संदर्भ - देवी देवता २

पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.


पंढरे गे पुरामधी,

कथा वाचिता घरोघरी

साधुच्या विणेवरी

मैना बोलता नानापरी ।२१।

दिगा तू दिगा देवा

साधू संताचो शेजार

नित्य नि कानी पडे

हरी नामाचो गजर. ।२२।

राम चाले वाटे

लक्ष्मण झाडी काटे

आताच्या राजीयात

अशे भाऊ गे नाही कोठे ।२३।

राम नि लक्ष्मण

दोघे दुलुडीचे गे मणी

कैकयी गे पापनी

नको धाडू तू दूर वनी ।२४।

राम नि लक्ष्मण

साखरेचा नि गे खवा

रामाचा नाव घेता

सुख वाटलां माझ्या जीवा ।२५।

राम नि लक्ष्मण

पुतळ्योचा ठसा

एवढ्या दुनियेत

राम प्रगटला कसा ।२६।

सीतेने रानीयेलो

झाडाचो झाडपालो

नगरी वास गेलो

सीते नागरीच्या रानपाचो. ।२७।

सीतेन रानियेलां.

कोडू गे कारला

पुण्यीया सारीख्या

तिच्या पतीला गोड झाला ।२८।

सीता नि कानी सांगे

आपुल्या जलमाची

पापीया रावणाची

लंका जळता सोनियाची ।२९।

पहिली माझी ओवी

गाई मी एकाएकी

ब्रम्ह नि विष्णू दिका

गाई मी हारोहारी ।३०।

दुसरी नि माझी ओवी

दुजा ही नाही कोठे

दयाळ पांडुरंग

वनी तो मज भेटे ।३१।

तिसरी माझी ओवी

तिन तिरकुटाच्या परी

बेल नि गे पत्र

ब्रम्ह नि शिवावरी ।३२।

चवथी माझी ओवी

गाईली चहू देशा

दयाळा पांडुरंगा

पुरवी माझी आशा ।३३।

पाचवी माझी ओवी

पाचाही प्राणज्योती

दयाळ पांडुरंग

रुक्मीणीच्या गे पती ।३४।

सहावी माझी ओवी

सहाही गे सरले

दयाळ पांडुरंग

गुरुमुर्ती गे भेटले ।३५।

सातवी माझी ओवी

साताय सप्त ऋषी

शिरिराम गे जन्मले

कौसल्येच्या गे कुशी ।३६।

आठवी माझी ओवी

अठ्ठावीस गे युगे

दयाळ पांडुरग

विटेवर गे उभे ।३७।

नववी गे माझी ओवी

संपले गे दळण

दयाळ पांडुरंग

चुकवी जन्म मरण ।३८।

दहावी माझी ओवी

दहावीगे पावली

दयाळ विठ्ठ्लाची

पूजा मी आरंभीली ।३९।

ताम्याच्या गे तोपात

गव्हाची केली सोजी

चिदंबर देऊ स्वामी

नित्य पुरवी माझी रोजी ।४०।

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP