भजनावली - मंगळवारची भजनावली

भजनाचे सांप्रदाय - एक रामदासी सांप्रदाय आणि दुसरा वारकरी सांप्रदाय.


जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृश्ण हरी ॥

१८ पंचपदी दुसरी । गणेश स्तवन
पावले संकटीं गजानन पावले संकटी ॥धृ०॥
पावलासी धावलासी । व्यापक सर्वाघटी ।
कार्यारंभी नमितो तुजला । भवार्णवाच्या तटी ॥२॥
शेंदूर दुर्वा प्रियदल तुजला । मोदक वाढीन ताटी ॥३॥
तुका म्हणे पायांपाशी । धाऊन घालिन मिठी ॥४॥

१९ शारदा स्तवन
तारी भवानी तारी आम्हांला तारी भवानी तार ॥धृ०॥
नको मज देऊ धन संपदा । पुरवी मनाची आस ॥२॥
शडरिपू वैरी गांजिती भारी । करी त्यांचा संव्हार ॥३॥
तवपद कमली विनंद्ति करित । करी माझा उध्दार ॥४॥

२० सद्‍गुरु स्तवन
सद्‍गुरु सारिखा असतां पाठिराखा ।
इतरांचा लेखा कोण करी ॥धृ०॥१॥
राजयाची कांता काय भीक मागे ।
मनाचिया जोगे सिध्दी पावे ॥२॥
कल्प तरूं तळवटी जो कोणी बैसला ।
काय उणे त्याला सांगावे हो ॥३॥
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो
साच उध्दरलो गुरुकृपें ॥४॥

२१ देवीच्या रुपाचा अभंग
आली भवानी स्वप्नांत । आई । आली भवानी स्वप्नांत
श्री वरदा तूं प्रसंन्न मूर्ती ॥धृ०॥
जशी वीज चमके गगनांत ॥१॥
रत्न जडिइत हार पीत पितांबर ।
कंचुकी हिरवी अंगांत ॥२॥
सरळ भांग निज भुजंग वेणी
काजळ शोभे नयनात ॥३॥
केशर कस्तुरी मिश्रीत तांबूल ।
लाल रंगला वदनांत ॥४॥
कंकणे कनकांची खणखणती ॥
पैंजण वाजती पायांत ॥५॥
विष्णूदास म्हणे अशीच निरंतर
दे आवडी भजनात । आली भवानी ॥६॥

२२ बुक्का अभंग
श्रीहरीला सर्वजणी बुक्का वाहू या ग ॥धृ०॥
अधार्‍या ह्रदयांत । हरी नामाची लावुनी ज्योत
ज्ञानदीप प्रकाशांत । देव पाहू या ग ॥१॥
मी तू पणा दोन्ही जाळी । अहंभाव बुक्का दळी ।
द्वैतभाव भूतळी । पार लोटू या ग ॥२॥
पांची देवा गान गाऊ । तुळशांचें दल वाहूं ।
आपण सार्‍या कृष्णपदी । लीन होऊ या ग ॥३॥ बुक्का

गजर ( मधले भजन )
जय करुणाघन भय हरिणी ।
भक्त वत्सले जय करुनी ।
तुजवीण दु:खादूर करी ।
कोण जननी या संसारि
गजर
जाऊ माहेरी ग अंबा मंदिरी ।
कैवल्याचे धाम बाई निःकाम करी ग ॥ जाऊ ॥

२३ मधले अभंग
कर्म आणि धर्म आचरी जयालागी
साधक शिणले साधन साधिता अभागी ॥१॥
गोड तुझे नाम विठोबा आवडते मज ।
दुजे उच्चारिता मना येतसे लाज ॥ गोड ॥धृ०॥

भक्ती आणि मुक्ती । नामापाशी प्रत्यक्ष ।
चारी वेद साही शास्त्रें । देताती साक्ष ॥२॥

काया वाचा चित्त चरणीं । ठेविले गहाण
बापरखुमा देवीवरा विठठलाची आण ॥३॥

२४ अभंग
रामकृष्ण गोविंद नारायण हरी ।
केशवा मुरारी पांडूरंग । मुरारी पांडुरंग ॥धृ०॥
लक्ष्मी निवासा पाहे दीनबंधु ।
तुझा लागो छंदू सदा मज ॥१॥
तुझे नामी प्रेम । देई अखंडित ।
नेणे तप व्रत दान काही ॥२॥
तुका म्हणे माझे हेचि बा मागणे ।
अखंडीत गाणे नाम तुझे ॥३॥

२५ अभंग
माती तुडविता नाही देह स्थिती ।
आठवितो चित्ती पांडूरंग ॥१॥
गोर्‍होबाची काम्ता । पाणियासी जाता ।
पुत्राला पाहाता खेळतसे ॥धृ०॥
दृष्टी असू द्यावी स्वामी बाळावरी ।
नाही कोणी घरी सांभाळाया ॥३॥
तुका म्हणे गोरा नाही देहावरी ।
सर्वत्र निर्धारी पांडुरंग पांडुरंग ॥४॥

२६ अभंग
जनी नामयाची रंगली कीर्तनीं
तेथें चक्रपाणी धांव घेई ॥धृ०॥१॥
मुखी हरी नाम । नेत्र पैल तीरी ।
देवाची पंढरी । मोक्ष वाटे ॥२॥
दळिता कांडीता । वाहता कावडी ।
चिंतनांत गोडी । विठठलाच्या ॥३॥
चक्र टाकोनीया । दळावें हरीने ।
देवानें भक्ताचे । दास व्हावे ॥४॥
जुळो ऐसे नाते । जळॊ गर्व हेवा ।
हीच आस देवा । पांडूरंगा ॥५॥

२७ अभंग
हेचि थोर भक्ती आवडते देवा ।
संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविलें अनंते तैसेची रहावें ।
चित्ती असू द्यावे समाधान ॥२॥॥धृ०॥
वाहिल्या ऊद्वेग दुःखची केवळ
भोगणे ते फळ संचिताचे ॥३॥
तुका म्हणे घालूं तयावरी भार ।
वाहू हा संसार देवापायी ॥४॥

२८ अभंग
एका देवासाठी । जगाचे सोसावे ।
चित्ती असू द्यावे । समाधान ॥धृ०॥
बरें म्हणो कोणी । अथवा वाईट ।
कर कीर पाठ । जगाकडे ॥२॥
बरे म्हणुनीया । तुज काय देती ।
उपाधी लाविती पाठीमागे ॥३॥
तुका म्हणे आता । घेई एक नाम ।
अंतरीचे श्रम । वीसराया ॥४॥

२९ उपसंहार मागणी संताचा अभंग
ज्ञानियांचा राजा गुरुमहाराज ।
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसे ॥१॥

मज पामरासी काय थोरपण ।
पायीची वहाण । पायीं बरी ॥२॥
ब्रह्मादीक जेथे । तुम्हां ओंळंगणे ।
इतर तुळणें काय पुढे ॥३॥
तुका म्हणे नेणो । युक्तीचिया खोली ।
म्हणुनी ठेविली पायी डोई ॥४॥

देवीचा गोंधळ ( जोगवा )
३० आईचा गोंधळ गोंधळ गोंधळ घालिते
आईचा गोंधळ गोंधळ गोंधळ घालते ।
आईचा जोगवा जोगवा जोगवा मागते ॥धृ०॥

काम क्रोध हे क्रोध हे क्रोध महिषासुर ।
आईने मर्दुनी मर्दुनी मर्दूनी केले चुर ॥
सत्व गुणांची गुणांची हाती तलवार ॥१॥

सूक्ष्म स्थळीं या स्थळी या आईच हो राहणं ।
अंबा भवानी भवानी तेथे तिचे स्थान ।
चैतन्य स्वरुपी स्वरुपी हो का नित्य लीन ॥२॥

बोध संबळ संबळ संबळ घेऊनी हाती ।
ज्ञान दिवटा दिवटा पाजळल्या ज्योती ॥
तेथें रमले मी रमले मी होका दीन रात्री ॥३॥

या बा गोंधळा गोंधळा गोंधळाच्यासाठी ।
संत पडियेले पडियेले आटाआटी ॥
वि दासाची दासाची कृपादृष्टी ॥४॥

३१ गोंळण
अग हा नंदाचा कान्हा पाण्याला जाऊच देईना ॥
शाम सुंदर हरी उभा वाटेवरी । उभा वाटेवरी ।
मयुर पिच्छे शिरी । मुरली वाजवी तनाना ऽऽऽ॥१॥

घागर घेऊन शिरी येत होते घरी । येत होते घरी ।
चेंडू मारी वरी । धड घागर घरी येऊ देईना ॥२॥

शिरी भरला घडा नको मारू खडा । नको मारु खडा
सख्या जाईल तडा । किती सांगू तुला मन मोहना ॥३॥

यासी दटावितां हासें खदाखदा । हासें खदाखदा ।
राग नये कदा । हा कोणाच्या बापाला भेईना ॥४॥

याच्या पाहता मुखा हरल्या तहान भुका । हरल्या तहान भुका ।
संसार झाल फिका । म्हणुनी लक्ष्मी लागते चरणां ॥५॥

३२ गौळण
पाणीयासी कैसी आतां । एकली मी जाऊं ॥
एकली मी जाऊ कैसी । एकली मी जाऊं ॥धृ०॥१॥
कुंभ घेऊनीया शीरि । जात होते यमुनातीरी ।
वाटेवरी उभा हरी । यासी काय देऊं ॥२॥
मुरली घेऊनिया करी । वाजवीतो श्रीहरी ।
नाद येतो कर्ण द्वारी । कोठे याला पाहूं ॥३॥
जिकडे पहावे तिकडे बाई । हरी विणें दुजे नाही ।
एका जनार्दनी हरी । कृष्ण कोठे पाही ॥४॥

३३ गौळण
नको रे कृष्णा रंग फेकू चुनडी भीजते ।
मध्यरात्री चांदण्यांत थंडी वाजते ॥धृ०॥
राधीकेने चोळी शिवली जरी बुटयाची
 श्रीकृष्णाने झारी भरली गुलाबी पाण्याची ।
राधा म्हणे कृष्णा तुला थट्टा वाटते ॥१॥
केतकीच्या वनामध्ये नाग डोलतो ।
अंब्याच्या वृक्षावर राघू बोलतो ।
नभांतील चंद्रिका ही तुजसी हांसते ॥२॥

वायु वाहे मंद मंद । दाही दिशा होती धूंद ।
पौर्णिमेच्या चांदण्यांत सृष्टी नाहते ॥३॥
चला जाऊ यमुनेकडे । रुप आपुले पाहू गडे ।
आनंदी यमुनाजल स्थिर राहते ।
कृष्ण रुपीं गोंपी सर्व द्वैत नासते ॥४॥

३४ गौळण
आरे कान्हा तू मुरली वाजविली । तहान भूक हारिली । वृत्ती गुंग केली ॥धृ०॥
यमुने तएटी । तू जगजेठी । गळा घालिती मिठी । लाज मनी ना धरली ॥१॥
सासूच्या प्रती गूज सांगती । सून चोरटी म्हणसी ।
लोणी ओठी लाविसी । अशी करणी कसली ॥२॥
यमुना जीवना । आम्ही जातांना । का रे आडविसी कान्हा ।
व्यर्थ छळिसी आम्हां । वृत्ती बहु घाबरली ।\३॥

नंद नंदना । हे मधुसुदना । ध्यास आहे सुमना
विनवी लक्ष्मी कन्या । पदरी घे वनमाली ॥४॥

३५ संतांचा अभंग
संत कृपा झाली । इमारत फळा आली ॥धृ०॥
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ॥१॥
नामा तयाचा किंकर । त्याने केला हा विस्तार ॥२॥
जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ॥३॥
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥४॥

३६ आरती
दुर्गे दुर्घट भारी । तुजवीन संसारी ।
अनाथ नाथे अंबे । करुणा विस्तारी ॥
वारी वारी जन्म मरणांते वारी
हारी पडलो आता संकट नीवारी ॥१॥

जय देवी जय देवी महिषासूर मथीनी ।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजिवनी ॥धृ०॥

त्रिभुवनी भुवनी पाहता । तुज ऐशी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं ॥
साही विवाद करिता पडले प्रवाही ।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही ॥२॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा ।
क्लेशा पासून सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा ।
नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा ॥३॥
॥संपूर्ण ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP