दांभिकास शिक्षा - ६१५१ ते ६१६०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६१५१॥
संध्या करितोसि केशवाच्या नांवें । आरंभीं ते ठावें नाहीं कैसें ॥१॥
किती या सांगावे करुनि फजित । खळ नेणें हित जवळी तें ॥२॥
माजल्या न कळे उचित तें काय । न घ्यावे तें खाय घ्यावें सांडी ॥३॥
तुका ह्मणे घेती भिंतीसवें डोकें । वावसी तीं एकें अंधारलीं ॥४॥

॥६१५२॥
हुंदकी पिसवी हळवी दाढी । मणी ओढी निंदेचे ॥१॥
त्याचें फळ पाकी यमाचे दंड । घर केलें कुंड कुंभपाक ॥२॥
क्रोध पोटीं मांग आणिला अंतरा । भुंकोनि कुतरा जप करी ॥३॥
तुका ह्मणे स्नान केलें मळमूत्रें । जेवविलीं पितरें अमंगळें ॥४॥

॥६१५३॥
अभक्त ब्राह्मण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥१॥
वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥२॥
ऐसा हा निवाडा झालासे पुराणीं ॥ नव्हे माझी वाणी पदरींची ॥३॥
तुका ह्मणे आगी लागो थोरपणा । दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी ॥४॥

॥६१५४॥
पंडित म्हणतां थोर सुख । परि तो पाहतां अवघा मूर्ख ॥१॥
काय करावें घोकिलें । वेदपठण वांयां गेलें ॥२॥
वेदीं सांगितलें तें न करी । सम ब्रह्म नेणे दुराचारी ॥३॥
तुका देखे जीवीं शिव । हाचि तेथींचा अनुभव ॥४॥

॥६१५५॥
धाई अंतरिंच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥१॥
विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥२॥
वाढे तळमळ उभयतां । नाहीं देखिलें अनुभवितां ॥३॥
आपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥४॥
साधनाची सिद्धि । मौन करा स्थिर बुद्धि ॥५॥
तुका ह्मणे वादें । वांयां गेलीं ब्रह्मवृंदें ॥५॥

॥६१५६॥
कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥१॥
कैसीं ठकलीं बापुडीं । दंभविषयाचे सांकडीं ॥२॥
भूस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥३॥
तुका ह्मणे लागे हातां । काम मथिलें घुसळितां ॥४॥

॥६१५७॥
वंश वंदाया पुरते । कोण ब्राह्मण निरुते ॥१॥
ऐसे सांगा मजपाशीं । संतां निरवितो येविशीं ॥२॥
असा जी प्रवीण । ग्रंथीं कळे शुद्ध हीण ॥३॥
तुका म्हणे लोपें । सत्यचि या घडती पापें ॥४॥

॥६१५८॥
अंगीं ब्रह्मक्रिया खिस्तिचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळांचे ॥१॥
अंत्यजाची खिचडी घेताती मागून । गाळिया प्रदान मायबहिणी ॥२॥
उत्तम कुळीं जन्म क्रिया अमंगळ । बुडविलें कुळ उभयतां ॥३॥
तुका ह्मणे ऐसी कलियुगाची चाली । स्वार्थे बुडविली आचरणें ॥४॥

॥६१५९॥
पुराणीक ह्मणविती । जाणोनी कांदे भक्षिती ॥१॥
अगस्तीचें मूत्र मळ । लावुनि म्हणती कृष्णावळ ॥२॥
श्रेष्ठ वर्ण ब्राह्मणाचा । संग न सुटे शूद्रीचा ॥३॥
बदराहीच्या पाडी दाढा । लागे तुकयाचा हुंदाडा ॥४॥

॥६१६०॥
खिस्तिचा उदीम ब्राह्मण कलयुगीं । महारवाडीं मांगीं हिंडतसे ॥१॥
वेवसाव करितां पर्वत मांगासी । ते पैं विटाळसी न मनिती ॥२॥
मांगिणीशीं नित्य करीतसे लेखा । तोंडावरि थुंका पडतसे ॥३॥
आशा माया रांडा नांव हें कागदीं । आठवीना कधीं नारायण ॥४॥
तुका ह्मणे देह झाला पराधीन । पांडुरंगाविण गति नाहीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP