निर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


N/Aये समयीं तुकारामाच्या दर्शनेंकरुन पुनीत होण्यास तीर्थे, व्रतें, पर्वकाळ इत्यादि मूर्तिमंत आलीं.

॥६५५०॥
पापताप दैन्य जाय उठाउठी । झालिया भेटी हरिदासांची ॥१॥
ऐसें बळ नाहीं आणिकांच्या आंगीं । तपें तीर्थे जगी दानें व्रतें ॥२॥
चरणींचें रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्याचे माथां ॥३॥
भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेदी पाव हात कांहीं ॥४॥
तुका ह्मणे मना झालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥५॥
====

नंतर इंद्रादि देवगण वगैरे दर्शनास आले.

॥६५५१॥
संतांचें सुख झालें या देवा । ह्मणुनी सेवा करी त्यांची ॥१॥
तेथें माजा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥२॥
निर्गुण आकार झाला गुणवंत । घाली दंडवत पुजोनियां ॥३॥
तिर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥४॥
अष्टमा सिद्धिंचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोण्ही तया ॥५॥
तुका ह्मणे तेव्हां बळिया शिरोमणी । राहिलों चरणीं निकट वासें ॥६॥

॥६५५२॥
नामाचिया बळें कैवल्य साधन । उगेची निधान हाता चढे ॥१॥
जाणोनी हें वर्म भक्त भागवत । राहिलों निवांत प्रेमबोधें ॥२॥
कोण जपतप वाहे हें काबाड । म्हणती आवघड यारे नाचों ॥३॥
उघडा समाधी हरिकथा सोहळा । नरनारी बाळां लहान थोरां ॥४॥
छंदें वाहती टाळी गाती नामावळी । जयजयकारें होळी दहन दोष ॥५॥
येणें ब्रह्मानंदें दुमदुमिलें जग । सुलभ हा मार्ग सांपडला ॥६॥
तुका ह्मणे हरिभक्तिचा उल्हास । आणिलासे त्रास यमदुतां ॥७॥

॥६५५३॥
शब्दांचीं रत्नें करुनी अलंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥१॥
भावाचे उपचारें करविलें भोजन । तेणें नारायण जेवविला ॥२॥
संसारहातीं दिलें आचमन । मुखशुद्धी मन समर्पिलें ॥३॥
एक भाव दीप केला निरंजन । करोनी आसन देहाचिया ॥४॥
रंगलीं इंद्रियें करोनी तांबुल । माथां तुळसदिळ समर्पिलें ॥५॥
न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ॥६॥
====

याप्रमाणें एकादशीपर्यंत जागर केल्यानंतर द्वादशीस पारणें सोडण्यास तुकाराम बावांस संतांसह देवानें आपल्या उतार्‍यास अमंत्रण दिलें.

॥६५५४॥
देवाच्या प्रसादें करावें भोजन । व्हाल कोण कोण भाग्याचे ते ॥१॥
ब्रह्मादिकांसी हें दुर्लभ उच्छिष्ट । नका मानूं वीट ब्रह्मरसीं श
अवघिया पुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥३॥
इच्छादानी येथें बोलला समर्थ । अवघेचि आर्त पुरवितो ॥४॥
सरे ऐसें येथें नाहीं कदा काळीं । पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसें ॥५॥
तुका ह्मणे पाक लक्ष्मीच्या हातें । कामारी सांगातें निरुपम ॥६॥

॥६५५५॥
ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणें । बळिये आम्ही भले शरणांगत ॥१॥
कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । झाला पद्मनाभ सेवा ऋणी ॥२॥
बसलिये ठायीं लाविलें भरतें । त्रीपुटी वरुतें भेदी ऐसें ॥३॥
कामधेनुचिया क्षीरा पार नाहीं । इच्छेचिये वाहीं वरुषावें ॥४॥
हरि नाहीं आह्मां विष्णुदासां जगीं । नारायण अंगीं विसांवला ॥५॥
तुका म्हणे बहु लाटे हें भोजन । नाहीं रिता कोण राहत राहों ॥६॥
====

देवानें विचारिल्यावरुन तुकारामबावांनीं देवास संगातें जेवण्यास विनंति केली.

॥६५५६॥
आवडी कां ठेऊं । बैसोनियां संगें जेवूं ॥१॥
मागें नको ठेवूं उरी । माझी आण तुजवरी ॥२॥
देखिले प्रकार । यात्रे पाहेन साचार ॥३॥
तुका ह्मणे बळी । केली चाहाडी सकळीं ॥४॥
====

जैसें माता आवडीनें मुलास स्तनपान करिते तसें देव तुकोबांस प्रेमाने वोरसतात.

॥६५५७॥
अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥१॥
देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दिनांचा ॥२॥
आपुलिया वैभवें । शृंगारावें निर्मळ ॥३॥
तुका ह्मणे जेवी सवें । प्रेम घ्यावें प्रीतीचें ॥४॥

॥६५५८॥
मायबापाचिये भेटी । अवघ्या तुटी संकोचा ॥१॥
भोगिलें तें आहे सुख । खातां मुख मोकळें ॥२॥
उत्तम तें बाळासाठीं । लावी ओठीं माउली ॥३॥
तुका ह्मणे झाली धणी । आनंद मनीं न समाये ॥४॥

॥६५५९॥
देवें जीव धाला । संसार तो कडू झाला ॥१॥
तेच येताती ढेंकर । आनंदाचे हरिहर ॥२॥
वेधी आणिकांस । ऐसा जया अंगीं कस ॥३॥
तुका ह्मणे भुक । येणें नलगे आणीक ॥४॥

॥६५६०॥
धालों सुखें ढेंकर देऊं । उमटे जेऊं तोंवरी ॥१॥
क्रीडा करुं निरंजनीं । न पुरे धणी हरीसवें ॥२॥
अवघे खेळों अवघ्यामधीं । ठायीं न पडो ऐसी बुद्धि ॥३॥
तुका ह्मणे वांचवितां । आह्मा सत्ता समर्थ ॥४॥

॥६५६१॥
आमुचें जीवन हें कथा अमृत । आणिकही संतसमागम ॥१॥
सारुं एके ठायीं भोजन परवडी । स्वाद रसें गोडी पदोपदीं ॥२॥
धालिया ढेंकर येती आनंदाचे । वोसंडलें वाचे प्रेमसुख ॥३॥
पिललें स्वरुप आलिया घुमरी । रासी ते अंबरीं न समाये ॥४॥
मोजितां तयाचा अंत नाहीं पार । खुंटला व्यापार तुकयाचा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 15, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP