मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
कुंतीचा कर्णासाठी शोक

गीत महाभारत - कुंतीचा कर्णासाठी शोक

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


पांडूराजाचा विवाह कुंतीशी झाला होता. कुंतीला तिच्या पित्याने आपल्या मित्राला कुंतिभोजराजाला दत्तक दिले होते. त्याने त्या कन्येला ऋषिमुनींच्या आतिथ्याच्या कामावर नेमले होते. दुर्वासांची उत्तम सेवा केल्याने त्यांनी आपणहून तिला वशीकरण मंत्र दिले. या मंत्रांच्या सामर्थ्याने ती ज्या देवाला आवाहन करेल तो वश होऊन त्याच्यापासून तिला पुत्रप्राप्ती होईल असे मुनीने सांगितले. काही काळ गेल्यावर कुंतीने पोरबुद्धीने कुमारी असतानाच सूर्यदेवास आवाहन केले. सूर्यदेव उपस्थित झाल्यावर तिने भयापोटी त्यांना परत जाण्यास सांगितले. पण ते आता शक्य नव्हते. तसे झाल्यास तिचा पिता व मुनी दोघेही शापदग्ध झाले असते. शेवटी अगतिक होऊन तिने सूर्यासारखाच तेजस्वी पुत्र लाभावा अशी इच्छा व्यक्‍त केली. तिला सूर्यदेवापासून मंत्रबलाने जो पुत्र झाला तो कर्ण ! त्याला दिव्य कवचकुंडले लाभली होती. सूर्याच्या कृपेने तिला तिचा कन्याभाव परत मिळाला. कुंतीने गरोदरपणाचे दिवस गुप्ततेने काढले. पित्याच्या अपकीर्तीच्या भयाने तिने जन्मतःच त्या बाळाचा त्याग केला. रात्रीच्या अंधारात त्याला मंजुषेत घालून ती मंजुषा अश्वनदीत सोडून दिली. तीरावर बसून वाहणार्‍या मंजुषेकडे पाहात तिने बाळासाठी आक्रोश केला. त्या एकांतात तिच्या शोकाला कुठलीही सीमा राहिली नाही ! तिथे तिच्यासोबत फक्‍त एक दासी होती.

कुंतीचा कर्णासाठी शोक

सोडतांना हि मंजुषा

अश्वनदीच्या पाण्यात

शोक मावेना मनात

थरथरती गे हात ॥१॥

आळविते जगदीशा

हाति तुझ्या दिलं बाळ

अश्रू ढाळीत पाहिली

त्याची कवच-कुंडलं ॥२॥

तारकांच्या देवतांनो

तुम्हा सोपलं तान्हुलं

वाहणार्‍या या जळात

देवा वरुणा सांभाळ ॥३॥

धन्य पिता सूर्यदेव

पाहीलं तो मंजुषेला

सर्व देवतांचे छत्र

ऊन-वार्‍यात रे तुला ॥४॥

डोळे कमळासारखे

किती मोहक विशाल

दिव्य रुपाचा ग पुन्हा

दिसेल का माझा बाळ ? ॥५॥

गेला जरी दूरदेशी

तुला घेईन जाणून

तेज मुखी तुझ्या असे

कुंडलाची तुझी खूण ॥६॥

कोण वनिता तुजसी

बाळं अपुले मानील

तुझ्या शिरावर हात

ममतेने जी धरील ? ॥७॥

सुखावेल हृदयात

तुला उराशी धरता

धन्यधन्य खरोखरी

तुला पाजेलं जी माता ॥८॥

धन्य धन्य जी पाहील

रांगताना तुला बाळा

कवटाळील प्रेमाने

धूळ माखलेल्या तुला ॥९॥

कोण म्हणेल छकुल्या

तुला चांदण्याचं गाणं

कोण धन्य ऐकील रे

तुझं बोबडं बोलणं ॥१०॥

दूर गेला ग सोनूला

उरी दाटतसे भय

माझे हृदय पाषाणं

सखे केले ग मी काय ? ॥११॥

आसवात बुडते मी

सखे मन ग व्याकुळं

देव देतिल का बाळा

कृष्णासारखं गोकूळं ? ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP