गोष्ट एकोणिसावी


संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.
The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट एकोणिसावी
पाप करताना येई हसू, पण परिणाम भोगताना येती आसू.

एका गावात 'धर्मबुद्धी' व 'पापबुद्धी' या नावाचे दोन तरुण मित्र होते. एकदा पापबुद्धीच्या मनात विचार आला, 'आपल्या मानाने धर्मबुद्धी हा अतिशय बुद्धिमान व विद्वान असल्यामुळे तो परदेशी गेल्यास पैसाच पैसा कमवू शकेल, व आपणही जर का त्याच्यासंगे गेलो, तर त्याच्या मार्गदर्शनाने आपल्यालाही थोडाफार पैसा मिळू शकेल.'
मनात असा विचार येताच तो धर्मबुद्धीकडे गेला व त्याला म्हणाला, 'मित्रा, अरे, ज्याने आयुष्यात परदेश पाहिले नाहीत, निरनिराळे लोक, त्यांच्या चालीरीती, भाषा, वेष, कला वगैरेंचा प्रत्यक्ष अनुभव घेतला नाही, अशा माणसाच्या जीवनाला काहीतरी अर्थ असतो का ? म्हटलेच आहे ना ?
देशान्तरेषु बहुविधभाषावेशादि येन न ज्ञातम् ।
भ्रमता धरणीपीठे तस्य फलं जन्मनो व्यर्थम् ॥

(पृथ्वीच्या पाठीवर भ्रमंती करून, निरनिराळ्या देशांतील भाषा, वेष इत्यादी ज्याने पाहिले नाहीत, त्याचा जन्म व्यर्थ होय.)
पापबुद्धी पुढे म्हणाला, 'हे धर्मबुद्धी, अरे आपल्या म्हातारपणी मुलांनी किंवा नातवंडांनी 'तुम्ही आयुष्यात काय केले ?' असा जर प्रश्न विचारला, तर 'आम्ही आमचं आयुष्य केवळ खाण्यापिण्यात घालवलं,' असंच आपण त्यांना उत्तर द्यायचं का ? वास्तविक तुझ्यासारख्या बुद्धिवंताने तर परदेशात जाऊन इतर गोष्टींचा अनुभव घेण्याबरोबरच धनही कमावले पाहिजे. तुझी तयारी असली, तर तुझ्यासोबत परदेशात येण्याची माझी तयारी आहे.' पापबुद्धीचे हे म्हणणे धर्मबुद्धीला पटले व एके दिवशी ते दोघे वडीलधार्‍यांचे आशीर्वाद घेऊन परदेशाच्या प्रवासाच्या निघाले.
परदेशी गेल्यावर धर्मबुद्धीने आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर भरपूर धन मिळविले तर त्याच्या मार्गदर्शनामुळे थोडाफार पैसा मिळविण्यात पापबुद्धीलाही यश आले. काही वर्षे तिकडे घालविल्यावर दोघे आपापल्या संपत्तीसह स्वतःच्या गावी जायला निघाले.
आपल्या गावाबाहेरील वनापर्यंतची मजल गाठताच कपटी पापबुद्धी मुद्दाम म्हणाला, 'धर्मबुद्धी, मी आता जे म्हणतो आहे ते नीट ऐक -
न वित्तं दर्शयेत् प्राज्ञः कस्यचित्‌ स्वल्पमप्यहो ।
मुनेरपि यतस्तस्य दर्शनाच्चलते मनः ॥

(सूज्ञाने आपले थोडेसेही धन कुणाला दाखवू नये. कारण धनाचे दर्शन घडले असता, बैराग्याचेही मन विचलित होते.)
त्याचप्रमाणे -
यथाऽमिषं जले मत्स्यैर्भक्ष्यते श्वापदैर्भुवि ।
आकाशे पक्षिभिश्चैव तथा सर्वत्र वित्तवान् ॥

(पाण्यातील आमिष मासे खातात, भूमीवरील पशू खातात, तर आकाशातील आमीष पक्षी खातात. पण धनवंत माणूस मात्र कुठेही जरी असला, तरी लोक त्याला खाऊन टाकतात. [म्हणजे लुबाडतात.] )
'तेव्हा हे धर्मबुद्धी, आपल्याला सध्या लागेल तेवढेच धन आपण आता बरोबर घेऊन घरी जावे व बाकीचे धन या वनात पुरून ठेवावे असे मला वाटते. मग पुढे जेव्हा जशी गरज लागेल, तसे इथे पुरलेले धन आपल्याला घेऊन जाता येईल.' पापबुद्धीने केलेली ही सूचना पटल्यामुळे - कुणी पाहात नाही याची खात्री करून घेऊन - त्या दोघांनी एक खोल खड्डा खणला आणि आपापल्या धनाच्या थैल्या एका मोठ्या डब्यात घालून, तो डबा खड्ड्यात पुरला व घराचा रस्ता धरला.
घरी गेल्यावर त्यांचा काळ अतिशय सुबत्तेत चालला होता. असे काही दिवस निघून गेले आणि एके दिवशी पापबुद्धीने एकट्याने वनात जाऊन व तो खड्डा उकरून, त्यातले दोघांचेही सर्वच्या सर्व धन पळवून आपल्या घरी नेऊन ठेवले.
मग दुसर्‍याच दिवशी तो धर्मबुद्धीकडे गेला व त्याला म्हणाला, 'मित्रा, माझे कुटुंब मोठे असल्याने, माझ्याजवळचे सर्व धन संपून गेले. तेव्हा निदान माझ्या गरजेपुरते थोडेसे धन आणण्यासाठी तरी आपण दोघे वनात जाऊ या.' धर्मबुद्धीने त्याचे म्हणणे मान्य केले व ते दोघे वनातील ठरल्या जागी गेले.
पण माती खणून काढतात, तर त्या खड्ड्यातला डबा नाहीसा झालेला ! ते पाहून पापबुद्धी धर्मबुद्धीवर उलटून त्याला म्हणाला, 'अरे दगलबाजा, इथे पुरलेले धन तुझ्या-माझ्याशिवाय इतर कुणालाच ठाऊक नसल्याने, ही चोरी तूच केली आहेस. बर्‍या बोलाने माझे धन मला परत कर, नाहीतर मी तुझ्याविरुद्ध सरकारात दावा दाखल करीन.'
धर्मबुद्धी म्हणाला, 'हे पापबुद्धी, मला तर हे काम तुझेच असून, चोरी पचविण्यासाठी तू माझ्यावर बालंट घेत आहेस असे वाटते. माझ्याविषयी म्हणशील तर मी माझ्या नावाप्रमाणेच धर्मशील आहे आणि माझ्या हातून असे पापकर्म घडणे अशक्य आहे. म्हटलेच आहे ना ?
मातृवत् परदाराणि परद्रव्याणि लोष्ठवत् ।
आत्मवत् सर्वभूतानि वीक्ष्यन्ते धर्मबुद्धयः ॥

(जे धार्मिक वृत्तीचे असतात, त्यांना इतरांच्या स्त्रिया मातेप्रमाणे, दुसर्‍यांचे धन मातीच्या ढेकळाप्रमाणे आणि सर्व प्राणिमात्र स्वतःप्रमाणे वाटत असतात. )
अखेर ते दोघे न्यायालयात गेले व त्यांनी आपापले गार्‍हाणे न्यायमूर्तींच्या कानी घातले. ते ऐकून न्यायमूर्ती म्हणाले, 'तुम्हा दोघांपैकी कुणी हा अपराध केला, हे कळायला साधन नसल्यामुळे, तुम्ही दोघांनीही एखादे 'दिव्य' करून दाखवा.'
यावर पापबुद्धी म्हणाला, 'न्यायमूर्ती, तुमचे हे सांगणे वावगे आहे. एखादे प्रकरण संशयास्पद असले, तर न्यायमूर्तींनी लेखी पुराव्याची मागणी करावी; ती पूर्ण करता येत नसेल, तर ती घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यक्तीची साक्ष काढावी आणि तसा साक्षीदार मिळत नसेल, तरच 'दिव्य' करून दाखविण्याची जबाबदारी संबंधितांवर टाकावी या बाबतीत म्हणाल तर ते धन या धर्मबुद्धीने चोरले. ही गोष्ट त्या वनाच्या वनदेवाने नक्कीच पाहिली असणार. तेव्हा आपण वनात यावे व त्या वनदेवालाच विचारावे. वनदेव हा जरी मानवांच्या दृष्टीस पडत नसला, तरी माझ्यासारख्या सज्जन व पुण्यवान् माणसाला वाचविण्यासाठी तो आपण विचारलेल्या एखाद् दुसर्‍या प्रश्नाला तरी स्वतः गुप्त राहून नक्कीच उत्तर देईल.' काहीशा आश्चर्याने का होईना, पण न्यायमूर्तींनी पापबुद्धीचे हे म्हणणे मान्य केले आणि दुसर्‍या दिवशी वनात येण्याचे त्याला आश्वासन दिले.
घरी जाताच पापबुद्धीने न्यायालयात घडलेला सर्व प्रकार आपल्या पित्याच्या कानी घातला व तो त्याला म्हणाला, 'बाबा, उद्या पहाटे तुम्ही त्या वनातील शमीच्या झाडाच्या ढोलीत दडून रहा, आणि 'हे धन कुणी चोरले ?' असा प्रश्न आमच्यापैकी कुणी विचारला की, 'धर्मबुद्धीने' असे सरळ उत्तर द्या.' पित्याने धनाच्या लोभाने पापबुद्धीचे म्हणणे मान्य केले.
दुसर्‍या दिवशी पहाटेच पापबुद्धीचा पिता वनात जाऊन शर्माच्या झाडातील कोटरीत लपून बसला आणि चांगले उजाडल्यावर पापबुद्धी व धर्मबुद्धी यांच्यासह न्यायाधीशही तिकडे गेले.
दुसर्‍या दिवशी पहाटेच पापबुद्धीचा पिता वनात जाऊन शमीच्या झाडातील कोटरीत लपून बसला आणि चांगले उजाडल्यावर पापबुद्धी व धर्मबुद्धी यांच्यासह न्यायाधीशही तिकडे गेले.
तिकडे गेल्यावर न्यायाधीशाच्या सांगण्यावरून स्वतः पापबुद्धीनेच मोठ्या आवाजात विचारले, 'हे वनदेवा, या इथे पुरलेले धन कुणी चोरले ?'
तो प्रश्न कानी पडताच त्या शमीवृक्षाच्या ढोलीतून उत्तर बाहेर पडले, 'पुण्यवान् पापबुद्धीचे त्या ठिकाणी पुरलेले धन, अधर्मी अशा धर्मबुद्धीने पळवून नेताना स्वतः मी वनदेवाने पाहिले.' हे उत्तर ऐकून पापबुद्धीने न्यायाधीशाला विचारले, 'महाराज, हा धर्मबुद्धीच चोर असल्याचे आता तरी सिद्ध झाले ना ?'
परंतु त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता धर्मबुद्धीने घाईघाईने त्या वृक्षाच्या बुंध्याभोवती पालापाचोळ्याचा ढीग रचला व तो पेटवून दिला. त्याबरोबर त्याच्या ज्वाला व धूर त्या ढोलीत शिरून पापबुद्धीच्या बापाच्या कपड्यांनी पेट घेतला व त्याचे डोळे भाजले जाऊन तो आंधळा बनला. पण अशाही स्थितीत त्याने ओरडत, किंचाळत ढोलीबाहेर उडी घेतली आणि न्यायाधीशाने विचारल्यावरून त्याला खरी हकीगत सांगितली. मग न्यायाधीशाने पापबुद्धीला त्याच झाडाखाली फाशी दिले. अशा तर्‍हेने, केलेली चोरी पचविण्यासाठी पापबुद्धीने जो उपाय योजला भयंकर अपाय ठरला.
त्यानंतर धर्मबुद्धीच्या प्रामाणिकपणाची व चातुर्याची स्तुती करून न्यायाधीश त्याला म्हणाला, 'कुठलाही उपाय योजताना, त्याच्यापासून आपल्याला एखादा अपाय तर होणार नाही ना? या गोष्टीचा विचार करावा लागतो. नाहीतर, त्या अविचारी बगळ्याने योजलेल्या उपायमुळे, जसा त्याच्यावर व त्याच्या आप्तमित्रांवर आत्मनाशाचा प्रसंग ओढवला, तसा प्रसंग ओढवतो.'
'तो कसा काय?' अशी पृच्छा धर्मबुद्धीने केली असता, न्यायाधीश म्हणाला, 'ऐक-

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP