आश्विन शुद्ध १०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) विजयादशमीचें रहस्य !

आश्विन शु. १० हा दिवस सर्व भारतांत ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. भारतीयांच्या मूर्तिमंत पराक्रमाचा इतिहासच ‘विजयादशमी’ त दिसून येतो. हिंदु समाजांतील चारहि वर्णांच्या दृष्टीनें या दिवसाला महत्त्व आहे. विद्येची आराधना आणि जोपासना करणारा ब्राह्मण-वर्ग याच दिवशीं सरस्वतीची पूजा करुन ज्ञानाचे पाठ घेत असतो. आपल्या अद्वितीय बाहुबलानें पराक्रम करणारे क्षत्रिय वीर विजयादशमीलाच आपल्या शस्त्रास्त्रांचे पूजन करुन देशरक्षणासाठीं, शत्रूंचा नि:पात करण्यासाठीं सीमोल्लंघन करीत असतात. नवीन धन निर्माण करणें हें ज्या वैश्यांचे कार्य त्यांच्याकडून याच वेळीं शेतांतून नवीन नवीन धान्यें निर्माण झालेलीं असल्यामुळें सृष्टीस ‘सुजला सुफला’ असें स्वरुप प्राप्त झालेलें असतें. शत्रुपक्षाचा पराभव करुन आणलेली धनदौलत स्वकीयांना या दिवशी वांटण्याची प्रथा आहे. याचा उगम रामायणाच्या पांचव्या सर्गात सांपडतो. आपल्या गुरुस चौदा कोटी सुवर्ण-मुद्रांची दक्षिणा देतां यावी म्हणून कौत्स नांवाचा ब्राह्मण-पुत्र रघुराजाकडे आला. त्याच वेळीं रघुराजानें नुकताच विश्वजित्‍ यज्ञ केलेला असल्यामुळें तो दरिद्री झाला होता. पण आलेल्या याचकास विन्मुख न पाठवितां रघूनें कुबेरावर स्वारी करुन त्याच्याकडे सुवर्ण-मुद्रांची मागणी केली. बिचार्‍या कुबेरानें भयभीत होऊण अयोध्या नगराबाहेर एका शमीच्या वृक्षावर सुवर्णवृष्टि केली. त्यांतील चौदा कोटी सुवर्णमुद्रा कौत्सास मिळाल्या. उरलेलें सुवर्ण रघुराजानें नागरिकांना वांटून टाकिलें. हा दिवस सुद्धां आश्विन शु. १० हाच होता. या वेळपासून सोनें लुटण्याची प्रथा रुढ झाली असावी. असें सांगतात कीं,याच दिवशीं प्रभु रामचंद्रांनीं रावणाचा नाश करण्यासाठीं लंकेवर स्वारी केली. अशा प्रकारें हा दिवस पराक्रमाचा, विद्यार्जनाचा, म्हणून भारती यांना अत्यंत उत्साहदायक वाटतो. तीनचार महिने पावसाळ्यांत विश्रांति घेतल्यानंतर मराठ्यांच्या फौजा याच दिवशीं शत्रूचा पराभव करण्यासाठीं ‘सीमोल्लंघन’ करीत असत.
-----------------

आश्विन शु. १०

(२) भगवान्‍ गौतम बुद्धांचा जन्म !

आश्विन शु. १० या दिवशीं भारतीयांनी मानिलेला नववा अवतार भगवान्‍ बुद्धदेव यांचा जन्म झाला. कपिलवस्तु येथील राजा शुद्धोधन यांचा पुत्र म्हणजे भगवान्‍ शुद्धोदनाच्या दुसर्‍या राणीनें - महाप्रजावतीनें बुद्धाचें पालनपोषन केलें. याला सिद्धार्थ अथवा गौतम असेंहि म्हणत. लहानपणापासूनच याच्या अंगी विरक्ति बाणलेली होती; विद्याभ्यासाबरोबर तिची वाढच झाली. तेव्हां गौतमाला संसारांत जखडण्यासाठीं यशोधरा ऊर्फ गोपा नांवाच्या राजकुमारीशीं त्याचा विवाह करण्यांत आला. आपल्या मुलासाठीं शुद्धोदनानें ऐषआराम आणि सुखविलास यांनी समृद्ध असा राजवाडा निर्माण केला. परंतु गौतमाचा अवतार काय यासाठींच होता ! त्यांचें मन या सुखोपभोगांत कधींच रमलें नाहीं. एके दिवशीं गौतमानें एक रोगी पाहिला, दुसर्‍या दिवशीं एक वृद्ध पाहिला, तिसर्‍या दिवशीं त्यानें एक प्रेत पाहिलें. लागलीच त्याला उपरति झाली. सर्व जग दु:खमय असून क्षणिक आहे, असा विश्वास त्यास वाटूं लागला; आणि मनास खरी शांति लाभावी म्हणून सिद्धि साधण्यासाठीं त्यानें सर्वसंगपरित्याग केला, आणि तो संन्यासवृत्ति धारण करुन निरंजना नदीकाठी तपस्या करुं लागला. एके दिवशी नदीच्या पलीकडे त्याला एक अश्वत्थ वृक्ष दिसला. याच वृक्षाखालीं त्यानें तपश्चर्येस पुन्हा सुरवात केल्यावर एके दिवशीं त्याला बोधप्राप्ति झाली. तो स्वत: मुक्त झाला. आतां इतरांच्या मुक्तीसंबंधी त्याला काळजी वाटूं लागली. गौतम बुद्धानें आपल्या अभिनव तत्त्वजानाच्या प्रसारास सुरवात करुन क्रांतिकारक विचारांना चालना दिली. धर्माची आणि मानवतेची अधिक व्यापक कल्पना भारतांत अभिनव पद्धतीनें गौतम बुद्धानें सुरु केली. हिंसामय कर्मकांडांत मग्न झालेल्या भारतीयांना अहिंसेचा दिव्य मंत्र बुद्धानें दिला. गौतम बुद्ध हा सर्व जगांतील धर्मसंस्थापकांत प्रथम श्रेणींतील धर्मसंस्थापक होऊन गेला.
--------------------

आ. शु. १०

(३) रा. स्व. संघाचा जन्म !

शके १८४७ च्या आश्विन शु. १० या दिवशीं नागपूर येथील मोहित्यांच्या वाड्यांत, भारतांत विख्यात असलेल्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या संघटनेचा जन्म झाला. विजयादशमीला सीमोल्लंघन करावयाचें असतें. आत्मविस्मृतीच्या सीमा ओलांडून स्वाभिमानाकडे मोहरा बळकावयाचा असतो. या दृष्टीनें शके १८४७ मधील आश्विन शु. १० हा दिवस भारतीयांच्या इतिहासांत अनेक दृष्टींनीं महत्त्वाचा आहे. या दिवशी नागपूर येथें डाँ. हेडगेवार यांनीं ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या संघटनेची स्थापना केली. भ्रांत मार्गावर असणार्‍या हिंदु समाजाला संजीवनी देण्यासाठीं काय करावें याचा विचार डाँक्टर अनेक दिवस करीत होते. शेवटीं एका विचारानें, एका ध्येयानें, एका मनानें, सर्व हिंदु समाज संघटित झाल्याशिवाय तरणोपाय नाहीं असें निश्चित वाटल्यावर डाँक्टरांनीं मोठ्या धडाडीनें कार्यास आरंभ केला. पैसा गोळा करण्याअगोदर त्यांनी माणसांचीं मोठ्या धडाडीनें कार्यास आरंभ केला. पैसा गोळा करण्याअगोदर त्यांनी माणसांची मनें गोळा केलीं. पहिल्या दिवशीं मोहित्यांच्या पडक्या वाड्यांत अवघे पांचच स्वयंसेवक उपस्थित होते. परंतु थोड्याच अवधींत या मोहरीएवढ्या बीजाचा मोठा वटवृक्ष निर्माण झाला. लक्षावधि तरुण या पवित्र कार्यात आपण होऊन सामील झाले. त्याग, शिस्त, चारित्र्य यांचे धडे तरुणांना याच संघटनेंत मिळूं लागले. अनेक प्रकारच्या संकटांतून संघानें मार्ग काढिला. "राष्ट्राचें खरें चैतन्य व बल ध्येयनिष्ठ तरुणांच्या प्रभावी संघटनेंत असतें हें त्रिकालाबाधित सत्य डाँक्टरांनीं पुन्हा एकदां प्रत्ययास आणून दिलें. हिंदु समाजांतील सर्व अव्यक्त व निद्रित शक्तींना व्यक्त व जागृत करण्याची महनीय कामगिरी त्यांनीं पार पाडली. " या विख्यात संघटनेच्या शाखा भराभर सार्‍या भारतांत निघाल्या. कानाकोपर्‍यांतून संघाचें नांव दुमदुमुं लागलें. प्रसिद्धीची विशेष चाड न धरितां पंचवीस वर्षांच्या अवधींत संघानें मोठीच कामगिरी केली. म. गांधींच्या भीषण हत्येनंतर कांहीं काळ संघाला वनवास भोगावा लागला होता; परंतु लवकरच संघाचें कार्य पुन्हा पहिल्याच जोमानें सुरु झालें.

- २७ सप्टेंबर १९२५

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP