मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
भगवंताची अमरवाणी

गीत महाभारत - भगवंताची अमरवाणी

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


दुर्योधनाने अनेक राजांचा पाठिंबा मिळविला. शल्याला तर एक डाव खेळून आपलेसे केले. तो पांडवांकडे जात असताना त्याचे ठिकठिकाणी एवढे मोठे सत्कार केले की त्याने आनंदाने सेवकांना सांगितले की राजाला सांगा ---- तो मागेल ते मी देईन. त्याला वाटेल युधिष्ठिराने हे सर्व केले आहे. पण ते सर्व दुर्योधनाने केले होते. दुर्योधनाच्या इच्छेप्रमाणे शल्याला त्याच्याकडून लढणे भाग आले. दुर्योधनाची सेना अकरा अक्षौहिणी होती. पांडवांनाही अनेक राजे येऊन मिळाले. त्यांची सेना सात आक्षौहिणी होती. कौरवांचे सेनापती भीष्म होते तर पांडवांचा सेनापती द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न होता. धर्मयुद्धाचे नियम ठरले. चतुरंग सेना एकमेकासमोर उभ्या राहिल्या. प्रत्येक अक्षौहिणी सेनेवर एक एक महारथी प्रमुख म्हणून नेमला होता. या युद्धात इतक्या देशांच्या राजांचा समावेश होता की हे भारतयुद्ध त्या काळातील ’महायुद्ध’च होते. अर्जुनाने सारथी कृष्णाला आपला रथ दोन्ही सेनांच्या मधे आणायला सांगितला. त्याने कौरवसैन्यात भीष्म, द्रोण, धृतराष्ट्रपुत्र, शल्य हे सर्व पाहिले. या आप्तांची गरुंची हत्या करुन आपण काय मिळवणार ? या प्रश्नाने तो खचला. धैर्य गमावून रथात बसला. गुरुहत्या, कुलक्षय हे पातक करण्यापेक्षा युद्ध न करणे बरे असे त्याला वाटले.कृष्णाने त्याला रणभूमीवर त्याच्या प्रश्नाची उकल करुन आत्म्याचे अविनाशित्व, पुनर्जन्म, निष्कामकर्मयोग, मोक्षकल्पना या विषयीचे आध्यात्मिक ज्ञान गीतेच्या रुपाने दिले.

भगवंताची अमरवाणी

कसे सोडसी युद्ध अर्जुना काय मनाची स्थिती ?

कसले हे भय वाटे तुजला, कुठे हरपली मती ? ॥धृ॥

गांडिव टाकुन रथी बैसला

वदन कोरडे, कंप शरीरा

धीर तुझा आरंभिच खचला

गुरुजन पाहुन पुढती, अनुचित विचार तुज घेरती ॥१॥

कसे तुझे मन झाले दुर्बळ

तू तर योद्धा श्रेष्ठ धनुर्धर

वार करावा दुष्ट शत्रुवर

बंधू घातक बंधू कसला ? रिपूच त्या मानिती ॥२॥

आत्मा चेतन देह अचेतन

वसे नित्य तो देहा व्यापुन

देहभिन्न तो अचिंत्य निर्गुण

जन्मजरामृत्यूसम असती देहासी विकृती ॥३॥

स्वरुप आत्म्याचे घे जाणुन

अविनाशी अव्यक्‍त सनातन

होइ न त्याचे छेदन, शोषण

तो नच कोणा मारी, नच त्या मारि कुणी जगती ॥४॥

जुने टाकुनी नवे घालती

मानव वस्त्रे अंगावरती

तद्वत नवदेहाची प्राप्ती

जन्म-मरण ये चक्रगतीने परस्परामागुती ॥५॥

वीरांचे रणि मृत्यू होतिल

रणी गृही वा योद्धे मरतिल

वधास या तू निमित्त केवळ

काळाच्या दाढेतुन पार्था कुणी न सुटला कधी ॥६॥

क्षात्रधर्म युद्धाचा आठव

निंदतील जन भ्याला पांडव

ऊठ, शौर्य तू रणात दाखव

रणात मरता स्वर्गप्राप्ती, जयात हो भूपती ॥७॥

धरुनि फलाशा कृति जी असते

बंधनकारक कर्म जाण ते

कर्मामागिल बद्धि ठरविते

कर्माची शुद्धता, अर्जुना सोड फलासक्‍ती ॥८॥

बंध-मुक्‍तिचे चित्तच कारण

गंगाजलवत ठेवि शुद्ध मन

सर्वहि कर्मे करि मज अर्पण

कर्मयोग निष्काम असा हा देइ नरा मुक्‍ती ॥९॥

सज्जनरक्षण दुष्ट-विनाशन

करण्या धर्माचे संस्थापन

जन्म घेत मी युगायुगातुन

नसे काहि प्राप्तव्य, कार्यरत तरी जगासाठी ॥१०॥

उदरी माझ्या भुवने वसती

मीच चंद्रसूर्यातिल ज्योती

श्रेष्ठ मजहुनी कुठलि न शक्‍ती

प्रलय घडवितो मी विश्वाचा, करि सृष्टी कल्पांती ॥११॥

समबुद्धीने जगी वागतो

सत्य अहिंसा अंगि बाणतो

सर्वां-भूतीं ईश पाहतो

स्थितप्रज्ञ तो पुरुष तुल्य ज्या वाटे निंदा-स्तुती ॥१२॥

जळी, स्थळी जो मजसी पाही

पाहि सर्वही जो मजठायी

कधी अंतरत मी त्यां नाही

नाहि अंतरत मजसी तोही, महान योगी व्रती ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP