आश्विन वद्य २

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


आदिलशाहीची समाप्ति !

शके १६०८ च्या आश्विनव. २ रोजीं विजापूरची आदिलशाही समाप्त झाली. तुर्कस्तानांतील एका सुलतानाचा पुत्र अबुल मुज्फर युसूफ आदिलशहा यानें सन १४८९ सालीं विजापूरला आदिलशाहीची स्थापना केली. याची पत्नी बुबूजीखान मराठा सरदाराची मुलगी होती. ही जात्याच फार शूर आणि मुत्सद्दी होती. आदिलशाहींत इस्माइल, इब्राहिम, महंमदअली  आदि पातशहा होऊन गेले. यांच्या कारकिर्दीत विजापूरचे वैभव वाढून शाही अत्यंत संपन्न झाली होती. महंमद आदिलशहाच्या वेळेला मराठ्यांच्या अंगांत स्वातंत्र्याचें वारें खेळूं लागलें होतें. बंकापूर येथील कदमराव राजा बंडखोर ठरुन शहाकडून मारला गेला. मुराररावानें मोठ्या पराक्रमानें मोंगलांपासून विजापूरचें संरक्षण केलें. याच वेळी परिंड्याच्या किल्ल्यावरील अजस्त्र तोफ मुल्क - इ - मैदान (रणभूमीचा राजा ) हिला मुराररावानें विजापुरास आणलें. दुसरा आदिलसहा अली हा १६५६ मध्यें गादीवर आला. त्या वेळीं औरंगजेब दक्षिणेंत आला होता. याचे वेळीं राजे शिवाजी भोसले हेहि विजापूरचे ‘शत्रु’ म्हणून उदयास आले होते. अफजलखान, सिद्दी जोहार आणि स्वत: आदिलशहा यांनीं शिवाजीचा नायनाट करण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण हा ‘डोंगरी राजा’ त्यांच्या हातीं लागला नाहीं. १६८६ मध्यें औरंगजेबानें शेवटचा आदिलशहा यास विषप्रयोग करुन ठार मारिलें आणि पातशाही आपल्या पदरीं आणली, असें सांगतात कीं, आदीलशहाला "एवढे अफाट, श्रीमान्‍, बलाढ्य, मजबूत व शोभिवंअ राज गमावून पदरी असलेलें द्रव्य व जडजवाहीर खंदकांत ओतीत व दानधर्म करीत औरंगजेबाच्या तंबूंत जावें लागलें -*" आदिलशहाचें संगोपन अनेक मराठे सरदारांकडूनच झालेलें होतें. या कारकीर्दीत अनेक नामांकित इमारती व मशिदी बांधल्या गेल्या. सोलापूर, परिंडा, मिरज, इत्यादि भक्कम किल्ले बांधण्यांत आले. घाटगे, निंबाळकर, डफळे, माने, सावंत, भोसले, आदि नामांकित मराठे वीर याच काळांत उदयास आले.

- २३ सप्टेंबर १६८६.

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP