समश्लोकी भगवद्‌गीता - अध्याय पंधरावा

संस्कृत भाषेतील गीतेचे पद्यरूपात मराठी भाषेत रूपांतर करण्याचे अवघड कार्य सदाशिवराव परांजपे यांनी केले.


श्री भगवानुवाच

मूळवरी अश्‍वत्था शाखाखालीच वेद ही पाने ॥

ज्ञानी तोच गणा हा अविनाशी वृक्ष जाणिला ज्याने ॥१॥

वृद्धी गुणे डहाळ्या विषयांकुर पसरती वरी खाली ॥

कर्में बंधक मूले मानव लोकात पसरली खाली ॥२॥

न कळे स्वरुप याचे पाया आदी न अंतही ज्याला ॥

मुळे दृढ तम वृक्षा असंग शस्त्रेच छेदुनी त्याला ॥३॥

मी शरण आदि पुरुशा प्रवृत्ति आद्य ही पसरली ज्याने ॥

शोधा त्याच पदाजे मिळवा ते न फिरावे जीवाने ॥४॥

मोह मान संग दोष सोडी जो रत सदाच अध्यात्मी ॥

द्वंद्व विमुक्‍त ज्ञानी पावे मम अव्यया पदा नामी ॥५॥

सूर्यचंद्र अग्नीचा प्रकाश नलगे स्थान असे जे ते ॥

न फिरे जेथुन कोणी जाणावे श्रेष्ठ धाम माझे ते ॥६॥

सनातन अंश माझा मनुष्य लोकात जीव रुपे तो ॥

राहुन प्रकृतिस्थहि पंचेंद्रियासह मनहि खेची तो ॥७॥

जीवरुप ईश्‍वर हा घेई देहा तयास वा सोडी ॥

सुगंध पुष्पामधुनी वायु तसा आपणा सवे ओढी ॥८॥

कर्ण अक्ष त्वचेचा नासिक जिव्हा तसेच मन यांचा ॥

आश्रय जीवा करुनी घेई उपभोग सर्व विषयांचा ॥९॥

गुणयुक्‍त विषय भोगी देही असता तयातुनी जाता ॥

ज्ञानी तयास बघती न दिसे मनुजात मूढपण असता ॥१०॥

योगी यत्‍न करोनी बघती अंतस्थ ईश्‍वराला या ॥

मूढ अशिक्षित जन ते शकति न यत्‍नेहि पाहणेला या ॥११॥

विश्‍वा प्रकाश देते ऐसे जे तेज रविमधे वसते ॥

अग्नी चंद्रामध्ये जाणावे सर्व तेज माझे ते ॥१२॥

पृथ्वी मध्ये वसुनी स्वसामर्थ्ये रक्षितोहि मी भूते ॥

रस रुप चंद्र बनुनी पोषणहि मीच होय वनस्पति ते ॥१३॥

जठराग्नी मी बनुनी प्राण्यांचा देहाश्रयहि मी करितो ॥

प्राणापाना संगे चतुर्विध अन्ना पचन मी करितो ॥१४॥

सर्वांतरि वसे मी स्मृति विस्मृति ज्ञान सर्व मी आहे ॥

वेदज्ञ वेदाज्ञेय, वेदांतकार हि मीच जाणा हे ॥१५॥

क्षर अक्षर दोन पुरुष नश्य अविनाशी हेच जगतात ॥

नश्य सर्व भूते ती स्थीर अंतस्थ अक्षर जो त्यात ॥१६॥

वेगळा पुरुष उत्तम परमात्मा नाव हे असे ज्याला ॥

ईश्‍वर अव्यय वसुनी होई आधार तीन लोकाला ॥१७॥

क्षरा बाह्य असुनी मी उत्तम अक्षराहून ही आहे ॥

पुरुषोत्तम मज यास्तव लोकी वेदात नाव देती हे ॥१८॥

मोहा दूर करुनी जो मज पुरुषोत्तमास जाणे तो ॥

सर्वज्ञ समज भारत सर्व भाव यु‍क्‍त तोच मज भजतो ॥१९॥

गुह्य तम शास्त्र कथिले निष्पापा तुजसि याच ज्ञानाने ॥

व्हावे कृतार्थ भारत बुद्धि-मानहि तसेच मनुजाने ॥२०॥

सारांश

शा.वि.

हा संसार तरु जयास वरती पाळे तळी पल्लव ॥

याला शस्त्र असंग योजुन सदा छेद अहो मानव ॥

आहे श्रेष्ठच अक्षरा परि बहू मी जाण तू भारता ॥

तो होई कृतकृत्य बुद्धिमत ही गुह्यास या जाणता ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP