गोष्ट पाचवी


संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.
The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट पाचवी
'असाध्य ते साध्य होते, पण त्यासाठी धाडस करावे लागते.'

एका नगरीत एक विणकर तरुण व सुतार तरुण यांची दाट मैत्री होती. एकदा ते दोघे गावातल्या देवळातील वार्षिक उत्सवाला गेले असता, त्या ठिकाणी आलेल्या कमालीच्या सुंदर राजकन्येला पाहून तो विणकर तिच्यावर एकदम मोहित झाला; पण तिच्याशी आपले लग्न होणे अशक्य असल्याचे लक्षात येऊन, तो अतिशय अस्वस्थही झाला.
त्याची ती काहीशी भ्रमिष्टासारखी मनःस्थिती पाहून त्याच्या सुतार मित्राने त्याला त्याच्या तशा वागण्याचे कारण विचारले. तेव्हा तो विणकर तरुण म्हणाला, 'मित्रा आज देवळात पाहिलेली ती असामान्य सुंदर राजकन्या पाहून, मला तिच्याच संगे लग्न करण्याची इच्छा झाली आहे. पण तिचे माझे लग्न होणे ही अश्क्य गोष्ट असल्याने, मी अग्निकुंडात उडी घेऊन माझ्य़ा जीवनाचा अंत करून घेण्याचे ठरविले आहे.'
सुतार म्हणाला, 'अरे मित्रा, एखादी गोष्ट अशक्य आहे म्हणून ज्याला रडत बसण्याची सवय असते, त्याच्या वाट्याला या जगात केवळ दुःखच येते; याउलट, ज्याच्या अंगी प्रयत्‍नांची पराकाष्ठा करून अशक्य गोष्टही शक्य करून दाखविण्याचे धाडस व जिद्द असते, त्याच्याच गळ्यात 'लक्ष्मी' माळ घालते. तेव्हा तुझा मित्र म्हणून मी तुला 'कळ' असलेला एक लाकडाचा गरुड बनवून देतो. तू भगवान विष्णूंचे रूप घेऊन त्या गरुडावर बैस व त्याची 'कळ' दाबून, हवेतून त्या राजवाड्याच्या वरच्या मजल्यावरील खास महालात राहणार्‍या त्या राजकन्येची अपरात्रीच्या वेळी भेट घेत जा. भगवान विष्णू म्हणून ती तुझे स्वागत करील आणि मोठ्या आनंदाने ती तुझ्याशी लग्न करायला तयार होईल. मात्र लग्न झाल्यावर एखाद्या रांगड्या विणकराप्रमाणे तिच्याशी न वागता, तू तिच्याशी एखाद्या खानदानी राजकुमाराप्रमाणे चांगले वागण्याची काळजी घे.'
विणकराला ही गोष्ट पटली. मग आठ-दहा दिवसांत त्या सुतार मित्राने लाकडापासून तयार करून व रंगवून दिलेले चक्र, शंख, गदा व मुकुट धारण करून व त्यानेच तयार करून दिलेल्या कळीच्या गरुडावर बसून, तो तरुण विणकर एका रात्री त्या गरुडाची 'कळ दाबून, हवेतून त्या राजकन्येच्या महालात गेला.
प्रत्यक्ष भगवान विष्णू गरुडावर स्वार होऊन प्रेमाची याचना करण्याकरिता आपल्याकडे आले, या विचाराने त्या राजकन्येचे मन आनंदाने मोहरून गेले. तिने त्याच्यापुढे साष्टांग नमस्कार घातला. मग बराच वेळ प्रेमाच्या गोष्टी झाल्यावर 'भगवान्' पुन्हा गरुडावर बसून तिथून निघून गेले. त्यानंतर त्यांची अशी भेट दररोज रात्री होऊ लागली.
एके रात्री कंचुकी - राजवाड्यातील स्त्रियांवर देखरेख करणारा अधिकारी - त्या राजकन्येच्या बंद महालावरून चालला असता, ती राजकन्या व एक पुरुष यांचे बोलणे त्याच्या कानी पडले. त्याने ते वृत्त दुसर्‍या दिवशी सकाळी राजाच्या कानी घातले. ते ऐकून, मनी धास्तावलेला राजा म्हणाला, 'राजवाड्याभोवती एवढा कडक पहारा असताना आपल्या कन्येला भेटायला येण्याचे धाडस कोण करतो ? खरोखरच मुलीचा पिता होणं ही एक दुःखाचीच गोष्ट म्हटली पाहिजे. म्हटलंच आहे ना ?-
पुत्रीति जाता महतीह चिन्ता ।
कस्मै प्रदेयेति महान्वितर्कः ।
दत्त्वा सुखं प्राप्स्यति वा न वेति ।
कन्यापितृत्वं खलु नाम कष्टम् ।

(मुलगी जन्मणे म्हणजे मोठीच चिंतेची गोष्ट आहे. ती कुणाला द्यावी हा जसा मोठा प्रश्न तसाच तिला दिल्यावर तिला सुख मिळेल की नाही, हाही प्रश्नच असतो. खरोखरीच मुलीचा पिता होणं ही कष्टाची गोष्ट आहे. )
राजाराणीने आपल्या कन्येला फैलावर घ्यायला सुरुवात केली असता, ती त्यांना म्हणाली, 'आई-बाबा ! प्रत्यक्ष भगवान् विष्णू गरुडावर बसून माझ्याकडे येतात व त्यांची पत्‍नी होण्याचा मला आग्रह करतात. मग मी त्यांना नकार कसा देऊ ? वाटल्यास आज रात्री तुम्ही लपून त्यांना पहा, 'राजाराणीने त्याप्रमाणे त्या रात्री पाहिले व भगवंताचे दर्शन होताच त्यांना आपले हात आकाशाला लागल्यासारखे वाटले. विष्णू निघून जात असताना, त्यांना चोरून नमस्कार करून, त्या दोघांनी आपल्या मुलीचे अपार कौतुक केले.
प्रत्यक्ष भगवान विष्णू आपले आता जावई होणार म्हणजे या जगात आपले कोण वाईट करू शकणार !' असा समज होऊन, त्या राजाने आपल्या राज्याच्या सीमा ओलांडून, दुसर्‍या राज्यांवर आक्रमण केले. ते पाहून इतर राजे एकत्र आले व त्यांनी त्या राजाचा दारुण पराभव करून, त्याचे जवळजवळ सर्व राज्य जिंकले.
त्यामुळे तो राजा व त्याची राणी घाबरली आणि मुलीला म्हणाली, 'बेटी, प्रत्यक्ष विष्णू तुझा पती होणार असताना, आपल्याला असा दारुण पराभव का पत्करावा लागला ? उद्या हा राजवाडाही जर शत्रूच्या हाती गेला, तर आपण जायचे कुठे ? तेव्हा आज रात्री भगवान् तुझ्याकडे आले की, त्यांना आपले राज्य परत मिळवून देण्याची विनंती कर.'
त्या रात्री तो विष्णुवेषधारी विणकर त्या राजकन्येला भेटायला आला असता, तिने विनंती केली, 'भगवान्, आपण सर्वशक्तिमान् आहात. तेव्हा उद्या आपण माझ्या बाबांच्या सर्व शत्रूंचा धुव्वा उडवून, माझ्या बाबांना त्यांचे राज्य परत मिळवून द्या.'
तिची ती प्रार्थना ऐकून विणकर क्षणभर पेचात पडला. पण दुसर्‍याच क्षणी तो मनात म्हणाला, 'मी जरी सामान्य माणूस असलो, तरी मी या राजकन्येच्या पित्याचा एक प्रजाजन आहे आणि तो माझा स्वामी आहे. तेव्हा प्रसंगी स्वतःचे प्राणही पणाला लावून स्वामीचं व त्याच्या राज्याचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून उद्या सकाळी आपण राजाच्या सैन्याबरोबर - पण गरुडावर बसून - हवेत संचार करू. म्हणजे आपल्याला खरेखुरे भगवान् विष्णू समजून, शत्रू निश्चितच पळून जाईल.' मनात असे ठरवून तो विणकर तरुण राजकन्येला मुद्दामच म्हणाला, 'प्रिये, तुझ्या वडिलांच्या शत्रूंना जर माझ्या हातून मृत्यु आला तर त्यांना मरणोत्तर स्वर्ग मिळेल. तसे न होता त्यांना नरकाची प्राप्ती व्हावी, म्हणून तू तुझ्या बाबांनाच त्यांच्या सैन्याच्या सहाय्याने शत्रूवर तुटून पडायला सांग. मी त्यांना आशीर्वाद देईन व गरज पडलीच तर सहाय्य करीन.' राजकन्येने ते मान्य केले व त्याप्रमाणे वडिलांना सांगितले.
वैकुंठात राहणार्‍या खर्‍या भगवान् विष्णूंना हा प्रकार अंतर्ज्ञानाने कळला.
त्यांनी विचार केला, 'माझे रूप धारण केलेला हा विणकर जर उद्या रणभूमीवर पराभूत झाला, 'तर लोकांना तो माझाच पराभव झाल्यासारखा वाटेल व माझ्यावरची त्यांची भक्ती लोप पावेल, तेव्हा याला व याचा सासरा होणार असलेल्या राजाला विजयी करायला हवेच हवे.'
मनात असे ठरवून भगवान विष्णूंनी स्वतः त्या विणकराच्या शरीरात प्रवेश केला, स्वतःच्या खर्‍या गरुडाला त्यांनी त्या विणकराच्या लाकडी गरुडात प्रवेश करण्याची आज्ञा केली, तर त्यांच्या चक्राने व गदेने आपल्या सामर्थ्यासह त्या विणकराच्या अनुक्रमे लाकडी चक्रात व गदेत प्रवेश केला.
आपल्या गरुडावर विष्णूंच्या रूपात बसलेला तो विणकर दुसर्‍या दिवशी सकाळी मोठ्या धैर्याने रणभूमीवर गेला आणि त्याचे असामान्य तेज पाहून राजाच्या शत्रूंनी रणांगणातून पळ काढला. हे कर्तृत्व केवळ आपले व आपल्या सुतारमित्राचे नसून, या कामी आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वराचे सहाय्य झाले आहे, याची जाणीव त्या विणकराला झाली. त्याने मनोभावे परमेश्वराला नमस्कार केला व तो गरुडासह जमिनीवर उतरला.
गावकर्‍यांनी तो विणकर असल्याचे ओळखले, पण तरीही त्याने दाखविलेल्या धाडसाबद्दल ते त्याचा जयजयकार करू लागले. तेवढ्यात राजा तिथे आला व त्याला खरा प्रकार समजला. पण तो म्हणाला, 'राजघराण्यातील एखाद्या सामान्य तरुणापेक्षाही हा धाडसी विणकर तरुण अधिक श्रेष्ठ असल्याने, माझ्या दृष्टीने तो माझा जावई व्हायला योग्य आहे.' मग राजाने त्या विणकर तरुणाशी आपल्या कन्येचे मोठ्या थाटात लग्न लावून दिले व त्याला एक स्वतंत्र राज्यही दिले.'
ही गोष्ट करटकाला सांगून दमनक म्हणाला, 'दादा, गुप्त योजनेच्या व धाडसाच्या बळावर त्या विणकराने जशी राजकन्या मिळविली तसेच संजीवक व पिंगलकमहाराज यांच्या मैत्रीत फूट पाडण्यात मी यश मिळवीन.'
'पण बुद्धिमान संजीवक व शक्तिमान पिंगलक यांच्यापुढे तुझ्यासारख्या दुर्बळाचे काय चालणार?' असा प्रश्न करटकाने केला असता दमनक म्हणाला, 'दादा, या जगात जे काम करायला शक्ति असमर्थ ठरते, तेच काम युक्ती सहज करू शकते. म्हणून तर एक कावळा एका काळ्या व विषारी महासर्पाचा वध करू शकला ना ?'
'तो कसा काय ?' अशी पृच्छा करटकाने केली असता दमनक म्हणाला, 'त्याचं असं झालं-

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP