भजनावली - शुक्रवारची भजनावली

भजनाचे सांप्रदाय - एक रामदासी सांप्रदाय आणि दुसरा वारकरी सांप्रदाय.


७३ गणेश स्तवन
मंगलमय नाम तुझें सतत गाऊ दे ॥धृ०॥
दुर्बल या ह्रदयांतूनी । चंचल या चित्तातुन
झुरझुरत्या नेत्रांतुनी । स्वरुप पाहु दे ॥१॥
अंधार्‍या निर्जनवनी । विषयांच्या काटयांतुनी ।
चौर्‍यांशी गोटयातुनी । पार होऊ दे ॥२॥
मन्मानस मंदिरात । सिंहासन ते प्रशांत ।
सोहंम्‍ ध्वनी गातगात । रंगी रंगु दे ॥३॥
संताची बोध धुळी । लागो या देह कुळी ।
भक्तीच्या प्रेमजळीं । मस्त होऊ दे ॥४॥
भवसागर कठिण घोर । शडरिपू हे करिती जोर ।
तुकडयाची नाव पार । स्थीर होऊ दे ॥

७४ देवीचा
विधी कुमारी वागेश्वरी हंस वाहिनी । हो प्रसन्न भजनी या रंगी रंगुनी ॥धृ०॥
परब्रह्म स्वरुपाची तूच स्वामिनी । वेदाची तू जननी ब्रह्म नंदिनी ॥
भक्ताची निज भक्ती । मुक्ती जीवनी ॥१॥
स्तवन भजन सर्व भाव तुजसी अर्पिले । शारदा स्वरुप सर्व नयनी देखिले ।
वंदन हे तुज त्रिवार घे स्विकारुनी ॥२॥

७५ सद्‍गुरु स्तवन
सद्‍गुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा कांही ॥धृ०॥
सापडविली वाट जाता गंगा स्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥१॥
भोजना मागती तूप पावशेर । पडला विसर स्वप्नामाजी ॥२॥
कांही न कळे उपजला अंतराय । म्हणोनीया काय त्वरा झाली ॥३॥
राघव चैतन्य केशव चैतन्य । सांगितली खूण मालिकेची ॥४॥
बाबाजी आपुलें सांगितले नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरी ॥५॥
माघ शुध्द दशमी पाहूनी गुरुवार । केला अंगिकार तुका म्हणे ॥६॥

७६ रुपाचा अभंग अंबाबाई
धन्य धन्य कोल्हापूर । अंबाबाई ती सुंदर ॥धृ०॥
डावे बाजू सरस्वती । महाकाली उजवे हाती ॥२॥
जय विजय दोन्ही मूर्ती । पुढे बसले हो गणपएती ॥३॥
कोल्हासूरासी मर्दुनी । आंबा बसली सिंहासनी ॥४॥

७७ बुक्का अभंग
बुक्का वाहु या ग बुक्का वाहु या ॥
श्रीहरीला सर्व जणी बुक्का वाहु या ॥धृ०॥
सुवासिक आणा फुलें । त्यांचे गुंफा हार तुरे ।
श्रीहरीच्या हातामध्यें गुच्छ देऊ या ग ॥१॥
मन बुध्दीचे करुनी पीठ । मिसळोनी या बुक्क्यांत
श्रीहरीचें चरण रज भाळी लावू या ॥२॥
या बुक्याचा घेता वास । होतो शडरिपूंचा नाश
भवाब्धीचा तुटतो पाश । गुरुकृपें श्रीहरीला वश करु या ॥३॥
गिरिजासुता झाली लीन । पदी ठेवी तुझ्या मन
देह भाव भक्ती प्रेम चरणीं अर्पुया ग ॥४॥

गजर ( भजन )
करवीर क्षेत्री जाऊ या । अंबादर्शन घेऊ या ॥
हळदी कुंकू वाहू या । अंबादर्शन घेऊ या ॥
जय जयकार जय जयकार अंबा मातेचा
अंबा मातेचा जय जयकार जयकार ॥

७८ अभंग
जग व्यापक हरिला । नाही कसे म्हणावे ॥धृ०॥
मुक्तासी तेज पाणी । पुष्पिं सुगंध तो हा । मलयागिरी सुवासा । नाही कसे म्हणावे ॥१॥
तंतू पटी मिळाला । पाणी नभापरी हो । घट मृत्तिका निराळी । ऐसे कसे म्हणावे ॥२॥
गोडी ती शर्करेची । पाखडिता न ये बा । भिन्नत्व हेमवस्तू । ऐसे कसे म्हणावे ॥३॥
मी सांगती तुम्हांला । निर्गुण देव तो हा । अमृतेश्वराचे वचनी । प्रभू नाही का म्हणावे ॥४॥

७९ अभंग
मनी नाही भाव । देवा मला पाव । अशाने पावत नाही हो
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ०॥
एक दगडाचा देव । त्याला वडाराचे भय । शेंदूर फासुनी राहो हो ॥१॥
एक मृत्तिकेचा देव । त्याला कुंभाराचे भय । पाण्यांत विरुन जाई हो ॥२॥
एक लाकडाचा देव । त्याला सुताराचें भय । अग्नित जळून जाई हो ॥३॥
एक सोनियाचा देव । त्याल सोनाराचें भय । दुष्काळी विकुनी खाई हो ॥४॥
तुकडया म्हणे देवा । घ्यावी भोळी सेवा । दासाला पावत राही हो ॥५॥

८० अभंग
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यवंत ॥धृ०॥
धन्य भागीरथी । मनकर्णिका ओघा । आणिक हो गंगा त्रिवेणीच्या ॥१॥
धन्य ऋषीश्वर । धन्य पांडुरंग । मिळाले हो संत अलंकापुरी ॥२॥
नामा म्हणे धन्य । भाग्याचे हे संत । जाहला एकांत ज्ञानेशांचा ॥३॥

८१ अभंग
बोलु ऐसे बोल । जेणे बोले विठ्ठ्ल डोले ॥धृ०॥
प्रेम सर्वांगाचें ठायीं । वाचे विठ्ठल रखुमाई ॥१॥
नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥२॥
परेहूनी परतें घर । तेथें राहू निरंतर ॥३॥
सर्व सत्ता आली हाता । नामायाचा खेचर दाता ॥४॥

८२ अभंग
देवा माझे मन लागो तुझें चरणीं संसार व्यसनी पडो नेदी ॥धृ०॥
नाम संकीर्तन संत समागम । वाऊगाची भ्रम नको देवा ॥१॥
पायीं तीर्थयात्रा मुखी रामनाम । हाची माझा नेम सिध्दी नेई ॥२॥
आणिक मागणें नाहीं नाहीं देवा । एका जनार्दनी सेवा नित्य घेई ॥३॥

८३ अभंग
सदा नाम घोष करु हरीकथा । तेणे माझ्या चित्ता समाधान ॥१॥
सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लतसो ॥२॥॥धृ०॥
असो ऐसा कोठें आठवच नाही । देहीच विदेही भोगू दशा ॥३॥
तुका म्हणे आम्ही झालो अग्नीरुप । लागो नेदी पाप पुण्य अंगा ॥४॥

८४ अभंग
बरव्या दुकानी बैसावे । श्रवण मनाने असावे ॥धृ०॥
सारा सार भरा पोती । गिर्‍याईक पाहून करा रीती ॥१॥
उगीच फुगऊ नका गाल । पूर्ण सांठवावा माल ॥२॥
आम्ही निर्गुणपुरचे वाणी । आमुचे दुकान गगनी ॥३॥
ज्याच्या प्रारब्धी असेल । तो ह्या दुकानी बैसेल ॥४॥
जैसी संत तैसी वाणी । तुका बसला दुकानी ॥५॥

८५ अभंग उत्तरार्ध
नको ब्रह्मज्ञान । आत्मस्थिती भाव । मी भक्त तू देव । ऐसे करी ॥१॥
दावी रुप मज । गोपीका रमणा । ठेवू दे चरणावरी माथा ॥२॥
पाहीन श्रीमुख । देईन आलिंगन । जिवे लिंब लोण उतरीन ॥३॥
तुका म्हणे यासी न लावी उशीर । माझे अभ्यंतर जाणोनिया ॥४॥

८६ आदिमायेचा गोंधळ ( गजर )
गोंधळ घालू या ग जोगवा मागु या
आदिमाया अंबाबाई ध्यानी आणु या ग ॥धृ॥
अनादी निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी ।
मोह महिषासुर मर्दना लागुनी ॥

त्रिविध तापाची करावया झाडणी
भक्तालागी तू लागीं तू पावसी निर्वाणी
आईचा गोंधळ गोंधळ गोंधळ घालिते
आईचा आईचा जोगवा जोगवा मागते ॥ गजर ॥

आईचा जोगवा जोगवा जोगवा मागेन ।
द्वैत सारुनी सारूनी माळ मी घालीन ॥
हाती बोधाचा बोधाचा झेंडा मी घेईन ।
भेद रहीत रहीत् वारीसी जाईन  ॥धृ०॥

नवविध भक्तीच्या भक्तीच्या नवरात्रा ।
करुनी पोटी मी पोटी मी मागेन ज्ञानपुत्रा ॥
धरुनी सद्‍भाव सद्‍भाव अंतरीच्या मित्रा ।
दंभ सासुर्‍या सासुर्‍या सांडीन कूपात्रा ॥१॥

पूर्ण बोधाची बोधाची भरीन परडी ।
आशा तृष्णेच्या तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार विकार करीन कुर्वडी ।
अद्‍भुत रसाची रसाची भरीन दुरडी ॥२॥

आता साजणी साजणी झाले मी निःसंग
विकल्प नवर्‍याचा नवर्‍याचा सोडियेला संग ।
काम क्रोध हे क्रोध हे सोडियेले मांग ।
केला मोकळा मोकळा मार्ग हा सुरंग ॥३॥

ऐसा जोगवा जोगवा मागुनी ठेविला ।
जाऊनी नवस नवस महाद्वारी फेडीला ।
एका जनार्दनी जनार्दनी एकपणे देखिला ।
जन्म मरणाचा मरणाचा फेरा चूकविला ॥४॥

८७ गौळण
क्षीरसागरी हरी । कान्हा यशोदेच्या घरी ॥१॥
रांगू लागला आंगणी । माथा जाऊळाची वेणी ॥धृ०॥२॥
पायी पैंजण वाक्या वाळे । हाती नवनीताचे गोळे ॥३॥
धन्य धन्य यशोदा माय । नामा मुखाकडे पाहे ॥४॥

८८ गौळण
नकोरे कृष्णा मी गवळयाची नार
फाटेल साडी जरीची किनार ॥धृ०॥
धुणे धुत होते मी यमुनेच्या तीरी । अवचीत धरली माझी वेणी ।
हात जोडिते नंदकुमार ॥१॥
कुठवर सोसू मी हरीचा जाच । घरी दारी करिते सासु मला जाच ॥
पाया पडते नंदकुमार ॥२॥
एका जनार्दनी निश्चय मनीचा । राधेसाठी धरिल याने अवतार ॥३॥

८९ गौळण
राधे तुला बोलावितो वनमाळी ॥धृ०॥
जरी पदराची चोळी बुटयाची । चंद्रकळा काळी काळी ग ॥१॥
कर्णफुलांवर टीक हिर्‍याची । शिरी मोत्याची जाळी ॥२॥
जनाबाई म्हणे बघतो श्रीहरी । भक्ती माझी भोळी भोळी ॥३॥

९० मीराबाई कृष्णरुप
मिरा रंगली रंगली । कृष्णरुपी तल्लीन झाली ॥धृ०॥
जिकडे पाहे तिकडे कृष्ण । कृष्णमय हे जीवन ।
अंतर्बाह्य होऊनी कृष्ण । देहभाव विसरली ॥१॥
मुखीं नामाचा उच्चार । करी टाळयांचा झंकार ।
हरी भक्ती दाटे अनिवार । बेहोष नर्तनी झाली ॥२॥
आता कोठे संसार । कैसे सासर माहेर ।
निर्गुण नीराकार । परब्रह्मी लीन झाली ॥३॥
धन्य धन्य मीराबाई । सुखदुःखा पार जाई ।
निजानंदी डुंबत राही । मग्न हरीरुपीं झाली ॥४॥

९१ आरती
जय जय भवानी । मन रमणी । मातापुरवासिनी
चौदा भुवनांची स्वामिनी । महिषासुर मर्दीनी ॥धृ०॥
नेसुनी पटवा पीवळा । हार शोभे गळा । हाती धरुनीया
त्रिशूळ । भाळी कुकुमटीळा ॥२॥
अंगी ल्यालीसे काचोळी । वर मोत्याची जाळी
ह्रदया झळकळी पीवळी । गळा हे गळसरी ॥३॥
पाय़ीं घागरीया खुळ खुळ । नाकी मुक्ताफळ ।
माथा शोभतसे कुरळ । नयनी हे काजळ ॥४॥
सिंहावरी तू बैसून । मारीसी दानव जन ।
तुजला नमितो मी निशिदिन । गोसावी नंदन ॥५॥

शुक्रवार संपूर्ण

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP