मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत काणेकर|संग्रह १|
कोणि म्हणती

कोणि म्हणती

अनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.


कोणि म्हणती कसलिं ही प्रतिभेस घेसी बंधनें ?

चांदराती आणखी तीं वल्लभेचीं चुंबनें----

---टाकुनी हें काय गासी रुक्ष, कर्कश, रांगडें ?

शेणमातीचीं खुराडीं आणि रंकांचे लढे !

राव सत्तावंत किंवा दास मध्यमवर्गिय,

गा गडया, त्यां खूष करण्या गान तूझें स्वर्गिय !

तीं तुझीं गुलगूल गाणीं ऐकुनी विसरावया---

---लाव रंकां झुंज जी लढतात ते सत्ता-जया !

वल्ल्भा जाईल माझी मीहि माती होइन;

रंकरावांची रणें इतिहास टाकिल तोडुन.

आणखी उगवेल साम्याची उषा जगतांत या;

काय ते म्हणतील काव्या त्या क्षणीं या माझिया ?

मानवांचे पुत्र लढले, आणि तुटलीं बंधनें;

गाइला हा चांदरातीं वल्लभेची चुंबनें !

क्रांतियुध्दाची चढाई आज जर ना गाइन,

मानवी इतिहास का देईल फिरुनी हा क्षण ?

N/A

References :

कवी - अनंत काणेकर

दिनांक - ९ ऑगस्ट १९३३

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP