दांभिकास शिक्षा - ५९८१ ते ५९९०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५९८१॥
डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥
तरी ते नव्हती संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥२॥
मेळवूनि नरनारी । शकुन सांगती नानापरी ॥३॥
तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥४॥

॥५९८२॥
कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु झाले ॥१॥
द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडाची ॥२॥
दंभ करी सोंग मानावया जग । मुखें बोलें त्याग मनीं नाहीं ॥३॥
वेदाज्ञे करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥४॥
तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥५॥

॥५९८३॥
नावडे तरि कां येतील हे भांड । घेउनिया तोंड काळेम येथें ॥१॥
नासोनियां जाय रस या संगती । खळाचे पंगती नारायणा ॥२॥
तोंडावाटा नर्क काढी अमंगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनें ॥३॥
तुका म्हणे नाहीं संताची मर्यादा । निंदे तोचि निंदा ॥४॥

॥५९८४॥
उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुख बडबडी शिकलें तें ॥१॥
आपण जाऊन न्यावीं नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥२॥
अबोलणें बोले डोळे झांकुनियां । बडबडी वांयां दंभासाठीं ॥३॥
तुका म्हणे आह्मी तेथील पारखी । नाचे देखोदेखीं जाणों खरें ॥४॥

॥५९८५॥
जळो प्रेमा तैसा रंग । जाय उडोनि पतंग ॥१॥
सासूसाठीं रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥२॥
मैंद मुखींचा कोंवळा । भाव अंतरीं निराळा ॥३॥
जैसी वृंदावनकांती । उत्तम धरुं नये हातीं ॥४॥
बक ध्यान धरी । सोंग करुनी मासे मारी ॥५॥
तुका ह्मणे सर्प डुले । तैसा कथे माजी खुले ॥६॥

॥५९८६॥
साधक झाले कळीं । गुरु गुडीची लांब नळी ॥१॥
पचीं पडे मद्यपान । भांग भूर्का हें साधन ॥२॥
अभेदाचें पाठांतर । अति विषयीं पडिभर ॥३॥
चेल्याचा सुकाळ । पिंड दंड भंगपाळ ॥४॥
सेवा मानधन । वरे इच्छेनें संपन्न । सोंगाच्या नरकाडी । तुका ह्मणे बोडोनियां सोडी ॥६॥

॥५९८७॥
एक करिती गुरु गुरु । भोंवता भारु शिष्यांचा ॥१॥
पुंस नाहीं पाय चारी । मनुष्य परी कुतरीं तीं ॥२॥
परस्त्री मद्यपान । पेंडखान माजविलें ॥३॥
तुका म्हणे निर्भर चित्तीं । अधोगती जावया ॥४॥

॥५९८८॥
आवडीच्या मतें करिती भजन । भोग नारायणें ह्मणती केला ॥१॥
अवघा देव ह्मणे वेगळें ते काय । अर्थासाठीं डोय फोडूं पाहे ॥२॥
लाजे कमंडल धरितां भोपळा । आणीक धीगळा प्रावरणा ॥२॥
शाला गडवे धातुद्रव्यइच्छा चित्तीं । नैश्वर्य बोलती अवघें मुखें ॥३॥
तुका म्हणे यांस देवा नाहीं भेटी । ऐसे कल्पकोटि जन्म घेतां ॥४॥

॥५९८९॥
कवीश्वरांचा तो आह्मांसी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती ॥१॥
दंभाचे आवडी बहिराट अंधळे । सेवटासि काळें होईल तोंड ॥२॥
सोन्यासेजारीं तों लाखेची जतन । संतत तें गुण जैसेतैसे ॥३॥
सेव्यसेवकता न पडतां ठावी । तुका ह्मणे गोवी पावती हीं ॥४॥

॥५९९०॥
॥निंदा स्तुती करवी पोट । सोंग दाखवी बोभाट ॥१॥
जटा राख विटंबना । धीर नाहीं क्षमा मना ॥२॥
शृंगारिलें मढें । जीवेंवीण जैसें कुडें ॥३॥
तुका ह्मणे रागें । भलतें चावळे वाउगें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP