निर्वाण प्रकरण - ६६०८ ते ६६३६

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


या प्रसंगीं आपल्या समागमी जनांस आलिंगन
देऊन तुकारामबावांनीं उपदेश केला.

॥६६०८॥
ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥१॥
तार्किकांचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥२॥
नका शोधूं मतांतरें । नुमगें खरें बुडाल ॥३॥
कलीमध्यें दास तुका । जातो लोकां सांगत ॥४॥
==========

तुकारामबावांची शेवटील विनवणी.

॥६६०९॥
सखे सज्जन हो स्मरा नारायण । संगें येतें कोण सत्य सांगा ॥१॥
आमुचे गांवीचें जरी रत्न गेलें । नाहीं सांगितलें म्हणों नये ॥२॥
म्हणोनि सकळां केलें जरी ठावें । नाईकलें जावें पुण्यवाटे ॥३॥
इतुकियावरी तुह्मी राहों नका । विनवितो तुका विठोबासी ॥४॥

॥६६१०॥
माहेरींचा मज आलासे मुळारी । उद्यां प्रात:काळीं जाणें मज ॥१॥
बहूकाळ माझा केलासे सांभाळ । पांडुरंगें मूळ पाठविलें ॥२॥
हीच आह्मा भेटी लोभ असों द्यावा । पुन्हा मी केशवा नये येथें ॥३॥
तुका ह्मणे बहू न बोलों उत्तर । आतां फार असों द्यावी ॥४॥

॥६६११॥
सकळही माझी बोळवण करा । परतोन घरा जावें तुह्मी ॥१॥
कर्म धर्म तुम्हां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशिर्वाद ॥२॥
वाढवूनी दिलें एकाचिये हांतीं । सकळ निश्चिती झाली येथें ॥३॥
आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । मी माझीया भावें अनुसरलों ॥४॥
वाढवितां लोभ होईल उशिर । अवघींच स्थिर करा ठायीं ॥५॥
धर्म अर्थ काम झाले एक ठायीं । मेळविला तीहीं हाता हात ॥६॥
तुका ह्मणे आतां झाली याची भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥७॥

॥६६१२॥
चार लक्ष तीस हजार हीं पदें । तुह्मासी विषदें सांगितलीं ॥१॥
पुन्हा नरतनु मिळणार नाहीं । ह्मणोनि या देहीं भव तरा ॥२॥
सर्वाच्या चरणीं मस्तक ठेवितों । आह्मी आतां जातों निज धामा ॥३॥
सर्वत्र मिळोनि विनंति हे ऐका । भजनीं करुं नका आळस कोणी ॥४॥
पोटाचिये साठीं चिंता न करावी । देईल गोसावी अलबेले ॥५॥
मन हें तुमचें अधीर हें आहे । ह्मणोनि यां बाहे चिंता बहु ॥६॥
राजा जनालागीं चाकर ठेवितो । पोटालागीं देतो किंवा नाहीं ॥७॥
म्हणोनि देवासी साधावें विचारें । देईल निर्धारें अन्न बहु ॥८॥
पोटासाठीं इतुकी हळहळ लागली । कैसी भ्रांती आली देवाविशीं ॥९॥
तुका ह्मणे माझ्या गळ्याची हे आण । जरी नारायण विसराल ॥१०॥

॥६६१३॥
उठा सकळिक भेटूं तुह्मी आम्ही । लक्ष लावा नामीं विठोबाच्या ॥१॥
लहानथोर सारे आशीर्वाद घ्यारे । बोळवित यारे इंद्रायणी ॥२॥
येथुनी आमुचा खुंटलासे मार्ग । तुम्ही कृपा लोभ असूं द्यावा ॥३॥
तुम्हासाठीं जीव झाला कासावीस । कोणी हरिचे दास निवडाना ॥४॥
तुका म्हणे आतां जाईल हीच भेटी । राहातील त्या गोष्टी बोलावया ॥५॥

॥६६१४॥
येतों काकुळती अर्थ धरा चित्तीं । आमचीये पंथीं हेत धरा ॥१॥
आमुच्या पंथें नाहीं जकातिचें नातें । सणद आलिया पंथें । कोण दंडी ॥२॥
असें मी सांगतों बरें धरा मनीं । अनहिताचें कोणी सांगत नाहीं ॥३॥
परिहारासाठी वैद्य नारायण । औषध आपुला गुण करितसे ॥४॥

॥६६१५॥
रानोवनीं नाम दाटलें अपार । प्रेमाचें नीर वरुषला ॥१॥
तेव्हां माझें रुप स्वरुपीं मिनलें । धन्य धन्य केलें तिहीं लोकीं ॥२॥
तुझिये किर्तीचा वाजविला डंका । एकलाचि तुका चालविला ॥३॥

॥६६१६॥
तुम्हां सांगावया मूळ हें कारण । वैकुंठाहून आलों आम्ही ॥१॥
कलीमध्यें झाल्या पापाचिया राशी । म्हणूनि आम्हांसीं पाठविलें ॥२॥
नाम गर्जुनियां पाप जाळावया । जडजीव उद्धाराया कलीमाजी ॥३॥
माझिया बोलाचा मानाल जरी शीण । भोगाल पतन यमपुरीं ॥४॥
म्हणोनीयां तुम्हां येतों काकुळती । नाम धरा चित्तीं विठोबाचें ॥५॥
तुमचीं हीं पापें जातील निरसुनी । हें तुम्हां सांगोनी जाइल तुका ॥६॥

॥६६१७॥
मज वाटे खंती आतां वैकुंठिची । पूर्ण संसाराची आशा झाली ॥१॥
श्रीरंग सांवळा आहे वैकुंठासी । धर्मे हृषीकेशी राज्य करी ॥२॥
तें सुख आठवितां झालें समाधान । आतां नाहीं येणें संसारासी ॥३॥
आतां ऐका आम्ही सांडूं मृत्युलोक । हें तुम्हा कवतुक कळेल पुढें ॥४॥
तुका म्हणे माझी वाट तुम्ही पहातां । दग्धलों संसारी म्हणोनियां ॥६॥

॥६६१८॥
कुडीसहित तुका जाईल वैकुंठासी । ते गुज तुम्हासी कळलें नाहीं ॥१॥
पुढें जें होईल तें जाणें विठ्ठल । लौकिकां कळेल काय तेथें ॥२॥
तुका म्हणे आतां काया ब्रम्ह झाली । विमानें उतरली आम्हा लागीं ॥३॥

॥६६१९॥
उठा एक आतां सांगतों तुम्हाला । देशनटा आला आम्हालागीं ॥१॥
इंद्रायणीवरी उतरलीं विमानें । आम्हापासीं आले विष्णुदूत ॥२॥
मत्युलोकीं माझें पूर्ण झालें मन । गाईलें कीर्तन विठोबाचें ॥३॥
साधुसंतां पायीं गेलों लोटांगणीं । नित्य गर्जे वाणी विठ्ठलनामें ॥४॥
आतां एक ऐका सांगतों तुम्हासी । जावें पंढरीसी सर्व काळ ॥५॥
तुम्ही कोणी करा हरिनामकीर्तन । ऐसें तुम्हा सांगोन जातो तुका ॥६॥

॥६६२०॥
बैसा आतां आमचा राम राम घ्यावा । आम्ही गेलों देवा शरणांगत ॥१॥
शरणांगत जातां ब्रम्ह झाली काया । गेल्या नासोनीया पापराशी ॥२॥
तुमची आमची तुटी झाली येथोनी । तुम्ही स्मरा वाणी रामराम ॥३॥
नामें करो विठ्ठल दूर अंतरला । भावें हा वळला पांडुरंग ॥४॥
निरपेक्ष निरभिमानी असती जे प्राणी । त्यांसी चक्रपाणी जवळी आहे ॥५॥
ज्यांचा भाव जडला विठोबाचे पायीं । त्यांसी मुक्ति देई पांडुरंग ॥६॥
ज्ञान अभिमान अंगीं भरला ताठा । देवासी करंटा दुरावला ॥७॥
ज्ञानाचा अभिमान सांडा म्हणे तुका । तरीं जोडेल सखा पांडुरंग ॥८॥

॥६६२१॥
पताकांचें भार मृदंगाचे घोष । जाती हरिचे दास पंढरिसी ॥१॥
लोकांची पंढरी आहे भूमीवरी । आम्हा जाणें दुरी वैकुंठासी ॥२॥
कांहीं केल्या तुम्हा उमजेना वाट । म्हणुनी बोभाट करुनी जातों ॥३॥
मग पुढें रडाल कराल आरोळी । तुका कदाकाळीं मागें नये ॥४॥

॥६६२२॥
ऐसिये अवघड आमुची आहे वाट । नाहीं घाटनीट वाटेवरी ॥१॥
जकातीचा गुंता नाहीं वाटेवरी । मार्ग मोकळे बरें यावें जावें ॥२॥
ऐसें ज्या भोगणें असेल हें सुख । तेणें हो विन्मुख होऊं नये ॥३॥
मग पडाल संकटीं भवसागरीं शोका । कोणे जन्मीं तुका सांपडेना ॥४॥

॥६६२३॥
बसारे गडयानों आज्ञा द्यावी आह्मा । आमुच्या रामनामा चित्तीं धरा ॥१॥
उपकार करा पतीत उद्धरा । वारंवार उच्चारा रामनाम ॥२॥
व्हारे वारकरी वेगीं जा पंढरी । निरोप महाद्वारीं एवढा सांगा ॥३॥
तुका आमुचे गांवीं होता एक आपुला । नाहीं कोठें गेला पायाविणें ॥४॥

॥६६२४॥
गेलियाची हळहळ कोणी । नका मनीं धरुं कांहीं ॥१॥
पावले तें म्हणों देवा । सहज सेवा या नांव ॥२॥
जळतां अंगीं पडतां खाण । नारायण भोगितां ॥३॥
तुका ह्मणे नलगे मोल । देव बोल आवडती ॥४॥

॥६६२५॥
बसा सर्वजन तुह्मी कृपा करा । सत्य मार्ग धरा आपुलाला ॥१॥
माझा मार्ग नाहीं फुटणार कोणा । सद्भाववासना धरो नेदी ॥२॥
पेरियेलें बीज विस्तारे मागुती । मग करा खंती नि:कार्याची ॥३॥
उन्हाळीं पर्जन्य वर्षे शीळधारी । काय आह्मावरी उपकार ॥४॥
समय उचित कोणी सावधान । होतो राज्यमान तुका म्हणे ॥५॥

॥६६२६॥
विमानांचे घोष वाजती असंख्य । सुरु झाला डंका वैकुंठींचा ॥१॥
शब्दांचा विश्वास झाली आठवण । करा बोळवण सज्जन हो ॥२॥
आले विष्णुदूत तेचि प्रेममूर्ति । अवसान हातीं सांपडलें ॥३॥
झाला पाठमोरा इंद्रायणीतळीं । रामघोषटाळी वाजविली ॥४॥
प्रथम तो पाय घातला पाण्यांत । राहिली ते मात तुका ह्मणे ॥५॥

॥६६२७॥
माडयावरुतें पांजलें हें शरीर । झाला धुंदुकार दाही दिशा ॥१॥
टाळ घोळ विणा मृदंगाचे घोष । गाती हरिदास नाचताती ॥२॥
नेणों मागें पुढें होती हरीकथा । पहातां पहातां भ्रम लोकां ॥३॥
हातावरी हात मारुनि जातो तुका । परी कोणा एका उमजेना ॥४॥

॥६६२८॥
कंठ आणि उर झाले ते जीवन । परतलें मन मागुतें कीं ॥१॥
जनीं जनार्दन आहे तुम्हापाशीं । व्यर्थ उपवाशी होती जीव ॥२॥
इतुक्यांत एक येत पाठीवरी । कीर्ति हे माघारी जागवित ॥३॥
कांहीं केल्या याचें द्रवेना तें मन । केवळ पाषाण दिसतसे ॥४॥
सहस्त्रांत एक निवडीतां शूर । जागे तरुवर बरे होतें ॥५॥
काढुनि डोईचा लोंभ लावी शेला । असेल आपुला यावें कोणी ॥६॥
तुका म्हणे किती फोडावे या उर । करी परिहार आपुला तो ॥७॥

॥६६२९॥
सर्व हेत झाला एक आहे मनीं । ऐका विनवणी तुह्मी संत ॥१॥
आह्मी संतलोकीं स्त्री ही मृत्यूलोकीं ॥ कोण धरा एकी सुपंथ हा ॥२॥
ठायींची अचपळ तोंड फटकळ । सोसा वरदळ मजसाठीं ॥३॥
इचा उपकार आह्मावरी झाला । पदर दिधला माळणीला ॥४॥
अहो पांडुरंगा फेडा इचें ॠण । संबंध तोडणें इचा माझा ॥५॥
बाकी देऊनि यां तुका मार्गी झाला । पदर दिधला माळणीस ॥६॥

॥६६३०॥
आमुची ही कांता तुमचे पदरीं । दया तिजवरी करावी ते ॥१॥
आहे अचपळ तोंडें फटकळ । सोसा वरदळ मज साठीं ॥२॥
पसरीं पदर धरीं दाढी होंटी । घालवे जी पाठीं अपराध ॥३॥
इतुक्या शब्दांचा खरा हेत धरा । उपकार करा मजवरी ॥४॥
तुका म्हणे नेणें बोलणें मी फार । करा अंगिकार तुह्मी आतां ॥५॥

॥६६३१॥
आह्मी जातों आपुल्या गावां । आमुचा रामराम घ्यावा ॥१॥
तुमची आमची हेचि भेटी । येथूनियां जन्मतुटी ॥२॥
आतां असो द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ॥३॥
येतां निजधामीं कोणी । विठ्ठलविठ्ठल बोला वाणी ॥४॥
रामकृष्ण मुखीं बोला । तुका जातो वैकुंठाला ॥५॥

॥६६३२॥
घरचीं दारचीं भजा पांडुरंगा । वडिलांसी सांगा दंडवत ॥१॥
मधाचिये गोडी माशी टाकी उडी । मोडलिया घडी पुन्हा नये ॥२॥
गंगेचा हा ओघ सागरीं मिळाला । नाहीं मागें आला कदा काळीं ॥३॥
ऐशी या शब्दांची बरी करा सोय । गेला तुमा नये मागुता तो ॥४॥

॥६६३३॥
लोकांची पंढरी आहे भुमीवरी । आह्मा जाणें दुरी वैकुंठासी ॥१॥
कांहीं केल्या तुम्हां उमगेना वाट । म्हणोनी बोभाट करीतसे ॥२॥
माघारे रडाल कराल आरोळी । तुका कदा काळीं मागुता नये ॥३॥

॥६६३४॥
निरोप दिल्यावरी न पहावें मागुतें । पुढील तो पंथ उरकावया ॥१॥
थोडयासाठीं मागें ठेऊं नये घोर । आपुलें परिहार करावें तें ॥२॥
पोट भरल्यावर न बोलाव्या गोष्टी । भ्रम अन्न पोटीं घेऊं नये ॥३॥
देवाज्ञा झालीया न ठेवावी वासना । रांडा घोरें जाणा निरवूं नये ॥४॥
तुका ह्मणे देवें मार्ग शुद्ध केला । वांटा तो आपुला आला हाता ॥५॥

॥६६३५॥
झालें परब्रह्म घोटयाखालीं शून्य । राहीलें बोलणें येथोनियां ॥१॥
एकांतीं बोललों परिहारासाठीं । नामयाची बाकी फेडियेली ॥२॥
बरा मी भाग्याचा ऋणी श्रीदेवाचा । वदविली वाचा तेणें माझी ॥३॥
एवढे ऋणानें माझें काम झालें । आतां हरपला भवभ्रम ॥४॥
व्याज हें मुद्दल आलें तुझे हातां । नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥५॥

॥६६३६॥
शालिवाहन शकें पंधराशें एकाहत्तर । विरोधीनाम संवत्सर उत्तरायणीं ॥
फाल्गुन वद्य द्वितिया दिवस सोमवार । प्रथम प्रहर प्रात:काळ ॥१॥
तये दिवशीं शेवट कीर्तन करितां । ह्मणे मज आतां निरोप द्यावा ॥२॥
तुका ह्मणे नमन साधुसंत पाया । ऐसें बोलोनियां गुप्त झाले ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP