समश्लोकी भगवद्‌गीता - अध्याय सहावा

संस्कृत भाषेतील गीतेचे पद्यरूपात मराठी भाषेत रूपांतर करण्याचे अवघड कार्य सदाशिवराव परांजपे यांनी केले.

कर्म फलेच्छा नसुनी जो कर्तव्या समजोनच कर्म करी ॥

भगवान वदे यति तो संन्यासी तोच अशीच खूण धरी ॥१॥अ

वेद विहित कर्मे जीं अग्निहोत्रादि अशी मुळी टाकी ॥

ऐसा यति योगी या संज्ञेला पात्र नच मुळी लोकी ॥१॥ब

संन्यास जया म्हणती तोच योग पांडवा असे जाण ॥

योगी कुणी न होई कर्म फलाशा त्यागिल्या वीण ॥२॥

कर्मयोग साधावा हेतू हा मुनिमनामधे असला ॥

शांतीस कर्म साधन ती मिळता शम करवि कर्माला ॥३॥

विषयभोग कर्मे दोहोमध्यें कधीं न जो गुंते ॥

फलाशा त्याग करिता योगा-रुढ हें नांव तया मिळते ॥४॥

अपणास उद्धरावे अपणाला न कदापि खचवावे ॥

आपण बंधु अपुला आपण शत्रू असेंच समजावे ॥५॥

जिंकी जो आत्म्याला बंधू तो पुरुष आपुला होतो ॥

आत्म्याला विसरे तो शत्रूसम वैर आपुलें करितो ॥६॥

जिंकी मन जो शांती मिळवी त्याचाच थोर परमात्मा ॥

शोतोष्ण दुःखसुख या मानी सम अपमान मानहि महात्मा ॥७॥

ज्ञानानुभवें तृप्‍ती इंद्रिय दामी विकार रहित असे ॥

सुवर्ण माती दगडासम मानी त्यास नांव युक्‍त असे ॥८॥

मित्र हितेच्छू शत्रू बंधु द्वेष्टयांत पक्षपात नसे ॥

दोघांचे हित इच्छी वृत्ती ऐशी तयास साध्य असे ॥९॥

ऐसा असून पापी साधू याशी समान भाव धरी ॥

श्रेष्ठ पुरुष तोच असे बुद्धि ज्याची वरील गूण वरी ॥१०॥अ

एकाकी एकांती राहोनी वसनास टाकावें ॥

आशा समूळ नासुनि योग्यानें अध्ययन आचरावे ॥१०॥ब

वर्तुनि सततहि ऐसें देह मनाचें संयमन करावें ॥

नंतर योगाभ्यासा योग्यानें सर्वदा आरंभावे ॥१०॥क

दर्भ मृगाजिन वस्त्रे युक्‍तशा पवित्र आसना वरती ॥

योग्यानें बैसावे स्थानी जे न नीच न उच्च अती ॥११॥

एकाग्र चित्तें बसुनि इंद्रियें मन यास आळ घालावा ॥

चित्ताच्या शुद्धीला योग्याने योग नित्य साधावा ॥१२॥

एका रेषेमध्यें करुनि ताठ शीर मान पाठीला ॥

चित्त स्थीर करोनी ठेवोनी नासिकाग्र दृष्टीला ॥१३॥

दृष्टी नच चाळविता शांत मनें भीति सर्व सोडून ॥

मन संयमन करावें ब्रह्मचर्य व्रत नित्य पाळून ॥१४॥अ

माझे ठायी चित्ता ठेवोनी सर्व मीच समजून ॥

योगाभ्यास करावा सर्वस्व मी हेच नित्य मानून ॥१४॥ब

ऐसे वर्तन करितां सत्ता राखी मनावरी योगी ॥

शांती मत्सन्निधचि निर्वाण दे अशी सदा भोगी ॥१५॥

खादाड अति किंवा मुळी स खाई तशीच झोप अती ॥

किंवा सदैव जागे ऐशा योग्या न होय योग गती ॥१६॥

आहार कर्में नियमित जागृति झोपहि जयास मित असती ॥

दुःखे ऐशाला जीं योगानें याच तीं नष्ट होतीं ॥१७॥

योग्याचे नियमित मन आत्म्याठायींच स्थीरता पावे ॥

निरिच्छ उपभोगास्तव पुरुष तोच उक्‍त हें नाम पावे ॥१८॥

निर्वात अशा जागीं निश्‍चल दीपासमान जो ठेवी ॥

चित्ता स्थीर करोनी योगी उपमा तया खरी व्हावी ॥१९॥

योगानें जे केलें चित्त स्थिर विषय वासना तोडी ॥

आपण आत्मा पाही त्याच्या मध्येच शांतता जोडी ॥२०॥

इंद्रिया जे कळेना बुद्धीला ज्ञात जे असे आहे ॥

आत्यंतिक ऐसे सुख मिळणारे स्थान जें एक आहे ॥२१॥अ

जेथे स्थिरता येता योगी ना ब्रह्म सोडि तो सहसा ॥

त्याहुन सुखकर ऐशी स्थिति वाटे न कधी तया मनसा ॥२१॥ब

अधिष्ठान जें मिळता दारुण दुःखेहि शक्य ना होती ॥

भीषण शक्‍तीनेही टाळणेस उच्च निश्‍चला स्थिति ती ॥२२॥

दुःख संयोग वियोग योगाचे नांव योग इच्छूनी ॥

आचरण हा करावा संकटांचा न त्रास मानूनी ॥२३॥

संकल्पानें होती त्या सोडुनि वासनास पूर्णपणें ॥

सवेंद्रिय संघाला संयमानें पूर्ण दाविलें जेणें ॥२४॥

त्या बुद्धिमान पुरुषे शांतीला हळुहळूच मिळवावें ॥

आत्म्यांत मना लाउनि इतर विचारा तये नच शिवावे ॥२५॥

चंचल अस्थिर मन हें ज्या ज्या स्थानाकडे वळे धावें ॥

खेंचुनि तयास तेथुनि आत्म्या ठायीच पूर्ण वळवावे ॥२६॥

ज्याच्या मनास शांती होई नष्ट रजोगुणहि जयाचा ॥

निष्पाप मिळवी ब्रह्म योग्या त्या लाभ उत्तम सुखाचा ॥२७॥

निष्पापी ऐसा जो राहे योगांत मग्नही नित्य ॥

ब्रह्मसंग सौख्याचा घेतो उपभोग सहज तो सत्य ॥२८॥

सर्वाठायीं बुद्धि सम होता पुरुष कर्मयोगी तो ॥

भूतांत आपणाते भूतें अपणांत सर्वही बघतो ॥२९॥

भूतामध्यें मजला माझ्या ठायीच सर्वही भूतें ॥

जाणे त्या मी नाही तो मज नाही असे कधि न होतें ॥३०॥

समबुद्धि सर्वभूतीं सर्वांत-स्थास मजसि जो भजतो ॥

कैसाही तो योगी वागे तरि मजमधेंच तो वसतो ॥३१॥

सौख्य असो दुःख असो वागे भूतांत आत्म सम ऐसा ॥

समबुद्धि कर्मयोगे अर्जुना जाण तोच श्रेष्ठ असा ॥३२॥

पार्थ वदे मधुसूदन साम्यावस्थिति योग तुवा कथिला ॥

मन चांचल्ये त्याचें भासे न स्थैर्य शक्यही मजला ॥३३॥

कृष्णा हे मन चंचल दृढ बलिष्ठ अडथळाच कार्यांत ॥

त्याचा निग्रह वाटे वायूला बांधणेंच मोटेंत ॥३४॥

महाबाहु चंचल मन निःसंशय निग्रहास कठिण असे ॥

कौंतेया अभ्यासे वैराग्यें तेचि वश्य होत असे ॥३५॥

इंद्रिय निग्रह न करी हा साम्य साध्य योग न शक्य तया ॥

परि यत्‍नें शक्य असे जो अंतःकरण वश करील तया ॥३६॥

अर्जुन-उवाच

श्रद्धा-वान हि कृष्णा योग चलित चित्त होय नच घडता ॥

योग्य यत्‍न ऐशाला गतिहि काय योग सिद्धि नच होता ॥३७॥

ना स्थिर ब्रह्ममार्गी मुकुनी निष्काम काम्य ही स्वर्गा ॥

मोह वश महाबाहो नासे कीं ? चुकुनिया योग्य मार्गा ॥३८॥

कृष्णा संशय हा मम निर्मूल घालविणेस शक्य असा ॥

तुजवांचुनि कोणीना समूळ या संशयास नाशिलसा ॥३९॥

श्री भगानुवाच

पार्थ इहपर लोकीं योग भ्रष्टा विनाश ना असतो ॥

सत्कृत्यें करणारा दुर्गतीस कधीही न बा जातो ॥४०॥

योग भ्रष्टा मिळतो ज्या स्वर्गा पुण्यवान जाती तो ॥

बहु काळे या लोकीं पवित्र धनिक कुळांत जन्मे तो ॥४१॥

अथवा जन्मा येतो कुळांत तो बुद्धिमान योग्याच्या ॥

ज्यांतील जन्म दुर्लभ ऐशाच कुळांत मृत्यु लोकीच्या ॥४२॥

पूर्वजन्म बुद्धीचा संयोग मिळे तयास जन्मीं या ॥

त्या योगे कुरुनंदन तो झटतो अधिक सिद्धि मिळवाया ॥४३॥

पूर्व संस्कार नेती ऐशाला पूर्ण सिद्धि मिळवाया ॥

इच्छा तयास असली किंवा नसली तरीहि ती द्याया ॥४४॥अ

कर्मयोग जिज्ञासा ज्या मनुजा एकवार होई तो ॥

जिज्ञासू ऐसा हा शब्द ब्रह्मा पलीकडे जातो ॥४४॥ब

योग्याची पापेंही या रीतीनें समस्त विलयाला ॥

जाउनि बहु जन्मानें तो मिळवी परम पूर्ण सिद्धीला ॥४५॥

श्रेष्ठ तपस्व्या पेक्षां सांख्यज्ञ अधिक कर्मयोगी हो ॥

फलेच्छु कर्म्याधिक हि अर्जुना यास्तव कर्मयोगी हो ॥४६॥

जो मजसि कर्मयोगी प्रेमानें भजुनि चित्त ही ठेवी ॥

श्रद्धाही मज ठायी जाणे तो पूर्ण सिद्धिला मिळवी ॥४७॥

सारांश

शा.वि.

श्रीकृष्णा मजला निरोध गमतो चित्तास या शक्यसा ॥

ज्याला भाव नसे दुजा मम असा त्यालाच साधेलसा ॥

पार्था प्रेम भरे भजे मजसि जो भूतांत जो सारखा ॥

योगी उत्तम तो तरी विजय तूं हो कर्मयोगी सखा ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP