श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र - अध्याय ७

श्रीकल्हळिवेंकटेश


॥ श्रीगणेशाय नम: ॥
॥ श्रीसांबसदाशिवाय नम: ॥
॥ श्रीदत्तात्रेयाय नम: ॥

॥ जयजय पुरुषोत्तमा ॥ मुनिजनमनविश्रामा ॥ भक्तकामकल्पद्रुमा ॥ नामा-अनामातीत तूं ॥१॥ जयजया गरुडवाहना ॥ क्षीराब्धीवासा शेषशयना ॥ भूतात्मा भूतभावना ॥ लक्ष्मीरमणा तुज नमो ॥२॥
नमो तुज विघ्नहरा ॥ दुग्धसिंधुदुहितावरा ॥ भक्तजनांचें माहेरघरा ॥ जगदोध्दारा जगत्पते ॥३॥
तूंचि कर्ता करविता ॥ तूंचि भोक्ता भोगविता ॥ तूं एकचि देवा अनंता ॥ तुजवांचोनि समर्था दुजें नाहीं ॥४॥
आतां ऐका श्रोतेजन ॥ पुढील कथेचें निरुपण ॥ जैसें वदवतील नारायण ॥ तैसेंच कथिन अत्यादरें ॥५॥
कोकिला मैना कीर ॥ यापरिचे अन्य विकिर ॥ बोलताती बोल मधुर ॥ परी बोलविणार तो निराळा ॥६॥
किंवा सूत्रपुतळी सुंदर ॥ नाचे खेळे परिकर ॥ परि सूत्रें हलविणार ॥ सूत्रधार तो वेगळाची ॥७॥
असो श्रीपतीचें चरित ॥ जें पावन करी त्वरित ॥ तें परिसा भाविक हो समस्त ॥ एकाग्रचित्त करोनियां ॥८॥
नरसो तुकदेव नामें कोणी गृहस्थ ॥ अग्रजन्मा कुलशीलवंत ॥ बादशहाची नोकरी करित ॥ विजापुरांत रहातसे ॥९॥
जो सदाचारसंपन्न ॥ स्वधर्मीं रत पूर्ण ॥ देखतां साधु सज्जन ॥ प्रेमें वंदन करीतसे ॥१०॥
सत्यवचनी सत्यवंत ॥ संतति-संपत्तीनें युक्त ॥ असोनि गर्वरहित ॥ न करी घातपात कवणाचा ॥११॥
यापरी काल क्रमीत ॥ राहिलासे आनंदांत ॥ व्हावया सफल मनोरथ ॥ तेणें शेषाद्रिनाथ प्रार्थिला ॥१२॥
जयजयाजी वैकुंठनायका ॥ शेषशाई सर्वव्यापका ॥ भूताधिपते भक्तरक्षका ॥ भवभयहारका गोविंदा ॥१३॥
हे प्रभो वैकुंठपति ॥ मम इच्छा केलिया पूर्ती ॥ येवोनियां गिरिवरती ॥ मुडुप निश्चितीं समर्पीन ॥१४॥
पुढें जातां अल्प दिन ॥ श्रीअनुग्रहेंकरोन ॥ नरसोचे सर्व हेतु जाण ॥ परिपूर्ण जाहाले ॥१५॥
तेणें मनीं आनंदला ॥ संसृतीमाजीं गुंगला ॥ विषयीं रंगोन गेला ॥ मुळींच विसरला प्रभूतें ॥१६॥
ऐसे बरेच दिवस गेले ॥ गिरिवर जाणें नाहीं केलें ॥ ना मुडुपहि पाठविलें ॥ तेणें क्षोभले वेंकटेश ॥१७॥
कधीं उठावा पोटशूळ ॥ कधीं अर्धशिशिकपाळ ॥ कधीं यावें रात्रंदळ ॥ माथां शूळहि उठावा ॥१८॥
ऐशा व्याधी श्रीहरी ॥ उत्पन्न करी नानापरी ॥ तेणें दु:खित परोपरी ॥ तरी अविचारी उमजेना ॥१९॥
शाहण्या शब्द चाबुक ॥ मूढा प्रत्यक्ष पाहिजे ठोक ॥ या न्यायें रोगनायक ॥ ज्वरेश्वर पाठविला ॥२०॥
तो त्वरें वाढों लागला ॥ तेणें अतिशय तापला ॥ म्हणे काळ जवळ आला ॥ नरसो झाला भयभीत ॥२१॥
त्याचें कुलदैवत केदारेश्वर ॥ इष्ट दैवत वेंकटेश रमावर ॥ उभयांतें नमस्कार ॥ करोनि वारंवार विनवितसे ॥२२॥
पार्वतीपते पंचवदना ॥ पद्माकरा पन्नगशयना ॥ शंकरा वृषभवाहना ॥ खगेंद्रगमना गोविंदा ॥२३॥
गंगाधरा गिरिधरा ॥ कर्पूरगौरा मेघवर्णशरीरा ॥ दिगंबरा पीतांबरधरा ॥ श्रीशंकरा वेंकटपति ॥२४॥
मी तों दीन पामर ॥ न सोसवे दु:ख अपार ॥ यांतोनियां सत्वर ॥ या दासा पार करावें ॥२५॥
मजकडोन कांहीं चुकलें ॥ कीं साधुसंतादि छळिले ॥ किंवा देवभक्तां निंदिलें ॥ काय केलें न कळे मज ॥२६॥
यापरी करीत चिंतन ॥ भूत भविष्य वर्तमान ॥ सांगणारे देवऋषि जाण ॥ तेविं गणकज्ञ आणविले ॥२७॥
विनवी तयां करजोडोन ॥ सांगा स्वामी कृपा करोन ॥ थकले वैदय रसायनें देवोन ॥ व्याधिकारण कळेना ॥२८॥
या व्याधी नव्हेत शारीरिक ॥ केवळ असती दैविक ॥ पहातां सर्व पुस्तकें देख ॥ आम्हां नि:शंक वाटतसे ॥२९॥
देवा करोनियां नवस ॥ चुकला अससी फेडावयास ॥ तेणें असंतुष्ट मानस ॥ कोपले खास तुजवरी ॥३०॥
त्यांतोन श्रीवेंकटपति ॥ महाधनलोभी अशी ख्याति ॥ नवस घेण्या निश्चितीं ॥ भक्तांप्रति छळीतसे ॥३१॥
ऐशी ऐकतां तयांची वाणी ॥ नरसो आठवला तत्क्षणीं ॥ म्हणे चुकलों मुडुप नेउनी ॥ वेंकटेशचरणीं अर्पावया ॥३२॥
सवें मोहरा पुतळ्या होन ॥ बोलल्यापरि काढोन ॥ त्यांचें गांठोडें बांधोन ॥ देवगृहीं जाण ठेविलें ॥३३॥
देवा अनिरुध्दा अच्युता ॥ दीनवत्सला दीनानाथा ॥ देवकिनंदना कमलाकांता ॥ त्रिलोकनाथा दयानिधे ॥३४॥
आरोग्य झालिया किंचित ॥ मुडुप घेवोनि त्वरित ॥ वेंकटगिरीवरी धांवत ॥ येईन निश्चित गोविंदा ॥३५॥
यापरी करितां स्तवन ॥ लोटलिया कांहीं दिन ॥ झालें रोगाचें निरसन ॥ रमारमणकृपेनें ॥३६॥
आयती सर्व करोनियां ॥ गेला नृपातें पुसावया ॥ मागता निरोप जावया ॥ कोपोनियां नृप बोले ॥३७॥
कैंचा देव वेंकटरमण ॥ केवळ असे तो पाषाण ॥ पुनश्च करशील उच्चारण ॥ तरी शिक्षा जाण करीन मी ॥३८॥
ऐसें बादशहाचें कठोर वचन ॥ ऐकता झाला उद्विग्नमन ॥ मनीं ह्मणे दोहींकडोन ॥ आलें मरण काय करुं ॥३९॥
यापरी चिंता करित ॥ निघोन गेलीं वर्षें सात ॥ पुनश्च नरसो अकस्मात ॥ व्याधिग्रस्त जाहला ॥४०॥
तेव्हां म्हणे तो चक्रपाणी ॥ तुजविण त्राता नसे कोणी ॥ श्ववृत्तिवर सोडोनि पाणी ॥ येईन तव चरणीं आनंदें ॥४१॥
परि तेणें खवळेल नृपति ॥ महाक्रूर मूढमति ॥ करील वित्तजीवत्वमाती ॥ वाटे निश्चितीं वेंकटेशा ॥४२॥
मम मन भ्रमलें हरले विचार ॥ तूं तों सर्वज्ञ विश्वंभर ॥ या दु:खार्णवांतून पार ॥ करावें सत्वर मुकुंदा ॥४३॥
ठेविली तव चरणावरी ॥ मानभोपळा अपराधसुरी ॥ क्षमा करी अथवा चिरी ॥ देवा श्रीहरि स्वइच्छें ॥४४॥
ऐसें करीत स्तवन चिंतन ॥ राहिला परी झाला क्षीण ॥ जाऊं पहाती पंच प्राण ॥ तंव स्वप्नीं ब्राह्मण देखिली ॥४५॥
जो मेघवर्ण सांवळा ॥ शुभ्रयज्ञसूत्र गळां ॥ शिरीं टोपी चंदनटिळा ॥ कंठीं सुमनमाला विराजे ॥४६॥
नेसलासे शुभ्रवसन गळां ॥ शिरीं टोपी चंदनटिळा ॥ कंठीं सुमनमाला विराजे ॥४६॥
नेसलासे शुभ्रवसन ॥ तेजें आगळा सूर्याहून ॥ जयाचे भव्य आकर्ण नयन ॥ सुहास्य वदन शोभतसे ॥४७॥
ब्राह्मण नव्हे तो रमारमण ॥ काय बोलला भक्ताकारण ॥ तें ऐका चित्त देवोन ॥ भाविक जन अत्यादरें ॥४८॥
वदे नरसिंहा ऐक ॥ दे सोडोनि सर्व दु:ख ॥ माझें सत्यवचन देख ॥ मनीं नि:शंक धरावें ॥४९॥
जमखंडीनगरीचे अंतिक ॥ द्वय कोसावरी देख ॥ कल्हळिसंज्ञिक एक ॥ असे खेटक जाण पां ॥५०॥
तया खेटकाशेजारीं ॥ वेदाव्हयगिरिवरी ॥ पीतांबरधारी मुरारी ॥ भक्तकैवारि अवतरले ॥५१॥
दयावया भक्तां दर्शन ॥ कराया राष्ट्रभक्तपालन ॥ आले वेंकटाद्रिहून ॥ वेंकटेश धांवोन निर्धारें ॥५२॥
यास्तव तेथें जावें त्वरित ॥ अर्पिजे मुडुप चरणाप्रत ॥ नवस फिटेल तव निश्चित ॥ भ्रांति यत्किंचित धरुं नको ॥५३॥
कसाहि असो तव यजमान ॥ उदईक पुसावें तयांलागोन ॥ आज्ञा देईल सुखें करोन । कल्पांतीं मम वचन ढळेना ॥५४॥
स्वप्नांतुनी जागृतींत ॥ यवोनि नरसो मनीं वदत ॥ नव्हे वाडव तो रमानाथ ॥ मजला साक्षात भेटला ॥५५॥
जयाचें नेत्र वर्ण लक्षण ॥ तेविं सुहास्यवदन भाषण ॥ पाहतां ऐसा दुजा कोण ॥ नव्हे ब्राह्मण निश्चयें ॥५६॥
ऐसा निर्धार करोनि मनीं ॥ गेला धन्यासन्निधानीं ॥ वंदन करोनि चरणीं ॥ विनयें विनवणी करीतसे ॥५७॥
जमखंडी ग्रामासमीप जाण ॥ असे श्रीवेंकटेशदेवस्थान ॥ नवस फेडावया कारण ॥ तेथवरी जाईन म्हणतों मी ॥५८॥
फिरोनि स्वल्प दिवसांत ॥ खचित येईन स्वामी परत ॥ होवोनियां कपावंत ॥ आज्ञा मजप्रत मिळावी ॥५९॥
ऐसें वदोनि तटस्थ ॥ उभा पुढें जोडोनि हस्त ॥ परेशकरणी अघटित ॥ विपरीत सुपरीत होतसे ॥६०॥
मुका वाचाळ होईल ॥ पंगु महागिरि चढेल ॥ अंध मणी पारखील ॥ खदा होईल चिंतामणी ॥६१॥
वांझ सुपुत्र प्रसवेल ॥ रेडा वेद बोलूं शकेल ॥ अल्पायु सहस्त्रायु होईल ॥ काय न करील ईशेच्छा ॥६२॥
असो तयाशीं पहातां पुढती ॥ पालटली रायाची मति ॥ म्हणे नरसिंहा शीघ्रगति ॥ जावें वैकुंठपति दर्शना ॥६३॥
जमखंडि परगण्यावर ॥ नेमणें आहे कामगार ॥ तुलाचि नेमिलें त्या जाग्यावर ॥ जावें सत्वर ममाज्ञें ॥६४॥
ऐसें वदोनि हुकुमावरती ॥ सही करोनी दिला हातीं ॥ नृपानिदेश धरोनि माथीं ॥ वंदोनि चरणाप्रति निघाला ॥६५॥
मेणा पालखी पायदळ स्वार ॥ ब्रह्मवृंदादि परिवार ॥ संगें घेवोनियां सत्वर ॥ पुष्करणीवर पोंचला ॥६६॥
करोनियां सचैल स्नान ॥ संध्यादि आन्हिक आटपोन ॥ मुडुप स्वमस्तकीं घेवोन ॥ घ्यावया श्रीदर्शन चालला ॥६७॥
चरणचालीच जाण ॥ जातसे करीत नामस्मरण ॥ श्रीचरणाब्जापुढें तें ठेवोन ॥ लोटांगण घातलें ॥६८॥
विनवी देवा नारायणा ॥ भक्तचालका दयाघना ॥ गोविंदा भवभयहरणा वेंकटरमणा दयालो ॥६९॥
श्रीहरिकमलापति ॥ मी अत्यंत पापी निश्चितीं ॥ अनुरक्त होवोनि संसृतीं ॥ देवा तव विस्मृति जाहली ॥७०॥
दयासागरा करुणाकरा ॥ रुक्मिणीहृदयाब्जभ्रमरा ॥ निजभक्तमानसविहारा ॥ मज दातारा क्षमा कीजे ॥७१॥
इतुकिया अवसरीं ॥ जवळी होता पुजारी ॥ तेणें श्रीप्रसाद झडकरी ॥ तयाचे करीं वोपिला ॥७२॥
हा आदय जो पुजारी ॥ नागणैया नामधारी ॥ ज्यातें दर्शन दयावया श्रीहरी ॥ वेदाद्रिवरी प्रगटले ॥७३॥
त्याचा हा प्रपौत्र ॥ या नागणैयाच वदते समस्त ॥ प्राप्त झालेंसे वृध्दत्व ॥ नरसो तयांप्रति बोलतसे ॥७४॥
श्रीगिरिवेंकटेशाकारण ॥ केला असे नवस जाण ॥ तें मुडुप ईशाज्ञें आणोन ॥ येथें श्रीचरणीं अर्पिलें ॥७५॥
नागणैया वदे ऐक वचन ॥ मुडुप येथेंच खर्च करोन ॥ घालिजे ब्राह्मणभोजन ॥ तेणें यदुकुलभूषण संतोषे ॥७६॥
माझे वाडवडिल मजप्रत ॥ असेंचि आले सांगत ॥ मीही हेंच आलों पहात ॥ आजवरी वृध्दत्व मज आलें ॥७७॥
नरसो वदे ब्राह्मणभोजन ॥ करवितों मज नसे न्यून ॥ परी श्रीस केलेलें अर्पण ॥ तें खर्चाया मन इच्छीना ॥७८॥
नागणैया हें वचन ऐकोनी ॥ श्रीशाज्ञा प्रमाण आम्हां वदोनि ॥ पुत्रलक्ष्मणहस्तें करोनि ॥ मुडुप श्रीसन्निधानीं ठेवविलें ॥७९॥
इतुकें झालियानंतर ॥ नरसोपंतादि परिवार ॥ जागा पाहोनी सोइस्कर ॥ थिरस्थावर जाहला ॥८०॥
त्याच रात्रीं एक ब्राह्मण ॥ ज्यानें केलें त्रिपुंड धारण ॥ नवजलद समानवर्ण ॥ आकर्ण नयन शोभती ॥८१॥
झालें जया वृध्दत्व प्राप्त ॥ ग्रीवा लटलटा कांपत ॥ आलासे यष्टि टेंकित ॥ स्वप्नीं काय वदत तें ऐका ॥८२॥
ऐकें बा नरसोपंत ॥ मी क्षुधित असें अत्यंत ॥ देवोनियां भोजन अतृप्त ॥ मज संतोषित करावें ॥८३॥
तव मुडपाचें द्रव्य जाण ॥ येथेंच सर्व खर्च करोन ॥ घालिजे मिष्टान्नभोजन ॥ तेणें तव नवस पूर्ण होतसे ॥८४॥
ऐसें वदोनि ब्राह्मण गेला ॥ सवें नरसो जागृत झाला ॥ तों घंटारव ऐकिला ॥ काकडार्ति प्रभूला होतसे ॥८५॥
तैसाचि गेला धांवत ॥ श्रीस घालोनि दंडवत ॥ स्वप्नांतील सर्व मात ॥ नागणैयाप्रत सांगितली ॥८६॥
परेशाज्ञा शिरीं धरोन ॥ अतिउल्हासें करोन ॥ सर्व साहित्य होतां जाण ॥ भूदेवां निमंत्रण करविलें ॥८७॥
बरेच दिवसांपर्यंत ॥ ब्राह्मणभोजन करवी प्रेमयुक्त ॥ तांबूलदक्षिणा देवोनि समस्त ॥ ब्रह्मवृंद आनंदांत बोळविले ॥८८॥
गोरगरीब इतर जन ॥ यांसहि मिष्टान्नभोजन ॥ तैसीच खैरात देवोन ॥ सकळ जन तृप्त केले ॥८९॥
नागणैयाचें सुशीलपण ॥ भक्ती आणि निस्पृहता जाण ॥ पाहोनि नरसोचें अंत:करण ॥ सुप्रसन्न जाहलें ॥९०॥
एके दिनीं स्वस्थचित्त ॥ उभयतां बैसले बोलत ॥ तैं नरसो नागणैयाप्रत ॥ काय पुसत तें ऐका ॥९१॥
श्रीचें येथें आगमन ॥ झालें तधींपासोन ॥ श्रीहरीचें चरितवर्णन ॥ ऐकों मम मन इच्छितसें ॥९२॥
तें सविस्तर कथन ॥ करा तुम्ही कृपा करोन ॥ तेणें हा अनित्य देह पावन ॥ होईल जाण निर्धारें ॥९३॥
नागणैयानें तत्क्षणीं ॥ जें ऐकिलें तातमुखें करोनी ॥ तेंच सर्व विस्तरोनी ॥ नरसिंहा लागोनि निवेदिलें ॥९४॥
पुनश्च वदे माझे देखत ॥ झालें जें अघटित कृत्य ॥ तें सांगतों तुजप्रत ॥ होवोनि स्वस्थचित्त परिसावें ॥९५॥
देशपांडे वेंकुबाई ह्मणोन ॥ रहातसे सवदिगांवीं जाण ॥ तिचें पूर्वदुष्कृत फळोन ॥ श्वेत कुष्ठें रुग्ण जाहली ॥९६॥
तेणें व्यापिलें शरीर ॥ दिसे जैसे जणु कापूर ॥ केले नानाविध उपचार ॥ परि रोग अनिवार हटेना ॥९७॥
तिचे आप्तेष्ट इतर जन ॥ कंटाळती करावया स्पर्शन ॥ अन्नपाणीहि दुरोन ॥ घालती जाण तिजलागीं ॥९८॥
तेणें झाली उद्विग्नचित्त ॥ म्हणे देवा लक्ष्मीकांत ॥ अशापरी जिणें व्यर्थ ॥ सत्वरी करावा अंत वेंकटेशा ॥९९॥
यापरी चिंता करित ॥ तळमळतसे दिनरात ॥ तों तीतें अकस्मात ॥ एक हरिभक्त भेटला ॥१००॥
म्हणे कां करशी दु:ख ऊठ ॥ त्वरें धरी कल्हळीची वाट ॥ श्रीवेंकटेशा चोखट ॥ मनोभावें नीट करावी ॥१०१॥
मन करोनियां निर्मळ ॥ सेवा करितां कांहीं काळ ॥ तव कुष्ठ जाईल समूळ ॥ शंका आळुमाळ न धरावी ॥१०२॥
श्रीवेंकटशाची सुकीर्ति ॥ भरोनि राहिली त्रिजगतीं ॥ देवादिक वर्णूं न शकती ॥ तेथें मी किती मंदमती य:कश्चित ॥१०३॥
आजवरी कैक भक्तार्ति ॥ नाशित आले वेंकटपति ॥ परी अव्यभिचारणी भक्ती ॥ चित्तीं निश्चितीं धरावी ॥१०४॥
तरीच होईल कार्यसिध्दी ॥ असें सांगते माझी बुध्दी ॥ यास्तव होवोनि त्रिशुध्दी ॥ भावें आराधी वेंकटेशा ॥१०५॥
ऐसें वचन ऐकोनियां ॥ आनंदली ती बया ॥ श्रीशसेवा करावया ॥ आली धांवोनियां गिरिवरी ॥१०६॥
उष:काल होतां प्रकट ॥ नित्य झाडी प्रदक्षणेची वाट ॥ सोसोनियां अमुप कष्ट ॥ सेवा उत्कृष्ट करीतसे ॥१०७॥
त्रिकाळ स्नान करोन ॥ श्रीचें घे दुरोन दर्शन ॥ गोविंद गोविंद नामोच्चारण ॥ रात्रंदिन करीतसे ॥१०८॥
यापरी जातां कांहीं दिन ॥ तया स्त्रीचें शुध्दांत:करण ॥ पाहोनियां कमल लोचन ॥ लक्ष्मीरमणमन कळवळलें ॥१०९॥
ईशेच्छें दिवसानुदिवस ॥ होत चालला कुष्ठर्‍हास ॥ पुढें भरतां सा मास ॥ गेलें निखालस कोड तें ॥११०॥
काया झाली पूर्ववत ॥ पाहोनि बाई आनंद भरित ॥ वदे श्रीपति वैकुंठनाथ ॥ तूंचि एक समर्थ गोविंदा ॥१११॥
अनेक दैवतें नवसिलीं ॥ नानापरीनें विनविलीं ॥ परि नाहींच कींहों फळली ॥ तातमाउली मुकुंदा ॥११२॥
मी तों अनाथ भिकारी ॥ तूं तरी सकलद्रव्याधिकारी ॥ यास्तव ही काया मुरारी ॥ तव चरणकमलावरी अर्पितसें ॥११३॥
ऐसें करोनियां स्तवन ॥ यथाशक्त्त्या ब्राह्मणभोजन ॥ देवोनि नवटाक इनाम जमीन ॥ ईशाज्ञा घेवोन गृहा गेली ॥११४॥
ऐशीं कृत्यें अघटित ॥ कैक घडलीं मज देखत ॥ तीं किती सांगूं नरसोपंत ॥ मम मति थकित होतसे ॥११५॥
आलीकडील एक गोष्ट कथन ॥ करितसे तुजकारण ॥ परशुरामभाऊ पटवर्धन ॥ ठावे तुज लागोन असतील कीं ॥११६॥
जे वीर शूर सरदार ॥ प्रतापी रणधुरंधर ॥ ज्यानीं आपुली समशेर ॥ हिंदुस्थानभर गाजविली ॥११७॥
त्याही प्रभूची सुकीर्ती ॥ ऐकोनि आनंदले चित्तीं ॥ दया रहावी आपणावरती ॥ ऐसें चित्तीं आणोनियां ॥११८॥
श्रीवेंकटेशपूजेलागोन ॥ पडों नये तुळसपुष्पांची वाण ॥ यास्तव नूतन इनाम जमीन ॥ प्रेमेंकरोन दीधली ॥११९॥
ऐसें बोलोनि त्वरित ॥ सनद दिली हातांत ॥ नरसो वाचोन पहात ॥ आनंदभरित जाहला ॥१२०॥
सोळाशें एक्याणव शकाभीतरीं ॥ विरोधीनाम संवत्सरीं ॥ सनद दिली मोर्तब शिक्कावरी ॥ गणपति शिरावरी करोनियां ॥१२१॥
सनद वाचोन नरसोपंत ॥ म्हणे मी ही जमीन देईन निश्चित ॥ नवरात्रोत्सव विप्रभोजनार्थ ॥ श्रीवेंकटेशप्रीत्यर्थ सत्यत्वें ॥१२२॥
ऐसें वदोनि त्वरित गती ॥ कल्हळी मदरखंडि मध्यवर्ती ॥ कुडलबसवापासून निगुती ॥ इनाम निश्चिती नेमिलें ॥१२३॥
शके सतराशें एकुणिसाशीं ॥ प्लवंग संवत्सर आषाढमासीं ॥ सनद ताकीदपत्रानिशीं ॥ आनंदें श्रीचरणासी समर्पिली ॥१२४॥
ती जमीन आद्यावत ॥ वेंकटेशाकडे आहे चालत ॥ प्रभूचें अवर्णनीय चरित ॥ परमाद्भुत कोण वर्णी ॥१२५॥
कोणी कुलशीवंत ब्राह्मण ॥ गणेशकृष्णनामाभिधान ॥ अडनांव जोशी जाण ॥ वसतिस्थान कोकण जयाचें ॥१२६॥
जो का सुज्ञ गृहस्थ ॥ स्वधर्मीं सदा रत ॥ कधीं न वदे अनृत ॥ साधुसंत वंदितसे ॥१२७॥
जो असे सदाचारी ॥ सदसत् विचारी ॥ श्रम करोनि परोपरी ॥ उदर हातावरी भरीतसे ॥१२८॥
तेथ तयाची उदर पूर्ती ॥ नीट होईना निश्चितीं ॥ म्हणोनि आला देशावरती ॥ दैवप्रतीती पहावया ॥१२९॥
तैसाच फिरत फिरत ॥ आला हिप्परगी ग्रामांत ॥ मिळतां लोक अनुकूळमत ॥ तेथेंच स्वस्थ राहिला ॥१३०॥
नित्य कृष्णास्नानपान ॥ तेणें आनंदित झालें मन ॥ परि मनींचा हेतु पूर्ण ॥ होतां सुचिन्ह दिसेना ॥१३१॥
मनीं म्हणे आतां काय करावें ॥ पुढें येथोनि कोठें जावें ॥ ब्रह्मस्व कैसें फिटावें ॥ कोणा आळवावें कळेना ॥१३२॥
कोठेंहि गेल्या जाण ॥ पळसाला तीनच पान ॥ ही चालत आलेली म्हण ॥ अनुभवापूर्ण मज आली ॥१३३॥
दरिद्री निघाला दर्यावरती ॥ कर्म चाललें तया संगति ॥ बुडी मारली मिळाया मोती ॥ परी शंखचि हातीं लागलें ॥१३४॥
ऐशी झाली माझी गती ॥ कोंकण सोडोनि आलों वरती ॥ परी पूर्वींचि जी स्थिति ॥ तीच निश्चितीं कायम ॥१३५॥
गुरुच्या कृपें करोन ॥ येतसे लेखनवाचन ॥ परि दैवाचा कैसा गुण ॥ चाकरीहि कवण ठेवीना ॥१३६॥
तों त्याच गांवचे दर्ग्यांत ॥ कोणी असे फकीर ज्ञानवंत ॥ हें ऐकोनि गेला धांवत ॥ वंदोनियां चरणाप्रत बैसला ॥१३७॥
तो वदे कां दिसतोसि म्लानवदन ॥ जोशी करी आपुलें जीवन कथन ॥ तें फकीरानें ऐकोन ॥ वदे मम वचन परिसिजे ॥१३८॥
केवळ दैवावरी हवाला ॥ देवोनि जो बैसला ॥ त्याचा त्याणेंच घात केला ॥ यास्तव प्रयत्न केला पाहिजे ॥१३९॥
प्रयत्न केल्यावांचोन ॥ दैव हें पंगू जाण ॥ मग ते चांगलें वा असो हीन ॥ प्राधान्य प्रयत्न जाणिजे ॥१४०॥
तेणें चांगल्याचा होय विस्तार ॥ वाइटाचा होतसे परिहार ॥ प्रयत्नांतीं परमेश्वर ॥ हा निर्धार असावा ॥१४१॥
जें कांहीं पूर्वींचें दुष्कृत ॥ तें हरावया समर्थ ॥ एकचि बापा वैकुंठनाथ ॥ दुजा अन्यत्र असेना ॥१४२॥
यास्तव तुवां सत्वरी ॥ जावे कल्हळगिरीवरी ॥ तेथें अवतरले श्रीहरि ॥ गोवर्धनधारि गोविंद ॥१४३॥
त्या प्रभूच्या कृपें करोन ॥ कैक भक्तांच्या इच्छा पूर्ण ॥ झाल्या तो दयाळु मनमोहन ॥ कमललोचन वेंकटेश ॥१४४॥
सर्व कांहीं सोडोन जाण ॥ जा धरी त्या प्रभूचे दिव्य चरण ॥ भक्तकैवारि भगवान ॥ करील इच्छा पूर्ण सत्यत्वें ॥१४५॥
ऐसें ऐकोनि वचन ॥ आनंदलें गणेशाचें मन ॥ जयजय रमारमण वदोन ॥ गेला धांवोन गिरिवरी ॥१४६॥
श्रीतें सन्मुख पाहिलें ॥ त्रिवार नमस्कार घातले ॥ देवा मम भाग्य उदेलें ॥ म्हणोनी पाहिले तव चरण ॥१४७॥
श्रीतें सन्मुख पाहिलें ॥ त्रिवार नमस्कार घातले ॥ देवा मम भाग्य उदेलें ॥ म्हणोनी पाहिले तव चरण ॥१४७॥
यापरि विनवोन तेथ ॥ राहिलासे सेवा करित ॥ सेवेवांचोनि तयाचें चित्त ॥ दुजीकडे किंचित ढळेना ॥१४८॥
पंच सूक्त पवमान ॥ त्रिकाल करी नित्य पठण ॥ अष्टोत्तरशत प्रदक्षिणा जाण ॥ प्रेमें करोन घालितसे ॥१४९॥
ऐसे जातां बरेच दिन ॥ तयाची विमल भक्ती पाहोन ॥ श्रीहरि शेषशयन ॥ रमारमण संतोषले ॥१५०॥
पुढती प्रभु एके दिनीं ॥ ब्राह्मण वेश धरोनि ॥ वदले स्वप्नीं गणेशालागुनि ॥ तें चित्त देवोनि परिसावें ॥१५१॥
तुझी अर्धी भाकरी ॥ भाऊसाहेबांचे पदरीं ॥ नेमिली असे सत्वरि ॥ जावें तेथवरी तया भेटी ॥१५२॥
यापरि स्वप्नींची मात ॥ ऐकोनि झाला जागृत ॥ म्हणे मज वैकुंठनाथ ॥ पावले सत्य निर्धारें ॥१५३॥
तेणें आनंदित होवोन ॥ करोनि अनन्यभावें पूजन ॥ घातलें पांच ब्राह्मणां भोजन ॥ ईशाज्ञा घेवोन निघाला ॥१५४॥
आला पुण्यास धांवत ॥ भेटला भाऊतें त्वरित ॥ म्हणे स्वामी मी अनाथ ॥ जोडोनि हस्त विनवितसे ॥१५५॥
महाराज मी निराधारी ॥ मिळावी मज अर्धी भाकरी ॥ ठेवोनियां आपुले पदरीं ॥ रक्षण करिजे स्वामिया ॥१५६॥
ऐकतां तयाचें दीन भाषण ॥ श्रीप्रभूचे प्रेरणेंकरोन ॥ संतोषले भाऊंचें मन ॥ काय वचन बोलती ॥१५७॥
साला पांचशेचें वेतन ॥ तुज मुकरर केलें जाण ॥ आमुचे पदरीं राहोन ॥ निस्पृह वर्तन ठेवावें ॥१५८॥
पुढें कांहीं दिवसांवर ॥ केला जखंडिचा शेकदार ॥ तेणें ईशसन्निध कांहीं स्थावर ॥ भक्तिपुर:सर बांधविलें ॥१५९॥
पुष्करणीस जाणेच्या वाटेसी ॥ करविल्या पाहिर्‍या आणि फरशी ॥ जिना आणि तीन कमानींची ओरी खाशी ॥ श्रीदक्षिणदिशेसी बांधविली ॥१६०॥
देवता पश्चिमदिशेला ॥ दुघई भव्य धर्मशाला ॥ जिचें अंखण नऊ आणि सोळा ॥ प्रति घईला शोभती ॥१६१॥
या इमारतीची दुरस्ती ॥ अदयापि गणेशवंशज करिती ॥ वेंकटेशचरणीं प्रीती ॥ तशीच त्याची भक्ति बसतसे ॥१६२॥
दुसरा एक प्रकार विलक्षण ॥ दाविती प्रभु नारायण ॥ तो करितसें कथन ॥ देवोनि मन परिसावा ॥१६३॥
भाऊसाहेबांचे पश्चात् ॥ आपासाहेब त्यांचे पुत्र ॥ येवोन राहिले जमखंडींत ॥ प्रजावन करीत प्रेमानें ॥१६४॥
अधिकार आपणां नसोन ॥ दिल्या इनाम जमिनी नूतन ॥ हें गैरशिस्त झालें ह्मणोन ॥ खालसा जाण त्या केल्या ॥१६५॥
नरसोर्पतानें दिलेली ॥ जमीनहि खालसा झाली ॥ तिचीही लावणी ठरविली ॥ योग्य वाटली त्या परी ॥१६६॥
ठरविलेली रकम पूर्ण ॥ पूजार्‍यानें भरली जाण ॥ निरुपाय होवोन ॥ आज्ञा उल्लंघन करी कसा ॥१६७॥
अन्य विषयाकडे नव्हे जाण ॥ केवळ देवास केलेली अर्पण ॥ काढोन घेतली जमीन ॥ तेणें लक्षुमणमन हळहळे ॥१६८॥
नृपातें काय कमी केलें ॥ ईशेंच सर्व कांहीं दिलें ॥ परि त्याचेंच हिरोनि घेतलें ॥ हें बरवें न केलें नृपरायें ॥१६९॥
नृपराज आमुचे धनी ॥ जी काय करतील करणी ॥ तीच न्याय ह्मणानि ॥ असावें स्वस्थ मनीं दुसरें काय ॥१७०॥
ऐसें मनाशीं बोलत ॥ पुरारी झाला अस्वस्थचित्त ॥ विनवितसे श्रीहरीप्रत ॥ मनीं दु:खित होवोनियां ॥१७१॥
हे वेंकटपति गोविंदा ॥ नारायणा मुकुंदा ॥ निजभक्तजनमनानंदा ॥ सर्वसुखकंदा जगत्पते ॥१७२॥
माझ्या मनिंचा मनोरथ ॥ पुरवावया तूंचि समर्थ ॥ देवा शेषाद्रिनाथ ॥ जमीन परत यावी हा ॥१७३॥
जें दु:ख भरलें ममांतरीं ॥ तें तुज कळविलें मुरारी ॥ आतां कळेल तैसें करी ॥ प्रभो गिरिधारि यदुपते ॥१७४॥
ऐकोनि भक्तविनवणी ॥ आनंदले चक्रपाणी ॥ प्रभूची अघटित करणी ॥ सुरवरांलागोनि कळेना ॥१७५॥
पुढें काय झाला चमत्कार ॥ ऐका कथीतसें सविस्तर ॥ सुभक्त हो मन स्थीर ॥ करोनि सादर परिसावें ॥१७६॥
श्रीवेंकटेशाचा रथोत्सव ॥ वाढत चाललासे अभिनव ॥ दूरदुरोनि भक्तसमुदाव ॥ धरोनियां भाव येतसे ॥१७७॥
कित्येक साखरा वांटती ॥ रथावरी खारका लाजा उधळती ॥ कोणी लोटांगणें घालती ॥ कैक नाचती प्रेमानें ॥१७८॥
होतां कामनेची पूर्ती ॥ कित्येक मुडुप आणिती ॥ अर्पण करोनि श्रीचरणांप्रती ॥ भावें विनविती प्रभूतें ॥१७९॥
ठाईंठाईं बैसोनि ब्राह्मण ॥ वेदचर्चा करिती जाण ॥ कांहीं रथापुढती राहोन ॥ श्रीनारायण वर्णिताती ॥१८०॥
कितीक गायकवृंदें ॥ गायन करिती स्वच्छंदें ॥ कैक कवि नानाछंदें ॥ श्रीहरि आनंदें वर्णिती ॥१८१॥
नाना वादयांचा गजर ॥ त्यांत भरला गोविंदनामोच्चार ॥ त्या नादें भरलें अंबर ॥ ऐसें क्षणभर वाटतसे ॥१८२॥
यापरि जन समस्त ॥ होवोनि आनंदभरित ॥ विसरोनि प्रापंचिक मात ॥ राहती स्वस्थचित्त तया स्थानीं ॥१८३॥
दास आणि दासरी ॥ तैशी अन्यजात परोपरी ॥ दर्शनार्थ धांवोनि गिरिवरी ॥ येती भक्तकैवारि म्हणोनियां ॥१८४॥
बहुजनसमूह जमला ॥ तेणें गिरि फुलोन गेला ॥ गुणिजन आपुलाल्या कला ॥ दाविती प्रभूला भक्तीनें ॥१८५॥
नानापरिचें सामायन ॥ व्यापारी येती घेवोन ॥ बसती दुतर्फा हौसेन ॥ व्यापारहि द्विगुण होतसे ॥१८६॥
ऐशिया अवसरीं ॥ नृपरायाचे हृदयांतरीं ॥ प्रेरणा उठविती श्रीहरी ॥ जावें गिरिवरी म्हणोनियां ॥१८७॥
तों अवचित नृपाचें मन ॥ सांगतें झालें तयालागोन ॥ श्रीचा रथोत्सव पाहोन ॥ यावें परतोन निश्चयें ॥१८८॥
तत्काल गज घोडे स्वार ॥ शिबंदी जासूद चटेदार ॥ सर्व सरंजाम सपरिवार ॥ स्वारी गिरिवर पोंचली ॥१८९॥
प्रथम देवतार्चन ॥ घेवोन तुगल्यापाजवळी जाण ॥ उत्तम बिछायत घालोन ॥ खासे स्थानापन्न जाहले ॥१९०॥
सव्य बाजू मानकरी बसती ॥ डावी मंत्र्यादिकें शोभविती ॥ हुजर्‍यादि उभे पुढें रहाती ॥ मध्यें विराजती नृपवर्य ॥१९१॥
तंव वेंकटेशाचा रथ ॥ आला तुगल्यापापर्यंत ॥ पुढें हलेना तो किंचित ॥ नाना प्रयत्न केलिया ॥१९२॥
पाहोनि श्रीमंत बोलती ॥ थकले ओढणार निश्चितीं ॥ आतां आमुचा हत्ती ॥ तो सहजगति ओढील ॥१९३॥
नृपाज्ञें गज लाविला ॥ ओढवेना रथ तयाला ॥ म्हणोनि दुसरा जुंपिला ॥ उभयतांलाहि हलेना ॥१९४॥
महात अंकुशें टोंचती ॥ तेहि ओढाया धडपडती ॥ परि चालेना कांहीं शक्ति ॥ काय करतील बापुडे ॥१९५॥
हें देखोनियां नयनीं ॥ श्रीमंत विचारिती मनीं ॥ ही केवळ देवाची करणी ॥ त्यावांचोनि ऐसें घडेना ॥१९६॥
हें कृत्य अद्भुत ॥ कळतां लक्ष्मणाप्रत ॥ देवळांतुनी आला धांवत ॥ श्रीपुढें जोडोनि हस्त उभा ठेला ॥१९७॥
क्षणैक श्रीचें मुख पाहोनी ॥ निघाला त्वरित तेथोनी ॥ जेथें होते आपुले धने ॥ त्यांचे सन्निधानीं पोंचला ॥१९८॥
विनवितसे कर जोडोन ॥ धनीमहाराज माझें वचन ॥ परिसिजे चित्त देवोन ॥ कृपा करोन स्वामियां ॥१९९॥
नोकर चाकर प्रजानन ॥ रक्षितसां पुत्रासमान ॥ राज्य चालवितां न्यायेंकरोन ॥ अधिकार पूर्ण स्वामींचा ॥२००॥
परि या देवस्थानावर ॥ कोणाचा असे अधिकार ॥ हे दावावया प्रभुवर ॥ येवोनि येथवर राहिले ॥२०१॥
यास्तव सरकारें खालती ॥ उठोनि यावें शीघ्रगति ॥ क्षणभरी रथरज्जू धरितां हातीं श्रीवेंकटपति निघतील ॥२०२॥
ऐकतां हें निस्पृह भाषण ॥ उमजलें सुज्ञ नृपतींचें मन ॥ बसलों येथें गर्वेंकरोन ॥ तें श्रीलागोन नावडलें ॥२०३॥
ऐसें आणोनियां चित्तीं ॥ नृपति उतरले खालती ॥ रथरज्जू धरितां हातीं ॥ रथी त्वरितगति निघाले ॥२०४॥
हें पाहोनि जन आनंदले ॥ गोविंदनामें गर्जिन्नले ॥ पूर्ववत् समारंभें वहिले ॥ देव पोंचले पूर्वस्थळीं ॥२०५॥
अगाध महिमा तुझा देवा ॥ वर्णूं न शके ब्रह्मामघवा ॥ तेथें या मानवाचा केवा ॥ किती केशवा वर्णावया ॥२०६॥
यापरि करोनियां स्तवन ॥ श्रीपुढें नारळ दक्षिणा ठेवोन ॥ दोनहि हस्त जोडोन ॥ केलें वंदन नृपरायें ॥२०७॥
नरसोपंतें दिलेली जमीन ॥ तेविं रथोत्सवाकारण ॥ तेतीस खेडयांतहि वर्षासन ॥ श्रीस दयावें म्हणोन ठरविलें ॥२०८॥
शके सत्राशें एकुणतिशीं ॥ प्रभवनाम संवत्सरेशीं ॥ करोनि गणपति शिक्यानिशीं ॥ सनद वेंकटेशासि नृप अर्पी ॥२०९॥
ऐसा प्रभूचा महिमा गाढा ॥ वर्णावा तितका थोडा ॥ यास्तव कुबुध्दी सोडा ॥ मिळवा जोडा भक्तीचा ॥२१०॥
भक्ताचिया काजासाठीं ॥ कृपाळू बाप जगजेठी ॥ धांवतसे उठाउठी ॥ प्रेमा पोटीं धरोनियां ॥२११॥
श्रीहरीचे भक्त संवगडी ॥ समईं होतसे भक्तांचा गडी ॥ संकटीं घाली नि:शंक उडी ॥ कधीं न पळघडी विसंबे ॥२१२॥
हा अध्याय सुधारस ॥ सेविती भक्तदिवौकस ॥ यांतील यत्किंचितहि रस ॥ पाखांडिवायसास मिळेना ॥२१३॥
उमारमण पंचवदन ॥ रमावर पन्नगशयन ॥ एकचि तया करोनि नमन ॥ हा अध्याय चरणीं अर्पण करि हरी ॥२१४॥

इति सप्तमोऽध्याय: ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP