समश्लोकी भगवद्‌गीता - अध्याय पहिला

 भाषेतील गीतेचे पद्यरूपात मराठी भाषेत रूपांतर करण्याचे अवघड कार्य सदाशिवराव परांजपे यांनी केले.


आर्या

धृतराष्ट्र संजयाते सांग-वदे युद्ध इच्छु दोघे ते ॥

मम सुत तसेच पांडव धर्म कुरुक्षेत्रि काय करिती ते ॥१॥

संजय भूपास वदे दुर्योधन पांडुसैन्य रचनेचे ॥

व्यूहा पाही जाई द्रोणाचार्या कडे म्हणे साचे ॥२॥

गुरुजी सैन्य पहा हे रचिले तव बुद्धिवान शिष्यानें ॥

धृष्टद्युम्न जयाला म्हणती त्या द्रुपद राजपुत्रानें ॥३॥

भीमार्जुनसम येथें शूर धनुर्धर तसेच रणधीर ॥

सात्यकि विराट तैसा रणधीर महारथ द्रुपद वीर ॥४॥

धृष्टद्युम्न तसा तो चेकितान वीर काशिराजाही ॥

कुंतिभोज पुरुजित ते नरपुंगव शैब्य थोर राजाही ॥५॥

विक्रांत उत्तमौजा वीर युधामन्यु तोहि बहु धीर ॥

पाच सुत द्रौपदिचे अभिमन्यूसह महारथी थोर ॥६॥

कौरव वीर गुरुजी कथितो नांवेच मुख्य वीरांची ॥

ऐकोन शांत चित्ते यावी तुम्हांस कल्पना त्यांची ॥७॥

गुरुजी पितामह तसे कर्ण कृप असे सदा विजयि जो तो ॥

अश्‍वत्थामा विकर्ण भूरिश्रव सोमदत्त पुत्रहि तो ॥८॥

माझ्या हितार्थ जीवहि सोडाया जे तयार वीर असे ॥

असती बहु शस्त्रास्त्रे घेउनि हाती रणांगणी सरसे ॥९॥

तात्पर्य कौरवांचे दळ अगणित भीष्म रक्षिती ज्याते ॥

अपुरेच पांडवांचें पार्थाग्रज रक्षिता असे त्यातें ॥१०॥

यास्तव सैन्य विभागी भागाधीशे अघाडिला व्हावे ॥

ऐशी रचना करुनी सर्वानी भीष्म गुरुस रक्षावें ॥११॥

उत्साह सुयोधनाला यावा म्हणूनीच वृद्ध भीष्मानें ॥

रणसूचक वाजविला दर केला सिंहनाद जोरानें ॥१२॥

तेव्हां दळांत भेरी शंख पणव गोमुखादि आनक ही ॥

वाद्यांच्या नादांनें दुमदुमले नभ तसे दिशा दाही ॥१३॥

श्‍वेताश्‍वरथीं बसुनी माधव अर्जुन रणांगणीं आले ॥

त्यानी सिद्ध आहो हे दावाया शंख थोर वाजविले ॥१४॥

पांचजन्य कृष्णाने देवदत्त अर्जुनेंच वाजविला ॥

भीम-कर्म भीमानें थोर असा पौंड्र शंख तो फुकिला ॥१५॥

अनंतविजय युधिष्ठिर वाजवि भूपति तसाच तो नकुला ॥

सुघोष तव सहदेवे मणिपुष्पक दर प्रबल वाजविला ॥१६॥

धृष्टद्युम्न शिखंडी महारथि काश्य जो धनुर्धारी ॥

अजिंक्य सात्यकि तैसे द्रौपदिचे पांच पुत्र रथधारी ॥१७॥

सौभद्र महाबाहू द्रुपद विराटहि तसेच रणधीर ॥

हें राजा धृतराष्ट्रा वाजविती सर्व वीर दिव्य दर ॥१८॥

भूमी नभ दोन्ही ही दुमदुमली थोर शंख नादानें ॥

कौरव हृदये तुटली हरिणांची जेवि सिंहनादानें ॥१९॥

कौरव तयार असुनी शस्त्राघाता मुहूर्त होणार ॥

पाहून कपिध्वजही सज्ज करी नीट आत्मचापशर ॥२०॥

भूपामय कृष्णातें पार्थ वदे दोन सैन्य मध्यांत ॥

न्यावे रथास माझ्या पळवी अश्‍वास अच्युता त्वरित ॥२१॥

तो वरि निरीक्षितो मी युद्धेच्छू वीर कोण समरात ॥

दुर्बुद्धी दुर्योधन परि त्याचेही करावयास हित ॥२२॥

हेतू हाचि धरोनी आले असती रणात जे धीट ॥

संग्राम मी कुणाशी करणे तें पाहू दे मला नीट ॥२३॥

संजय सांगे ऐसे वचन गुडाकेश बोलला जेव्हा ॥

नेलाच हृषीकेशें रथ दोन दळ मध्यस्थळी तेव्हा ॥२४॥

पितामह द्रोणादी भूपाल इतर रणात जे होते ॥

त्यांना दावुन सांगे पार्थ पहा कौरवादि जमले ते ॥२५॥

जमले भाचे पुत्रहि वडील आजे तसेच नातूही ॥

आचार्य मित्र मामा तेथें जे इतर आप्‍तजन तेही ॥२६॥

श्‍वशुर स्नेही बंधू दोही सैन्यामधील रणवीर ॥

आले युद्ध कराया कुंति-सुतें सोडिला तदा धीर ॥२७॥

ऐशा त्या स्वजनाना युद्धार्थी त्या रणांत पाहून ॥

कृष्णाला पार्थ वदे प्रेमानें कंठ फार दाटून ॥२८॥

शक्‍ती जम गात्रांची गेली मुख सर्व कोरडे पडले ॥

कंप शरीरा आला अंगीं रोमांचही तसे उठले ॥२९॥

गांडीव करामधुनी गळते हा देह तप्‍त कीं झाला ॥

शक्‍ति न उभे रहाया वाटे होईच या भ्रम मनाला ॥३०॥

सारीच केशवाही दुश्‍चिन्हें मज मनास दिसतात ॥

स्वहित मला नच वाटे समरीं या स्वजन आप्‍त वधणेंत ॥३१॥

नाही इच्छा कृष्णा विजयाची राज्यभोग सौख्याची ॥

मरतीच आप्‍त मग ती जीवित राज्यादि काय कामाची ॥३२॥

ज्याच्यासाठी राज्या इच्छावे भोग सर्व मिळवावे ॥

प्राण धनेच्छा सोडुनि समरी युद्धार्थते उभे व्हावे ॥३३॥

आचार्य पुत्र मामा वडील आजे तसेच बंधू ही ॥

सासरे मेहुणे हे समरीं नातू तसेच ते स्नेही ॥३४॥

इच्छी मी न बघाया शस्त्रे जी मारिती मज रणी तो ॥

त्रैलोक्य राज्य नलगे पृथ्वीचें काय होय मजला तो ॥३५॥

मारुनि कौरवांना लाभ जनार्दन मिळेल काय तरी ॥

साठाच पातकांचा असती ते आततायि वध्य जरी ॥३६॥

या कौरव बंधूना मारावे हें अयोग्य पांडुसुता ॥

आप्‍तवधाने माधव सांग कसें सौख्य मिळवु तें आता ॥३७॥

लोभमय बुद्धि यांची न दिसे यांना कुलक्षयज पाप ॥

मित्र द्रोहानेही घडते तैसेच जे महापाप ॥३८॥

कुलक्षये घडणारे दोषाला पूर्ण जाणणारांनीं ॥

आम्ही जनार्दना मग टाळु नये कां तयास सर्वानी ॥३९॥

कुचधर्म सनातन ही विलया जाती कुलक्षया होता ॥

कुलहि अधर्मी बुडतें धर्म सनातन असा लया जाता ॥४०॥

कृष्णा धर्म लयाला जातो तेव्हा कुलस्त्रिया भकती ॥

उन्मार्गी त्या होता तत्कालीं वर्ण संकरा करिती ॥४१॥

संकर नरका नेई कुलनाशका तसा सकल कुलाला ॥

पिंडादि लुप्‍त होता मिळति अधोगति गताहि पितराला ॥४२॥

ऐशा संकर-कारी कुल घातक लोक सर्व दोषानी ॥

कुलधर्म नष्ट होती जाती धर्म सनातनहि त्यांनीं ॥४३॥

कुलधर्म लुप्‍त होता जाती जन निश्‍चयेंच नरकास ॥

आम्ही जनार्दना हे ऐकत आलो समस्तही दिवस ॥४४॥

मोठे पाप कराया इच्छाही क्षुद्र राज्य सौख्याची ॥

करिते प्रवृत्त आम्हा आप्‍तवधा गोष्ट फार दुःखाची ॥४५॥

शस्त्र करात न घेई प्रतिकारहि उलट मी नच करीन ॥

कौरव शस्त्रें माझा करिती वध तोहि सौख्य मानीन ॥४६॥

संजय सांगे अर्जुन वदुनी ऐसे रथातिल स्थानीं ॥

बसला विषण्ण चित्तें चापशरादी समस्त फेकूनी ॥४७॥

सारांश

शा.वि.

युद्धेच्छु करु पांडवासह कुरुक्षेत्री जमा जाहले ॥

त्या वृत्ता मज सांग संजय असे भूपेच आज्ञापिलें ॥

आप्‍ताना वधुनी कुलक्षय घडे ऐसे मनी अर्जुना ॥

वाटे, चापशरास टाकून वदे इच्छी न मी या रणा ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP