दांभिकास शिक्षा - ६१३१ ते ६१४०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६१३१॥
लोकांलागीं सांगे करुं नका पाप । आपणासी झोंप लागलीसे ॥१॥
लोकांसी सांगतो आपण हो भ्रष्ट । पुढें होती कष्ट जाचणीचे ॥२॥
जाचील तो यम दया नाहीं त्यासी । काकुलती येसी मग कोणा ॥३॥
तुका ह्मणे देव आपुलासा करा । यमाचिया घरा जाऊं नका ॥४॥

॥६१३२॥
दाटुनीयां पाप करिती संचय । न कळतां सोय विधीमार्गी ॥१॥
न करावें तैसें करी आचरण । सांगतां ही नेणे होतो मुर्ख ॥२॥
कर्म तैसा दंड बीज तैसें फळ । वोढवी कपाळ माझा होता ॥३॥
तुका ह्मणे पाप भिईना जोडीतां । ठेवी भगवंता शब्द मुर्ख ॥४॥

॥६१३३॥
ऐसे वेषधारी जगांत हिंडती । नानापरी घेती प्रतिग्रह ॥१॥
परमार्थ सांगे त्यजावा संसार । आपण साचार भ्रष्ट होय ॥२॥
काय भुललासी वरील रंगासी । काय जाय देसी यमसभे ॥३॥
तेथें कैंचे अंतीं धनवान जन । सोडवील कोण अपमृत्यु ॥४॥
जन्म संवसार त्यजियलें सुख । तोचि निष्कलंक सूर्य जैसा ॥५॥
तुका ह्मणे ज्याचे मनीं नाहीं आस । वोळगती त्यास सर्व सिद्धी ॥६॥

॥६१३४॥
करुनियां स्नान संध्या देवार्चन । नित्य धर्म नेम जे जे कांहीं ॥१॥
नेणे लाभ वेंच पदरींचा आदा । झाला भाग्यमंद नेणवेची ॥२॥
परान्नासी दृष्टी चंचळ वृत्तीसी । नेणवे लाभासी हाणी आली ॥३॥
अंगुष्ठ धुवोनी देतां न लाजेची । पूजा इच्छी रुची आवडीनें ॥४॥
तुका ह्मणे गेलें नेणेचि जोडिलें । मजुराचें झालें जिणें ऐसें ॥५॥

॥६१३५॥
ऐसे कळीं झाले भोंदू । करिती कर्म ह्मणती साधु ॥१॥
राख लावुनी अंगास । डोळे झांकी करी दोष ॥२॥
दावी वैराग्याची कळा । भोगी विषयसोहळा ॥३॥
तुका ह्मणे सांगों किती जळो तयांची संगती ॥४॥

॥६१३६॥
काय सांगूं वाणी न पुरेची आतां । हित सांगूं जातां दु:ख वाटे ॥१॥
काय हे थोरीव मी एक संन्यासी । निंदावें लोकांसी मतांतरें ॥२॥
जगाचिया चाली तुम्हासी कारण । राहिलें तें कोण सांगा ऐसें ॥३॥
आपुला आपण चालवावा पंथ । असेल जे रीत तैसें करा ॥४॥
तुका ह्मणे वेष घेतला संन्यासी । मागिल हे दासी काय काज ॥५॥

॥६१३७॥
लाविला लंगोटा नेसोनी कांसोटा । आश्रमाचा ताठा वागविती ॥१॥
आम्ही ब्रह्मचारी हुंबरती गर्वे । अंतरीं हिरवें न शिजेचि ॥२॥
चमकत चाले मोकळा कांसोटा । अभिमान मोठा वागविती ॥३॥
साजिरी गोजिरी दिसों लागे कांती । तुका ह्मणे नीति ऐसी नोहे ॥४॥

॥६१३८॥
ज्ञानीयांचा गर्व लवों नेदी कोणा । संताच्या पूजना नये चित्त ॥१॥
ज्ञान सांगे लोकां आपण आंधळा । अज्ञानी वेगळा संगीं राहे ॥२॥
तुका ह्मणे अल्प विद्या ज्ञानगंडे । म्हणोनीयां तोंड फोडा त्याचें ॥३॥

॥६१३९॥
काय लटिकाचि खरा । सोंग दाखवी पसारा ॥१॥
सर्व दिसतसे शीण । जारी बाग सोंग जाण ॥२॥
बहुरुपी नट । लावी जनालागीं चट ॥३॥
तुका ह्मणे ऐसें सोंग । आम्ही जाणतसों ढोंग ॥४॥

॥६१४०॥
बहुरुपी नरें पालटिलें सोंग । अंतरींचा रंग जागतसे ॥१॥
तैसें भक्तजनीं न करावें ऐसें । परमार्थी हांसें न होय तें ॥२॥
टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदी जगीं फांस कैसे ॥३॥
ढिवर हा जैसा मांस लावी गळीं । ओढुनियां नळी फाडितसे ॥४॥
तुका ह्मणे करी पराविया हाणी । पुढें पडे दुणी देणें लागे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP