गोष्ट दुसरी


संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.
The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट दुसरी
'नसती उठाठेव जो करी, तो संकटाला आपणहून पाचारी'

'एका नगरात सीमेवरील उपवनात एक धनिक मंदिर बांधून घेत होता. त्या कामावर असलेले सुतार, गवंडी आदि कामगार, सूर्य डोक्यावर येताच काम थांबवून आपापल्या घरी जेवायला जात.
एकदा त्या मंदिराच्या तुळया तयार करण्याकरिता सुतार अर्जुनवृक्षाचे एक जाड व लांब लाकूड करवतीने चिरत होते. ते लाकूड अर्धवट चिरून होते न होते, तोच उन्हे उभावल्यामुळे सुतार त्या अर्धवट चिरलेल्या लाकडात खैराची पाचर ठोकून, इतर कामगारांसंगे जेवायला घरी गेले. ते घरी गेले आणि लगेच पाच-पंचवीस वानरांचे एक टोळके त्या ठिकाणी येऊन नाना तर्‍हेच्या चेष्टा, चाळे करू लागले.
कुणी दगडांच्या राशीतले दगड फेकतोय, तर कुणी हातोड्याने ठाकठोक करतोय, असे त्यांचे चाळे सुरू झाले असता, नसते उपद्‌व्याप करण्याची खोड असलेला एक जाडगेला वानर त्या अर्धवट चिरलेल्या लाकडावर जाऊन बसला, व त्या चिरलेल्या भागात सुताराने ठोकलेली पाचर ओढून काढू लागला. असे करीत असता, त्याची शेपटी, वृषण आदि अवयव अजाणता त्या दुभंगलेल्या लाकडाच्या फटीत गेले आणि ती पाचर काढली जाताच ते लाकडाचे दोन भाग एकदम एकत्र आल्याने त्यांत ते अवयव चिरडले गेले व त्याला यातना सोशीत प्राणांना मुकावे लागले. म्हणून मी म्हणतो, 'हे दमनका, तू नसत्या उठाठेवीत पडू नकोस.'
यावर दमनक नाक मुरडून म्हणाला, 'दादा, मग काय आपण आपलं पुढलं आयुष्य केवळ स्वतःचं पोट भरण्यातच घालवायचं ? छे छे ! आज जरी आपल्याला राजाश्रय नसला, तरि मित्रांना वर आणण्याकरिता व शत्रूंना खाली दडपण्याकरिता आपण पुन्हा राजाश्रय मिळवलाच पाहिजे. सध्याच्या आपल्या चैतन्यहीन आयुष्याला काहीतरी अर्थ आहे का ? म्हटलंच आहे ना ? -
यस्मिन जीवति जीवन्ति बहवः सोऽत्र जीवति ।
वायाम्सि किं न किर्वन्ति चंच्वा स्वोदरपूरणम् ॥

(ज्याच्या जगण्यामुळे या जगात अनेकजण जगतात, तोच खर्‍या अर्थी जगतो. नाहीतर कावळेसुद्धा आपल्या चोचीने स्वतःचे पोट भरतातच ना ?)
'तेव्हा दादा, मी पिंगलकमहाराजांकडे जाणार आणि त्यांना त्यांच्या भीतीचे कारण विचारून व शक्य झाल्यास ते कारण दूर करून, त्यांचे व आपले दुरावलेले संबंध पुन्हा जोडणार.'
करटकाने विचारले, 'पण दमनका, बोलावले नसतानाही जो राजाकडे जातो, तो बर्‍याच वेळा इतरांच्या कुचेष्टेचा विषय होतो, हे तुला ठाऊक आहे ना ?'
दमनक म्हणाला, 'दादा, नसत्या अभिमानाला बळी पडून जे लोक राजापासून दूर राहतात ते आयुष्यभर अर्धपोटी राहतात. ज्याप्रमाणे चंदनवृक्ष हा मलय पर्वताखेरीज इतरत्र कुठे वाढत नाही, त्याचप्रमाणे विद्वान, गुणवान्, कलावंत व शूर यांच्या गुणांचे चीज राजाच्या आश्रयाखेरीज होत नाही. आता तू विचारशील की, आपण कुठे तसे मोठे आहोत ? पण आपण जरी सामान्य असलो, तरीही राजाच्या आश्रयाला जावे. कारण म्हटलेच आहे ना ?
आसन्नमेव नृपतिर्भजते मनुष्यं ।
विद्याविहीनमकुलीनमसंस्कृतं वा ।
प्रायेण भूमिपतयः प्रमदा लताश्च ।
यत्पार्श्वतो भवति तत्परिवेष्टयन्ति ॥

(जो मनुष्य जवळपास असतो, तो जरी विद्याहीन, अकुलीन किंवा असंस्कृत असला, तरी राजा त्याच्यावर कृपा करतो. राजे, स्त्रिया व वेली या बहुधा जो जवळ असतो त्याचाच आधार घेतात.)
याप्रमाणे बोलून दमनक हा जेव्हा पिंगलकाकडे गेला व त्याला म्दन करून त्याच्यापुढे नम्रपणे उभा राहिला, तेव्हा पिंगलकाने त्याला विचारले, 'काय रे दमनका, तू बर्‍याच दिवसांत माझ्याकडे फिरकला कसा काय नाहीस ?'
दमनक म्हणाला, 'महाराज, आपल्याला जर आमच्यासारख्या सामान्यांची गरज उरली नाही, तर उगाच यायचे कशाला ? पण एक गोष्ट मात्र निश्चित - आपण आम्हाला विचारा वा न विचारा, आमचे आपल्यावरचे प्रेम कधी कमी व्हायचे नाही, आणि आम्हाला जे योग्य वाटेल ते आपल्यासमोर बोलायला आम्ही कचरणारही नाही.'
'त्यातून महाराज, राजा जर सेवकावर प्रसन्न झाला, तर तो फार तर त्याला कमीअधिक धन देतो, पण निष्ठावंत सेवक जर राजावर प्रसन्न झाला, तर तो त्याच्यासाठी आपला प्राणही द्यायला तयार होतो. आता इतर मंत्र्यांच्या तुलनेत मी व माझा भाऊ करटक आपल्याला यःकश्चित् वाटत असलो, तरीही आपण माझे म्हणणे ऐकून घ्यावे.'
'महाराज, यःकश्चित् गोष्टींकडेसुद्धा दुर्लक्ष करू नये. त्यासुद्धा वाटतात तशा निरुपयोगी नसतात. साध्या काडीचासुद्धा दात व कान कोरण्यासाठी उपयोग होतोच ना ? मौल्यवान रेशीम यःकश्चित् किड्यांपासूनच मिळते ना ? प्रत्यक्ष देवसुद्धा ज्यांना मस्तकी धारण करतात, ती कमळे चिखलापासूनच मिळतात ना ? सोनेसुद्धा दगड मातीतूनच प्राप्त होते ना ? तेव्हा भोवतालच्या लोकांचे नुसते कूळ वा बुद्धी विचारात न घेता, त्यांची निष्ठाच अधिक विचारात घ्यावी. तेव्हा, आम्हा दोघां भावांसारखे मर्यादित बुद्धीचे पण अमर्याद निष्ठेचे सेवकच आपल्याला अधिक उपयोगी पडतील, ही गोष्ट महाराजांनी लक्षात असू द्यावी, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे.'
पिंगलक हसून म्हणाला, 'दमनका, तुझे आताचे बोलणेच मुळी तू सामान्य बुद्धीचा नाहीस हे सिद्ध करते. त्यातून तू व तुझा भाऊ करटक हे माझ्या एकेकाळच्या मंत्र्याचे मुलगे, तेव्हा मी तुम्हा दोघांना तसे परके कसे मानीन ? पण या घडीला त्या इतर गोष्टी बाजूला ठेवून, तू माझ्याकडे कशासाठी आला आहेस, तेवढेच मला सांग.'
दमनक म्हणाला, 'काही गोष्टी सर्वांसमक्ष बोलायच्या नसतात.' त्याचे हे बोलणे ऐकून राजा पिंगलकाभोवती असलेले सर्व प्राणी दूर जाताच दमनकाने विचारले, 'महाराज, आपण पाणी पिण्याच्या उद्देशाने यमुनाकाठी गेला असता, पाणी न पिताच काहीशा भयभीत मनःस्थितीत इकडे का परतलात?'
सुरुवातीला थोडेसे आढेवेढे घेऊन राजा पिंगलक म्हणाला, 'दमनका, मी सांगतो आहे त्याची कुठे वाच्यता करू नकोस. अरे, मी यमुनेवर पाणी प्यायला गेलो असता, काळजाचा थरकाप उडवणारी एक डरकाळी माझ्या कानी पडली. ती ऐकून, ती एखाद्या, महाभयंकर प्राण्याची असावी, असे वाटून मी पाणी न पिताच इकडे परतलो व हे रान सोडून दुसर्‍या एखाद्या दूरच्या रानात जाण्यचा विचार मी करू लागलो.'
यावर दमनक म्हणाला, 'महाराज, नुसत्या मोठ्या आवाजामुळे धास्तावून जाणे योग्य नाही. तसा मोठा आवाज नगारा, नौबत किंवा शंख यांचाही होतो. अशाच एका नगार्‍याच्या आवाजाला भ्यायलेल्या आमच्या एका जातभाईचे, नंतर कसे डोळे उघडले, ती गोष्ट आपल्याला ठाऊक आहे का?' पिंगलकाने नाही असे उत्तर देताच दमनक म्हणाला, 'तर मग ऐका महाराज-

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP