मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
गांधारीचा शोक

गीत महाभारत - गांधारीचा शोक

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


अश्वत्थाम्याशी युद्ध करुन त्याचा पाडाव केला व मणी मिळविला. अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडले होते. इकडे अर्जुनानेही भीमाला वाचवायला त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडले. ह्या भयानक अस्त्रांनी जगाचा नाश होऊ नये म्हणून व्यासांच्या सांगण्यावरुन अर्जुनाने अस्त्र मागे घेतले. अश्वत्थाम्याला ते घेता आले नाही. ते उत्तरेच्या गर्भावर त्याने सोडले. पण कृष्णाने अश्वत्थाम्याला शाप दिला की तो रोगजर्जर होऊन हजारो वर्ष वनात भटकत राहील. उत्तरेच्या मृतपुत्राला परिक्षिताला कृष्णाने जिवंत केले. इकडे हस्तिनापुरी विदुर व संजय यांनी शोकाकुल धृतराष्ट्राचे सांत्वन केले. धृतराष्ट्र, गांधारी व राजस्त्रिया गंगातीराकडे निघाल्या. पांडव श्रीकृष्णासह धृतराष्ट्राची भेट घेण्यासाठी आले. रडत असलेल्या स्त्रियांतून मार्ग काढत पांडव पुढे आले. धृतराष्ट्राला प्रणाम केला. एकेक पांडव नाव सांगून प्रणाम करीत होता. धृतराष्ट्राच्या मनात भीमाविषयीचा राग धगधगता होता. त्याचा राग श्रीकृष्णाला त्याच्या चेहर्‍यावर दिसला. भीमाला बाजूला सारुन भीमाच्या लोखंडी पुतळ्याला कृष्णाने पुढे केले. धृतराष्ट्राने त्या पुतळ्याला मिठी मारुन त्याचा चुराडा केला. कृष्णाने राजाला सत्य काय ते सांगितले व भीम हा निमित्तमात्र होता; त्याच्यावर राग धरु नको असे सांगितले. गांधारीलाही शोक अनावर झाला. व्यासांनी तिचे सांत्वन केले. गांधारीने कृष्णाबरोबर रणभूमीवर जाऊन पुत्रांच्या शरीरांकडे पाहून शोक केला. दुर्योधनाविषयीचा शोक तिने असा केला.

गांधारीचा शोक

हे दुःख नको मज मरण बरे

पुत्राविण जीवित व्यर्थ ठरे ॥धृ॥

शूर सुतांचे छिन्न कलेवर

बघुन सुनांचा शोक अनावर

अश्रुंचा जणु पूर भूमिवर

सौभाग्य, लोपले त्यांचे रे ॥१॥

अभागिनी मी शतजन्माची

मुखे पाहते मृतपुत्रांची

हानी झाली सर्वस्वाची

वैराणी जीवनी काय उरे? ॥२॥

मानी माझा ज्येष्ठ सुयोधन

गदाप्रविण, वीरांचे भूषण

कसा आज मज गेला सोडुन?

रे वार ऊरुवर का केले? ॥३॥

वारा घालित होत्या दासी

राजमहाली जया नृपासी

वारा पंखांचा जणु त्यासी

घालती पक्षी रानातले ॥४॥

पूर्वी राजे मुजरे करिती

स्तुतिसुमनांची करिती वृष्टी

त्यास गिधाडे इथे वेढिती

दुर्दैव कसे हे ओढवले? ॥५॥

अकरा अक्षौहिणि सेनेचा

नायक हा जणु अतुल शक्तिचा

प्रहार झेली भीमगदेचा

हे युद्ध नीतिचे रे कसले? ॥६॥

अधर्मप्रिय वा दुराग्रही वा

पुत्रच ना तो परी माधवा,

रिपू तये मानिले पांडवा

भोगतो आज निजकर्मफळे ॥७॥

वरदहस्त ज्या बलरामाचा

शासनकर्ता जो पृथ्वीचा

छिन्न देह बघता हा त्याचा

जाहली मनाचि या शकले ॥८॥

धाय मोकलुन भार्या रडते

तिने गमविले पतिपुत्राते

कलेवरा कवटाळुन घेते

याहून अधिक जगि दुःख नसे ॥९॥

भीमाने रणि गदाप्रहारे

सारे शंभर जिवे मारले

माझे अश्रू वाहुन अटले

वृद्धेस मला काठी न उरे ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 18, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP