मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कोकिळा माहात्म्य|

कोकीळामहात्म्य - अध्याय अठठाविसावा

शास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने, शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते.


॥ श्रीगणेशाय नम: ॥
श्रीकृष्ण म्हणे धर्मालागून ॥ तूज सांगितले पुरुषाचे धर्म ॥ आतां स्त्रियांचें पूर्ण ॥ धर्म सांगतो ते ऐक ॥१॥
स्त्रियाचें दैवत भ्रतार जाण ॥ त्याचें वचन करावें मान्य ॥ हेंच व्रत नेम संपूर्ण ॥ स्वामीची आज्ञा मानावी ॥२॥
जरी अन्य धर्म केले जाण ॥ तरी करावें पतीसेवन ॥ पतीसेवेचा महिमा पूर्ण ॥ मोठा असे धर्मराया ॥३॥
अंध अथवा मूर्ख जाण ॥ बहिरा अथवा नपुंसक पूर्ण ॥ दरिद्री अथवा रोगी जाण ॥ त्याचा अव्हेर न करावा ॥४॥
भ्रतार जे बोले वचन ॥ तेंची मान्य करावें जाण ॥ सदा दोन्ही हस्त जोडून ॥ उभें असावें त्या जवळी ॥५॥
ऐसें पतीचे सेवन ॥ निरंतर करावें जाण ॥ स्वामी सेवा करुन ॥ मग आपन निजावें ॥६॥
भ्रतार वचब ऐकावें पूर्ण ॥ भ्रतार करी जरी ताडण ॥ तरी राग न करावा पूर्ण ॥ चरण धरावें स्वामीचे ॥७॥
स्वामीसी करुन विनंती ॥ माझा अपराध क्षमा निश्चितीं ॥ करुन घालाजी पोटीं ॥ नम्रवचन निववावें ॥८॥
भ्रतार गेलिया बाहेरी ॥ करावा काम धंदा निर्धारी ॥ भ्रतार आलिया घरीं ॥ हास्यवदन बोलावें ॥९॥
मधुरभाषणें त्यासी ॥ पुसावें काय इच्छा मानसीं ॥ तेंचि सांग्गा मजसी ॥ करीन आज्ञेप्रमाणें ॥१०॥
भ्रतार वचन ऐकावें ॥ मधुर तयासी बोलावें ॥ आणीक काय करावें ॥ तें ऐके धर्मराया ॥११॥
गंधपुष्पें घेऊन ॥ पतीचें करावें पूजन ॥ दोन्ही हस्त जोडोन ॥ नमस्कार करावा ॥१२॥
स्वामीचें करुनी श्रवण ॥ तयेवेळीं जे मिळे जाण ॥ तेंचि करावें भक्षण ॥ हाची धर्म स्त्रियांचा ॥१३॥
भ्रताराचें उच्छिष्ट पूर्ण ॥ अन्न अथवा फळ जाण ॥ तो प्रसाद म्हणून । न लागतां क्षण भक्षावें ॥१४॥
मोठया तिर्थी धर्मा जाण ॥ स्त्रियांनी न करावें वेगळें स्नान ॥ सर्वांसी गोड बोलावें वचन ॥ कठोर वचन न बोलावें ॥१५॥
सासूसासरें दीर जाण ॥ तयांसी करावें नमन ॥ जें जें बोलती वचन ॥ तें तें शिरीं वंदावें ॥१६॥
लग्न अथवा यात्रेस जाण ॥ स्वामी आज्ञेनें जावें पूर्ण ॥ त्याची आज्ञा घेऊन ॥ मग जावें लग्नासी ॥१७॥
ऐसें धर्म स्त्री आचरे जाण ॥ ते स्त्री पति व्रता परम ॥ स्वामी वचनें न करी गमन ॥ ते स्त्री धन्य संसारी ॥१८॥
प्रात:काळी उठून ॥ पतीचें पहावें निजवदन ॥ तेच मनीं ध्यान धरुन ॥ पतीस्मरण वारंवार ॥१९॥
हरिद्रा कुंकुम काजळ पूर्ण ॥ चंदन वस्त्रें अभरण ॥ लेणे सौभाग्यदायक पूर्ण ॥ हेंचि लेणें स्त्रियांसी ॥२०॥
स्त्रियानीं वेणी घालून ॥ हातीं घालावें कंकण ॥ भ्रतारासी आयुष्यजाण ॥ नित्य काळ इच्छावें ॥२१॥
पति व्रतेचा नेम पूर्ण ॥ न भंगावा स्वधर्म जाण ॥ धैर्य तिनें धरुन ॥ संतोषें सदा असावें ॥२२॥
कोणाचा द्वेष न करावा पूर्ण ॥ सर्वदां बोलावें मधुरवचन ॥ पतीची सेव करुन ॥ काळ आपला क्रमावा ॥२३॥
भ्रतार पावलिया मरण ॥ स्त्रियेनें करावें सहगमण ॥ तेणें सप्तजन्म पूर्ण ॥ पती समागमें होतसे ॥२४॥
जेथें भ्रतार राहील पूरण ॥ तेथें स्त्रीनें रहावें जाण ॥ हा स्त्रीचा नेम पूर्ण ॥ कथिला म्यां तुजलागी ॥२५॥
जी स्ती करी सहगमन ॥ तिच्या पुण्यास पार नाहीं जाण ॥ अश्वमेघाचें पुण्य ॥ प्राप्त होय तिज लागीं ॥२६॥
घरीं असावें सावधान ॥ नाहीं न म्हणावें पती लागून ॥ आहे शब्दें करुन ॥ मन संतुष्ट करावें ॥२७॥
शिव विष्णुहून श्रेष्ठ ॥ पती जाणावा वरिष्ठ ॥ व्रत उपवास नेम स्पष्ट ॥ पती आज्ञेनें करावें ॥२८॥
जी स्त्री न ऐके भ्रतार वचन ॥ ती जाणावी करकशा पूर्ण ॥ तिचें मुख न पहावें जाण ॥ भ्रतारें त्याग करावा ॥२९॥
जी स्त्री करी पती भेद पूर्ण ॥ ती वटवागूळ होईल जाण ॥ जन्मोजन्मीं वैधव्यें करुन ॥ पिडेल जाण निश्चयें ॥३०॥
श्रीकृष्णे म्हणे धर्मा कारणें ॥ ही कथा श्रवण केली जेणें ॥ तिचे वैधव्य सप्तजन्में ॥ दूर होईल निश्चयेसी ॥३१॥
कथा कोकिळेची पुण्य पावन ॥ भाविकजन जे करिती श्रवण ॥ जाती किल्मिश जळून ॥ क्षणएक न लागलां ॥३२॥
ऐसें व्रत स्त्रियांनी करुन ॥ कथा ऐकावी भाव धरुन ॥ तेणें होय पाप नाशक ॥ जन्मोजन्मीचें एकदां ॥३३॥
हें व्रत केवळ भागीरथी जाण ॥ स्नान करीती भाविक जन ॥ तेणें पुण्य करुन ॥ दोष समस्त नासती ॥३४॥
इति श्रीस्कंदपुरणें ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्य ॥ अष्टविंशंतितमोऽध्याय: अध्याय ॥२८॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ ओव्या ॥३४॥
॥ अध्याय २८ वा समाप्त: ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 29, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP