गोष्ट तिसरी


संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.
The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट तिसरी
'नको तिथे भितो, तो हसे करून घेतो.'

गोमायु नावाचा एक कोल्हा भक्ष्याच्या शोधार्थ वनात भटकत असता, त्याच्या कानी अधुनमधून एक भयंकर आवाज पडू लागला. प्रत्यक्ष परिस्थिती अशी होती की, एके ठिकाणी कुणाच्यातरी राहून गेलेल्या नगार्‍यावर वार्‍याच्या झुळकेसरशी एका झुडपाच्या फांदीचा अधुनमधून आघात होत होता व त्यामुळे त्या नगार्‍यातून 'धाडधूम्' असा ध्वनी बाहेर पडत होता.
पण तो आवाज ऐकून तो कोल्हा अतिशय घाबरला व ते वन सोडून जाण्याचा विचार करू लागला. परंतु लगेच त्याच्या मनात विचार आला, हा भयंकर आवाज काढणारा प्राणी आहे तरी कोण, ते अगोदर सुरक्षित अंतरावरून पाहावे, आणि मगच हे वन सोडून जायचे की नाही ते ठरवावे.
मनात असा विचार करून तो त्या आवाजाच्या रोखाने जरा पुढे जातो न जातो, तोच त्याला फांदीच्या आघातांमुळे आवाज करणारा तो नगारा दिसला. ती एक निर्जीव वस्तू असल्याचे लक्षात येताच, तो त्या नगार्‍याजवळ गेला व स्वतःशीच म्हणाला, 'मी उगाच या आवाजाला भ्यायलो. हे एक पोकळ लाकडी भांडे असून, हे बहुधा चमचमीत खाद्यपदार्थांनी भरलेले असावे, म्हणूनच याचे वरचे तोंड चामड्याने पक्के बंद करून टाकले असावे.
या विचारामुळे त्याला आनंद झाला आणि त्या भांड्यातील ते रुचकर पदार्थ खाण्याच्या हेतूने, त्याने त्या नगार्‍याचे कातडे दाताने कुरतडले व तो त्याच्या आत काय काय आहे ते पाहू लागला. पण आत पाहतो तर केवळ पोकळी ! त्यामुळे निराश झालेला तो स्वतःशी म्हणाला -
भये वा यदि वा हर्षे संप्राप्ते यो विमर्शयेत् ।
कृत्यं न कुरुते वेगान्न स सन्तापमाप्नुयात् ॥

(भयाचा प्रसंग असो वा आनंदाचा प्रसंग असो, जो विचाराने वागतो, व कुठलीही गोष्ट उतावीळेपणाने करीत नाही, त्याच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही.)
दमनकाने ही गोष्ट सांगताच राजा पिंगलक त्याला म्हणाला, 'तुझ्या गोष्टीचा मतितार्थ मला कळला. पण समजा, ती भयंकर डुरकाळी एखाद्या महाभयंकर प्राण्याची असली तर ? मी वनराज सिंह असलो तरी आता वृद्ध झालो असल्याने, माझ्यात आता पूर्वीचे बळ राहिले नाही. तेव्हा मी त्याच्याकडे कसा जाऊ?'
दमनक म्हणाला, 'महाराज, माझ्यासारखा निष्ठावंत सेवक आपल्या सेवेला हजर असताना, आपण त्या प्राण्याकडे जाण्याचं काय कारण ? आपली आज्ञा झाल्यास, मी त्या प्राण्याकडे जातो आणि त्याची माहिती काढून येतो. त्याच्याकडे जाऊन आल्यावर पुढं काय करायचं ते मी सांगेन.'
'तू खरोखरच त्याच्याकडे जाशील का ?' अशा प्रश्न पिंगलकाने केला असता दमनक म्हणाला, 'महाराज, हा काय प्रश्न झाला ? माझ्यासारखा निष्ठावंत सेवक स्वामींसाठी वाटेल ते करायला तयार होईल. चांगल्या सेवकाचं लक्षणच मुळी असं आहे की-
स्वाम्यादेशात् सुभृत्यस्य न भीः संजायते क्वचित् ।
प्रविशेत् मुखमाहेयं दुस्तरं वा महार्णवम् ॥

(स्वामीने आज्ञा केली तर चांगला सेवक हा कधीही भीत नाही. तो सर्पाच्या जबड्यातसुद्धा शिरेल, किंवा प्रसंग पडल्यास महासागरातही उडी घेईल. )
दमनकाच्या या बोलण्याने संतुष्ट झालेल्या राजा पिंगलकाने, 'तू आपल्या कामात यशस्वी हो,' अशी त्याला शुभेच्छा व्यक्त करताच दमनक त्या 'भयंकर' प्राण्याच्या शोधार्थ निघाला व थोड्याच वेळात तो संजीवक बैल त्याच्या दृष्टीस पडला. त्याबरोबर तो स्वतःशीच हसून म्हणाला, हात्तिच्या ! हा तर एक साधा बैल आहे ! पण पिंगलक महाराजांनी आयुष्यात कधीही बैल पाहिलेला किंवा त्याचा आवाज ऐकलेला नसल्याने, याचीच डुरकाळी ऐकून स्वारीची तारांबळ उडाली असली पाहिजे. आता तोच त्यांचा समज कायम ठेवून, आपण आपल्या फायद्यासाठी या बैलात व त्यांच्यात आपल्या गरजेनुसार मैत्री किंवा तंटा निर्माण केला पाहिजे, तरच हे दोघे आपल्या शब्दांत राहतील. नाहीतरी राजेलोक हे काही एखाद्याचे सद्‌गुण वा त्याचे कुळ पाहून त्याला मान देत नाहीत. त्यांना ज्याची गरज असते, त्याचीच ते दखल घेतात. बाकी तेही साहजिकच आहे. ज्याचं आरोग्य उत्तम आहे, तो वैद्याची विचारपूस कशाला करील?' मनाशी असे ठरवून, दमनक पिंगलकाकडे गेला.
त्याला पाहून पिंगलकाने विचारले, 'दमनका, खरं सांग, तुझ्या कामात तू यश मिळवलंस का?'
दमनक म्हणाला, 'महाराज, आपल्याशी मी खोटं कसं बोलेन ? अहो, देवापाशी खोटं बोललं तर त्याबद्दलची शिक्षा पुढल्या जन्मी मिळते, पण राजाजवळ खोटं बोललं तर त्याची शिक्षा याच जन्मी वाट्याला येते. तेव्हा खरं सांगायचं तर तुम्ही सांगितलेल्या मोठ्या कामगिरीचा पहिला टप्पा मी पूर्ण केला. या वेळेला मी फक्त त्या प्राण्याला दुरून पाहिले. तो खरोखरच भयंकर दिसतोय. तरीही आपली आज्ञा झाली, तर मी त्याला आपला सेवक बनवू शकेन.'
'पण तो प्राणी माझा सेवक बनायला तयार होईल?' असा प्रश्न पिंगलकाने केला असता, दमनक म्हणाला, 'महाराज, जी बुद्धीलाही करता येणे अशक्य आहे, अशी एखादी तरी गोष्ट या जगात आहे का? म्हटलंच आहे-
न तच्छस्त्रैर्ननागेर्न्द्रैर्न हयैर्न पदातिभिः ।
कार्यं संसिद्धिमभ्येति यथा बुद्द्ध्या प्रसाधितम् ॥

(एखादी गोष्ट बुद्धीच्या सामर्थ्यावर जशी प्राप्त करून घेता येते, तशी ती शस्त्रे, हत्ती, घोडे व सैनिक यांच्या सहाय्यानेही साध्य करून घेता येत नाही. )
दमनकाच्या या बोलण्याने त्याच्यावर खूष झालेला पिंगलक त्याला म्हणाला, 'दमनका, आतापासून मी तुला पुन्हा माझा मंत्री बनविले आहे. यापुढे कुणाचा गौरव करायचा व कुणाला शिक्षा द्यायची, त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार मी तुला बहाल करीत आहे. तेव्हा आता तू माझा मंत्री म्हणून त्या प्राण्याकडे जा, त्याला मी अभय दिले असल्याचे सांग आणि त्याच्याकडूनही मला अभय असल्याचे वचन मिळवून, मग तू त्याला घेऊन माझ्याकडे.'
मंत्रीपद मिळाल्याने आनंदित झालेला दमनक त्या संजीवक बैलाकडे गेला आणि त्याला दटावणीच्या सुरात म्हणाला, 'कोण रे तू? आणि या वनाचे राजे असलेले महापराक्रमी पिंगलकमहाराज, यांच्या अनुज्ञेशिवाय तू या वनात स्वच्छंदपणे फिरून चारा खातोस ? त्यांच्यासारख्या सिंहश्रेष्ठाने मनात आणले, तर ते क्षणात तुझी चटणी करून टाकतील, तेव्हा तू माझ्यासंगे त्यांची क्षमा मागायला चल.'
'वनराज सिंहाकडे जाणे म्हणजे त्याचे भक्ष्य होणे,' हा विचार मनात येताच संजीवक बैल हादरून दमनकाला म्हणाला, 'कोल्होबा, कृपा करा आणि पिंगलकमहाराज या संजीवकाला मारणार नाहीत असे काहीतरी करा.'
दमनक मनात म्हणाला, 'सध्या हा व पिंगलक यांच्यात मैत्री घडवून आणायला हरकत नाहीत. त्यामुळे हे दोघेही परस्परांच्या भीतीपोटी माझ्याशी चांगले वागत राहतील.'
इकडे दमनकाच्या मनात असा विचार चालला असता, तिकडे पिंगलकाच्या मनात संशयाचे वेगळेच भूत थैमान घालू लागले होते. तो स्वतःशीच म्हणाला, 'या दमनकाला आपण मागे मंत्रीपदावरून काढून टाकले होते. त्या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्या भयंकर प्राण्याकरवी हा आपला काटा तर नाही ना काढणार ? वास्तविक त्याच्यावर विश्वास टाकून, आपण आपल्या मनातली भीती त्याच्यापुढे उघड करायला नको होती.
म्हटलंच आहे ना?
न वध्यन्ते ह्यविश्वस्ता बलिभिर्दुबला अपि ।
विश्वस्तारस्त्वैव वध्यन्ते बलवन्तोऽपि दुर्बलैः ॥

(अवाजवी विश्वास न टाकणार्‍या दुर्बलांचा बलवानही घात करू शकत नाहीत, पण तसा विश्वास टाकणार्‍या बलवंतांचा दुर्बलांकडूनसुद्धा घात केला जातो.)
वनराज पिंगलकाच्या मनात असा संशय उत्पन्न झाल्यामुळे तो त्या वडाच्या झाडाखालून उठून, पलायनाच्या दृष्टीने सोयीच्या अशा दुसर्‍या झाडाखाली जाऊन बसला व संकट ओढवलेच तर काय करायचे, याचा विचार करू लागला.
तिकडे दमनक संजीवकाला म्हणाला, 'हे बघ, वास्तविक आमचे पिंगलकमहाराज हे प्रत्यक्ष चंडिकादेवीचे वाहन असल्यामुळे, त्यांना कुणाचीच गरज नाही. असे असूनही मी तुला त्यांच्याकडून अभय मिळवून देईन व तुझी त्यांची मैत्री जुळवीन. पण माझे जे तुझ्यावर उपकार होतील, त्यांची तू जाणीव मात्र ठेव. यापुढे आपण दोघे जर एकमेकांचा सल्ला घेऊन वागलो, तर दोघांनाही सुखात दिवस काढता येतील.'
संजीवकाने हे मान्य करताच, दमनकाने त्याला तिथेच तात्पुरते थांबायला सांगून, तो पिंगलकाकडे गेला व त्याला भिवविण्यासाठी म्हणाला, 'महाराज, तो प्राणी असा तसा नाही. प्रत्यक्ष भगवान् महादेवाचे तो वाहन असल्यामुळे त्याला कुणाचीच गरज नाही. त्यामुळे सुरुवातीला तो माझे म्हणणेही ऐकून घ्यायला तयार नव्हता. पण 'पिंगलकमहाराज हे तर प्रत्यक्ष पार्वतीदेवीचे वाहन आहेत, असे मी त्याला खोटेच सांगितले, त्यामुळे तो आपल्याशी मैत्री करायला तयार झाला. मग घेऊन येऊ का इकडे त्याला ?'
दमनकाच्या या बोलण्याने मनातला संशय दूर होऊन पिंगलक त्याला म्हणाला, 'शाब्बास तुझी ! खरा बुद्धिवान आहेस तू. म्हटलंच आहे ना?
मन्त्रिणां भिन्नसन्धाने भिषजां सन्निपातिके ।
कर्मणि व्यज्यते प्रज्ञा स्वस्थे को वा न पण्डितः ॥

(अनपेक्षित प्रसंग ओढवले असता मंत्र्यांच्या बुद्धीची आणि मोठ्या दुखण्यात वैद्यांच्या बुद्धीची परीक्षा होते. खरी बुद्धिमत्ता ही बिकट प्रसंगीच प्रकट होते. सर्व ठीक असताना कोण विद्वान नसतो ?)
मग पुन्हा पिंगलकाची परवानगी घेऊन दमनक संजीवकाकडे गेला व त्याला म्हणाला, 'मित्रा, मी माझे कौशल्य पणाला लावले आणि तुझ्यात व महाराजांच्यामधे मैत्रीचे संबध जुळवून आणले. तेव्हा तू निःशंकपणे माझ्यासंगे त्यांच्याकडे चल. पण महाराजांशी मैत्री जुळली, तरी मला मात्र विसरू नकोस. मी कोल्हा म्हणून मला क्षुद्र समजू नकोस. क्षुद्रांमध्येही थोरामोठ्यांना त्रास देण्याचे सामर्थ्य असते. म्हणून तर एका राजाच्या एका क्षुद्र हुजर्‍याने त्या दंतिल सावकाराची हबेलंडी उडवली ना?'
'ती गोष्ट काय आहे?' असे संजीवकाने विचारताच दमनक म्हणाला, 'त्याचं असं झालं -

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP