श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय २४

श्रीनवनाथभक्तिसार ही पोथी अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधिपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव मिळतो.


एके दिवशीं सांयकाळी सूर्याची व ऊर्वशीची नजरानजर होऊन सूर्यास कामानें व्यापून टाकिल्यामुळें वीर्यपात झाला. तें वीर्य आकाशांतून पडतांच वार्‍यानें त्याचे दोन भाग झाले. त्यांपैकी एक भाग लोमेशऋषीच्या आश्रमांतील घटामध्यें पडून त्यापासून अगस्तीचा देह उप्तन्न झाला. दुसरा भाग कौलिकऋषीच्या आश्रमास आल. त्या वेळेस तो भिक्षा मागावयास बाहेर जात होता. तो आपलें भिक्षापात्र अंगणांत ठेवून दार लावीत होता. इतक्या अवकाशांत तें वीर्य त्यांत येऊन पडलें. हें ऋषीच्या पाहाण्यांत आलें. त्या वेळीं हें वीर्य सूर्याचें आहे, असें तो समजला. तीन हजार एकशें तीन वर्ष लोटन्यांनतर धृमीननारायण या पात्रांत संचार करील; यास्तव हें नीट जपून ठेवलें पाहिजे, असा विचार करून त्यानें तें भिक्षापात्र नीट जपून ठेवलें.

ह्या गोष्टीस बहुत वर्षे लोटल्यानंतर पुढें कलियुग सुरू झालें. नंतर त्या ऋषीनें तें पात्र मंदराचळाच्या गुहेंत तोंडाशींच नेऊन ठेविलें आणि आपण निघून गेला. पुढें कलीची तीन हजार एकशें तीन वर्षें लोटल्यानंतर द्वारकाधीशानें धृमीननारायणाच्या अवतारामध्यें त्या पात्रांत संचार केला. तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन नऊ महिने पूर्ण भरतांच पुतळा तयार झाला. तो त्यांत सामावेना, तेव्हा त्या पात्राचीं दोन शकलें झालीं. त्यांतलें मूल सूर्याप्रमाणें दैदीप्यमान होतें; पण रडून आकांत करीत होतें.

त्याच संधीस कांहीं हरिणें तेथें चरावयास आलीं. त्यांत एक हरिणी गर्भिणी होती ती चरत तेथें जाऊन प्रसूत झाली. तिला दोन बाळें झालीं; परंतु ती मागें पाहूं लागली तेव्हां तिला तीन बाळें दिसली. तीं तिन्ही मुलें माझींच असा तिला भास झाला. मग ती त्यांस चाटूं व हुंगूं लागली. ती दोन्ही हरणें प्यावयास लागली, पण तिसर्‍यास प्यावयाचें कसें तें माहित नव्हतें. ह्यामुळें तें टकमक पाहूं लागलें. परंतु तिनें युक्तिप्रयुक्तीनें स्तनपान करवून त्या मुलीचें सरंक्षण केलें. पुढें कांहीं दिवसांनी मूल रांगूं लागलें. तिन्ही मुलें एके ठिकाणीं ठेवून ती हरिणी चरावयास जात असे, तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता. ती घडोघडी येऊन त्यांस पाहून पुन्हां चरावयास जाई. याप्रमाणें तीन वर्षे लोटली. मग तो हरिणामध्यें जाऊन झाडपाला खाऊं लागला तो निरंतर आपल्या आई मागे राहीं. अशा रीतीनें त्यानें तिच्या संगतीनें पांच वर्ष काढली.

एके दिवशीं तीं चौघें चरत चरत मार्गावर आलीं असतां त्या वाटेनें एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता. त्यानें हें मूल पाहिलें. त्या भाटाचें नांव जयसिंग व त्याच्या स्त्रीचें नांव रेणुका असें होतें. तीं उभयतां एकमतानें वागत. त्यांनी सूर्याप्रमाणें तेजस्वी असा तो मुलगा तेथें पाहून, अशा सुकुमार व स्वरूपवान् मुलास आईबापांनीं अरण्यांत सोडून दिल्यामुळें त्या मुलाविषयीं त्याच्या मनांत नानाप्रकारे विचार येऊं लागले. जयसिंहास पाहून हरिणी पळून जाऊ लागली व तिच्यामागून तो मुलगाहि धांवत जाऊं लागला. परंतु जयसिंहानें त्यास धरिलें. नंतर तो त्यास म्हणाला मुला, भिऊं नको. तुझीं आईबापें कोठें आहेत तीं मला सांग. मी तुला तुझ्या घरीं नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो. परंतु तें रडून हंबरून आकांत करूं लागलें व मुलगा मनुष्याच्या हाती सांपडल्यामुळें त्या हरिणीसहि परम दुःख झालें. तिला मनुष्याच्या भयानें जवळ येण्यास हिंमत होईना. म्हणुन लांबूनच ती हंबरडा फोडूं लागली.

जयसिंह भाट मुलास म्हणाला, मुला ! तूं रडून असा कां आकांत करून घेत आहेस ? तुझीं आईबापें कोठें आहेत, मला सांग, मी तुला त्यांच्या स्वाधीन करितों. पण मुलाच्या तोंडून एक शब्दसुद्धां निघेना. तो ब्यां ब्यां करून रडत होता. मग मुका असेल असें जयसिंगास वाटलें, म्हणुन तो त्यास हातांच्या खुणा करून विचारूं लागला. परंतु त्या त्यास समजत नसल्यामुळें तो कांहींच उत्तर देईना. सरतेशेवटीं त्यानें त्या मुलास आपल्या घरीं घेऊन जाण्याचा निश्चय केला. मग तो त्यास खांद्यावर घेऊन जाऊं लागला. तो मुलगा ओरडून हरिणीस हांक मारीत होता व ती पाठीमागून येत होती. पण मनुष्याच्या भीतीनें ती जवळ येईना. ह्यांतलें वर्म जयसिंगास काय तें कळेना. ती हरिणी जयसिंगाच्या मागून ओरडत जातच होती. ती बरीच लांबपर्यत गेली, तेव्हां हिचें पाडस रानांत चुकलें असेल, म्हणुन ही रडत आहे असें जयसिंगाला वाटून तो मुलास घेऊन चालता झाला.

मुलास घेऊन जयसिंग जात असतां, सांयकाळ झाल्यावर एका पदरहनी गांवांत वस्तीस राहिला. त्यानें तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला. पुढें मुलास हळूहळू हरिणीचा विसर पडत चालला. त्याला थोडें खाणें, पिणें, बोलणें, चालणें, उठणें बसणें हें सर्व कळूं लागलें.

अशा रीतीनें तो भाट फिरत फिरत काशीस गेला. तेथें भागीरथीचें स्नान करून विश्वेश्वराचें दर्शन घेण्यासाठीं देवालयांत गेला. बरोबर मुलगा होता. दर्शन घेत असतां लिंगातून शब्द निघाला कीं, 'यावें भर्तरी ! तुम्ही अवतार घेऊन प्रकट झालांत, फार चांगलें.' हें शंकराचे शब्द ऐकले. तें ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनांत आली व हा आपल्या पूर्वपुण्याईच्या योगानें आपणांस प्राप्त झाला आहे असेंहि त्यास वाटलें. मग शिबिरास गेल्यावर त्यानें हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून ह्याचें भर्तरी नांव ठेवून याचें पुत्राप्रमाणें पालन कर, ही अलभ्य जोड आपणांस प्रयत्‍नावांचून कर्मधर्मसंयोगानें प्राप्त झाली आहे, असे सांगितलें.

'यावें भर्तरी' म्हणुन शंकरानें कां म्हटलें, अशी कदाचित कोणी कल्पना काढील. तशी हांक मारण्याचें कारण असें कीं, त्याचा जन्म भर्तरीमध्यें झाला म्हणुन शंकरानें त्याच नांवानें त्यास हांक मारली. असो, शंकराच्या देवालयांतला वृत्तांत जयसिंगानें रेणुकाबाईस कळविल्यानंतर तिला परमानंद झाला. त्या दिवसापासुन तीं उभयतां त्यास भर्तरी असें म्हणूं लागली. त्यांस पुत्र नसल्यामुळें त्यांची भर्तरीवर अत्यंत प्रीति जडली. तीं त्याचें लालनपालन उत्तम प्रकारें करीत. त्यासहि आनंद होऊन तो त्यांशीं त्यांच्या मनाप्रमाणें वागे. त्यांस हा मुलगा प्राप्त झाल्यानें अतिशय हर्ष झाला होता. परंतु त्या मुलाच्या आईबापांस, तो चुकल्यामुळें परम दुःख होत असेल, तीं ह्याचा तपास करीत असतील, व आपली भेट झाल्यास त्यास आपणांपासून घेऊन जातील, अशी शंका त्यांच्या मनांत वारंवार येई. मग ती त्याच क्षेत्रांत राहून भिक्षा मागुन आपला उदरनिर्वाह करूं लागली.

भर्तरीस संपूर्ण राजयोग होता. तो गांवांतली मुलें जमवून अनेक प्रकारचे खेळ खेळतांना आपण राजा बनून दुसर्‍यांस कामदार करी. अश्व, पायदळ, मंत्री आदिकरून सर्व मुलांस निरनिराळे वेष देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहुब थाट आणीत असे. जसजसा योग असेल तशतशीं त्याच्या हातून कृत्यें घडत.

एके दिवशीं काठीचे घोडे करून खेळत असतां भरधांव पळत व तोंडानें हो हो म्हणत आणि त्यांची पाठ थोपटीत, ते गांव सोडून अरण्यांत गेले. तेथें खेळतांना भर्तरिस ठेंच लागून तो उलथून खाली पडला. अगदी बेशुद्ध झाला. त्यानें जेव्हां डोळे पांढरे केले तेव्हां मुलें भिऊन पळून गेलीं व हा आतां मेला व भूत होऊन बोकांडीस बसेल आणि आपणांस खाऊन टाकील असें म्हणुं लागली. मग सर्व मुलें तेथून पळून भागीरथीच्या कांठीं जाऊन विचार करूं लागलीं कीं, भर्तरी भूत होऊन गांवांत हिंडेल व आपणांस खाऊन टाकील, ह्यास्तव आतां आपण बाहेर जाऊं नये. ज्यानें त्यानें आपपल्या घरींच खेळावें. असा तीं आपसांत विचार करून घरीं गेलीं.

इकडे भर्तरी अगदीच बेशुद्ध होऊन निश्चेष्ट पडला. त्याचें सर्वांग दगडाने ठेचून गेल्यामुळें अंगांतून रक्त निघाले होतें. सर्व प्रकार सूर्यानें पाहिला व त्यास पुत्रमोहास्तव कळवळा आला. तत्क्षणीं त्यानें भूतलावर येऊन, प्रेमानें मुलास उचलून पोटाशीं धरिलें. नंतर भागीरथीचं उदक आणुन त्यास पाजलें व सावध केलें. मग कृपाद्दष्टीनें त्याच्याकडे पाहतांच त्याचा देह पूर्वीप्रमाणें झाला. इतकें झाल्यावर सूर्यानें विप्राचा वेष घेतला आणि भर्तरीस घरीं आणून पोंचविलें. येतांना वाटेंत भर्तरीस पोरांनीं ओळखून तो भुत होऊन आला, असें तीं ओरडूं लागली आणि भिऊन घरोघरी जाऊन लपून राहिली.

सूर्यानें भर्तरीस घरीं नेऊन रेणुकेच्या स्वाधीन केलें, तेव्हां ती त्यांची विचारपूस करूं लागली. तो तेजःपुंज ब्राह्मण पाहून तिनें त्यास आसनावर बसविलें आणि म्हटलें, महाराज ! तुम्ही अति ममतेनें या मुलास घेऊन आलां आहां, त्याअर्थी आपण कोठून आलां व आपलें नांव काय हें सर्व मनांत काडीभर सुद्धां संशय न आणितां सांगावें. तेव्हां सूर्य म्हणाला, मी या मुलाचा बाप आहे; म्हणुन ममतेनें मी ह्यास तुजकडे घेऊन आलों आहें व मीं तुला या मुलास अं:तकरणपूर्वक अर्पण केलें आहे. ह्यास्तव तूं मनांत कोणत्याहि प्रकारची आकांक्षा आणिल्यावांचून ह्याचें संगोपन कर. तें ऐकून, तुम्हीं याचे जनक कसे, असें रेणुकेनें विचारल्यावर तो म्हणाला, मी विप्रवेषानें तुजकडे आलों आहें म्हणुन तुं मला ओळखलें नाहींस. सुर्य म्हणून देव म्हणतात तो मी. असें सांगून मुळापासून भर्तरीची कथा सांगून त्याचें हरिणीनें संगोपन कसें केलें व तो त्यांच्या हातीं कसा आला हा सर्व साद्यंत वृत्तांत सांगितला. शेवटीं तो तिला म्हणाला, हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असें मानून निर्धास्तपनें तूं याचें संरक्षण कर. हा पुढें मोठमोठालीं कृत्यें करून लौकिकास चढेल. तुझें भाग्य उदयास आलें म्हणून हा तुला प्राप्त झाला. असें तिला सांगून विप्रवेषधारी सूर्य निघून गेला.

ह्या वेळेस तिचा नवरा जयसिंग घरीं नव्हता. तो येतांच तिनें हें वर्तमान त्यास सांगितलें; तें ऐकून त्यासहि परमानंद झाला. त्याच्या संशयाची निवृत्ति झाली. मग त्याचें त्यावर पूर्ण प्रेम बसलें. मुलाचें वय सोळा वर्षाचें होईपर्यंत ती काशींत राहिली. पुढें मुलांचें लग्न करण्याचा विचार मनांत आणून तीं आपल्या गांवीं जाण्यासाठीं काशीहून निघाली. तों मार्गात अरण्यामध्यें चोरांनी जयसिंगास ठार मारून व त्याजवळचें सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले. पतीचें दुःख दुःसह होऊन रेणुकाहि गतप्राण झाली. मग भर्तरीनें उभयतांना अग्नि देऊन दहन केलें. तो निराश्रित होऊन शोकसागरांत बुडून गेला. त्यास शोक आवरेना व निराश्रित झाल्या मुळें तो अनेक प्रकारच्या विवंचनेंत पडला.

त्या वेळीं कांहीं व्यापारी व्यापारासाठीं त्याच मार्गानें जात होते ते भर्तरीस पाहून त्याच्यापाशीं गेलें. त्यांना त्याची दया आली आणि त्यांनीं त्यास विचारल्यावरून भर्तरीनें त्यास सर्व प्रकार निवेदन केला. मग त्यांनी त्यास बोध केला कीं, प्रारब्धीं होतें तसें झालें, आतां तुं रडून कपाळ फोडून घेतलेंस तरी तीं आतां पुन्हां परत येणार नाहींत. ह्या रीतीचा त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गेले, ते त्यास अन्नवस्त्र देत व तोहि त्यांचें कामकाज करी. असें कांहीं दिवस लोटल्यावर व्यापार्‍यांच्या सहवासानें त्यास आपल्या दुःखाचा थोडाथोडा विसर पडत चालला पुढें ते कांहीं दिवसांनीं अवंतीनगरी येऊन पोचले.

N/A

References : N/A
Last Updated : February 18, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP