मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश

गीत महाभारत - भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


सेनापती भीष्म पडल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. द्रोणांना हे कळताच ते रथातच गाफील झाले. सर्व राजे योद्धे कवच काढून भीष्मांना वंदन करण्याकरिता त्यांच्या शय्येपाशी आले. भीष्मांनी त्यांचे अभिवादन स्वीकारले. कौरव-प्रमुखांनी आणि पांडवांनी पितामहांना नमस्कार करुन प्रदक्षिणा घातली. आपण उत्तरायण लागताच देहत्याग करु असे त्यांनी सर्वांना सांगितले. जलधारा काढण्याच्या विक्रमाबद्दल त्यांनी अर्जुनाची प्रशंसा केली. दुर्योधनाला त्याक्षणी सांगितले की अर्जुनाने जे केले ते पृथ्वीवर कोणी वीर करु शकणार नाही. सर्व तर्‍हेची अस्त्रविद्या त्याला ज्ञात आहे. वैष्णव, आग्नेय, वारुण, पाशुपत इत्यादी सर्व अस्त्रे अर्जुन व दुसरा कृष्ण एवढेच दोघे जाणतात. अशा शक्‍तिशाली पांडवांना युद्धात जिंकणे केवळ अशक्य आहे. त्यांच्याशी समेट कर. जोपर्यंत सेनेचा व महारथींचा अधिक नाश होत नाही तोपर्यंत पांडवांशी तह करुन युद्धविराम कर. इंद्रप्रस्थ त्यांना दे; तुमच्यात बंधुभाव वाढू दे; ह्यातच सर्वांचे हित आहे.

भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश

दिव्यास्त्र अर्जुनाचे तू आज पाहिले ना

संधी करुन राजा, दे राज्य पांडवांना ॥धृ॥

जल काढिले शराने तू अर्जुना क्षणात

महनीय कर्म असली करशील जीवनात

तुज जिंकण्यास शक्‍ती मनुजात नाहि कोणा ॥१॥

पक्ष्यात गरुड श्रेष्ठ, हिमवान पर्वतात

आदित्य तेजसात, अर्जून मानवात

हा एक अस्त्रवेत्ता जगतात श्रेष्ठ जाणा ॥२॥

तू ऐक शब्द माझा दुर्योधना हिताचा

माझ्यासवे नरेंद्रा करि अंत या रणाचा

देई तुझ्या कृतीने आनंद या नृपांना ॥३॥

कुरुसैन्य जोवरी हे जाईल ना लयाला

क्रोधात भीम सगळ्या जाळील ना चमूला

तू तोवरी शमाचा संदेश दे तयांना ॥४॥

दुर्योधना असे मी शय्येवरी शरांच्या

हे सांगणे हिताचे आहे कुरु-कुलाच्या

द्यूतात राज्य गेले त्यांचेच देई त्यांना ॥५॥

सोडून क्रोध, द्वेषा, सोडून वैरपाशा

करि सख्य पांडवांशी, हो शांत कौरवेशा

क्षत्रीय अन्यथा हे मुकतील व्यर्थ प्राणा ॥६॥

माझा अखेरचा हा मृत्यू ठरो रणीचा

येथून काळ येवो सर्वास शांततेचा

बंधूंत सख्य होता, सीमा नसे सुखांना ॥७॥

स्वीकार शब्द माझे, आहे अखेरचे हे

ठरशील घातकी तू, रण थांबवी अता हे

नाशाकडे नको रे नेऊस कौरवांना ॥८॥

होता समेट तुमचा शांती मिळो प्रजेला

भेटो पिता सुताला, भेटो सखा सख्याला

भोगा स्वकीय राज्ये, दोघेहि वैभवांना ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 17, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP