आश्विन शुद्ध ५

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) खंडो बल्लाळ चिटणिसांचे निधन !

शके १६४८ च्या आश्विन शु. ५ ला स्वामिनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस यांचें निधन झालें. खंडो बल्लाळ हा बाळाजी आवजीचा वडील मुलगा. संभाजी गादीवर येतांच त्यानें बाळाजी आवजीस हत्तीच्या पायीं दिलें आणि खंडो व निळो या बंधूंना वाघाच्या तोंडीं देण्याचे ठरविलें. पण येसूबाईच्या दूरदृष्टीमुळें हा विपरीत प्रसंग झाला नाहीं. खंडो बल्लाळ लेखणीबरोबर तलवारहि चालवीत असे. हा मोठा स्वामिभक्त होता. एकदां राजपत्नी येसूबाई मोंगलाच्या हातांत सांपडण्याचा प्रसंग आला असता याने आपली मावसबहिण संतूबाई हिला येसूबाईऐवजी पालखींत बसवून मोंगलांच्या छाप्यांतून निसटण्याचा प्रयत्न केला. संतूबाईस येसूबाई समजूण मोंगल घेऊन गेलेच. पुढें संतूबाईनें हिरकणी खाऊन प्राण दिला. राजारामाबरोबर प्रल्हाद निराजी, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, आदि निवडक मंडळी असून ते सर्व जिंजीकडे निघाले होते. त्यांत खंडो बल्लाळ प्रमुख होता. सर्वांनी लिंगायत यात्रेकरुंचा वेष घेतला होता. मुसलमान अधिकार्‍यांना त्यांचा संशय आल्याचें समजल्याबरोबर खंडो बल्लाळानें सर्वांना मोठ्या शिताफीनें दूर पाठवून दिलें आणि आपण स्वत: संकटास तोंड देण्यास राहिला. त्याला पकडून मोंगलांनी चांगलाच मार दिला. चारपांच दिवस अन्नपाण्यावांचून अंधारकोठडींत ठेवून दिलें. शेवटीं राखेचे तोबरेसुद्धां दिले. तरी पण स्वामिभक्त खंडो बल्लाळ म्हणे, ‘आम्ही जंगम कापडी आहोंत’ नंतर त्याची सुटका झाली. एकदां मुसलमानांच्या कैदेतून गुप्तपणें निसटतांना त्याला तटावरुन उडी टाकण्याचा प्रसंग आला. त्यांत त्याचा पाय दुखावून तो कायमचा लंगडा झाला. शाहूला एका जिवावरच्या संकटांतून खंडो बल्लाळानेंच वांचविलें. शेवटीं याचें वतन आंग्र्याच्या ताब्यांत गेल्यामुळें या स्वामिनिष्ठ, मानी, पण कर्तबगार पुरुषास शेवटचे दिवस हालांत काढावे लागले.
- १९ सप्टेंबर १७२६
------------------------

आश्विन शु. ५

(२) प्रतापसिंह भोंसले यांचे निधन !

शके १७६९ च्या आश्विन शु. ५ रोजीं सातारचे छत्रपति श्रीमंत प्रतापसिंह भोंसले यांचा अत्यंत हालअपेष्टांत मृत्य़ु झाला. प्रतापसिंह हे सातारच्या छत्रपति घराण्यांतील धाकट्या शाहूचे वडील पुत्र, पेशव्यांच्या ताब्यांतून सुटण्यासाठीं त्यांनी व त्यांच्या मातोश्रीनें इंग्रजांची मदत मागितली आणि मदत देण्याचें एल्फिन्टनने आनंदानें कबूल केलें. या वेळीं इंग्रज व पेशवे यांची लढाई चालू होती.बापू गोखल्याचा पाडाव झाला. संकेतानुसार प्रतापसिंह लष्कराच्या मागें उगाच राहिले होते, त्याना स्मिथनें ताब्यांत घेऊन त्यांची रवानगी एल्फिन्स्टनकडे केली. तत्पूर्वीच सातारा इंग्रजांविरुद्ध खटपट सुरु केली आणि बेबनाव होऊन छत्रपतींना पदच्युत व्हावें लागलें. त्यांच्यावर बंडाचा आरोप ठेवून त्यांना कराचीस ठेवण्यांत आलें. राज्य परत मिळविण्यासाठीं विलायतेंत माणसें पाठवून त्यांनीं खूप प्रयत्न केला. पण त्यांना यश न येऊन त्यांचें दु:खद परिस्थितींत निधन झालें. प्रतापसिंह सत्याचे मोठे पुरस्कर्ते असून स्वभावानें करारी आणि निश्वयी होते. पदच्युत करणार्‍या कारन्याकला यांनीं तोंडावर जबाब दिला, "राज्य जाईल अशी धमकी देता कशाला ? मीं कधींच राज्याची हांव धरलेली नाहीं. उघड चौकशीशिवाय केलेले आरोप मुकाट्यानें मान्य करुन राज्यावर राहण्याची माझी इच्छा नाहीं. लक्षांत ठेवा, प्रतापसिंहाची मान रेसभरसुद्धा वांकणार नाहीं. फायद्याचा किंवा स्वार्थाचा लोभ धरुन मी आपलें चारित्र्य कलंकित करुन घेणारा नव्हें. तुमच्या चिठोर्‍यावर मी नाहीं सही करीत जा." परंतु दुर्दैव हें कीं, हा बाणेदार राजा इंग्रजांच्या कपटनीतीला बळी पडला. याच प्रतापसिंहानीं सन १८२२ मध्यें सातारला नवीन राजवाडा-जलमंदिर राजवाडा बांधला; आणि यवतेश्वराहून सातारा शहरांत पाणी खेळविलें.
- १४ आँक्टोबर १८४७
-----------------------

आश्विन शु. ५

(३) दादोबा पांडुरंगांचें निधन !

शके १८०४ च्या आश्विन शु. ५ रोजीं मराठी भाषेचे व्याकरणकार, कवि, ग्रंथलेखक व विख्यात समाजसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन झालें ! दादोबांचा जन्म शके १७३६ च्या वैशाख वद्य ४ रोजीं मुंबईजवळील खेतवाडींत झाला. यांचे मूळचें घराणें वसईजवळील तर्खडचें. पांडुरंगराव भाविक वारकरी असल्यामुळे दादोंबास बालपणापासूनच मराठी काव्याची गोडी लागली. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेंत शिक्षण पूर्ण झाल्यावर यांनीं जावरा संस्थानचे नबाब यांचे येथें व एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट येथें शिक्षकाचें काम केलें. त्यानंतर हे डेप्युटी कलेक्टर झाले. सन १८५७ सालीं झालेलें भिल्लांचे बंड यांनी मोडलें म्हणून सरकारनें यांना रावबहादुर ही पदवी दिली. पुढें एज्युकेशनल ट्रान्सेलटरच्या जागेवर काम करुन कांही दिवस बडोदें संस्थानच्या दिवाणाच्या मदतनिसाचें कामहि यांने केलें. यांची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे यांनी मराठी भाषेला पद्धतशीर असा व्याकरणग्रंथ निर्माण करुन दिला. मराठी भाषा सहासात शतकांपासून चांगलीच जोपासली गेली होती; पण त्या भाषेला व्याकरण लाभले नव्हतें ! महानुभावीय वाड्मयांत कांहीं तुरळक प्रयत्न झाले होते, परंतु त्याचा प्रसार मात्र सर्वत्र होणें शक्य नव्हतें. इंग्रज लोकांचा परिचय आपणांस झाल्यानंतर मिशनरी लोकांनीं कांही संवादात्मक व्याकरणाचे विभाग तयार केले होते, पण ही सारी तुटपुंजी व्यवस्था होती. व्यवस्थित असें व्याकरण दादोबांनीच मराठी भाषेला दिलें. याशिवाय ‘केकावली’ या अप्रतिम स्तोत्रकाव्यावर स्वत:च्या आईवडिलांच्या नांवानें यांनीं केलेली ‘यशोदा-पांडुरंगी’ ही अत्यंत रसाळ गद्यटीका प्रसिद्ध आहे. दादोबांनीं लिहिलेलें ‘आत्मचरित्र’ आणि त्यांचें समग्र चरित्र श्री. प्रियोळकर यांनी संपादित केलें आहे. ‘पारमहंसिक ब्रह्मधर्म’, ‘शिशुबोध’, ‘धर्मविवेचन’, इत्यादि ग्रंथ दादोबाच्या धर्मसुधारणेच्या कळकळीची साक्ष देतात. असा हा श्रेष्ठ समाजसुधारक, आणि मराठी भाषेचा त्राता आश्विन शु. ५ रोजीं सकाळी साडेआठ वाजतां परब्रह्मांत विलीन झाला !
- १७ आँक्टोबर १८८२

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP