साकी सर्ग स्थिति लय कारण जगता अनाथ ज्याची शक्ती ।
भक्ति नितिच्या आभरणें जो देई सुजना मूक्ति ॥
कलिमल नाशुनियां । देओ भक्तां निजठाया ॥१॥

संध्याकाळचा समय, शांत, किरण, तमोहरण भास्कर, नभोभाग उतरत उतरत प्राग्वधूला चुंबन देण्यास सरसावलेला आहे, संध्यारागानें विभुषित झालेली पश्चिम दिशा कनक प्राशन केलेल्या रसपतीप्रमाणें पिंगटवर्णीय भासत आहे, सरस्वतीच्या निर्मल सलिलांत सहस्त्रकिरणाचे कण खेळत आहेत, मंदपवन, मनशांत, तिला आंदोलन देत आहे, अशा वेळी सरस्वतीच्या पूर्वभागावर, प्रचंड ऋषींचा अपूर्व समुदाय एकत्र झालेला दिसूं लागला; उदयाचलावर आरुढ झालेल्या दिनकराप्रमाणें व्यासपीठावर सारस्वतमुनि शोभूं लागला; दिव्य ऋषींच्या मुखचंद्रास पहात पहात सारस्वतमुनीच्या वक्तृत्वसागरास भरती होऊं लागली, तेव्हां --
सन्मान्य मुनिजन हो ! आपल्या आकांक्षेप्रमाणें आर्यधर्म म्हणजे काय, हे मी अल्प अधिकारे असून, स्वल्पच शब्दव्याख्येनें सांगणार आहें; धर्म हा शब्द धृ म्हणजे धारण करणें या धातूपासून उत्पन्न झालेला आहे. सर्व प्रजा धर्मानें बद्ध झालेली आहे, हें प्रबुद्ध शास्त्रवेत्यांचे शुद्ध मत आहे; आणि मीमांसाशास्त्राच्या मतानें "चोदनालक्षणोऽर्था धर्म:" असें जैमिनी महामुनीचें मत आहे. चोदना म्हणजे प्रेरणा, अर्थात्‍, अर्थात्‍ कोणातरी अधिकारी पुरुषाची आज्ञा, हिलाच धर्म ही संज्ञा आहे; धर्म ही संसारसागरांतील महान नौका आहे; आकाशांतील ग्रहमालेला जसें आकर्षण बंधन आहे, तसेंच मानव जातीला धर्म हें एक बंधन आहे, ऋग्वेदांत "सुप्रिणितिश्चिकितुषो न शासु:" म्हणजे विद्वान्‍ चिकित्सक्‍ यांच्या शासनाप्रमाणें प्रियकर अशा अर्थाच्या ऋचा आहेत, अर्थात्‍ धर्माचें शासन हें लोकांस भारी हितकर आहे; ....  आतां कांही स्मृतिकारांच्या मताप्रमाणें, धर्माधर्माची व्याख्या, धर्मशास्त्राबरोबर प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्या विचारानें सारासार पाहून केली पाहिजे. "प्रत्यक्षचानुमानंच शास्त्रंच विविधागमम्‍ ! त्रयं सुविदितं कार्यं धर्मशुद्धि ममिप्सता"..... तसेंच धर्मशास्त्राचा,विचारपूर्वक अर्थनिर्णय करण्याविषयीं वेदवेत्या भारीच तत्परता दाखविलेली आहे. " तदेव वेदवादीना विचार पूर्वकेऽर्थ निर्णये तात्पर्यातिशय दर्शसर्वोपि वेदार्थे विचारनिर्णयेत व्यइत्यवगम्यते" अर्थात्‍ सद्‍सद्विवेक बुद्धीस अनुसरुन " सर्वभूत हितेरत: " ज्यांत सर्व लोकांचें कल्याण आहे तोच आर्यधर्म म्हणजे श्रेष्ठ धर्म होय ... (टाळ्या). मत्पूज्य सभाजनहो ! आर्यधर्माची संपूर्ण व्याख्या वर्णन करण्यास, बराच वेळ थोडाच होणार आहे, तर स्वल्पांतच धर्माचीं लक्षणें आणि अंगें सांगून आपला निरोप घेतों.

धृति क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रिय निग्रह: ।
धीर्विध्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम्‍ ॥

या प्रकारची महान्‍ धर्माचीं मुख्य दहा लक्षणें आहेत, तसेंच

अहिंसा सत्यमस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रह: ।
एतं सामासिकं धर्म प्राहु: ....... मनुस्मृति.

अशी धम्राची पंचागें आहेत. मानसिक धैर्य, क्षमा, इंद्रियदमन, अचौर्य,शुचिर्भूतत्व, शुद्धबुद्धि, अध्ययन, सत्य, अक्रोध, यावर सर्व आर्यधर्माचा पाया आहे, तात्पर्य, ऐहिक आणि पारमार्थिक अभ्युदय करणारा, ज्याच्या योगानें संसारांत सुखाचा उपभोग मिळून मरणोत्तर स्वर्गसुखाची प्राप्ति करुन देणारा, हा आर्यधर्म होय. " इहलोके सुखं भुक्त्वाचान्तेसत्यपुरं व्रजेत्‍ ..... सारस्वत मुनीच्या मुखांतून निघत असलेला वाग्विहार म्हणजे अमृतमेघाची धार, कीं भोगावतीचा शीतल तुषार अथवा वेदरत्नाकरांतील शब्दमौक्तिकांचे हार यांचीहि उपमा निरुपमाच होणार आहे. तेव्हा ----

साकी

सज्जन मुनिंची सभा भासली निश्चल चित्रासम ती ॥
वचनसुधा प्राशाया मिळले प्रेक्षकगण नच गणती ॥
सुरवर तै गगनीं । करिती दाटी नभयानीं ॥१॥

इतक्यांत --

साकी

विद्युल्लेखेसम तैं प्रगटे मूर्तिमंत वाग्देवी ।
मुनिजन नयनज्योति भ्रमवी विश्वताप जे शमवी ॥
पदरज वंदाया । सुरमुनि इच्छिति शुभ समया ॥१॥

तेव्हां, सरस्वतीतीरावर आनंदाचें नंदनवन भासूं लागलें, पशुपक्षी यांचें प्रदर्शनच भरलें, मच्छकच्छ विहरुं लागले, लतावल्लरी कुसुमगंध पसरुं लागल्या, सुफलान्वित वृक्ष फळाहार अर्पू लागले, कोकिळा पंचम स्वरांत मंजूळ गायन करुं लागल्या, मूर्तिमंत वेदं स्तवनगुंग झाले, दाहीदिशा नादब्रह्ममय भासूं लागल्या, त्यावेळीं ---

पद (चाल-देवस्त्री मेनका०)

श्रीजगदंबा विश्वकदंबा सारस्वत जननी ।
प्रसन्नवदना तोषित सुमना सुरवर मुनि नमनीं ॥
वरदहस्त शुभकारक सादर सत्वर वर करुनी ।
पवन सुधाकर वसुधामरपद वंदित मृदु वचना ॥१॥

मत्प्रिय मुनिजन हो !

सरस्वती जल नदीतटाकीं तपती मद्भजनीं ।
प्रसन्न त्यांना सदा असें मी तत्पर वरदानी ॥
धर्मनीति बल पुण्यप्रभावें मान्य सदा सुजनीं ।
सारस्वत श्रुतिमार्ग प्रकाशक पावन अभिधानी ॥२॥

यांत --

आर्या (गीति)

अमर कुसुम घन वर्षति झाली सारस्वती सुमनवृष्टी ।
सज्ञान पर्वणी ते दिसली आनंदमग्निका सृष्टि ॥१॥

ॐ तत्सत्

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP