पति म्हातारा मी नव तरुणी जात तरुणपण । जीव जळे तुला पाहून ॥धृ०॥
कुठें माझे कर्मामध्यें होता बाई शिजला भात । केला छत्तीस गुणांनी घात ॥
अष्टपाकुळका माझे संगतीने द्वैत नथ नाकांत । षड्‍ विकार जोडे पायांत ॥
पहिले पदावर तीन मुलें झालीं साक्ष सहा चवघांत । त्यावर येईना महालांत ॥
सुत्र धरुन जगास खेळवी असें याचें लक्षण । जीव० ॥१॥
रांडभांड भविष्य इदभार नाही तुझे शब्दासी । कां व्यर्थ खेद करिसी ॥
माया भ्रांति घालुनि तो भुलवी सखयासी । शेवटी पडली फसी ॥
आम्ही तुरेकर शिपाई अविनाश नित्य राहतों कैलासी ॥
ज्ञानदृष्टीनें न्याहाळिसी । जुनी ओळख कधी पटेना सद्गुरुवांचून । जीव० ॥२॥
ऐकून पतीचा शब्द जरा शांत झाले मनांत । काय होतें सांगून जनांत ॥
चवघीजणी माझे संगतीने मंत्र फुकला कानांत । धर चरण आशापणांत ॥
ज्ञान अंजन घालून डोळां रुप आणलें ध्यानांत । पोंचलें ब्रह्मवनांत ।
प्रपंच पडदा फाडून गुरुचरणीं लुब्धले मन । जीव० ॥३॥
महाबीज शून्यावरती अमल प्रकाश दिसला । तो बिंब अंतरी भासला ॥
तेथे मनाचें काहीं न चले द्वैतभाव नासला । जीव देवरुपांत घुसला ॥
आल्या जन्माचें सार्थक झालें भटकत हिंडतां कशाला ॥
हो लुब्ध नामरसाला । गणपत आत्मज्ञानींची कविता चतुर करील छान । जीव० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP