समश्लोकी भगवद्‌गीता - अध्याय अठरावा

संस्कृत भाषेतील गीतेचे पद्यरूपात मराठी भाषेत रूपांतर करण्याचे अवघड कार्य सदाशिवराव परांजपे यांनी केले.


अर्जुन उवाच

संन्यास त्याग तत्वे समजावी हृषीकेश इच्छा ही ॥

केशिघ्न महाबाहो समजावी पृथक मजसि दोन्ही ही ॥१॥

श्री भगवानुवाच

कर्मांत काम नसणे म्हणती ज्ञानी अशास संन्यास ॥

सर्व कर्म फल सोडी देती ज्ञानी त्याग नाव यास ॥२॥

दोष युक्‍त कर्म असे या सोडा वदति जाण ते काही ॥

निष्काम तपदाना न सोडा यज्ञा वदति दुसरे ही ॥३॥

भारत सत्तम ऐक मम मत निश्‍चित त्याग हा असे कैसा ॥

त्यागा पुरुष-व्याघ्रा तीन प्रकार असति जाण ऐसा ॥४॥

यज्ञ दान तप कर्मे विहित अशी न त्याज्य आचरावी ॥

तप यज्ञ दान करिती विद्वाना शुद्ध अशीच जाणावी ॥५॥

पार्थ ही सर्व कर्मे आसक्‍ती सोडून फलेच्छा ही ॥

करावी असे माझें मत निश्‍चित तसेच उत्तम ही ॥६॥

शास्त्र विहित कर्मांचा करु नये तो कधीच संन्यास ॥

मोहे घडता देती तामस त्याग नाव असे त्यास ॥७॥

कर्मे क्लेश शरीरा देती यास्तव करील संन्यास ॥

संन्यासी राजस तो त्याग फल न मिळे त्याच पुरुषास ॥८॥

शास्त्र विहित कर्मे ती कर्तव्य असे म्हणून जो करितो ॥

आसक्‍ति फलेच्छा ही ज्यात नसे त्याग होय सात्विक तो ॥९॥

संशय सर्वच छेदी त्यागी बुद्धि मत भावना शुद्ध ॥

चिकटे न शुद्ध कर्मी न द्वेषी कर्मास जी अशुद्ध ॥१०॥

सर्वथैव कर्मांचा त्याग नसे शक्य देहधार्‍याना ॥

कर्म फलेच्छा त्यागा करिती त्यागी नाव असें त्याना ॥११॥

न करी त्याग तयाला फळ अनिष्ट इष्ट मिश्र परलोकी ॥

मिळते परि संन्यासी पात्र न कधीही फलास ऐशा की ॥१२॥

सांख्य शास्त्रात कथिली कर्मे सिद्धीस कारणे पाच ॥

समजून नीट घे हे महाबाहो मी सांगतो तीच ॥१३॥

देह तसा तो कर्ता साधने तशीच ती निरनिराळी ॥

पृथक‌ क्रियाच तैशा जाणा ते पाचवेच दैव बळी ॥१४॥

न्याय्य अन्याय्य अशी कर्मे जी वाङमने शरीराने ॥

आरंभिलीच होती सर्वही याची पाच साधनाने ॥१५॥

ऐसे असता ज्याला मूढत्वे वाटते करी मीच ॥

ऐशा त्या दुर्मतिला समजेना यामधील काहीच ॥१६॥

अभिमान मीपणाही बुद्धीला लेप ना फलाशेचा ॥

मारुन सर्व लोका न हंता ना बद्ध कर्म फलाचा ॥१७॥

ज्ञान ज्ञेय ज्ञाता जाण प्रवर्तक सर्व कर्मांचे ॥

करण कर्म कर्ता हे आधार तीन हे त्या सर्वांचे ॥१८॥

प्रकार गुण भेदाने कर्ता ज्ञान कर्म या तीहीचे ॥

आहेत तीन ऐके वर्णन गुण गणनेत जसे त्यांचे ॥१९॥

विभक्‍त भूतामध्ये अविनाशी अविभक्‍त तत्व एक ॥

ज्ञानाने ज्या दिसते म्हणती त्या सात्विक ज्ञान लोक ॥२०॥

ज्ञानाने ज्या वाटे पृथक तत्त्व असे पृथक भूतात ॥

ऐशा त्या ज्ञानाला राजसी असेच नाव देतात ॥२१॥

निष्कारण आसक्‍ती एका कार्यात ठेउनी राहे ॥

तत्त्व हीन अल्पच जे जाणा तामसी ज्ञान ते आहे ॥२२॥

फलाशा नसे त्याने आसक्‍ती द्वेष राग सोडून ॥

केले कर्म तयाला देती संज्ञा सात्त्विक म्हणून ॥२३॥

फलाशा धरी त्याने किंवा मी पण धरुन पुरुषाने ॥

कष्टेच कर्म केले त्या ओळख राजसीच नावाने ॥२४॥

स्वशक्‍ती तशी हानी कर्म परिणाम इतर भूत हिंसा ॥

दुर्लक्षुनि मोहे जो कर्मारंभ होय तामसी ऐसा ॥२५॥

ना आसक्‍ती मी पण कर्ता उत्साह धैर्य युक्‍त असे ॥

सिद्धि असिद्धि विषयी विकार नाही सात्त्विक तोच असे ॥२६॥

अशुचिता लोभ हिंसा कर्म फलांशा तशीच आसक्‍ती ॥

हर्ष शोक युक्‍त असे ऐशा कर्त्यास राजसी म्हणती ॥२७॥

असंस्कार नीच शठ जो दीर्घ सूत्री खिन्न गर्विष्ठ ॥

आळशी लुबाडी जो कर्ता ऐसाच तामसी स्पष्ट ॥२८॥

बुद्धि मन धैर्याचे गुण भेदाने प्रकार होतो ते ॥

तीन्ही धनंजया मी पूर्ण कथितो तू नीट ऐके ते ॥२९॥

प्रवृत्ति निवृत्ति कार्ये अकार्ये अभय भयास जी समजे ॥

मोक्ष बंध यानाही सात्विक ऐशाच बुद्धिला म्हणि जे ॥३०॥

धर्म अधर्म न समजे कार्य अकार्यहि तसेच समजेना ॥

राजसी पार्थ बुद्धी ज्ञान जिने हे यथार्थ होईना ॥३१॥

अज्ञाने गुरफटुनी पार्था अधर्मा धर्म भासविते ॥

सत्य असत्य मानी तामसी म्हणा अशाच बुद्धीते ॥३२॥

योगाश्रयेंच पार्था मन प्राण इंद्रिय क्रिया आवरी ॥

मनुष्य जीच्या योगे घृति जो ऐशी सात्विक तीच खरी ॥३३॥

धर्म अर्थ कामाच्या आश्रयास अर्जुना मनुज करितो ॥

धृति पार्थ राजसी ती ज्या योगे फलाशा मनीं धरितो ॥३४॥

पार्था जीच्या योगें दुर्बुद्ध मनुज शोक निराशेला ॥

निद्रा भय न सोडी तामसी नाव असे अशा धृतिला ॥३५॥

अभ्यासाने ज्याच्या होतो आनंद तसाच दुःख लय ॥

सुख तीन जातिचे ते भरतर्षभ नीट ऐकता होय ॥३६॥

आत्म बुद्धित जन्मे आधी विष सम सुधाच परिणामी ॥

सुख जे ऐसे असते प्रसिद्ध ते सात्विक सुख या नामी ॥३७॥

इंद्रिय विषय इंद्रिये या संयोगे सुधाच मूळात ॥

परि विष सम अंती त्या राजस सुख हेच नाव देतात ॥३८॥

प्रमाद निद्रा आळस यातुन निघोन मुळात अंताला ॥

मोहा उत्पन्न करी म्हणती तामस अशाच सौख्याला ॥३९॥

प्रकृतीत उद्‌भव अशा या त्रिगुणातून पूर्ण जो सुटला ॥

आकाश पृथ्वीवरी किंवा देवात कोणी ना असला ॥४०॥

स्वभावोद्‌भव गुणानी परंतपा वेगळीच ती होती ॥

क्षत्रिय ब्राह्मण असे शूद्र वैश्यादिक यास जी असती ॥४१॥

इंद्रिय दमन तप शांतीं शुद्धपणा आस्तिकता सरळपण ॥

ज्ञान विज्ञानहि तसे असती हे ब्राह्मण स्वभाव गुण ॥४२॥

शौर्य तेज मनोधैर्य कौशल्य न पळे युद्ध सोडून ॥

क्षत्रिय स्वभाव गूण सत्ताधिशता तसेच की दान ॥४३॥

रक्षण गोधन करणे शेती व्यापार हेच वैश्यांचे ॥

सेवा हा शूद्रांचा स्वाभाविक जाण गूण हे त्यांचे ॥४४॥

स्वकर्म रत असणारा मनुष्य मिळवीच योग्य सिद्धीला ॥

स्वकर्म रतांस मिळते सिद्धि कशी त्याच ऐक रीतीला ॥४५॥

सर्व प्राणी निर्मी विश्‍व व्यापी प्रवर्तक जगाचा ॥

स्वकर्म अशी तयाची पूजा देतेच लाभ मोक्षाचा ॥४६॥

परधर्म सुकर असला त्रिगुण युक्‍त स्वधर्म श्रेष्ठ असे ॥

स्वभावानुरुप असे कर्म करी जो तयास पाप नसे ॥४७॥

कौंतेय सहज येई कर्म असे सदोष तरी न सोडा ॥

धूम्र जसा अग्नि सवे कर्मासंगेच दोष होय खडा ॥४८॥

जिंकी अंतःकरणा जो निरिच्छ बुद्धिला न आसक्‍ती॥

मिळवी कर्म फलाच्या संन्यासे नैष्कर्म्य सिद्धी ती ॥४९॥

सिद्धीनंतर मिळते कौंतेया ब्रह्म कसे मनुजाला ॥

संक्षेपे मी कथितो ऐके ब्रह्म वा ज्ञान उच्चाला ॥५०॥

बुद्धी शुद्धच ठेवी धैर्याने जो मनास संयमितो ॥

शब्दादि विषय टाकी राग द्वेषास सोडुनी देतो ॥५१॥

वास करी एकांती नियमी मन देह वचन आहार ॥

ध्याय योग मग्न असे वैराग्य नित्य जयास आधार ॥५२॥

क्रोध गर्व मी-पण बल संसार दुःख काम ममत्वाला ॥

सोडून बरी शांती योग्यच तो ब्रह्मपदी जाण्याला ॥५३॥

ब्रह्मभूत पुरुषाचे प्रसन्न चित्त शोक नसे तयाला ॥

निरिच्छ भूताशी सम तो मिळवी मम श्रेष्ठ भक्‍तीला ॥५४॥

पुरुष असा भक्‍तीने जाणे मी कोण शक्‍ति मज काय ॥

सत्य अशा ओळखिने प्रविष्ट तो पुरुष मजकडे होय ॥५५॥

आश्रय माझा घेई यास्तव कर्मे नित्य तया घडली ॥

शाश्‍वत अव्यय पद तो पावे माझी कृपा तया झाली ॥५६॥

अंतःकरणे अर्पी कर्मे तव सर्व मजसि मत्पर हो ॥

बुद्धि योग अवलंबी लक्ष नित्य मजकडे तुझे राहो ॥५७॥

मच्चित्त जरी होशी विघ्ने मत्प्रसादेच तरशील ॥

न ऐकशी गर्वाने मम वचना नाश खचित होईल ॥५८॥

न करिशिल लढणे तू व्यर्थ सर्व तो जाण अहंकार ॥

प्रकृतीच तुझे हाती या युद्धे निश्‍चयें करविणार ॥५९॥

स्वकर्मे स्वभावज जी अससी त्यानीच बद्ध कौंतेया ॥

मोहे वाटे न करु करिशी ते स्वभाव वश होउनिया ॥६०॥

सर्व प्राणी हृदयी वसुनी भूतास ईश मायेने ॥

फिरवी तयास अर्जुन फिरवावी जेवि सर्व यंत्राने ॥६१॥

भारता सर्व भावे जाई शरन तू त्याच जगदीशा ॥

तत्प्रसादें मिळविशी शांति परम स्थानास शाश्‍वतशा ॥६२॥

गुह्यातून गुह्य हे ज्ञान तुला मी समस्त जे कथिले ॥

पूर्ण विचार तयाचा करुन वर्ते मना जसे आले ॥६३॥

गुह्यतम वाक्य पुनरपि कथितो ते ऐक तू परम वचना ॥

प्रिय बहुतच मजशी तू यास्तव तव हितार्थ मम कथना ॥६४॥

मन लावी मज ठायी होई मम भक्‍त यजक नम मजला ॥

प्रतिज्ञा सत्य ममही निश्‍चये मज मिळशी प्रिय तू मला ॥६५॥

त्यागून सर्व धर्मा येई रे तू शरण मजच एका ॥

मुक्‍त सर्व पापातुन करीन मी तुला नच करी शोका ॥६६॥

न करी तप जो त्याला भक्‍त नसे ऐकणे नको ज्याला ॥

माझा द्वेष करी जो या गूढा तू नको कथू त्याला ॥६७॥

परम गुप्‍त सद्‌भक्‍ता जो हे सांगेल तोच श्रद्धेने ॥

येऊन मिळे मजशी निःसंशय मग श्रेष्ठ भक्‍तीने ॥६८॥

सर्व मनुष्यामध्ये प्रियतर यावीण दास ना कोणी ॥

पृथ्वीत तयापेक्षा अधिक प्रिय मज न होय ही कोणी ॥६९॥

धर्म संवाद अपुला अध्ययन जो करील तोच मनुज ॥

ज्ञान यज्ञ हा करुनी वाटे यज कीं भजेल तोच मज ॥७०॥

द्वेष सर्व टाकोनी ऐके जो हे शास्त्र पूर्ण श्रद्धेने ॥

मुक्‍त तो मनुज जाई जेथे जावेच पुण्यवानाने ॥७१॥

पार्था एकाग्र मनें श्रवण शास्त्र तुजसि सर्व झाल्याने ॥

नष्टच धनंजया का मोह जो होय तुलाच अज्ञाने ॥७२॥

अर्जुन उवाच

अच्युत तव प्रसादे मोह टळे ज्ञानही मजसि झाले ॥

संदेह मुक्‍त झालो आचरीन तूच जे कथिले ॥७३॥

संजय उवाच

श्रीकृष्णा महात्म्याने पार्थाशी संवाद असा केला ॥

रोमांचकारी अद्‌भूत ऐसा सर्व तो श्रवण मी केला ॥७४॥

योगेश्‍वर कृष्णाने स्वये परम गुह्य योग जो कथला ॥

व्यास प्रसादे तो कथितानाच सर्व मी आयकिला ॥७५॥

श्रीकृष्ण अर्जुनाचा अद्‌भुत संवाद फार आठवतो ॥

राजा मजला त्याने वारंवारच हर्ष मना होतो ॥७६॥

स्चरुप अद्‌भूत हरिचे वारंवाराचि स्मृतीत मम येते ॥

वाटे बहु विस्मयहि राजा मम मना मोदही देते ॥७७॥

अर्जुन धनुर्धर तसा योगेश्‍वर कृष्ण होय बाजू ती ॥

मज वाटे विजश्री वैभव तीच वरील नित्य नीती ॥७८॥

सारांश

शा.वि.

पार्था युद्ध नको असे मन तुझे सांगे परी भाग ते ॥

होईरे प्रकृतीमुळे मन कथी सोडीच की मोह ते ॥

हे कृष्णा मम मोह नष्ट सगळा पाळीत आज्ञा तुझी ॥

सांगे संजय बाजु तीच विजयी कृष्णार्जुने युक्‍त जी ॥१॥

अर्पण

काव्याचा कधीही न गंध असतां गीता महा ग्रंथ हा ॥

भाषा ज्ञान हि अल्प फार तरिही भाषेत सोप्या पहा ॥

ज्या कृष्णेच दिली मला मति अशी त्याच्या पदी सर्व हा ॥

नम्रत्वें स्तवुनीच लेख सगला अर्पी सदाशीव हा ॥१॥

श्रीकृष्णार्पणमस्तु

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP