भजनावली - रविवार रामाची भजनावली

भजनाचे सांप्रदाय - एक रामदासी सांप्रदाय आणि दुसरा वारकरी सांप्रदाय.


जय जय राम कृष्ण हरी । जय जय राम कृष्ण हरी ॥
गणेश हे ॐकारा गौरी कुमरा । जय जय विघ्रहरा ।
हे गजवक्रा पंकज नेत्रा । हे विश्वाधारा ॥धृ०॥
संकट नाशन हे गजवदना । महिमा न कळे तव वेदांना ।
हे गुण सुंदर हे जगदीश्वर । विद्यालंकारा ॥१॥
मूषक वहन पीतांबरधर । माथां शेंदुर शिरी दुर्वांकुर ।
झळके तनु वर शेला सुंदर । मनोहएर रुप धरा ॥२॥
सत्व गुणाचा हाती मोदक । कमल पाणी हे हे गणनायक ।
गण राज्याचा आद्य प्रवर्तक । अंकुश पाशधरा ॥३॥
ज्ञान परशु हा हाती घेऊन । अज्ञानाचे करिसी खंडन ।
भक्त जनांचे करिसी रक्षण । जगदानंद खरा ॥४॥
नांदो येथे विद्या वैभव । कला गुणांचा होवो गौरव ।
तळपो तेजे ज्ञान सूर्य नव । भेटुनिया तिमिरा ॥५॥

१०८ देवी
अंबे कोल्हापूर वासिनी । अंबे कोल्हापूर वासिनी ॥धृ०॥
तुझें दर्शन व्हावे ऐसी । इच्छा बहुत मनी ॥१॥
तुझें स्वरुप ते एकवार मी । पाहीन नेत्र भरोनी ॥२॥
तव महिमा काय वर्णू मी । थकले सुरवर मुनी ॥३॥
बाळकृष्ण पद किंकर केशव । शरण तव चरणी ॥४॥

१०९ सद्‍गुरु
पहिला परळीचा मी सद्‍गुरु पहिला परळीचा ॥धृ०॥
सज्जन गडावरी । नित्य वास करी । गुरु आहे हा राष्ट्राचा ॥१॥
छाटी भगवी तेजा लाजवी । उदय झाला जणु भानुचा ॥२॥
भाळीं अवालू ह्र्दय कनवाळु । सागर आहे हा दयेचा ॥३॥
ज्ञान देऊनी अज्ञान निरसी । दास आहे हा रामाचा ॥४॥

११० राम रुपाचा अभंग
सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी
वामांगी नंदिनी जनकाची ॥धृ०॥
दक्षिणेसी उभा बंधू लक्षुमण । भरत शतुघ्न कैकई सूत ॥२॥
सन्मुख तो उभा मारुती बलभीम । जपे राम नाम सर्व काळ ॥३॥
तुका म्हणे माझ्या श्रीरामाचे ध्यान । जीवे लिंबलोण उतरीन ॥४॥

१११ अभंग रामाचा
राम गावा राम घ्यावा राम जिवीचा विसावा ॥धृ०॥
कल्याणाचे कल्याण । रघुपतीचे गुणगान ॥२॥
मंगलाचे मंगल । कौसल्येचा राम बाळ ॥३॥
राम कैवल्याचा दानी । रामदास अभिमानी ॥४॥
घ्या भागिनीनो बुक्का माळा । हरी भजनाचा लागो चाळा
हरी आम्हांला देईल । जनी जनार्दन पावेल

११२ मध्यंतर
मंगळसूत्र कुंकू काजळ पाठविलं गुरुनं । मजला ।
आयोपण वाढु दे म्हणुनी दिले अशिर्वचन । मजला ।
नवविधा भक्ति खडे कोंदणे मंगलसूत्रासी । सुखे ग ।
अष्टभाव हे सात्विक रंग । दिले कुंकवासी मजला ॥१॥
काय सांगु मी सखे बाई ग । अलंकार शोभा । सखे ग ।
इडा पिंगला नाकी नथनीचा । आत्मबिंब गाभा ॥२॥
अद्वैत रेखाचे पैंजण वाजतात पायी । सखे ग ॥
सहजानंदे श्रीगुरु ऐसा त्रिभुवनी नाही ॥३॥

११३ दत्ताचा अभंग
सर्वकाळ डोळा जडो तुझी मूर्ती
योगियांचे पती दत्तराया ॥धृ०॥
सावळे गोंडस रुप सुकुमार । देई मज-प्रेम सर्व काळ ॥१॥
निर्गुण वैभव ब्रह्मादिका न कळे । मी तरी दुबळे बाळ तुझे ॥२॥
आवडीने पाया घालिन मी मीठी । तेथुनिया उठी न काही केल्या ॥३॥
न मागो आणिक नाही दुजी आस । दत्ता पायीं वास देई सदा ॥४॥

११४ अभंग देवीचा
जयकार जयकार । त्रिवार जय जयकार ।
जगत्‍ जननीचा एक मुखाने करु जय जयकार ॥धृ०॥
कमल उमलता प्रभा फाकाते । भ्रमर चाखता मधुकण गळते ।
कोटी कोटी कंठातुनी उमटे । उदो उदो ललकार ॥१॥
निरांजनी पाजळल्या ज्योती । मंगलमय हो संगीत आरती
दिव्य भारती नव्या युगाच्या । निरसू दे अंधार ॥२॥
अमृत ओतीति गोमुख बसले । पाप क्षालनी जलचर हासले ।
विष्णूतीर्थ कल्लोळ वर्षती । संजीवनी जलधार ॥३॥
लाल रक्तिमा इथे सांडला । हळदीकुंकू सडा शिंपला ।
दिव्य परिसर भवानीचा । झळाळतो दरबार ॥४॥
जय जगदंबे जय जय गर्जत । लाख लाख कंठातुन येत
मर्द मराठयामधे गर्जली भवानीची तलवार ॥५॥

११५ अभंग रामाचा
रामा हे दयाघना । हे दयाघना स्वामी राघवा ॥धृ०॥
प्रथम का मला लाविली सवे । मग उपेक्षणा योग्य हे नव्हे ॥१॥
सकळ जाणता अंतर स्थिती । मग तुम्हा प्रती काय विनंती ॥२॥
दास तुमचा वाट पाहतो । बोलता नये कंठ दाटतो ॥३॥

११६ मागणीचा अभंग
अहंकार निशी घनदाट । गुरुवचनी फुटली पहाट
माता भक्तीची झाली भेट । मार्ग दाविला तिने मज चोखट
नरहरी रामा गोविंदा वासुदेवा ॥धृ०॥
एक बोल सुस्पष्ट बोलावा । वाचे हरी हरी म्हणावा ॥
संत समागमु धरावा । तेणे ब्रह्मानंदु होय जीवा गा ॥१॥
रामा गोविंदा वासुदेवा ॥२॥
आला शितल शांतीचा वारा । तेणे सुख झाले या शरिरा ॥
फिटला पातकांचा थारा । कळिकाळासी धाक दरा गा ॥३॥
अनुहात वाजवी टाळ । अनुक्षीर गीत रसाळ ॥
अनुभव तन्मय सकळ । नामा म्हणे केशव कृपाळ गा ॥४॥

११७ आरती रामाची
श्रीराम जय जय राम जय जय राम ।
आरती ओवाळू पाहु सुंदर मेघःशाम ॥धृ०॥
कनकाचें ताट करी धनुष्य बाण । सव्य भागी शोभतसे बंधु लक्ष्मण ॥१॥
वाम भागी सुकुमार जनक नंदिनी । मारुती उभे पुढे हात जोडुनी ॥२॥
भरत शत्रुघन वारी चौर्‍या ढाळिती । सिंहासनी आरुढले जानकी पती ॥३॥
रत्नजडित माणिक वर्णु काय मुगुटी । स्वर्गाहुनी देव पुष्पवृष्टी करिती ॥४॥
विष्णुदास नामा म्हणे मागणे हेचि । निरंतर सेवा घडो राम चरणांची ॥५॥

रविवारचे भजन संपूर्ण

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP