श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय २९

श्रीनवनाथभक्तिसार ही पोथी अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधिपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव मिळतो.


मागें एका अध्यायांत सांगितल्याप्रमाणें गर्भाद्रिपर्वतावर मच्द्रिंनाथ राहिला व गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होता. त्यानें गिरिनारास जाऊन दत्तात्रेयाची भेट घेतली. तो दत्तात्रेयाच्या पायां पडल्यावर दत्तात्रेयानें तोंडावरून हात फिरविला व मच्छिंद्रनाथ कोठें आहेत व तूं इकडे कोठें आलास, म्हणुन विचारलें. तेव्हां गर्भाद्रिपर्वतावर मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करावयास राहिले आहेत व त्यांनीच सांगितल्यावरून व मी तीर्थ करीत करीत आपल्या चरणांजवळ आलों, असें गोरक्षनाथानें सांगितलें. नंतर दत्तात्रेयानें गोरक्षनाथास सांगितलें, मला तुझ्यापासून एक कार्यभाग करून घ्यावयाचा आहे. तो असा कीं, भर्तुहरीवर मी अनुग्रह केला, पण तो आपल्या बायकोसाठीं स्मशांनांत शोक करीत राहिला आहे. या गोष्टिस आज बारा वर्षे झाली. तो गवत, पानें खाऊन जिवंत राहिला. तरी तूं तेथें जाऊन त्यास सावध कर. हें सर्व जग मिथ्या, अशाश्वत आहे, असें त्याच्या अनुभवास आणून दे व त्यास नाथ पंथांत आण. मी त्यास मागें उपदेश केला तेव्हां त्यानें 'मी नाथपंथास अनुसरीन' असें माझ्याजवळ कबूल केले होते. असें सांगून भर्तृहरीची जन्मापासूनची संपूर्ण हकीकत सांगितली. ती ऐकून घेतल्यानंतर गोरक्षनाथानें दत्तात्रेयास सांगितलें कीं, आपल्या कृपेनें मी हें कार्य करून येतों. नंतर दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन आणि त्यास वंदन करून तो निघाला.

मग गोरक्षनाथानें व्यानअस्त्राचा जप करून कपाळी भस्म लावतांच तो एक निमिषांत पन्नास योजने लांब अवंतीस गेला. तेथें स्मशानामध्यें भर्तृहरी बसला होता. शरीर अगदीं क्षीण झालें होतें व त्यास पिंगलेचा एकसारखा ध्यास लागला होता. त्याची स्थिती पाहतांच गोरक्षास अत्यंत वाईट वाटलें. त्यानें असा विचार केला कीं, या समयीं हा पिंगलेच्या विरहानें अगदीं भ्रमिष्टासारखा होऊन गेला आहे. अशा वेळीं जर मी ह्यास उपदेश करीन, तर फायदा होण्याची आशा नाहींच, पण उलट माझें सर्व भाषण मात्र व्यर्थ जाईल. यास्तव तो आपल्या सांगण्यास अनुकूल होऊन आपल्या मनाप्रमाणें वागले अशी युक्ति योजून कार्यभाग साधून घ्यावा.

त्याप्रमाणें विचार करून गोरक्षनाथानें कुंभाराकडे जाऊन एक मडकें विकत घेतलें व त्यास बाटली असें नाव दिलें. नंतर त्या मडक्यास चित्रविचित्र रंग देऊन सुशोभित केल्यावर तें तो स्मशानांत घेऊन गेला. तेथें ठेंच लागली असें ढोंग करून तो जमिनीवर पडला व बेशुद्ध झाल्यासारखें त्यानें केलें. त्या वेळेस बाटली ( मडकें ) फुटून गेली असें पाहून तो रडूं लागला. त्यानें तिच्यासाठीं फारच विलाप केला. त्यानें त्या खापराचें सर्व तुकडे जमा करून जवळ घेतले आणि रडत बसला, ती आपणास अत्यंत उपयोगाची होती व मी मरून ती बाटली राहिली असती तर फार नामी गोष्ट पडती, अशा भावार्थाच्या शब्दांनी फारच विलाप करून 'बाटली ! बाटली !' म्हणून मोठमोठ्यानें गोरक्षनाथ रडत बसला. हें पाहून जवळच बसलेला भर्तृहरीस नवल वाटले. त्यास राहून राहून हसूं येई. गोरक्षनाथ एकसारखा धायधाय रडत होता. तो म्हणे, माझें बाटलीधन कोण्या दुष्टानें हिरावून नेलें ! हे बाटले ! एकदां मला तुझें तोंड दाखीव पाहू. अशा प्रकारचा त्याचा विलाप ऐकून भर्तृहरी पिंगलेचा नाद विसरला. अर्ध्या पैशाची त्या बाटलीची किंमत आणि तेवढ्यासाठीं 'बाटली, बाटली' म्हणत रडत असलेला गोरक्षनाथास पाहून भर्तुहरीस उगीच बसून राहवेना. तो गोरक्षनाथास म्हणाला, मडक्याची किंमत ती काय व तेवढ्यासाठीं मूर्खाप्रमाणें तूं योगी म्हणवीत असतां रडत बसला आहेस, हें काय ? तेव्हा गोरक्षनाथ विचारूं लागला, राजा ! तूं कोणासाठीं दुःख करून शोक करीत बसला आहेस बरें ? आवडत्या वस्तुच्या दुःखाचा अनुभव तुला आहेच. त्याचप्रमाणें माझी बाटली फुटल्यामुळें मला किती दुःख झालें आहे हें माझें मीच जाणतो ! हें ऐकून भर्तृहरी म्हणाला मी मडक्यासारख्या क्षुल्लक वस्तुकरितां शोक करीत नाहीं. प्रत्यक्ष माझ्या पिंगलाराणीचा घात झाला आहे; म्हणून तिचें मला भारी दुःख होत आहे. ती मला आतां पुन्हां प्राप्त व्हावयाची नाहीं, परंतु अशीं मडकीं हवीं तितकीं मिळतील. तें ऐकून गोरक्षनाथानें सांगितलें कीं, तुझ्या पिंगलेसारख्या लक्षावधि पिंगला एका क्षणांत निर्माण करून देईन; पण माझ्या बाटलीसमान दुसरी बाटली कदापि मिळावयाची नाहीं. तेव्हां भर्तृहरीनें म्हटलें कीं, तुं लक्षावधि पिंगला उत्पन्न करून दाखीव म्हणजे मी तुला लाखों बाटल्या निर्माण करून देतो; उगीच थापा मारून वेळ साजरी करून नेऊं नकोस तें ऐकून, जर मी पिंगला उत्पन्न करून दाखविल्या तर तूं मला काय देशील म्हणून गोरक्षानें भर्तृहरीस विचारलें, तेव्हां आपलें संपूर्ण राज्य देण्याचें भर्तृहरीनें कबूल केलें व दैवतांना साक्षी ठेवून बोलल्याप्रमाणें न केल्यास माझे पूर्वज नरकवास भोगतील आणि मीहि शंभर जन्म रवरव नरक भोगीन, अशी भर्तृहरीनें प्रतिज्ञा केली. मग गोरक्षनाथ त्यास म्हणाला, तूं आपलें बोलणें खरें करून न दाखवशील, तर शंभर जन्मच नव्हे, पण सहस्त्र जन्मपर्यंत नरक वास भोगशील.

नंतर गोरक्षानें कामिनीअस्त्राचा जप करून पिंगलेच्या नांवाने भस्म सोडतांच लक्षावधि पिंगला खाली उतरल्या. पिंगला राणीप्रमाणें त्या सर्वांची रूपें पाहून राजांस आश्चर्य वाटलें. त्या सर्व जणी भर्तृहरीजवळ बसून संसाराच्या खाणखुणा विचारूं लागल्या. त्यांनीं राजाच्या प्रश्नांचीं उत्तरे बरोबर दिली. शेवटीं पिंगलेनें राजास बोध केला कीं, माझ्या विरहानें तुम्हांस दुःख झालें ही गोष्ट खरी आहे; परंतु अशाश्वताचा भार वाहणें व्यर्थ होय. मी तुमच्यावर मनस्वी प्रीति करीत असतां आपणास जाळून घेतले; परंतु गोरक्षनाथानें मला पुन्हां दृष्टिगोचार केलें. तथापि शेवटीं आम्हांस व तुम्हांस मरावयाचें आहेच, तें कदापि चुकावयाचें नाहीं. यास्तव आतां माझा छंद सोडून देऊन तुम्हीं आपल्या देहाचें सार्थक करून घेऊन मोक्षाची प्राती करून घ्यावी. फक्त माझा ध्यास धरल्यानें तुम्ही मुक्तीला मात्र अंतराल. मी तुमची कांता असतांना पतिव्रताधर्म आचरून आपलें हित करून घेतलें. आतां तुम्हीं आपल्या हिताचा मार्ग पाहावा. हा सर्व चमत्कार पाहून राजास विस्मय वाटला.

मग भर्तृहरी गोरक्षानाथाच्या पायां पडण्यासाठीं धांवला. तेव्हां गोरक्षानाथानें त्यास हातीं धरून सांगितलें, राजा, माझा गुरु मच्छिंद्रनाथ हा दत्तात्रेयाचा शिष्य आहे व तुलाहि त्या दत्ताचाच अनुग्रह झालेला आहे. तर तूं माझ्या गुरुचा बंधु आहेस म्हणून मला गुरुस्थानीं आहेस, सबब मी तुझ्या पायां पडणें योग्य होय व म्हणुन मीच तुला साष्टांग नमस्कार करितों. राजा, आतां मला सांग कीं, तुझ्या मनांत काय आहे ? पिंगलेसहवर्तमान राज्यसुखाचा उपभोग घेण्याचे इच्छा आहे का वैराग्यवृत्ति घेऊन जन्माचें सार्थक करून घेणार ? तें ऐकून राजानें सांगितलें कीं, मी पिंगलेसाठीं बारा वर्षें भ्रमिष्ट होऊन बसलों होतों, परंतु ती माझ्या दृष्टीस पडली नव्हती. तूं योगसामर्थ्यानें हां हां म्हणतां शेकडों पिंगला मला दाखविल्यास, हें सामर्थ्य राज्यवैभवांत दिसत नाहीं. मी भ्रांत पडून श्रीगुरुच्या हातून निसटलों आणि मोठ्या संकटांत पडलों आतां कृपा करून मला दत्तात्रेयाचें दर्शन करव. मी योगमार्गाचा स्वीकार करणार.

दत्तात्रयाच्या दर्शनास जाण्यापूर्वी भर्तृहरी गोरक्षनाथास म्हणाला कीं, तूं ह्या सर्व पिंगला अदृश्य कर व राज्यकारभार आपल्या हातांत घेण्यासाठीं राजवाड्यांत चल. तें भर्तृहरीचें म्हणणें गोरक्षनाथानें कबूल करून पिंगला अदृश्य केल्या व त्यास घेऊन तो नगरांत गेला. त्या वेळेस सर्वांना आनंद झाला. विक्रमराजानें गोरक्षनाथास सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्याची षोडशोपचारांनीं पूजा केली.

भर्तृहरीस कोणत्या युक्तीनें देहावर आणिलें हें मला कृपा करून सांगावें, अशीं गोरक्षनाथाची विक्रमराजानें प्रार्थना केली. तेव्हां त्यानें घडलेला सर्व प्रकार त्यास निवेदन केला व पूढचा संकेतहि त्याच्या कानांवर घातला. मग विक्रमानें त्या दोघांस आणखी सहा महिनेपावेतों तेथें राहण्याचा आग्रह केला. बारा वर्षेपर्यंत भर्तृहरी केवळ झाडांची पानें खाऊन राहिल्यानें अगदी क्षीण होऊन गेला आहे, व तितक्या अवकाशांत त्यास कांहीशीं शक्ति येईन असें विक्रम म्हणाला. तेव्हां गोरक्षनाथानें सांगितलें कीं, आज जी राजाची बुद्धि आहे तीच पुढें कायम राहील हा नेम नाहीं, म्हणुन आमच्यानें येथें राहवत नाहीं. परंतु विक्रमानें अति आग्रह केल्यावरून तो तीन रात्रीं तेथें राहून भर्तृहरीस बरोबर घेऊन निघाला. त्या वेळेस भर्तृहरीच्या स्त्रियांनीं गोरक्षनाथावर फार रागवून शिव्यांची वृष्टि केली. परंतु विक्रमराजानें आनंदानें उभयतांची रवानगी केली. त्या वेळीं गांवची दुसरी बरींच मंडळीहि त्यास पोचविण्यासाठी विक्रमराजाबरोबर गेलेली होती. गोरक्षनाथानें भर्तृहरीस स्पष्ट सांगितलें कीं, जर तुझें मन संसारांत गुंतत असेल तर तुं अजून माघारी जा आणि खुशाल संसारसुखाचा उपभोग घे. मी आडकाठी करीत नाहीं. पण भर्तृहरीस तें बोलणें रूचलें नाहीं. आपण संसारास विटलों, असें त्यानें निक्षून सांगितलें. मग गोरक्षनाथानें आपली शैली, शिंगी, कंथा त्यास देऊन भिक्षेकरितां झोळी दिली. प्रचीति पाहण्यासाठीं त्याच्याच स्त्रियांकडे भिक्षा मागावयास त्याला पाठविलें. तेव्हां स्त्रियांनीं रडून गोंधळ केला. त्याचे गूण आठवून त्या त्यास राहण्यासाठी आग्रह करूं लागल्या. पण भर्तृहरीचें मन डगमगलें नाहीं. तो त्यांचा तिरस्कार करून निघून गेला. मग विक्रम वगैरे सर्व मंडळी परत नगरांत गेली. विक्रमानें भावजयांची समजूत करून त्यांचें शांतवन केलें.

भर्तृहरी फार अशक्त झालेला असल्यानें वाट चालतांना त्याच्या नाकीं नउ आलें तें पाहून गोरक्षनाथानें यानास्त्राची योजना करून भस्म मंत्रून त्याच्या कपाळास लावतांच भर्तृहरीचा अशक्तपणा गेला व ते दोघे डोळे मिटून एका क्षणांत गिरिनार पर्वतावर आले आणि दत्तात्रेयाचें दर्शन घेऊन पायां पडले. दत्तानें त्यांच्या तोंडावरून हात फिरविला व त्यांचें समाधान केलें.

N/A

References : N/A
Last Updated : February 18, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP