वर्णाश्रमधर्मनिर्णय - वैश्यकर्मधर्म

वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.


वैश्याचे कर्माबद्दल मनु महा ऋषि म्हणतात की,
॥ पशूनां रक्षणं दानमिज्याध्ययनमेव च ॥
॥ वणिक्‍ पथं कुसीदं च, वैश्यस्य कृषिमेव च ॥१॥ म.अ.१. श्लो.९०
अर्थ:- पशूंचे रक्षण करणें, अर्थात्‍ गाई आणि अश्व आदिक उपकारी पशूंचे रक्षण करणें, तथा पालन केल्यानें वृद्धीस प्राप्त झालेले बैल आणि घोडे वगैरे विक्रय करणे. "दान करणे" अर्थात सुपात्रांना सर्वदा यथाशक्ति अन्न आणि वस्त्रादिक देणें. " इजा " यज्ञ करणें अर्थात्‍ अग्नि होत्रादि यज्ञ विधिपूर्वक करणें. " अध्ययन करणें" अर्थात्‍ ब्रम्हचर्यपूर्वक अंगासहित वेद आणि धर्म शास्त्रादिक पढणें "वणिकपथं" म्हणजे स्थळ मार्गानें व जल मार्गानें व्यापार करणें. "कुसीदं म्ह. शास्त्रोक्त व्याजानें द्रव्य मिळविणे आणि कृषि म्हणजे शेतकी करणें, ही वैश्यांची कर्मे होत. ॥१॥
॥ वैश्यस्तु कृतसंस्कार:, कृत्वा दारपरिग्रहम्‍ ॥
॥ वार्तायां नित्ययुक्त: स्यात्‍ पशूनां चैव रक्षणे ॥२॥ म.अ.९श्लो.३२६
अर्थ:- उपनयनपर्यंत संस्कार झालेल्या वैश्यानें विवाह करुन वार्तायां म्हणजे शेतकीव्यापार इत्यादिक आणि पशूंचे रक्षण याविषयी नित्य तत्पर असावें ॥२॥
॥ नच वैश्यस्य काम: स्यान्न रक्षेयं पशूनिति ॥
॥ वैश्ये चेच्छति नान्येन, रक्षितव्या: कथंचन ॥३॥ म.अ.९ श्लो.३२८
अर्थ:- मी पशूंचें रक्षण करणार नाही, असें कदापि वैश्यानें इच्छूं नये [ तर शेती, व्यापार इत्यादि उपजीविकेचा संभव असतांहि वैश्यानें पशुरक्षण अवश्य करावें.] आणि वैश्य पशुरक्षण इच्छीत असतां अन्यानें कदापि पशुरक्षण करूं नये. ॥३॥
॥ मणिमुक्ताप्रवालानां, लोहानां तांतवस्य च ॥
॥ गन्धानां च रसानांच, विद्यादर्घबलाबलम्‍ ॥४॥ म.अ. ९ श्लो.३२९
अर्थ:- मणि, मोत्यें, पोवळीं, लोह, वस्त्रें, कापूर इत्यादिक सुगंधि द्रव्यें, आणि लवणादिक रस या सर्वांचे [ उत्तम, मध्यम, कनिष्ठ या भेदानें व देशकाल व्यवस्थेने ] न्यूनांधिक दर वैश्यांनी जाणावे ॥४॥
॥ बीजानामुप्तिविच्च स्यात्‍, क्षेत्रदोषगुणस्य च ॥
॥ मानयोगं च जानीयात्‍, तुलायोगांश्च सर्वश: ॥५॥ म.अ.९ श्लो.३३०
अर्थ वैश्यांनी [ हें बीज पातळ असावें, हें घण असावें इत्यादि । बीजें पेरण्याचा प्रकार हें बीज या क्षेत्रात उत्पन्न होतें. हें होणार नाही. हें अधिक पिकेल इत्यादिक क्षेत्राचे गुण दोष; शेर; पायली द्रोण इत्यादिक सर्व मापें आणि मासा तोळा इ. सर्व वजनेंही जाणावी ॥५॥
॥ सारासारंच भांडानां, देशानांच गुणागुणान्‍ ॥
॥ लाभालाभंच पण्यानां, पशूनां परिवर्धनम्‍ ॥६॥ म.अ.९ श्लो.३३०
अर्थ :- भांडे [ विकण्याची वस्त्रादिक द्रव्यें ] याचा सारासार विचार ( हें द्रव्य उत्कृष्ट व हें द्रव्य निकृष्ट इत्यादि विशेष), देशाचें गुण व अवगुण (ह्या देशांत व्रीही बहुत होतात, या देशांत जव बहुत होतात इत्यादिक); विकण्याच्या वस्तूंच लाभ व तोटा आणि पशूंच्या वृद्धीचीं साधने हीं सर्व वैश्यांनी जाणावीं ॥६॥
॥ भृत्यानांच भृतिं विद्याद्भापाश्च विविधा नृणाम्‍ ॥ द्रव्याणां
॥ स्थानयोगांश्च क्रयविक्रयमेव च ॥७॥ मनु. अ.९ श्लो.३३२
॥ धर्मेण च द्रव्यवृद्धावातिष्ठेद्यत्नमुत्ततम्‍ ॥
॥ दद्याच्च सर्वभूतानामन्नमेव प्रयत्नत: ॥८॥ मनु.अ.९ श्लो.३३३

अर्थ:- मजूर लोकांची मजुरी, मनुष्याच्या निरनिराळ्या नाना प्रकारच्या भाषा, द्रव्यांच्या स्थितीचे उपाय आणि क्रयविक्रय ही सर्व वैश्यानें जाणावीं ॥७॥
धर्मेकरून (क्रयविक्रयादिकेंवरुन) द्र्व्याचे वृद्धीविषयी मोठा यत्न ठेवावा, आणि प्राण्याला हिरण्यादि दानापेक्षां विशेषेंकरुन अन्नदानच करावें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP