मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
पांडू राजाचे निधन

गीत महाभारत - पांडू राजाचे निधन

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


पांडुराजाला पुत्रांच्या जन्मामुळे खूप आनंद झाला. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्याला मिळालेल्या शापामुळे तो वनात तपस्व्यासारखाच राहात होता. त्याच्या भार्या कुंती व माद्री व्रतात मग्न राहून त्याला साथ देत होत्या. एके दिवशी तरुण माद्रीला, नटावेसे वाटले. राजाने एका एकांत स्थळी पुष्पांनी अलंकृत अशी ती माद्री पाहिली. काळाने जणू त्याची मती मोहित करुन टाकली. त्याच्या मनातला काम त्याला आवरता आला नाही. त्याला शापाचे भान राहिले नाही. माद्रीच्या विरोधाला न जुमानता राजा रतिमग्न झाला. दैव बलवत्तर ठरले. शापरुपी काळाने राजावर झडप घातली. राजाचा अंत झाला. शापवाणीप्रमाणे जे जसे घडायचे होते तसे घडले. माद्रीने स्वतःला दोषी ठरवून राजाच्याच चितेत आपल्या प्राणांची आहुती दिली. नियतीपुढे महाप्रतापी पृथिवीपतीचेही काही चालले नाही !

पांडू राजाचे निधन

मुनीशाप होता लिहिला नृपाच्या ललाटी ।

दैव का कुणाला चुकले ? काय नराहाती ? ॥धृ॥

इंद्र-तुल्य होता पाण्डू कुरुकुली श्रेष्ठ

आपुल्या प्रतापे त्याने व्यापिले दिगंत

पराजीत राजे त्याचे दास जणू होती ॥१॥

पृथा आणि माद्री भार्या पूजिती तयास

धरेवरी भोगी जणु तो स्वर्गिच्या सुखास

दूर दूर पसरे त्याची त्रिलोकात कीर्ती ॥२॥

जडे प्रीत मृगयेवरती जातसे वनात

छंद हा नवा त्या जडला वसे अरण्यात

त्याच वनी नियती त्याची दारि उभी होती ॥३॥

गर्द वनी नीट न बघता मारिले हरीण

हरिणरुपधारी परि तो ऋषी रतिमग्न

अजाणता वधिले तरिही पाप ठरे अंती ॥४॥

ऋषी शाप देती ’दुष्टा, कृत्य तुझे हीन

समागमी तूही होशिल असा गतप्राण’

खोल उरी बसला त्याच्या शाप मर्मघाती ॥५॥

सर्व सुखे सोडुन राजा वसे आश्रमात

तपस्विनी राण्या त्यासी देत वनी साथ

तपामधे गुंतुन राही, मनी परी भीती ॥६॥

सहज नटे माद्री राणी एकटी वनात

बघे परी राजा दुरुनी, होउनी अशांत

काळरुप घेउन तेव्हा शापशब्द येती ॥७॥

काम मनी जागे वेगे नृपा नसे भान

रतीमग्न होता गेले अकस्मात प्राण

वज्रघात झाला जणु हा, शोक वना होई ॥८॥

पाच पांडवांची सारी लोपलीच छाया

एकनिष्ठ माद्री ठेवी चितेवरी काया

मुलांसवे अश्रू ढाळी पोरकीच कुंती ॥९॥

महारथी कीर्तीमंत थोर पुण्यवंत

हस्तिनापुराचा राजा जाइ अकस्मात

भाग्यरेष ओलांडाया कुणा नसे शक्‍ती ॥१०॥

दुःखसुखे सामान्याला तशी ती नृपाला

जन्म ज्यास लाभे त्याचा अंत हा लिहीला

भाग्यचक्र राही फिरते, हीच जगी रीति ॥११॥

सूर्य नभामध्ये तळपे, आहे त्यास अस्त

प्रलय असे सृष्टीलाही, सर्व नाशवंत

पूर्वसंचिताच्या कळल्या कुणाला न गाठी ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP