलें येथुन चालू लागा. विनाकारण कां खोटी करतां ? त्यांनी त्यास जें जें विचारावें त्या त्या प्रत्येक प्रश्नाचा माणिक उलट जबाब देई. तें पाहून मी आतां ह्यास युक्तीनें ताळ्यावर आणतों , असे गोरक्षनाथानें म्हटलें.

मग गोरक्षनाथ एकटाच तेथें राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखालीं बसले व गोरक्ष काय करितो हें पाहूं लागले. गोरक्षनाथानें माणिकाजवळ उभें राहून मोठ्यानें म्ह्टलें कीं, अहाहा ! असा तपस्वी मी अजूनपावेतों पाहिला नव्हता; अशाचा उपदेश घेऊन ह्यास गुरु करावा हेंच चांगलें. माझें दैव उदयास आलें म्हणुन समजावं, नंतर गोरक्ष त्यास बोलला; स्वामीं ! मी आपणांस गुरु करीत आहे; तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा. हें ऐकून माणिक त्यास म्हणाला. बेट्या, एवढा मोठा झालास तरी अजुन तुला अक्कल नाहीं. तु मला गुरु करुं पहातोस त्यापेक्षां तुंच कां माझा गुरु होईनास ! त्याचा उलटा जबाब येणार हें ओळखून गोरक्षनाथानें त्यास हा प्रश्न केला होता. त्याप्रमाणें उत्तर ऐकतांच गोरक्षनाथानें त्यास मंत्रोपदेश केला. त्यामुळें तो त्रिकाळज्ञानी सोडून गोरक्षनाथाच्या पायां पडला. तेव्हां गोरक्षनाथानें शक्तिप्रयोग मंत्रुन गोरक्षानें त्यास हातीं धरून मच्छिंद्रनाथाकडे नेलें. त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचें नाव 'अंडभंग' असें ठेवलें व त्यास नाथदीक्षा देऊन ते चौघे मार्गस्थ झाले, वाटेंत गोरक्षनाथानें अडभंगास सकल विद्यांत निपूण केलें.

नंतर तीर्थयात्रा करीत बारा वर्षानीं प्रयागास आले. त्या वेळेस धर्मनाथराजास पुत्र झाला असुन त्यांचें नांव त्रिविक्रम असं ठेविलें होतें हे चौघे गांवांत आल्याची बातमी धर्मनाथास समजांच तो त्यास सामोरा जाऊन राजवाड्यात घेऊन गेला. धर्मनाथानें आपल्या मुलास राज्यावर बसवुन आपण योगदीक्षा घेण्याचा निश्चय केला. माघ महिन्यांतील पुण्यतीथ द्वितीया, जिला धर्मबीज असें म्हणतात, त्या दिवशीं गोरक्षनाथानें धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दीली. त्या वेळेस सर्व देव बोलाविले होते. नगरवासी लोकांचाहि मोठा मेळा जमला होता. सर्वजण प्रसाद घेऊन आनंदानें आपपल्या स्थानीं गेले. दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांसुद्धां सर्वांनीं आपली इच्छा दर्शविली. मग ' धर्मनाथबीजेचा' उत्सव प्रतिवर्षीं करण्याची गोरक्षानें त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हां सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशीं उत्सव होऊं लागला.

गोरक्षनाथानें आपल्या 'किमयागिरी' नामक ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं. आपपल्या शक्त्यनुसार जो कोणी हें बीजेचें व्रत करील त्याच्या घरीं दोष, दारिद्र्य, रोग आदिकरुन विघ्नें स्वप्नांत देखील यावयाची नाहींत. त्या पुरुषांचा संसार सुयंत्रित चालेल प्रत्येक्ष लक्ष्मी त्याच्या गृहीं वास्तव्य करील. याप्रमाणें धर्मनाथ बीजेचा महिमा होय.

धर्मनाथास नाथदीक्षा दिल्यानंतर ते तिघेजण त्यास घेऊन निघाले. त्यांनी तीर्थ फिरत फिरत बदरीकाश्रमास जाऊन धर्मनाथास शंकराच्या पायांवर घातलें व त्यास त्याच्या स्वाधीन करून तपश्चर्येस बसविलें. नंतर, बारा वर्षांनीं परत येऊं असें सांगुन तो तिघेजण तीर्थयात्रा करण्यास गेले व मुदत भरतांच ते पुनः बदरिकाश्रमास गेले मग तेथें मोठ्या थाटानें मावंदे केलें. मावंद्याकरितां सर्व देवांना बोलावुन आणलें होतें. मावदें झाल्यावर सर्व देव वर देऊन निघुन गेले. व मच्छिंद्रनाथ, गोरक्षनथ, चौरंगीनाथ, अडभंगनाथ व धर्मनाथ असे पांचीजण तीर्थयात्रेस गेले.

ब्रह्मादेवाच्या वीर्यापासून पुर्वी अठ्यांयशीं सहस्त्र ऋषि उत्पन्न झाले; त्याच वेळीं जे थोडेंसे रेत पृथ्वीवर रेवानदीच्या तीरीं पडलें न्यांत चमसनारायणानें संचार केला; तेव्हां पुतळा निर्माण झाला. तें मूल सुर्यासारखें दैदीप्यमान दिसूं लागलें. जन्म होतांच त्यानें एकसारखा रडण्याचा सपाटा चालविला. त्याच संधीस सहन सारुख या नांवाचा एक कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता. त्यानें तें मूल रेतीत रडत पडलेलें पाहिलें; तेव्हां त्याचें हृदय कळवळलें. त्यानें त्या मुलांस उचलून घेतलें व घरीं नेलें आणि रेवातीरीं वाळवंटावर पुत्र मिळाल्याचें वर्तमान स्त्रीस सांगितलें व त्यास तिच्या हवली केलें. तिनें आनंदानें त्यास स्नान घालून पाळण्यांत आपल्या पोटच्या मुलाशेजारीं निजविलें. तो रेवतीरीं ' रेवेतं ' सांपडला म्हणुन त्याचें नांव ' रेवणनाथ ' असें ठेविलें. त्यास थोडथोडें समजूं लागतांच तो काम करावयास बापाबरोबर शेतांत जाऊं लागला. तो बारा वर्षांच्या वयांत शेतकीच्या कामांत चांगलाच हुशार झाला.

एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पहाटेंच उठून आपले बैल रानांत चरावयास नेत होता. त्या समयीं लखलखीत चांदणें पडलें होते; ह्यामुळें रस्ता साफ दिसत होता. इतक्यांत दत्तात्रेयाची स्वारी पुढें येऊन थडकली. दत्तात्रेयास गिरिनारपर्वतीं जावयांस होतें. त्यांच्या पायांत खडावा असून त्यांनीं कौपीन परिधान केली होती, जटा वाढविल्या असुन दाढी, मिशी पिंगट वर्णाची होती. असा तिन्ही देवांचा अवतार जे दत्तात्रेय ते जात असतां त्यांची व रेवणनाथाची भेट झाली. त्यास पाहतांच रेवणनाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माचें स्मरण झालें. मग आपण पूर्वीचें कोण, व हल्लीचें कोण व कसें वागत आहों याची त्यास रुखरुख लागली. तसेच मला आतां कोणी ओळखत नाहीं, मी अज्ञानांत पडलों असें त्यास ज्ञान होऊन तो स्तब्ध राहिला. तेव्हां तूं कोण आहेस, असें दत्तात्रेयानें त्यास विचारल्यवर त्यानें उत्तर दिलें, तुमच्या देहांत तिन्ही देवांचे अंश आहेत; त्यांत सत्त्वगुणी जो महापुरुष तो मी असुन मला येथें फारच कष्ट भोगावे लागत आहेत; तर आतां कृपा करुन या देहास सनाथ करावें. इतकें बोलून त्यांनें दत्तात्रेयाच्या पायांवर मस्तक ठेविलें. त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रेयानें आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला. नऊ नारायणाच्या अवतांरांपैकीं हा चमसनारायणाचा अवतार होय, हें दत्तात्रेयास ठाऊक होतें.

त्यास दत्तात्रेयानें त्यास वेळेस अनुग्रह कां दिला नाहीं अशी शंका येईल. पण त्याचें कारण असें कीं, भक्तिमार्गाकडे प्रवृत्ति झाल्यावांचून अनुग्रह देऊन उपयोग नाही; यास्तव भक्तीकडे मग लागलें म्हणजे ज्ञान व वैराग्य सहज साध्य होतें असा मनांत विचार आणुन दत्तात्रेयानें फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली. तेव्हां रेवणनाथास परमानंद झाला. तो त्याच्या पायां पडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रेय निघून गेले. एक सिद्धि प्राप्त झाली तेवढ्यावरच त्यानें समाधान मानल्यानें तो पूर्ण मुक्त झाला नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : February 24, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP