वर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य

वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.


ज्याप्रमाणे राजानें प्रजेचें पालन केले पाहिजे असें पूर्वी सांगितलेलें आहे, त्याचप्रमाणें प्रजेचेंहि हें कर्तव्य आहे कीं, त्यांनी राजाची आज्ञा उल्लंघन करुं नये, कारण राजा आणि प्रजा यांचा संबंध पिता व पुत्राप्रमाणें आहे. जसा सुपुत्र आपल्या पित्याची आज्ञा उल्लंघन करीत नाहीं त्याचप्रमाणें प्रजेलाहि राजाच्या आज्ञेंत चाललें पाहिजे. हीच वास्तविक राजभक्ति होय. याविषयी प्रजेला परमेश्वरानें काय ह्मटलें आहे, ते पहा:-
॥ इन्द्रो जायति न परा जयाता अधिराजो राजसु राजयातै ॥
॥ चर्कृत्य ईड्यो नन्द्य श्वोपसद्यो नमस्यो भवेह ॥१॥ अतर्व. ६-१०-९८-१॥
अर्थ:- हे मनुष्य हो ! जो या तुमच्या [ इहं ] समुदायामध्यें [ इन्द्र:] परम ऐश्वर्याचा कर्ता व शत्रूंनां ( जयाति ) जिंकणारा व कधींहि ( न पराजयाता ) ज्याचा पराजय तो नाही व जो [ राजसु] राजांमध्यें ( अधिराज:) सर्वांपेक्षा श्रेष्ठ व (राजयातै) त्यामध्यें प्रकाशमान्‍ होतों ( चर्कॄत्य) सभापति होण्याला अत्यंत योग्य ( ईड्य:) प्रशंसनीय गुणकर्मस्वभावयुक्त [ वन्द्य:] सत्कार करण्यास योग ( च उपसद्य:) जवळ जाण्यास व शरण जाण्यास योग्य व ( नमस्य:) सर्वांनी नमस्कार करण्यास योग्य असतो, तोच तुमचा सभापति ( भव ) होवो. अर्थात्‍ लोकांनी अशा प्रकारें गुणविशिष्ट पुरुषाला सभापति-लोकनियुक्त राजा करावा. तसेंच -
॥ इमन्देवा असपत्नम्‍ सुवध्वं महते क्षत्राय ज्यैष्ठाय मह्ते ज्ञान राजायेन्द्र्स्येन्दियाय ॥२॥ यजु. ॥९॥४०॥
अर्थ:- हे ( देवा:) विद्वान राजा प्रजाजन हो तुह्मी [ इमम‍] या प्रकारच्या मनुष्याला ( महते क्षत्राय ) महान्‍ चक्रवर्ती राजा साठीं ( महते ज्यैष्ठाय) सर्वांहून मोठे होण्यासाठी [ इंन्द्रस्य इन्द्रियाय] परमेश्वरयुक्त राज्याचें व धनाचें रक्षण करण्यासाठी [ असपत्न सुबध्वम्‍] सर्व संमति करुन पक्षपात रहित पूर्ण विद्यायुक्त विनयशील, सर्वांचा मित्र अशा लोकनियुक्त सभापतीला राजा व सर्वाधीश मानून सर्व भूमंडळावरील शत्रुभाव नाहीसा करावा, व पूर्वोक्त परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणें शत्रु भाव नाहीसा करण्याकरितां प्रजेनें राजा व राजपुरुषांना साहाय्य देऊन वेद विद्याप्रचार व धर्मप्रचार ही कामें त्यांचे द्वारा करवावीं. व शत्रुभाव नाहींसा करावा; कारण उपद्रवी लोकांनी अनेक संकटे उपस्थित केल्यावर राजाहि ती संकटें नाहीसी करितो व प्रजेमध्ये शांतता प्रस्थापित करितो. तथा आपल्या प्रजेचें रक्षण करितो ह्मणून प्रजेचेंहि कर्तव्य आहे कीं, तिनें सर्वदा राजानें घातलेल्या नियमांचे अनुकरण करावें आणि समय पडल्यावर राजाला तनमनधनांनी साहाय्य करावें. असो, पुढें प्रजेकरितां मनुमहर्षि काय ह्मणतात ते पहा:-*
॥ अराजके हि लोकेऽस्मिन्‍ सर्वतो विदूरुते भयात्‍ ॥
॥ रक्षार्थमस्य सर्वस्य राजानमसृजत्प्रभु: ॥३॥ म. अ. ७ श्लो. ३
॥ सोऽग्रिर्भवति वायुश्च सोर्क: सोम: स धर्मराद्‍ ॥
॥ स कुबेर: स वरूण: स महेंद्र: प्रभावत: ॥४॥ म. अ. ७ श्लो. ७
॥ बालोऽपि नावमंतव्यो मनुष्य इति भूमिप: ॥
॥ महती देवता ह्येषा नररुपेण तिष्ठति ॥५॥ म. अ. ७ श्लो. ८
अर्थ:- हें सर्व जगत्‍ अराजक ( राजरहित) असतां बलवंतापासून निर्बलास भय प्राप्त होऊन सर्वत्र हाहाकार झाला त्यावेळी प्रभूनें [ ब्रम्हदेवानें] या सर्व जगताच्या रक्षणाकरितां राजा उत्पन्न केला आहे. यास्तव त्यांने रक्षण करावें ॥३॥
तो राजा आपल्या प्रभावानें [ शक्तीच्या उत्कर्षानें] अग्नि वायु, सूर्य, चंद्र, धर्मराज, कुबेर, वरूण, इंद्र, या सारखा आहे. ॥४॥
राजा कदाचित्‍ बाल जरी असेल तथापि इतर मनुष्यांसारखा हा ही एक मनुष्य आहेअ अशा बुद्धीनें त्याचा अपमान, कदापि करूं नये; कारण, कोणी एक ही मोठी देवता मनुष्य रुपानें राहिली आहे "यावरुन देवतची अवज्ञा केली असतां जे अधर्मादिक अदृष्ट दोष ते यांच्या अवज्ञानें प्राप्त होतात असें सुचविलें ॥५॥
॥ एकमेव दहत्यगिर्नरं दुरुपसर्पिणम‍ ॥
॥ कुलं दहति राजाग्नि: सपशुद्रव्यसंचयम्‍ ॥६॥ म. अ. ७ श्लो. ९
॥ यस्य प्रसादे पद्मा श्रीर्विजयश्च पराक्रमे ॥
॥ मृत्युश्च वसति क्रोधे सर्वतेजोमयो हि स: ॥७॥ म. अ. ७ श्लो. ११
॥ तं यस्तु द्वेष्टि संमोहात्स विनश्यत्यसंशयम्‍ ॥
॥ तस्य ह्याशु विनाशाय राजा प्रकृरुते मन: ॥८॥ म. अ. ७ श्लो. १२
अर्थ:- जो कोणी मनुष्य प्रदीप्त झालेल्या अग्नीच्या अतिसमीप जातोअ त्याला एकट्यालाच अग्नि जाळितो (त्यांच्या पुत्रादिकांचे दहन करीत नाहीं) ; परंतु राजरुपी अग्नी तर कुल ( पुत्र, स्त्रिया, भ्राते, जाति इत्यादिक) पशु; [ गाई, अश्व, इत्यादिक ] सुवर्णादिधन संचय या सर्वांचा नाश करितो ॥६॥
ज्याच्या प्रसादाचे ठायीं पद्मा श्री [ मोठी लक्ष्मी वास करीते, ज्याच्या पराक्रमाचे ठायीं विजय राहातो. ज्याच्या क्रोधाचे ठायीं मृत्यु राहतो. कारण, सूर्यादि देवतांचे तेज राजा धारण करितो " याचा भाव - राजाच्या प्रसादानें लक्ष्मी प्राप्त होते, यास्तव लक्ष्मीकाम पुरुषानें त्याची सेवा करावी. ज्यास शत्रु असतील त्याजवर राजा संतुष्ट झाला असता त्याच्या शत्रूंचा नाश होतो [ करितो ] यास्तव शत्रुवधाची इच्छा करणारानें राजसेवा करावी. ज्याच्यावर राजा क्रोध होतो त्यास मरणांत शिक्षा करितो, यास्तव जीवनची इच्छा करणार्‍या पुरुषानें राजाला क्रोध येईल असें कृत्य करूं नये ॥७॥
जो मनुष्य मोहानें (अज्ञानानें) राजाचा द्वेष करितो, तो नि:संशय नाश पावतो. कारण, त्याचा नाश करण्याकरितां राजा शीघ्र मन धारण करितो. उक्त प्रमाणापासून सिद्ध आहे की, राजाबरोबर द्वेष करणें ह्मणजे त्याच्या आज्ञेला न मानणें तथा त्यांनी बांधलेल्या नियमानुसार न चालणें नाशाला कारण आहे. या करितां ऐहिक व पारत्रिक सुखाची इच्छा करणार्‍या मनुष्याला उचित आहे कीं, त्यांनी धर्मात्म्या राजाबरोबर द्वेष करूं नये व राजावर श्रद्धा ठेवून त्यानें घातलेल्या नियमानुसार सर्वदा चालणें आणि समय पडल्यावर तन, मन आणि धन यांनी राजाला साह्य करुन आपल्या स्वामिभक्तीचा परिचय देत राहावें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP