ऋणानुबंध - संग्रह ८

मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


गर्भीन्या नारीला । खाऊं वाटलं काय काय

अपुल्या म्हायेराशीं जाय । खाऊं घालील तुजी माय

*

पोतीमंदे पोती । भागवत भारी

गोतामंदे मातोसरी

*

माईनं माहेर । बापानं ग गोत सारं

राज्य भर्ताराचं बर्म । दिसतं शोभीवंत

*

घोडीची बसनार । तिला गाडी लागल आतां ।

लेकुरवाली झाली शीता । मैनाबाई

*

बाप करी बोळवन । माय करीते झोळणा

गाय वासरुं पाळणा । देलाय्‌ ग बंधूजीनं

*

सासरीं ग जातां वेळां । भावजई धूते पाय

पदर लावी डोळां माय

*

माय असतां माहेर । बाप असतां येणं जाणं

बंधू कोणाचे ग कोण

*

सांवळ्या भावजईचं । बोलनं ठसाठसा

माजा कल्यानी आरसा । भाऊराय

*

दिवाळी पंचेमी । वरसाचे दोन सण

करुं नको माझ्यावीण । भाईराया

*

घोडीचा लगाम । धरीतें मज्या मुटीं

आज राहये मज्यासाठीं । भाऊराया

*

घरां पावना ग आला । आताच्याला दाळभात

बुंदा करितें सारी रात

*

भाऊ ग चोळी घेतो । भावजय डोळे मोडी

नको सक्या तुजी चोळी । लेन्याची काय गोडी

*

मायबापाच्या ग राज्यीं । गोरे लुटावं नगर

भाऊ भाशियाच्या राज्यीं । ठाणं बसलं जबर

*

भाऊ ग आपुला । भावजई पराई

तिची मुरवत धरावी । अपुल्या भावासाठी

*

पान्या ग पावसाचा । येतो कीं वसाडा

भाऊ भयनीला असावा । जुन्या चोळीला इसांवा

*

भैन न्हाई त्या भावाचा । जलम बाई सूना

नित ववी आरजुना । बंधुराया

*

दिवाळीच्या दिशीं । आरतींत पांच कोंद

ओवाळीला तूजा गेंद । मायबाई

*

भाऊ यीवाई म्यां क्येलों । करायाचा नव्हता केला

होता तोही रंग गेला । झरीच्या पाटावाचा

*

भाऊ यीवाई म्यां क्येलों । भाची सून पडना पायां

घरला चला भाईराया । लेकीची रीत पाह्या

*

भाऊ यीवाई म्यां क्येलों । नाहीं की घरां आला

शिवंवरुनी ग गेला । लेक देऊन वैरी झाला

*

बहीन भावाचं भांडान किलीबिली

न्हाई तुला शिवी दिली बंधूराया

*

पांचजण बाई ल्याक । सहावा भरतार

गळां माझ्या चंद्रहार । बंधूराया

*

पांची ग उतरंडीं । पांचीला झांकण

लेकीसुना सौभागीन । मीं ग नांदतें भाग्यानं

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP