आर्य केकावली - १४१ ते १६०

केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.


आपण सेवा घेउनि पितृचरणी जोडिली पुन्हा बेडी ।

हा पितृभक्त रघुद्वह, कृष्ण नव्हे, बुद्धि नायके वेडी ॥१४१॥

रामत्रय त्यामध्ये मध्यम तो राम मी, असे हाते ।

धरुनी नितंबबिंबा दावी खुण रामचंद्र पाहा ते ॥१४२॥

वृत्ति यदृच्छालब्धे करा, स्मरा मज, धरा तनुसि हाती ।

मग मी आळिंगाया उभाच हे सुचवितो बुधव्राती ॥१४३॥

मध्ये कर मी ह्मणता, नरलोकी सत्क्रिया समाधाने ।

करुनी अन्नोदक द्या भूती आर्ती, स्वसिद्धि या दाने ॥१४४॥

विरहे करक्रियांच्या अकर्तृता पूर्णकामता सुचवी ।

करुणोत्कंठा दीनप्रोद्धारी हे उभ्यापणी रुचवी ॥१४५॥

तू तो येथेचि उभा, अंती आम्हासि ठेविशी कोठे ? ।

तरि आपल्या सख्याला पोटी ह्मणतो न बोलता ओठे ॥१४६॥

भक्तप्रेमाचा मी परम भुकेलो असे, असे कळवी ।

कटिवरि कर ठेउनिया उभा, खरा तर्क हा, न दुर्बळ वी ॥१४७॥

विषय पहाता सादर तरि जातो ह्मणुनिया उभा रुसतो ।

हितबोधग्रहणास्तव करुणाब्धि क्षोभला मला दिसतो ॥१४८॥

मी साक्षी, या सर्वी अखंड दंडायमान, लिप्त नसे ।

शरणागतास भेटे उभाउभी कळवितो स्वतत्व असे ॥१४९॥

प्रेमळ भक्तांही मज भेटावे कडकडूनि पोटभरी ।

कटि कर ठेवुनि भीमातटी उभा शुद्धभक्त्यधीन हरी ॥१५०॥

होती कैवल्याची कळिकाळी लूट, जे असी न कधी ।

मागेहि गोप्रतारी जाली सरयूंत एकवेळ तधी ॥१५१॥

सर्वस्वदान केले पात्री, क्षेत्री स्वमूर्तिसर्वस्व ।

न सरे अनंत लुटिता, सद्धन सदधीन लुटितसे विश्व ॥१५२॥

हे इंद्रनीळमणिच्या कांतिरसाचीच वोतिली मूर्ती ।

मन तृणकण लिगटतसे, तुम्ही बरी पाहिली खरी पूर्ती ॥१५३॥

हा विठ्ठल ठक, ठकिले ठक, ठक पडले ठकासि जे हरितो ।

नामचि देतो दाउनि निजार्थ, जनसंचितार्थ संहरितो ॥१५४॥

यासहि नामा ठकडा भेटे, मग यासि ठकविले तेणे ।

सद्गुण गाय सुनिपुणे वेधियला कृष्णसारसा जेणे ॥१५५॥

ऐसे भगवत्तत्पर सदयह्रदय संत पंत भेटावे ।

ते सच्छिक्षादाते मुमुक्षुबुद्धिसि होति नेटावे ॥१५६॥

सद्धृदयवशीकरण श्रीमत्सीतानिवास या मनुने ।

त्याच्या जपी असावे निरत सदा मी सचित्त वाक्तनुने ॥१५७॥

हे भरत! सुमित्रात्मज हे सीते ! माय आयका विनती ।

शिकवा साधुजनाला कैसी शरणागते करावि नती ॥१५८॥

तुम्ही वसिष्ठगाधिजमुजिमुखसच्चरणसेवनोद्युक्त ।

गुरुजनभजन शूभ जनी शिकवा, होयीन भवभयोन्मुक्त ॥१५९॥

श्रीमंदिरइंदीवर हे भ्रमरहित प्रसिद्ध तीर्थतटी ।

वृद्धांसि गमे सरयूनिटकट उभा राम निहितपाणिकटी ॥१६०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP