दांभिकास शिक्षा - ५९७१ ते ५९८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५९७१॥
आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वतां भाव ॥१॥
करवी आणिकांचे घात । खोडी काढूनि पंडित ॥२॥
श्वानाचिया परी । मिष्टान्नासि विटाळ करी ॥३॥
तुका ह्मणे ऐसा । सटवेचिना पांचा दिसां ॥४॥

॥५९७२॥
करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न ह्मणे संत ॥१॥
जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे झाले ॥२॥
जगदेव परी निवडीन निराळे । ज्ञानाचें आंधळें भारवाही ॥३॥
तुका ह्मणे भय न धरीं मानसीं । ऐसियांचे विशीं करितां दंड ॥४॥

॥५९७३॥
ह्मणविती ऐसे आइकतों संत । न देखिजे होत डोळां कोणीं ॥१॥
ऐसियांचा कोण मानितें विश्वास । निवडे तो रस घाईडाई ॥२॥
पर्जन्याचे काळीं वाहाळाचे नद । ओसरतां बुंद न थारेचि ॥३॥
हिर्‍या ऐशा गारा दिसती दुरोन । तुका म्हणे घन न भेटे तों ॥४॥

॥५९७४॥
अतिवाद लावी । एक बोट सोंग दावी ॥१॥
त्याचा बहुरुपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥२॥
प्रतिपादी वाळी । एक पुजी एक छळी ॥३॥
तुका म्हणे नाहीं । भुतदया ज्याचे ठायीं ॥४॥

॥५९७५॥
पोटाचे ते नट पाहो नये छंद । विषयांचे भेद विषयरुप ॥१॥
अर्थी परमार्थ कैसा घडों सके । चित्त लोभी भीके सोंग वांयां ॥२॥
देवाचीं चरित्रें दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥३॥
तुका म्हणे चित्तीं राहे अभिळास । दोघां नरकवास सारिखाचि ॥४॥

॥५९७६॥
भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥१॥
भाविकांनीं दुर्जनाचें । मानूं नये कांहीं साचें ॥२॥
होइल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥३॥
तुका ह्मणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥४॥

॥५९७७॥
जप करितां राग । आला जवळी तो मांग ॥१॥
नको भोंवतालें जगीं । पाहों जवळी राख अंगीं ॥२॥
कुडयाची संगती । सदा भोजन पंगती ॥३॥
तुका म्हणे ब्रह्म । साधी विरहित कर्म ॥४॥

॥५९७८॥
बोली मैंदाची बरवी असे । वाटे अंतरीं घालावे फांसे ॥१॥
कैसा वरिवरि दिसताहे चांग । नव्हे भाविक केवळ मांग ॥२॥
टिळा टोपी माळा कंठीं । अंधारीं नेऊनि चेंपी घांटी ॥३॥
तुका ह्मणे तो केवळ पुंड । त्यावरि वाजती यमदंड ॥४॥

॥५९७९॥
आशाबद्ध वक्ता । धाक श्रोतयाच्या चित्ता ॥१॥
वांयां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ॥२॥
बहिर्मुख एके ठायीं । तैसें झालें तया दोहीं ॥३॥
माप तैसी गोणी । तुका ह्मणे रितीं दोन्ही ॥४॥

॥५९८०॥
वरि बोला रस । कथी ज्ञान माजी फोस ॥१॥
ऐसे लटिके जे ठक । तयां इह ना पर लोक ॥२॥
परिस एक सांगे । अंगा धुळी हे न लगे ॥३॥
तुका ह्मणे हाडें । कुतर्‍या लाविले झगडे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP