समश्लोकी भगवद्‌गीता - अध्याय दहावा

संस्कृत भाषेतील गीतेचे पद्यरूपात मराठी भाषेत रूपांतर करण्याचे अवघड कार्य सदाशिवराव परांजपे यांनी केले.

श्री भगवानुवाच

तू मजसि महाबाहो अससी प्रिय रे बरें तुज व्हावें ॥

यास्तव उत्तम पुनरपि सांगे मी लक्ष तूं तया द्यावे ॥१॥

देव गण ऋषी-नाही मम उत्पत्ती कुणास समजेना ॥

कारण उत्पादक मी देवांना ऋषिगणादि सर्वांना ॥२॥

लोकांचा मी मोठा ईश्‍वर न जन्म न आदिही मजला ॥

हे तत्व जाणणारा पाप मुक्‍त पावतो न मोहाला ॥३॥

बुद्धि अमूढता ज्ञान इंद्रिय निग्रह तशी क्षमा शांती ॥

सुख दुःख जन्म मृत्यू सत्य भय अभय तशी अहिंसा ती ॥४॥

संतोष तशी समता तप दान यश अपयश हे मनाचे ॥

विकार हे उद्‌भवती मजपासुनीच प्राणि मात्रांचे ॥५॥

सप्‍त ऋषी पूर्वीचे सनकादिक चार मनुहि जे झाले ॥

ज्याची प्रजा सर्वही त्याना उत्पन्न मीच कीं केले ॥६॥

माझ्या विभूतिचे या उत्पादक शक्‍तीचें जया ज्ञान ॥

त्याला स्थिर कर्मयोग मिळतोच त्यांत मुळीच संशय न ॥७॥

उत्पादक मी सर्वा माझेपासून निर्मिती सारे ॥

समजून सूज्ञ भजती भक्‍ति पुरःसर मलाच ते सारे ॥८॥

चित्त मजकडे लावुनि ठेवुनि पंचप्राण मम ठायीं ॥

बोधुनि परस्परांना कीर्तन मम नित्य तोच मज ठायीं ॥९॥

ऐसे जे मज ठायी असती त्यानाच बुद्धि योगाला ॥

देतो मी त्यायोगें योगी ते सर्व पावती मजला ॥१०॥

त्यावर कृपा कराया अंतःकरणीं शिरे तयांच्या मी ॥

अज्ञान मोह तमा नाशीं उज्वल ज्ञानदीपें मी ॥११॥

अर्जुन उवाच

परब्रह्म परम धाम परम पवित्र हि तुलाच ऋषि सर्व ॥

देवर्षी नारद ही व्यास असित देवलादिकहि सर्व ॥१२॥

म्हणती शाश्‍वत अज तूं आदि देव दिव्य ईश्‍वरा तुजला ॥

भगवान आज पुनरपि सांगतोस तेंच तत्त्व तूंहि मला ॥१३॥

केशव जें तू वदसि मानी मी सत्य सर्व वचनाना ॥

भगवन्‌स्वरुप तुमचें न कळे दैत्या तसेंच देवांना ॥१४॥

देव देव भूतेशा जगत्पते भूत निर्मिणारानें ॥

स्वरुप पुरुषोत्तम तव जाणावें तूंच आत्म-शक्‍तीनें ॥१५॥

व्यापून सर्व लोका ज्यांच्या योगें जगत्पते असशी ॥

दिव्य विभूती त्यातच विस्तारें सांग सर्व तूं मजशी ॥१६॥

योगी चिंतन करितां मी कैसे तुजसि ओळखावें हे ॥

सांगे स्पष्ट कृपेनें वस्तू कोण स्वरुप तव आहे ॥१७॥

जनार्दना पुनरपि तव योग विभूती स्पष्टपणें सांग ॥

अमृता सम तव वचनें मम मना घडो तया सवे संग ॥१८॥

श्री भगवानुवाच

कुरुवर अनंत माझ्या असति विभूती अशक्‍य कथणे त्या ॥

सांगे तुला तथापि तयांतील मुख्य मुख्य असती त्या ॥१९॥

हृदयां तरि भूतांच्या आत्मा मी राहतो गुडाकेश ॥

आदि मी भूतांच्या मध्य तसा अंतही मीच ईश ॥२०॥

आदि त्यांतिल विष्णू तेजस्व्यांत मीच सहस्त्र रश्मी ॥

वायूत मरीची मी नक्षत्रातील कुमुद बांधव मी ॥२१॥

मघवान सुरांमध्यें सामवेद मीच सर्व वेदांत ॥

इंद्रिया मधे मन मी, चेतना असेच भूत मात्रांत ॥२२॥

शंकर रुद्रामध्यें यक्ष असुरांत कुबेर मीच असे ॥

अग्नी वसूत जाणा मेरु मी सर्व पर्वतात असे ॥२३॥

पार्था पुरोहितातिल मुख्य बृहस्पती तोहि मी आहे ॥

जल संचयांत सागर सेनानायकी स्कंद मी आहे ॥२४॥

महर्षी मधे भृगु मी वाचेंत एक अक्षर ॐकार ॥

यज्ञांत जपयज्ञ मी स्थावरांत मी हिमालय स्थीर ॥२५॥

वृक्षांतिल पिंपळ मी देवर्षीच्या मधील नारद मी ॥

गंधर्वात चित्ररथ सिद्धातिल कपिल थोर मुनि तो मी ॥२६॥

सागर मंथनांत निघे उच्चैश्रव अश्‍व थोर मी समजा ॥

ऐरावत दंतीतिल समजे कीं मानवांत मी राजा ॥२७॥

सर्वा युधांत वज्रचि सुरधेनु मीच सर्वा गायीत ॥

प्रजोत्पत्ती कारकहि अनंग मी वासुकीच सर्पात ॥२८॥

नागात शेष नागहि सर्व जलचरांत मी असे वरुण ॥

पितरात अर्यमा मी शास्त्यांतिल यमचि मजसि तूं जाण ॥२९॥

प्रल्हाद राक्षसांतिल गणना शास्त्यांत मी असे काल ॥

विनता सुत विग्रहणांतिल मी सर्व चतुष्पदांत शार्दूल ॥३०॥

वेगवानांत वायु मी सर्व शस्त्रधार्‍यांत राम मीच ॥

मत्स्यांतिल मकरच मी मी सर्व नदीत श्रेष्ठ जान्हवीच ॥३१॥

आदि मध्य अंतहि मी सृष्टयांचा अर्जुना असें जाण ॥

वादच वाद्यांचा मी अध्यात्म मज विद्या मधील गण ॥३२॥

अक्षरांत अकार मी द्वंद्व सर्व समासांत मी आहे ॥

अविनाशी कालहि मी विश्‍वमुख ब्रह्मदेवही आहे ॥३३॥

सर्व हरण मृत्यू मीं उत्पादक मीच जन्मती त्यांचा ॥

स्त्रिलिंगी मी कीर्ती श्री मेधा स्मृति धृति क्षमा वाचा ॥३४॥

सामांत साम मोठा गायत्री मीच सर्व छंदांत ॥

मासांत मार्गशीर्ष ऋतूमधे पहिलाच मी वसंत ॥३५॥

द्यूत कपटी जनांचें तेजस्व्या मधे तेजही मीच ॥

जय मी नि‍श्‍चय मी सर्व सात्विकांत सत्वही मीच ॥३६॥

वासुदेव वृष्णिकुलीं पांडवांत धनंजयच मी आहे ॥

व्यास मी मुनि जनांचा कविमध्यें मजसि नाव उशना हे ॥३७॥

शास्त्यांचा दण्डच मी नीति सर्व जयेच्छूंची मी ॥

मौनच गुह्याचे मी ज्ञानवानांचे ज्ञान तेंही मी ॥३८॥

विश्‍वांत अर्जुना या असणार्‍या वस्तुमधे मी बीज ॥

मी व्यापी ऐशी चराचरी नसे एकही चीज ॥३९॥

दिव्य अनंत विभूती माझ्या या शत्रु-तापना असती ॥

विस्तार हा तयांचा कथिला तुजसि जाण संक्षेप रिती ॥४०॥

सत्व विभूती किंवा लक्ष्मीने युक्‍त वस्तु जी जगती ॥

माझ्याच अंश योगें जाणे कीं होय तीस उत्पत्ती ॥४१॥

विस्तार बहु तो तुजला अर्जुन जाणोन काय उपयोग ॥

जाणे एका अंशे व्यापी मी विश्‍व शेष काय मग ॥४२॥

सारांश

शा.वि.

विस्तारें कथि तूं विभूति मजला कृष्णा जगीं ज्या तव ॥

तृप्‍तीना मजला जयी श्रवण मी केल्या तरी माधव ॥

सांगे कृष्ण तदा जगांतिल असे वस्तू मधे मूळ मी ॥

अंशानें मम विश्‍व सर्व भरले जाणे कुरुश्रेष्ठ मी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP