आश्विन वद्य ७

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


भारताच्या स्वातंत्र्याची प्रभात !

शके १८६५ च्या आश्विन व. ७ रोजीं स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथें स्वतंत्र हिंदुस्थानचें सरकार स्थापन करुन भारत स्वतंत्र झाल्याची जाहीर घोषणा केली ! सुभाषबाबूंच्या अद्‍भुतरम्य जीवनांतील हा दिवस सुवर्णाक्षरांनीं लिहिण्यासारखा आहे ५ जुलै १९४३ रोजीं आझाद हिंद सेनेची स्थापना झाल्यावर सुभाषचंद्रांनीं ‘चलो दिल्ली’ असा आदेश आपल्या सैनिकांना दिला. २५ आँगस्टला त्यांनी या सेनेचें नेतृत्व स्वीकारलें आणि २१ आँक्टोबरला (आश्विन व. ७ ला) स्वतंत्र सरकारची स्थापना करुन या स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळानें ब्रिटन-अमेरिकेविरुद्ध युद्धहि पुकारलें. सर्वच घटना अत्यंत रोमहर्षक अशा होत्या. भारताच्या स्वतंत्र सरकारची स्थापना ज्या दिवशी झाली तो दिवस अत्यंत हर्षदायक असाच होता. उच्चासनावर सुभाषबाबू व त्यांचे सेनानी व मंत्रिमंडळ होतें, .... राष्ट्रीय निशाण आकाशांत डौलानें फडकत होतें, सरसेनापतींच्या वेषांत सुभाषबाबूंनी चतुरंग सेनादलाची सलामी घेतली. स्वातंत्र्याचा जयजयकार झाला आणि सुभाषबाबूंनी खड्या आवाजांत स्वातंत्र्याचा जाहीरनामा वाचला ! याच्या अगोदर शपथविधीचा कार्यक्रम झाला. सुभाषचंद्र शपथेचा कागद हातीं घेऊन म्हणाले, "हिंदुस्थान आणि अडतीस कोटी हिंदी प्रजा यांस स्वतंत्र करण्याकरितां मी हें स्वातंत्र्ययुद्ध माझ्या आयुष्याचा अखेरपर्यंत चालू ठेवीन. मी सदासर्वकाळ भारतभूमीचा सेवक राहून अडतीस कोटी बंधुभगिनींचे हित साधनें हेंच मी माझें कर्तव्य समजेन." या स्वतंत्र भारतास मान्यता देण्यास पूर्वेकडेल सर्व राष्ट्रे तयार झालींच. परंतु ८ नोव्हेंबरला आयर्लंडचे अध्यक्ष डी. व्हँलेरा यांनी संदेश पाठवून जे अभिनंदन केले ते अत्यंत महत्त्वाचें आहे. त्यांत ते म्हणतात, "हिंदी स्वतंत्र सरकार स्थापिलेंत याबद्दल अत्यानंद वाढला. अभिनंदन. या दिनानिमित्त आम्हांला आमच्या स्वतंत्र सरकाराच्या स्थापनेची आठवण झाली. तुम्ही आज ज्या आणीबाणीच्या परिस्थितींत आहांत त्याच परिस्थितींत त्या वेळीं आम्हीं होतों. मी तुम्हांस सुयश चिंतितों -"

- २१ आँक्टोबर १९४३

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP