ऋध्दिपुरवर्णन - प्रकरण १६ ते २०

महानुभाव पंथातील थोर संत नारायण व्यास बहाळिये यांनी ऋध्दिपुरवर्णन काव्याची रचना केली.


प्रकरण १६ : स्तावकात्मनिवेदन, ओव्या २२

आदरेंसी नमस्करिलें : सोपानमार्ग लंघिलें : मग साष्टांगिं दंडवत घातलें : रायांगणीं ॥१६०॥
संभ्रमें जाला हृदयेस्फोटु : न धरे करुणाजळाचा लोटु : प्रेमें सदगदीत कंठु : तेणें बोलवेना ॥१६१॥
म्हणे अनादि अविद्या अवघडी : भवम्लेंछाचीये बादौडी : पडिलेया हीं बापुडीं : कव्हणातें जाणोचि ना ॥१६२॥
म्हणे आम्हांसि कवण आहे : कवणातें पुसों बापमाये : कवणा बंदसोडियाचे पाये : धरुनि राहों ॥१६३॥
आवलोकूनि दाही दिसा : कवणे ठाइं ठेउं आस : कवणाची पाहों वास : अनाथें आम्हीं ॥१६४॥
ऐसा कव्हणी नाहीं सोयेरा : जो ने कृपावंताचेया द्वारा : आम्हां बांदियां मोकारा : करुनि घाली ॥१६५॥
तवं प्रवृत्तीचें काइ सांघें : चाळविलें फळसृतीचेनि मार्गे : आम्ही वेसनाइत अवघे : कांही जाणोचि ना ॥१६६॥
एकाधें आक्षेम अंधळें : जेवि कूहां लोटिजे बळे : तेवि प्रवृत्ति दाउनि फळे : ऐसें आम्हां केलें ॥१६७॥
ते व्हेळीं चतुर्यौग भजणीं : वर्णाक्षेम साधनें : सकळ देवतांचीं ज्ञानें : धांडोळीलीं ॥१६८॥
येज्ञोपायें देउनि करी : भजिनलो सर्वपरी : परि अवघी प्रपंचाची सोयरीं : ते जाणोचि ना ॥१६९॥
वसवीति आपूलां लोकीं : दावीति नीजासारीखीं : देति जवळीक नीकी : मेळवीति आपणयाते ॥१७०॥
तवंचि आदरु बहु : जवं सूकृताचा संभउ : मग नीगावां चक्रवीहु : भारी होये ॥१७१॥
लाउनि साखरेची गोडी : माती भरिति तोंडी : जैसीं लाघवीयें वेडीं : चाळवीजती ॥१७२॥
तैसें स्वर्गादिसूखा : जीवां रातलेयां असेखां : परणामी भवदुखा : वांचौनि आन नाहीं ॥१७३॥
कीं वळघौनि झाडा : येरझारा करीं मांकोडा : तैसा जीवरासि बापुडा : संचरत असे ॥१७४॥
संसारकूपाचां पोटीं : कर्ममाळ काळघटीं : मायायेंत्रारुढा जीवसृष्टी : भ्रमताये ॥१७५॥
की बूडालेयां भवसागरीं : भणौनि देवताचक्रासि वरी : मायामोहें भवंडीतांहीं परी : न जीयेतीचि ते ॥१७६॥
कर्मभुमीचिये घानौडी : बांधौनि मीथ्याज्ञानाचीं झांपडीं : काळें भवंडीलीं बापुडीं : जीवपसूबें ॥१७७॥
मेरुपासाव घनवटें : जीहींसी जालीं तुकमुटें : तेव्हडीं दुखें भोगितां परि न वीटे : जीवरासि हा ॥१७८॥
वीपायें प्रजंन्याचिया धारा : वीर गणही गगनीचीया तारा : ना तरि पर्वे घालीतां वारा : उमानैल कीरु ॥१७९॥
पुण जीवभोगाचां जीनसी : नाहीं देवतांही सौरसीं : भणौनि आपुलालां कर्मलेपेंसी : वोळखती तीया ॥१८०॥
असो हें भवबंदिखानीचें : जे सूटीक बोलती जीवाचें : ते मीया उपाये धांडोळीले सृष्टीचे : म्हणे नारायेणू ॥१८१॥

प्रकरण १७ : ईश्वरगुणानुमोदन, ओव्या १९

बोलावेया जयाचें पद : मूंके जाले वेदु : तयातें उपायें केवि जातिअंधु : देखो पांती ॥१८२॥
जेहीं नीरासीं जीवी : सांडूनि उपायाची धावांधावीं : तयां आनाथाकार्नें गोसावी : बीजें केलें ॥१८३॥
बाप जीवाचीये कणवे : जे अज्ञाना मायेचि सवे : भणौनि तोचि वेखू देवें : अंगीकरीला ॥१८४॥
जो अगाध अक्षोभु : अव्येक्त अनादि स्वयेंभु : तो मायावेखें श्रीप्रभु : अवतरला ॥१८५॥
नीस्कामा नीराभिमाना : नीजानंदे परीपुर्णा : केवळाके वेसन : जीवोधरणाचें ॥१८६॥
आहो जी आइका : तुमतें नाहीं कृपेचा आवांका : तरि येथें बीजें करुनि कां : पां मातें चूकवीलें ॥१८७॥
भलतैसें दूष्ट लेकरूं : परि माउलीसि न आव्हेरुं : देवो कृपेचा सागरु : आन मी त्रूषा फुटें ॥१८८॥
बाप समर्था बापा : आपणयांतें म्हणवीसी नृपा : तरि लेंकुरुंवां कां पां : दैन्यभोगु ॥१८९॥
जाणितलें जयालागि उदास : जोजार प्रसवलासि बहुवस : भणौनि उबगलासि पोसू : बाळकांतें ॥१९०॥
प्रजापालनी जेवी : कांइ आक्रोष आति कासवी : तीयेचा भीतरूनिचि वाढवी : तया बाळकांतें ॥१९१॥
तैसें सकळ जीवांचे जीवन : जें आतीवसें प्रसन्न : ते माउली कां चोरीताये पान्हां : तुझी दृष्टी ॥१९२॥
भवमूक्तांचें वेझें : तुझेनि कृपाकटाक्षें सूजे : तु द्रष्टा भणौनि म्हणिजे : तो गुण वोवी ॥१९३॥
तापानळीं कवळलें : भुतजात वणवलें : कर्मज्वाळा व्यापिलें : ब्रह्मांड पाही ॥१९४॥
काळानळजोहरीं : जीवां होत असे बोहरी : राखएता नाहीं भवारी : तु वांचौनिया ॥१९५॥
सांधा पां जीवासि कवन आहे : तुचि एकु बापमाये : तरि वहीला धांवैं जव आहे : प्राण कंठीं ॥१९६॥
म्हणवीसी मी उदास परब्रह्म : नीसंग आत्माराम : जीवसृष्टी सकळ कर्मा : आधीन होऊनि असें ॥१९७॥
परशास्त्रसमत : मीया आइकीलें देवकें चरीत्र : जें राउळें काढिलें सरणागत : आनंद आपुले ॥१९८॥
तेथ आम्हींचि काई केलें : जरि नीगों राउळीचेनि बोलें : तरि बापपण आपुलें : कां दाखवीजे ना ॥१९९॥
भवदुखाचा वनवा : वरी साहवैल जी देवा : परी तुझीया वीरहाग्नी जीवां : जीणें कैचें ॥२००॥

प्रकरण १८ : रायागणस्तव, ओव्या ५

बाप सवै ( दै ) वे धरणी : जे स्पर्शलीं श्रीचरणी : कीं जाणतासि खावणी : वल्लभाची ॥२०१॥
साधनामाजि नीरुपमा : होसी परोपद्रवीं क्षेमा : भणौनि आवडलीसि परब्रह्मा : श्रीचरण ठेउं ॥२०२॥
तें नव्हे हें रायेंगण : जें पात्र जालें श्रीचरना : बीजें करितां जीवोधरना : लीळावसें ॥२०३॥
वामदक्षीण वीभागे : खोलति भुक्तिजन अवघे : प्रवृत्ति जाणौनि उळींगें : बोळगवीतीं ॥२०४॥
ऐसीं सूरंगे सूहावीं : राऊळिचीं चरणतळें बरवी : जयां ह्र्दय उपाहानौ सदैवीं : मेळवीजती ॥२०५॥

प्रकरण १९ : देवस्तव, ओव्या १५

सर्वज्ञा करितां बीजें : ते दीसाचि आनंदें फुंजे : तेथ जयजय शब्दी स्तवीजे : देवतागणीं ॥२०६॥
म्हणति जयजय परमपुरषा : जय महाकाळा नीसंका : जय नीर्मळा नीर्दोषा : जी सुखदानी ॥२०७॥
जय नीर्मयां नीर्मयां : जय उदासा परब्रह्मा : जय परदैवां उत्तमा : मायावेषा ॥२०८॥
जय अद्वैता अपारा : जय नीर्गुणा नीराकारा : जय प्रभु दातारा : देखिलासी ॥२०९॥
मूगटाचें भुषण : जळो हें देवपण : कां नाहीं अधिकारेंवीण : दास्य तुझे ॥२१०॥
नव्हे पीउष गोड : पांतां स्वर्गादि थोबड : होये अपवर्ग बापूडा : तुझीनि सन्निधानें ॥२११॥
श्रीमूर्ति देखौनि राउळीची : फीटली अवदसा डोळेयाची : आहो द्वापर मागिल आजिची : आम्हांसि आठवलें ॥२१२॥
जडें पाठीं धांवती वेधें : आनंदें ढूलती चतुस्पदें : परसुखाचेनि आल्हादें : नांदती गोवळरुचें ॥२१३॥
तुझेनि जीवा अंगिकारें : म्हणे स्वर्वसुखातें पूरे : कैसेनि वाइलें उत्तरे : मूगट शब्द हें ॥२१४॥
अंतळा ( रा ) ळौनि वीमानस्तीता : ऐसें स्तवीती देवता : तवं कृपा उपनली जगन्नाथा : तें परिएसा पां ॥२१५॥
परममंगळीं जीयेचां उसंगीं : जे काळासि वरि वज्रांगी : ते कृपादृष्टि गगनमार्गी : संचरली ॥२१६॥
सहज सरळ सूहावा : बाप देवाचा दृष्टिवा : जो वरिपडोनि देवां : देत परमानंदु ॥२१७॥
चाखति स्वामिकृपेची गोडी : म्हणति स्व (र्ग) सूखें रांकडीं : आनंदें डोलति कोडी : वीमानाचीया ॥२१८॥
अवलोकीतां श्रींमूर्ती : न लगेति नेत्रांची पांती : ते जैसे डोळे वाट दाविती : परसूखाची ॥२१९॥
इत्यादि बहुती लीळा : तु क्रीडसी स्वामि सळा : तो मीं न ल्हायेंचि सोहोळा : तुझेया सन्निधानाचा ॥२२०॥

प्रकरण २० : स्तावकरंकवृत्ति, ओव्या ६

वज्रापासाव कठिण : मज दैवंहताचें अंतःकरण : काइ येर्‍हवीं तुझेनि वीरहें प्राण : जावे कीं ॥२२१॥
म्हणे आहो जी जगजीवना : मीं फुटत असें ताहाना : तु मायावेषू तरि मज अज्ञाना : कां वीसंबलासी ॥२२२॥
तुं परब्रह्म मज क्षुधा : तुं सूखदानी मी दुखिया सदा : तुं मोचकू मीं भवबंधा : वस्य जालां ॥२२३॥
तुं कृपाळु मी आनाथु : तुं जगदात्मा मीं भुतु : तुं तारकू मीं बुडतु : भवार्णवीं ॥२२४॥
मायावीरहीत जैसें : फुंजत बाळक आपैसें : धावा फोकरीत बोलो तैसें : दीसांप्रती ॥२२५॥
तेविंचि संभ्रमें बेंबळ चाले : प्रेमें सदगदीत बोले : तया आसा टाकूनि आलें : राजभुवन ॥२२६॥


N/A

References : N/A
Last Updated : November 28, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP