झुंईऽऽ करीत विमान कसं
पोलादी पाखरु आभाळी फिरतं
ढगांत चढत, ढगांना चिरीत
दूरच्या देशात उडून जातं
दाबताच कळ शिसवी पेटीत
गंधर्व अप्सरा गायला येतात
मंजुळ स्वरात घराच्या कोपर्यात
कवडशांचीही फुले होतात
ट्रिंग् ट्रिंग् कधी घंटा वाजते
तारेची नळी उचलून घेतो
न्यूयॉर्क-दिल्लीचा, दादाचा-बाबांचा
प्रेमळ शब्द सुखावून जातो
चंद्रावरती चालतो माणूस
इथे काचेच्या फळयावर दिसतो
मंगळावरल्या अदृष्य नभाचा
गुलाबी रंग फोटोत खुलतो
बटन दाबताच लख्ख लक्ष दिवे
बिचारा अल्लाउद्दीन घाबरुन उठतो
फेकून दिवा आपला अडगळीत
राक्षसासहित पळून जातो