ऋध्दिपुरवर्णन - प्रकरण ११ ते १५

महानुभाव पंथातील थोर संत नारायण व्यास बहाळिये यांनी ऋध्दिपुरवर्णन काव्याची रचना केली.


प्रकरण ११ : देउळे वर्णन ओव्या ७

साळांखाचिया उचिया : पाहात दृष्टी टांचिया : जालीया बूधी सोच्या : ते रचना पांतां ॥८४॥
कीं प्रसादाचेनि मिषें : आकाशा मांच बांधले जैसें : दृष्टी वळघताति सायासें : परि अंत लाहाति ना ॥८५॥
कीं प्रसाद मेरु : वरि कळसू पुर्णचंद्रू : तै सारदी देवेंद्रू : क्रिडा करी ॥८६॥
कीं देवतांसि वरि : प्रसाद छ्त्र धरी : वळगाताति ऋध्दिपुरी : देवरायातें ॥८७॥
ना तया प्रसादा जैसीं : खातीं इंद्रीयें आंगेंसी : भणौनि वीसयेसूख नासी : गमलें मज ॥८८॥
ऐसीं नगरमंडीतें देउळें : देखे गोक्षीरधाम धवळें : ना तीयें जालीं उजनीर्मळें : दृष्टवेनि देवाचेनि ॥८९॥
जीएं समीपें भोगस्थानें : रचमचीतें जनीं : भणौनि नीस्पृहें केली वीजनें : मननसीळीं ॥९०॥

प्रकरण १२ : सरोवरवर्णन, ओव्या ११

तया देवयातना जवळिके : सरोवरें देखे सलक्षणीकें : तेथ टाहुवा करीत चक्रवाकें : वीर (ह) कातरें ॥९१॥
नीर्दोष नीस्पाप नीर्मळें : बोसंडति परीपूर्ण जळें : सर्वांगे जालीं वाचाळीं : कळिरवीं पक्षीयाचां ॥९२॥
ठाइं ठाइं बरवंट : नीवृति मंडीत घाट : जैसे प्रतिपक्षावरी तांबट : तपोनीधी ॥९३॥
आपुलेनि प्रसनपणें : दृष्टीसीं मांडिलें धरणें : आमृता आणिति उणें : गोडिया आंगीचिया ॥९४॥
जयाचिनि चरण्दपूनीतें : जगी वानिजेति तीर्थे : तो देवोरावो जेथें : क्रिडा करी ॥९५॥
मंद्दें मळयानीळें : झगटलें पाणी हाले : तें मज पातां सूखें डोले : परमपुरुषाचेनी ॥९६॥
सकळशास्त्र विचारु : करितां नव्हेचि नीर्धारु : तो तीयें आपेपरु : लाहातीं जालीं ॥९७॥
आसों हें पोखरणी बावी : जया श्रीचरणकमळें बरवीं : देउनि गोसावीं : बीजें करीती ॥९८॥
कव्हणी सूक्षेत्र नाहीं ऐसें : जेथ फीटे भवपीसें : गुणी आधिष्टिलें ह्र्षीकेशें : भणौनियां ॥९९॥
ऐसीं पवित्रें परिकरें : जीयें क्रिडास्थानें केलीं दातारें : तीयें तीर्थे पातां न स्मरे : आपणपें ॥१००॥
नाना तापीं तप्त : ह्र्दये असे जळत : तें जालें सांत : जें देखिलेया ॥१०१॥

प्रकरण १३ : नगरप्रवेशवर्णन, ओव्या १९

तेणें आनंदसौरसें : नगरमाजि प्रवेसे : तवं देखे देवरायें परे (सें) : पुनीत जन ॥१०२॥
मरनाभेण कव्हणी : टाकी अमृताची तवनी : ना तरि तमा भीयाला तरणी : समीपवसे ॥१०३॥
थोरा तापाचिया संका : जेवी झोबौनि राहिजे मयेंका : ना परि पाठि पुरविलेया पारकां : घर रीगें समर्थाचें ॥१०४॥
पापाभेण जाइसी : लोकीं टाकिजे कासी : कीं लोटलेया वीवसी : देखे नीधान जेवी ॥१०५॥
कीं ग्रीस्मीया दग्धु : जेवि रिगे गंगेचा हरदु : तेवि नगरप्रवेसी आनंदु : काई सांधों ॥१०६॥
आष्ट लोहोधातु सायासें : जेवि वेघिजेति परेसें : नव्हे ऋध्दिपुर तैसें : आवधातुतें वेधी ॥१०७॥
आंतरीं दोष आप्रमीत : ऐसे सर्वधर्मबहिकृत : बाप नगरीचे सामर्थ्ये : कीं तेही वेधियेले ॥१०८॥
कींबहुना आनुपम्यें : देखे नगरीची हर्म्ये : जें पांतां जालीं धर्म्हे : वीतरागांसी ॥१०९॥
चरणावीशेषें वीचीत्रीं : हाट चौहटे तीथरीं : मढमंडप चौबारीं : देखे धर्मसाळा ॥११०॥
तीयें सील्पें नीपुणें : कुसरी रचीलीं जेणे : तो वीस्वकर्मा मी म्हणें : आज्ञा देवाचिया ॥१११॥
ऐसीं अगणीत रचीतें : पाहात चाले राजपथें : तव पदें ठेविति दृष्टीपुतें : देखे संतजन ॥११२॥
तीयें आटणवीशेषें : हालिचालि करितें भीक्षुकें : जैसीं नृदेह लाधलीं पीयुषें : वाटेति डोळेयांसि ॥११३॥
कीं बाह्माभ्यांतरें आनुरागें रातलीं : तैसीं कशायें पांगुतलीं : कीं तेणें माधवें उल्हासलीं : पालासकूस्में ॥११४॥
कीं संध्यारागें गवसले : नीवविते पूर्णचंद्र प्रकटले : पुण तेही उणे एकें बोलें : नव्हेति नीस्कळंक ते ॥११५॥
धांडोळितां तीही लोकीं : मी उपमा न देखें आणिकी : तेहीं नीवत असे भीक्षुकीं : बाह्येभ्यांतरें ॥११६॥
प्रवृत्ति जगदेकनाएका  : जेथ खालवीजे सीबिका : तें महाद्वार देखा : पातला तो ॥११७॥
जगा तळौटीं तवंचि वेर्‍ही : म्हणो हे भुतधात्री : पदस्त भवारी : जवं कीजेचि ना ॥११८॥
की बीजे करुनि गोसांवी : चरणकमळीं जेवी : आद्यापि वेधली प्रुथवी : न संडी गंधु हे ॥११९॥
कीं कळिकल्मशामये : प्रुथवी दाटली सेषी आहे : ते उपचारावेया रसोपाये : देता वैद्यनाथू ॥१२०॥

प्रकरण १४ : तीनि मठांचें स्तवन, ओव्या ७

तो कैवल्यनाथु चरणचार्या : पदें ठेवीत जया वरीयां : तीया नमस्कारूनि पाईरियां : देखे महाद्वार ॥१२१॥
तें धर्मसुवर्णकाराचें एंत्र : कीं मोक्षसीधीचें वीवर : तें नमस्कारुनि महाद्वार : पाहे मठत्रये ॥१२२॥
विस्तारली लोकत्रइं कीर्ती : जे अवत्रला असे जीवपती : भणौनि वोळगे आली त्रीजगती : मिषें मठाचेनि ॥१२३॥
कीं भवार्णवीं सांपे : प्रकटलिईं कैवल्यरत्नाचीं दीपें : ना तरि देवराजधनीची जूपें : उघडलीं मज पांतां ॥१२४॥
कैलास सत्यकोक वैकूंठ : हें काज तीन्ही मठ : कां हे उपमा प्रकट : तें सांघिजैल ॥१२५॥
हरीहरब्रह्मादिक : तीन्हीं देव होउनि एक : जे स्थान सेवितां आद्यापि त्रीपुरुष : म्हणिजताती ॥१२६॥
भणौनिये सृष्टी : धांडोळितां उपमा न जोडे सूटी : कां परदैवं आधीष्टी : जें स्थान ॥१२७॥

प्रकरण १५ : संतमहिमा, ओव्या ३२

जेथ ठाइं ठाइं नीवृतांचीया सभा : फांक्त सांततेजाची प्रभा : तें देखतक्षेवो जळत उभा : वर्ग अविद्येचा ॥१२८॥
तेथ नीरुपणाचेनि सूधाकरें : दोंदिलें जालीं आर्त चकोरें : जेंहीं क्षेपिलें आंधारें : आनेथा ज्ञानाचें ॥१२९॥
आक्षेप परीहार नीधारु : करितां परशास्त्रवीचारु : तेणें श्रव्णें संसारु : विरळत दिसे ॥१३०॥
जेथची नावं तरि मर्‍हाटी : परि सटुदर्शनातें दळवटी : प्रमये धांडोळितां सृष्टी : आतीचि ना ॥१३१॥
कीं संसारसागरी : वागजाळ पांगीलें ढींवरीं : परि एकहीं न पडे बाहिरी : जीवमीनु हा ॥१३२॥
तैसें कृष्णसारा लागौनि : जे हिंडति रानीवनी : ते पारधी पाहूनी : डर नको ॥१३३॥
ते वाकसमूद्रिचे पाणिबूडे : कीं सारासारसीमेचे गुंढें : कीं मोक्षनीधी धांडोळिते उघडे : खनवादी जे ॥१३४॥
आसो हे सोमकांत उपळीं : जेवि द्रविजे चंद्रकळी : तेवी तयां संतांचां मेळीं : जालें जीवा ॥१३५॥
भयानका येया : एक न भियेति भवभया : दास्यावरि जया : आति चाड ॥१३६॥
तया ब्रह्मस्वरुपाचा गुणी : म्हणे सूवेझ भरले मूक्तामणी : जयाचें दासरेपण उरौनि : भंगेचि ना ॥१३७॥
हे वीरहें झूरती : प्रेमें मूरती : आर्ति उरती : नीर्वाणी ते ॥१३८॥
आलोकीके जयाचीये चाडे : सर्ववीषइं देवोचि आवडे : उत्कंठे पुढां रांकडें : मोक्षसूख ॥१३९॥
ऐसी परिकरें पवित्रें : राउळिची लीळाचरित्रे : तियें वांचौनि श्रोत्रें : आन सेविति ना ॥१४०॥
वाकत्रयाचिये खानी : लागलई शब्दरत्नाची विणी : परि एकहीं खरें नव्हचि भणौनि : सांडीयलीं ॥१४१॥
नीमीषोन्मिषाचेनी मीषें : वीरहें चडफडीत जैसें : आर्तैले डोळे तीये दीसे : धांवं घेती ॥१४२॥
देवेंवीण दृष्टी : रीती देखे सृष्टी : जैसी कां अनावृष्टी : जातिचातकाची ॥१४३॥
स्फुरणस्पंदनाचेनि मीषें : प्राण यरझारा करिति जैसे : सौरभ्य गीवसावया दोषें : गर्भी सूमनाचां ॥१४४॥
श्रीचरणकमळीचा वासू : वांचौनि प्राण न करी सौरसू : कां जे देवो ह्र्षीकेशू : भणौनिया ॥१४५॥
सांडुनि आन्यरससेवा : नामाची गोडी लागली जीव्हा : जैसी चाखात रसू जीवा : देति आहे ॥१४६॥
कीं सर्वज्ञ नांवं संपूर्ण शशी : जीवकुमोदातें वीकासी : भणौनि वीयोग पाविजे सारसीं : तटी रसनेचा ॥१४७॥
वोळगावेया परेशू : नाही ब्रह्मादीकां सौरसू : तीये श्रीचरणाचा  स्पर्शू : त्वचा भावी ॥१४८॥
देह सप्तधातुचा मेळावा : चरणस्पर्शू होए सदैवां : तीए सूवर्णजातीचा ठेवा : न मोडे कल्पांतींहीं ॥१४९॥
पाये श्रीचरना वेधले : हात दास्या दीधले : वाणी गुण लाधले : आमृतोपमां ॥१५०॥
स्मर्ण मननातें लूसी : बोध बूधितें मूसी : अहंकार दास्यत्वेंसी : एकवटला ॥१५१॥
ऐसी सर्वभावीं : जेहीं सोईरीक बांधली देवीं : जन्माचा तोडूनि जीवी : भवबंधु ॥१५२॥
ते जगजीवनें परीपूर्ण घट : कीं संसाररंगीचे नट : ना ते सांटवणेचे मठ : ब्रह्मविद्येचे ॥१५३॥
ती ईश्वरसेवेचे मोदक : की आर्ति जातिस्तबक : कीं प्रेमपीउषमयेंक : परीपूर्ण हे ॥१५४॥
कीं ते ज्ञानवैराग्य पक्षी : भक्त परमहंस मी लेखी : रमत श्रीचरणसूखीं : मानसीं आपूलांचि ॥१५५॥
बाप साधन नीरुपम : जें जाणें धुरेचें वर्म : जेणें वालभैलें परब्रह्म : पाठीं धांवें ॥१५६॥
जैसी वोरसें धेनु : हुंबरत ये वछालागौनु : ना तरि बाळाची आर्ति देखौनु : जननी जेवी ॥१५७॥
तेवी तया सदैवासवें : जगदात्मा पाठीं धांवें : तैं सृति नीर्गुण म्हणतां एणें नावें : लाजत असें ॥१५८॥
आसो हें भवमोचन : देवरायाचें लाडेसेपण : देखिलें राज्यभूवन : माजि नांदत असे ॥१५९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 28, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP