वर्णाश्रमधर्मनिर्णय - गृहस्थाश्रम

वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.


आचार्यकुलामध्ये राहून सांगोपांग वेदाध्ययन झाल्यावर ब्रम्हचारिणी व ब्रम्हचारी पुरुषानें आपल्या गृहामध्यी व विवाह करुन नियमितं समयपर्यंत स्वकर्तव्यपालन करणें त्यालाच गृहस्थाश्रम असें म्हणतात. गृहस्थाश्रम व विवाह या विषयी मनु म्हणतात की,
॥ चतुर्थमायुषो भागामुषित्वाद्यं गुरौ द्विज: ॥
॥ द्वितीयमायुषो भागं कृतदारो गृहे वसेत‍ ॥१॥ मनु. अ. ४ श्लो. १
॥ गुरुणानुमत: स्नात्वा समावृत्तो यथाविधि ॥
॥ उद्वहेत द्विजो भार्यां सवर्णां लक्षनान्विताम्‍ ॥२॥ मनु. अ. ४ श्लो. १४
अर्थ:- आयुष्याचे चार भागांतून पहिल्या भागामध्यें गुरुकुलीं वास करुन आयुष्याच्या दुसर्‍या भागांत विवाह करुन गृहस्थाश्रमांत राहावें ॥१॥
ब्रम्हचारी द्विजानें ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्यादिकांनी गुरुच्या अनुमतीनें यथाविधि [आपला] समावर्तन संस्कार करुन आपल्या वर्णांतील शुभ लक्षणांनी युक्त अशी स्त्री वरावी. ॥२॥
गृहस्थाच्या कार्यांविषयी महर्षि मनूनें सांगितलें कीं,
॥ वैवाहिकेऽग्रो कुर्वीत गृह्यं कर्म यथाविधि ॥
॥ पंचयज्ञविधानं च पक्तिं चान्वाहिकीं गृही ॥३॥ मनु. अ. ३ श्लो.६७
॥ पंच सूना गृहस्थस्य चुल्ली पेषण्युपस्कर: ॥
॥ कंडनी चोदकुंभश्च बध्यते यास्तु बाहयन्‍ ॥४॥ मनु. अ.३ श्लो. ६९
॥ अध्यापनं ब्रम्हयज्ञ: पितृयज्ञस्तु तर्पणम्‍ ॥
॥ होमो दैवो बलोर्भौतो नृयज्ञोऽतिथिपूजनम्‍ ॥६॥ मनु. अ.३ श्लो.७०
अर्थ:- गृह्यसूत्रोक्त कर्म [ सायंप्रात: होम, अष्टकादिक संस्था], यथाशास्त्र अग्निसंपाद्य असा पंचमहायज्ञांतर्गत वैश्वदेव होम, आणि प्रतिदिवशीं करावयाचा पाक ही कर्में गृहस्थाश्रमीं याने वैवाहिक विवाहांत उत्पन्न झालेल्या] अग्नीवर करावी ॥३॥
गृहस्थाचे गृहामध्यें हिंसाजन्य यांचवस्तु या कीं, ‘चुल्ली’ म्हणजे चूल, ‘पेषणी’ ह्मणजे जातें, ‘उपस्कर’ ह्मणजे केरसुणी, ‘कंडनी’ ह्मणजे उखळ, मुसळ आणि ‘उदकुंभ’ ह्मणजे पाण्याच्या घागरी. इत्यादि. ह्या पांच गृहस्थाला सूना ( प्राणिवधस्थानें) होत, ज्यांचा उपयोग [ आपल्या गृहकार्याकडे ] केला असता हिंसाजन्य पातकानें संबद्ध [लिप्त] होतो ॥४॥
त्या पंचसूनांपासून उत्पन्न होणार्‍या पापाच्या निष्कॄतीसाठी [ नाशांकरितां]  गृहस्थाश्रमी यांनी पंचमहायज्ञ प्रतिदिवशी करावे असें महर्षिंनी [ मन्वादिकांनी] सांगितले आहे. " श्लोकांत निष्कृत्यर्थ असें म्हटले आहे व पंचसूना ह्या हिंसास्थानें होत असे सांगितले आणि सूना दोषांनी लिप्त होत नाहीं असे पुढे सांगावयाचें आहे, यास्तव पंच सूना ह्या पापाला कारण आहेत आणि पंच महायज्ञ हे त्या पंचसूनासंबंधी पातकाचें नाशक आहेत. प्रत्यहं असें श्लोकांत ह्मटले आहे त्यापेक्षां त्या पातकाचा क्षय प्रतिदिवशी होणें अवश्य आहे, यास्तव जसें संध्यावंदन नित्य तद्वत्‍ पंचमहायज्ञादि नित्य करावे असा विधि सूचित होतो" ॥५॥
ते पंचमहायज्ञ असे: अध्यापन (वेदांचें अध्ययन करणें, वेद पढविणें आणि वेदोक्त धर्माचा प्रचार करणें)  तो ब्रम्हयज्ञ, [ अन्नादिकाने किंवा उदकानें ] तर्पण करणें तो पितृयज्ञ, अग्नीमध्ये होम करणें तो देवयज्ञ, भूतांला बलिदान करणें तो भूतयज्ञ, आणि अतिथीचें पूजन करणें तो मनुष्ययज्ञ, जाणावा. " अध्ययनादिकांचे ठायीं यज्ञशव्द व महच्छब्द स्तुतिसाठी गौण आहे " ॥६॥
॥ पंचैतान्‍ यो महायज्ञान्न हापयति शक्तित: ॥
॥ स गृहेऽपि वसन्नित्यं सूनादोषैर्न लिप्यते ॥७॥ मनु. अ. ३ श्लो. ७१
॥ देवतातिथिभृत्यानां पितृणामात्मनश्च य: ॥
॥ न निर्वपति पंचानामुच्छवसन्न स जीवति ॥८॥ मनु. अ. ३ श्लो. ७२
॥ स्वाध्याये नित्ययुक्त: स्याद्दैवे चैवेह कर्मणि ॥
॥ दैवकर्मणि युक्तो हि विभर्तीदं चराचरम्‍ ॥९॥ मनु. अ. ३ श्लो. ७५
॥ अग्नौ ग्रास्ताऽऽहुति: सम्यंगादित्यमुपतिष्ठते ॥
॥ आदित्याज्जायते वृष्टिर्वृष्टेरन्नं तत: प्रजा: ॥१०॥ मनु. अ. ३ श्लो. ७६
अर्थ:- जो गृहस्थाश्रमी हे पंचमहायज्ञ यथाशक्ति टाकीत नाहीं ह्मणजे आचरणि करितो, तो गृहस्थाश्रमांत रहात असतांहि पंचसूना दोषांनी लिप्त होत नाही. ॥७॥
जो मनुष्य देवता, अतिथि, भृ. चाकर [ पोषणीय असे वृद्ध मातापितर इत्यादिक], पितर व आत्मा ह्म. पुत्रादिकांला जो अन्नदानें करुन संतुष्ट करीत नाही तो जीवंत असतांहि मृतसमान आहे. तस्मात्‍ याला अवश्य संतुष्ट करावें ॥८॥
स्वाध्याय ह्मणजे वेदाध्ययन ( ब्रम्हयज्ञ) आणि दैवकर्म [ अग्नीचे ठायीं होम] यांविषयी नित्यतत्पर असावें; कारण दैव कर्माविषयीं निरंतर तत्पर असणारा ( अग्नींत होम देणारा) मनुष्य हें स्थावर जंगम जगत्‍ धारण करितो ॥९॥
यजमानानें अग्नीमध्यें टाकलेली आहुति ( सूर्याचे ठायीं रसाकर्षन शक्ति असल्यामुळे ) सूर्याला पोंचते, मग सूर्यापासून ( त्या आहुतीची रसरुप ) वृष्टि उत्पन्न होते, त्या वृष्टीपासून अन्न उत्पन्न होतें, आणि त्या अन्नापासून प्रजा उत्पन्न होतात ॥१०॥
प्रथमत: सांगितले आहे की, गृहस्थ पुरुष आपले कुटूंबादिकांचें पोषण करुन शिवाय ब्रम्हचर्य आदि शेष तीन आश्रमांला अन्न आणि वस्त्रादिकांचे साहाय्य करितो. यां विषयीं मनु भगवान ह्मणत आहेत की: -
॥ यथा वायुं समाश्रित्य वर्त्तंते सर्व जंतव: ॥
॥ तथा गृहस्थमाश्रित्य वर्त्तंते सर्व आश्रमा:  ॥११॥ मनु. अ. ३ श्लो. ७७
॥ यस्मात्त्रयोप्याऽश्रमिणो ज्ञानेनान्नेन चान्वहम्‍ ॥
॥ गृहस्थेनैव धार्यंते तस्माज्ज्येष्ठाश्रमो गृही ॥१२॥ मनु. अ. ३ श्लो. ७८
अर्थ:- जसे प्राणवायूचा आश्रय करुन सर्व प्राणी सजीव राहतात, तद्वत्‍ गृहस्थाश्रम्यांच्या आश्रयेंकरुन सर्व आश्रमी निर्वाह करितात ॥११॥
गृहस्थाश्रमी हा सर्व आश्रम्यांला प्राणासारखा उपकारक आहे ज्या कारणास्तव तिघेही आश्रमी ( ब्रम्हचारी, वानप्रस्थ आणि संन्यासी) यांला प्रत्यही ज्ञान [वेदार्थ] [व्याख्यान], आणि अन्नदान यांहीकरुन गॄहस्थाश्रमी [धारण] करितो, यास्तव गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे ॥१२॥
॥ विभागशीलो यो नित्यं, क्षमायुक्तो दयापर: ॥
॥ देवतातिथिभक्तश्च, गृहस्थ: स तु धार्मिक: ॥१३॥
॥ दया लज्जा क्षमा श्रद्धा, प्रज्ञा योग: कृतज्ञता ॥
॥ एते यस्य गुणा: सन्ति, स गृही मुख्य उच्यते ॥१४॥
॥ यथैवात्मा परस्तद्वद्‍, द्रष्टव्य: सुखमिच्छता ॥
॥ सुखदु:खानि तुल्यानि, यथात्मनि तथा परे ॥१५॥
॥ सुखं वा यदि वा दु:खं, यत्किंचित्‍ क्रियते परे ॥
॥ ततस्तन्तु पुन: पश्वात्‍, सर्वमात्मनि जायते ॥१६॥
अर्थ:- जो गृहस्थ पुरुष विभागशील ( गरीब अनाथ, ब्रम्हचारी तथा संन्यासी गुरु आदिकाला यथा योग्य दान आणि सत्कारानें संतुष्ट करणारा ) क्षमा युक्त आपल्यापेक्षा असमर्थानें सतविलें तरी त्याला न सतविणारा अर्थात्‍ क्रोध न करणारा दयापर [ क्लेशाला प्राप्त झालेल्या प्राणिमात्राला क्लेशापासून सोडविनारा] तथा देव आणि अतिथीचा भक्त आहे. [ अग्निहोत्री ] यज्ञादिकांचे द्वारा देवतांची नित्य पूजा करणारा तथा अन्न वस्त्र आदिकांचे द्वारां अतिथीचा सत्कार करणारा अहे. ] तो गृहस्थ धर्मात्मा मानिला जातो ॥१३॥
दया [ प्राणिमात्राला संकटापासून सोडविणें] लज्जा ( निंदित कर्मापासून मनास हटविणें. ) क्षमा [ दुसर्‍यांने केलेला अपमान आदिकाचे सहन करणें ] श्रद्धा ( सद्‍गुरु आणि वेद वेदांत वाक्यामध्यें विश्वास ठेवणें ) प्रज्ञा ( धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाला यथावत्‍ जाणण्याची अंत:करणाची वृत्ति) धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याला यथा समय प्राप्त करणें. अथवा चित्तवृत्ति विरोध करुन इंद्रियांना जिंकणें. कृतज्ञता ( माता पिता आचार्य आणि मित्र आदिकानें केलेल्या उपकाराला जाणणें अर्थात्‍ उपकाराची फेड करणे ) हे सद्‍गुण गृहस्थांमध्ये असतील तो गृहस्थ धर्मात्मा गृहस्थामध्येंही मुख्य धर्मात्मा मानला जातो. ॥१४॥
सुखाची इच्छा करणार्‍या गृहस्थाश्रमास उचित आहे, कीं, तो आपलेहि समान दुसर्‍याला विचाररुपी नेत्रानें पाहाणें, कारण कीं, ज्याप्रमाणे आपल्यामध्यें सुख आणि दु:खाचा अनुभव होत आहे. (सुख पिय होतें आणि दु:ख अप्रिय होतें) त्याप्रमाणें सुख आणि दु:ख यांचा दुसर्‍यांनाहि अनुभव असतो ॥१५॥
जो पुरुष दुसर्‍याकरितां जें काही सुख आणि दु:ख देतो तेंच सुख व दु:ख प्रसंगी आपणासहि अनुभवावें लागतें ॥१६॥
॥ यद्यदिष्टतमं लोके, यच्चापि दयितं गृहे ॥
॥ तत्तद्‍ गुणवते देयं, तदेवाक्षयमिच्छता ॥१७॥
॥ ज्ञानिभ्यो दीयते यच्च तत्‍ कोटिगुणितं भवेत्‍ ॥
॥ तस्मादात्मज्ञं ह्मर्चयेद्‍ भृतिकाम: ॥१८॥
जी जी वस्तु ह्या संसारामध्यें अत्यंत प्रिय असेल व जी जी वस्तु गृहामध्यें अत्यंत प्रिय असेल त्या सर्व वस्तूंची सर्वदा इच्छा करणार्‍या [ या सर्व उत्तम वस्तू सर्वदा माझेजवळ) राहाव्या या गोष्टीची इच्छा करणार्‍या ] मनुष्याला उचित आहे. की, तो त्या उत्तम तथा प्रिय वस्तूंचेव दान गुणवंताला करणें, ( गुणवंत अतिथि याला त्या व वस्तूला देणें.) ॥१७॥
श्रुत्यर्थ ज्ञानवंत अतिथींना जे पदार्थ दिले जातात ते पदार्थ कोटी गुण होतात ( अनंत गुण होऊन दात्याला प्राप्त होतात. याचकरितां आपले ऐश्वर्याची वृद्धि इच्छिणार्‍या गृहस्थ पुरुषांना उचित आहे की, तें आत्म्याला जाणणार्‍या [ ज्ञानवंत ] अतिथीचें श्रद्धापूर्वक अन्न आणि वस्त्रादिकानें पूजन करावें ॥१८॥
पहा:- याविषयी मनु भगवान यानें म्हटले आहे की,
॥ न वै स्वयं तदश्रीयादतिथिं यत्र भोजयेत्‍ ॥
॥ धन्यं यशस्यमायुष्यं स्वर्ग्यं वा ऽ तिथिपूजनम्‍ ॥१९॥ मनु. अ. ३ श्लो.१०६
अर्थ:- जे (उत्तम) पदार्थ अतिथीला समर्पण केले नाहीत ते आपण भक्षण करूं नयेत. अतिथीचें पूजन, धन, यश, आयुष्य आणि स्वर्ग यांते देणारें आहे ॥१९॥
गृहस्थाकरितां पूर्वी अतिथिसेवा सांगितली गेली आहे. ते अतिथि कसे पाहिजेत ते सांगितले आहे. अतिथि शब्दाचा अर्थ आहे की, " नास्ति तिथिर्यस्यासौ अतिथि" ज्याच्या येण्याची तिथि निश्चैत झालेली नसते त्याला अतिथि असे म्हणतात. धार्मिक सत्योपदेशक, सर्वांवर उपकार करण्य़ासाठी देश देशांतरी फिरणारा, पूर्ण विद्वान, परमयोगी, संन्यासी असा जो पुरुष एकाएकी गृहस्थाच्या घरीं येतो त्याला अतिथि असें म्हणतात.
अतिथीचे साहा भेद मानले आहेत. असे म्हटलें आहे कीं,
॥ ब्रम्हचारी यतिश्चेव विद्यार्थी गुरुपोषक: ॥
॥ अध्वग: क्षीणवृत्तिश्च षडेते भिक्षुक:स्मृता: ॥२०॥ अत्रिमहर्षेवचनम्‍
अर्थ:- ब्रम्हचारी ( आचार्य कुलामध्यें राहाणारा) यति ( चतुर्थाश्रमी अर्थात्‍ संन्यासी) विद्यार्थी ( अनाथ माधुकरी मागून विद्या पढणारा) गुरुपोषक [ ब्रम्हचर्यापासून युक्त होऊन गुरुकरितां अन्नादि मागणारा], अध्वग ( मार्गामध्यें चालणारा) तथा क्षीणवृत्ति [ असमर्थ अर्थात्‍ ज्याला कोणत्याही प्रकारची जीविका नाही तो; ) हे साहा प्रकारचे अतिथि म्हणन घेतात ॥२०॥
अतिथीचे सत्काराच्या विषयी धर्मशास्त्रामध्यें सांगितले आहे की,
॥ आसनावसथौ शय्यामनुव्रज्यामुसनाम्‍ ॥
॥ उत्तमेषॄत्तमं कुर्याद्धीने हीनं समे समम्‍ ॥ २१॥ मनु. अ.३ श्लो.१०७
॥ देवानृषीन्मनुष्यांश्च पितृन्‍ गृह्याश्च देवता: ॥
॥ पूजयित्वा तत: पश्चादृहस्थ: शेषभुग्भवेत्‍ ॥२२॥ मनु. अ. ३ श्लो. ११७
अर्थ:- ( एक काली बहुत अतिथि आले असतां) आसन, विश्रांतिस्थल, शय्या [ विछाना] अव्रज्या (त्याच्या मागून चालणें) आणि सेवा हे सर्व उपचार उत्तमाला उत्तम, मध्यमाला मध्यम, हीनाला हीन या रीतीनें करावें ॥२१॥
गृहस्थाश्रमी यानें देव, ऋषी, मनुष्य, पित्तर आणि गृहदेवता [ महादेवतादि], यांची पूजा करुन वैश्वदेवादिकांचे शेष अन्न आपण भक्षण करावें. अर्थात्‍ अतिथींना भोजन देऊन मग भोजन करावें ॥२२॥
जो पुरुष या सर्वांचे पूजन करीत नाही तो पापाचा भागीदार होतो श्रीकृष्ण भगवान यांनी असे म्हटले आहे, की,
॥ यजशिष्टाशिन: सन्तो, मुच्यन्ते सर्वकिल्बिषै: ॥
॥ भुज्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्‍ ॥२३॥ गी.अ.३ श्लो.१३
अर्थ:- पूर्वी सांगितलेले पांच यज्ञ करुन शेष राहिलेलें अन्न भक्षण करणारे जन सर्व पापांपासून मुक्त होतात आणि पूर्वोक्त पंच यज्ञ न करणारे केवळ आपल्याच करितां पाक करुन जेवतात ते पापी पापच खातात. ॥२३॥
याचप्रमाणें मनु महर्षींनें म्ह्टले आहे की,
॥ अघं स केवलं भुंक्ते, य: पचत्यात्मकारणात्‍ ॥
॥ यज्ञशिष्टाशनं ह्येतत्सतामन्नं विधीयते ॥२४॥ मनु. अ. ३ श्लो. ११८
अर्थ:- जो मनुष्य आपणाकरितांच पाक करुन भोजन करतो ( देव अतिथ्यादिकांला देत नाही) तो [पाप हेतुत्वास्तव] पापच केवळ भक्षण करतो, अन्न नाही; कारण, पंच यज्ञ (वैश्वदेवतादि) करुन त्यांचे अवशिष्ट राहिलेलें अन्न भक्षण करतों तें अतिथिचें, अन्न म्हटले आहे. ॥२४॥
पूर्वोक्त लिहिलेल्या प्रमाणापासून स्पष्ट आहे कीं, गृहस्थाश्रमी याल पंचयज्ञाचें अनुष्ठान प्रतिदिवशी केलें पाहिजे; कारण की हे पंचयज्ञ करणें गहस्थाश्रमींचा प्रतिदिवशीचा धार्मिक विधि आहे. जो पुरुष आपल्या धर्मविधिचा परित्याग करुन देतो; तो पुरुष महा दु:खी होऊन अनेक संकटे भोगतो. पहा दक्ष प्रजापतीनेंहि म्हटले आहे कीं, --
॥ सुखं वाच्छन्ति सर्वे तच्च धर्मसमुद्भवम्‍ ॥
॥ तस्माद्धर्म: सदा कार्य: सर्ववर्णै: प्रयत्नत: ॥२५॥ भ. द. व.
अर्थ:- ही गोष्ट निश्चित आहे की, सर्वही पुरुष सुखाची इच्छा करितात; परंतु तें सुख धर्मकर्तव्यापासूनहि होतें या करितां सर्व मनुष्यांना उचित आहे कीं, त्यांनी प्रयत्नांनी धार्मिक कार्यें करावीं ॥।२५॥
गृहस्थाश्रमांविषयी मनुमहर्षिनें असे म्हटले आहे कीं,
॥ अनेन विधिना नित्यं पंचयज्ञान्न हापयेत्‍ ॥
॥ द्वितीयमायुषो भागं कृतदारो गृहे वसेत्‍ ॥२६॥ मनु. अ. ५ श्लो. १६९
॥ सर्वमात्मनि संपश्येत्सच्चासच्च समाहित: ॥
॥ सर्वं ह्यात्मनि संपश्यन्नाधर्मे कुरुते मन: ॥२७॥ मनु. अ. १२ श्लो. ११८
॥ प्रशासितारं सर्वेषांमणीयांसमणोरपि ॥
॥ रुक्माभं स्वप्नधीगम्यं विद्यात्तं पुरुषं परम्‍ ॥२८॥ मनु. अ. १२ श्लो. १२२
॥ एतमेके वदंत्यग्रिं मनुमन्ये प्रजापतिम्‍ ॥
॥ इंद्रमेके परे प्राणमपरे ब्रम्ह शाश्वतम्‍ ॥२९॥ मनु. अ. १२ श्लो.१२३
अर्थ:- भगवद्गितादिमध्यें जो उक्तविधी तेणेंकरुन पंच महायज्ञ टाकूं नयेत ( नित्य करावे) आयुष्याच्या दुसर्‍या भागांत विवाह करुन पूर्वोक्त विधीनें गृहस्थाश्रमाला विहित धर्माचरण करावे. ॥२६॥
गृहस्थाश्रमीनें समाहित होऊन सदसद्‍रुप ( उत्पत्ति विनाशात्मक) असें सर्व जग आत्म्याचे ठायीं ब्रम्हस्वरुपानें पाहावें. आत्म्याचे ठायीं सर्व ऐक्य स्वरुपानें पाहाणाराला ( राग द्वेष नसल्यामुळे) अधर्माविषयीं मन जात नाहीं ॥२७॥
ब्रम्हपासून स्तंबपर्यंत सर्व चराचराचा शासनकर्ता अणूहूनहि अणु सुवर्णासारखा शुद्ध स्वरुप स्वप्नासारख्याधीनें [ज्ञानाने] जाणण्यास योग्य असा जो परमपुरुष [ प्ररमात्मा] त्याचें चिंतन करावे. ॥२८॥
ह्या अद्वैत परमात्म्यास कोणी अग्नि कोणी मनु. कोणी प्रजापति कोणी इंद्र, कोणी प्राण, कोणी शाश्वत ब्रम्ह अशी आपापल्या बुद्धीनें निरनिराळी नामें देऊन त्याची उपासना करितात ॥२९॥
उपासना करुन मळादि दोषनिवृत्ति झालेल्यांचें फळ पुढील श्लोकांत सांगतात.
॥ यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ॥
॥ तस्याहं न प्रणशामि स च मे न प्रणश्यति ॥३०॥ भग.अ. ६ श्लो. ३०
॥ एवं य: सर्वभूतेषु पश्यत्यात्मानमात्मना ॥
॥ स सर्वसमतामेत्य ब्रम्हाभ्येति परं पदम्‍ ॥३१॥ मनु. अ. १२ श्लो. १२५
॥ एवं गृहाश्रमे स्थित्वा विधिवत्‍ स्नातको द्विज: ॥
॥ वने वसेत्तु नियतो यथावद्विजितेंद्रिय: ॥३२॥ मनु. अ. ६ श्लो. १
अर्थ:- हे अर्जुन जो मला प्राणिमात्रामध्ये पाहातो आणि सर्व प्राणि मात्र माझ्यामध्यें पाहातो त्या योग्याला मी एक क्षणहि अद्दश होत नाही आणि तो मजपासून अद्दश न रहातो अर्थात्‍ मी त्याला अपरोक्ष होऊन दर्शन देतों ॥३१॥
या रीतीनें जो मनुष्य सर्व भूतांचे ठायी असणार्‍या आत्म्याला आत्मत्वें करुन पाहातो तो सर्व समता म्हणजे व्यापकत्व ( ब्रम्हसाक्षात्कार) पावून उत्कृष्ट अशा ब्रम्हपदाप्रत पावतो ॥३१॥
स्नातक ( समावर्तन झालेल्या द्विजानें ब्राम्हण क्षत्रिय वैश्यांनी पूर्वोक्त प्रकारांनी यथा शास्त्र गृहाश्रमामध्यें राहून म्हणजे गृहस्थाश्रमधर्म आचरण करुन विजितेंद्रिय होऊन ( विषयादिकांच्या ) वासनाक्षीण करुन नियम धारण करुन अरण्यांत वास करणें म्हणजे वानप्रस्थाश्रम धर्माचरण करावें ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP