मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|करुणापर पदे|
तव पदीं विनंती असे एकची स...

भक्ति गीत कल्पतरू - तव पदीं विनंती असे एकची स...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


तव पदीं विनंती असे एकची सद्‌गुरुनाथा ।

तव स्वरुपावांचुनी विषय दिसो न सर्वथा ॥धृ०॥

वृत्ती मम ही उठुनी जाई जरी ती बाहेर ।

तरी तव स्वरुपावांचुनी करो न अन्य व्यवहार ।

तत्‌चिंतनीं ही, वृत्ती राहो सदा तत्पर ।

तत्‌कथनीं तत् श्रवणीं, वृत्तीं होवो तदाकार ।

आंस ही पुरवा म्हणुनी ठेवितें चरणीं मी माथा ।

तव स्वरुपावांचुनी० ॥१॥

जी वस्तु मी पाहे ती दिसो मज सच्चिदानंद ।

सत्‌वस्तु पाहण्याचा लागो सद्‌गुरु मज छंदा ।

वस्तु पाहातां व्हावा अंतरीं बाहेरी स्वानंद ।

त्या स्वानंदीं मुरुनी व्हावा मज ब्रम्हानंद ।

तुजवांचुनी कोण समर्थ सद्‌गुरु ताता ।

तव स्वरुपावांचुनी० ॥२॥

तव कृपेने वृत्ती सद्‌गुरु राहो मुरुनी ॥

हें जाणुनीया अनन्य शरण आलें तव चरणीं ।

तव कृपाप्रसादें द्वैत टाकी काढुनी ।

तत्पदींचें तीर्थ तें ब्रम्ह करी तत्‌क्षणीं ।

म्हणे वारी ही सद्‌गुरु ऐसी अघटीत तव सत्ता तव स्वरुपावांचुनी० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP