समश्लोकी भगवद्‌गीता - अध्याय तेरावा

संस्कृत भाषेतील गीतेचे पद्यरूपात मराठी भाषेत रूपांतर करण्याचे अवघड कार्य सदाशिवराव परांजपे यांनी केले.


अर्जुन उवाच

प्रकृती पुरुषा तैसे क्षेत्र क्षेत्रज्ञयास जाणावे ॥

ज्ञानज्ञेयाचेही ज्ञान मजसि केशवा व्हावे ॥

श्री भगवानुवाच

कौंतेय शरीरा या क्षेत्र असे नाव या जगी आहे ॥

क्षेत्राचे ज्ञान जया क्षेत्रज्ञ नाव तयास देती हे ॥१॥

भारत सर्वा क्षेत्री राहे मी क्षेत्रज्ञ मीच समज ॥

क्षेत्रक्षेत्रज्ञाचें ज्ञान तेच मम ज्ञान हें उमज ॥२॥

ते क्षेत्र काय कसले स्वरुप शरिरा कसें विकार तया ॥

आले ते कोठोनी त्यांचे हे सर्वंगूण जाणाया ॥३॥अ

क्षेत्रज्ञहि कोण असे शक्‍ती त्याला असे पहा कैक ॥

इत्यादी आतां मी सांगे हे नीट सर्व तू ऐक ॥३॥ब

नाना रीत्या छंदी ऋषि बहुत पृथक निश्‍चये गाती ॥

ब्रह्मसूत्र पदामधे तर्क उदाहरण योजुनी युक्‍ती ॥४॥

अव्यक्‍त अशी माया बुद्धि अहंकार पाच जी थोर ॥

भूतें एक मनासह एकादश इंद्रियास आधार ॥५॥अ

ज्ञानेंद्रिय पाचाचे कर्मेंद्रियें हि पाच जी तयांचे ॥

आधार स्थान असे या इंद्रिय जनित पाच विषयांचे ॥५॥ब

सुखदुःख धृती इच्छा द्वेष संघचेतना विकारानी ॥

संक्षेपें हे कथितो क्षेत्र असे युक्‍त याच सर्वानी ॥६॥

दांभिकत्‍व मान नसे शांति अहिंसा स्वभाव सरळ मन ॥

आचार्याची सेवा शुद्धी स्थिरता तसेच संयमन ॥७॥

वैराग्य इंद्रियांच्या विषयासि मुळि नसे अहंकार ॥

व्याधि मरण जन्म जरा दुःखें समजेच सर्व दुःखकर ॥८॥

पत्‍नी गृह पुत्रावर आसक्‍ति हि असे स्नेह ना पार ॥

इष्ट अनिष्ट हि वस्तू जरि मिळे तरि मन राहते स्थीर ॥९॥

अव्वभिचारी माझी अनन्य भावे असे सदा भक्‍ती ॥

वास करी एकांती सामान्य जन संधी नसे प्रीती ॥१०॥

अध्यात्म ज्ञानाच्या नित्यत्वाचे सदाच जे भान ॥

आत्म दर्शन हे ज्ञान याच्याविण सर्व तेंच अज्ञान ॥११॥

ज्याच्या ज्ञाने मिळते मोक्ष ब्रह्म ते तुजसि मी कथितो ॥

सत् अन् असत् ही जे ज्या आदी अंतही मूळी नच तो ॥१२॥

सर्वत्र मुख नेत्र शिर हस्त पाद सर्व बाजुनि अंगा ॥

व्यापून जगा उरले असती की त्यास कर्ण सर्वांगा ॥१३॥

इंद्रिये मुळीच नसता इंद्रिय गुण सर्व भासती त्यात ॥

गुणात निर्गुण असुनी पोषक सर्वापरी न आसक्‍त ॥१४॥

बाहेर आत आहे भूतांच्या ते तसेच अचल चल ॥

न कळे सूक्ष्मत्वे ते निकट तरी दूर तेच राहील ॥१५॥

विभक्‍त नसताही ते विभक्‍त भासे समस्त भूताशी ॥

भूत्योत्पादक पोषक संहारक जाण हेच सर्वाशी ॥१६॥

तेजस्व्या तेजद ते ज्ञानज्ञेय तमा पार हि तेच ॥

ज्ञाने तेच मिळविणे सर्वा हृदयात राहते तेच ॥१७॥

क्षेत्र ज्ञान ज्ञेया विषयी मी थोडके असे कथिले ॥

भक्‍त ज्ञानाने या मम प्राप्‍तीला योग्य ही झाले ॥१८॥

प्रकृति पुरुष दोघे अनादि असती असेच तू समज ॥

विकार तैसे गुणही उत्पादक यास प्रकृति हे उमज ॥१९॥

कार्यकारण दोघांची प्रकृती पासून होय उत्पत्ती ॥

सुख दुःख भोगणेचे कारणास पुरुष हे नाव देती ॥२०॥

प्रकृतिस्थ पुरुष सेवी गुण जे जन्मति प्रकृतिचे योग ॥

सत् असत् योनिमधे जन्मा ये पुरुष याच गुण संगे ॥२१॥

पुरुष परा देही या महेश्‍वर भर्ता तसाच मति दाता ॥

परमात्मा ही म्हणती सर्व द्रष्टा तसाच तो भर्ता ॥२२॥

ज्ञान जया पुरुषाचे गुणा सहजी राहते प्रकृति तिचे ॥

वागो तो कैसाही न वाट्या ये पुर्नजन्म तयाचे ॥२३॥

ध्यानानें आत्म्याला अपूले ठायी कुणी जन पाहती ॥

कोणी जन सांख्याने कोणी आत्म्यास कर्मयोग रिती ॥२४॥

ज्ञान नसे काहीना या योगांचे तयास इतरानी ॥

उपदेशिले तयावर अपुला विश्‍वास पूर्ण ठेवोनी ॥२५॥अ

श्रद्धेने ऐशाही जे जन ईश्‍वर उपासना करिती ॥

मत्परायण असे ते त्या योगे मृत्यु भीतिला तरती ॥२५॥ब

स्थावर जंगम वस्तू भरतर्षभ या जगामधें असती ॥

क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या संयोगे त्यास होय उत्पत्ती ॥२६॥

समभावे जो भूतीं भूत मात्र सर्व नाश जरि झाले ॥

अविनाशी त्या समजे परमेश्‍वर ज्ञान हें तया झाले ॥२७॥

सम सर्वा ठायी जो ऐशा परमेश्‍वरास ओळखतो ॥

घात न करी अपुला परम गतिस तोच शेवटी जातो ॥२८॥

प्रकृती कर्में करिते आत्मा देही करी न काहीच ॥

ऐसेच समजणारा जाणावा जाणता खरा तोच ॥२९॥

जीव भिन्न असुनीही पाहे ते सर्व एक सत्वांत ॥

विस्तार हा तयाचा समजे तेव्हाच मिळे ब्रह्मात ॥३०॥

गुण आदी रहित असे अव्यय तो वास सर्व भूतात ॥

तो न करी काहीही होई नाही कशा मधे लिप्‍त ॥३१॥

आकाश सूक्ष्म यास्तव होते न कधी कशा मधे लिप्‍त ॥

देही नित्य वसे परि आत्मा तो सर्व थैवहि अलिप्‍त ॥३२॥

रवि एकला, परी तो प्रकाश देतो समस्त जगताला ॥

क्षेत्रज्ञ एक भारत प्रकाशि तो या सर्व क्षेत्राला ॥३३॥

क्षेत्र क्षेत्रज्ञातिल भेद तसा प्रकृति बंध भूतांचा ॥

जाणनि केवि तुटे हें ज्ञान त्या लाभ होय ब्रह्माचा ॥३४॥

सारांश

शा.वि.

कृष्णा ती प्रकृती कशी पुरुष ही क्षेत्रज्ञ तो क्षेत्र ते ॥

कैसे ते असती कथी मम मनीं इछा मिळो ज्ञान ते ॥

देहा क्षेत्र पुरुष जीव समजे क्षेत्रज्ञ मी पार्थ हे ॥

कार्ये कारण यासही प्रकृति जी हे तूच ती जाण हे ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP