अर्पणपत्रिका

आर्या (गीति)

मत्पूज्यप्रिय जननी सरस्वतीपादपंकजी नमन ।
करुनी सद्भावानें अर्पितसे काव्यरुप हे सुमन ॥

श्रीमत्
सारस्वत चम्पू:

सर्ग १

सरस्वतीवाससमा: कुतो रति: । सरस्वतीवाससमा: कुतो गुणा: ॥
सरस्वती प्राप्य दिवंगता जना: । सदा स्मरिष्यन्ति नदीं सरस्वतीं ॥१॥
सरस्वती सर्व नदीषु पुण्या । सरस्वती लोसशुभावहा सदा ॥
सरस्वती प्राप्य जना: सुदुष्कृतं । सदा न शोचन्ति परत्र चेहच ॥२॥
                            (महाभारत, शल्यपर्व, अ.५४)
वत्सा ! या सरस्वतीवर वास करीत असता, या स्थानाविषयीं मनांत जसें प्रेम उत्पन्न होतें, तसें तें इतरत्र कोठून होणार ? सरस्वतीवासांत जे गुण आहेत, ते इतरत्र कोठून आढळणार ? फार काय सांगूं, सरस्वतीवर ज्यांना एकदां राहावयास सांपडले आहे, ते लोक स्वर्गात गेले तरी त्यांस एकसारखे सरस्वती नदीचें स्मरण झाल्याविना राहणार नाहीं. सरस्वती ही सर्व नद्यांत पुण्यकारक आहे, ती सदोदित लोकांचे कल्याण करीत असते. सरस्वतीची प्राप्ति झाल्यानंतर, लोकांस इहलोकीं अथवा परलोकीं, आपल्या अत्यंत भयंकर अशाहि पातकांबद्दल शोक करण्याचा प्रसंग येत नाही; ते सर्व येथेंच भस्म होतें.  गुरुमहाराज ! आपल्या आश्रमानें इला बरेंच महत्व आलें आहे असें म्हणतात; आपलें हें गुरुकुल, मूर्तिमंत वेदांचें निवासस्थानच होऊन राहिलेलें आहे; पवित्र स्थान आणि एकांतवास,  ही जोडी भारीच दुर्मिळ असते; पण एक विचारतों. या सरस्वतीला पुण्यस्थान म्हणण्याचें कारण काय ?
कौडिण्य ! वत्साला अद्याप या नदीचें माहात्म्यच कळलें नाहीं.  गुरुमहाराज ! या सरस्वतीचे आदिवृत्त कथन करण्याचा अनुग्रह व्हावा.
बाळांनो ! फार उत्तम; तुमची जिज्ञासा पूर्ण करण्यास मला भारीच आनंद वाटत असतो. ऐका. एके समयीं -

पद (चाल - देवस्त्री मेनका अप्सरा०)

जगन्नियंता चतुर्वेदमुख ब्रह्मदेव धाता ।
सर्वकामसमृद्ध सुरंजित यज्ञ महा करितां ।
सुरवर मुनिजन उद्‍भुत झाले शुभकारक जगता ।
या अवनीवरि पुष्कर क्षेत्रा नच समता ।
वेदघोष किति प्रचंड चाले ओघ नभावरता ।
गंधर्वासह करिति अप्सरा नृत्यगान ललिता ॥१॥

काय, गुरुमहाराज ! या स्थानाला आधीं पुष्कर क्षेत्र असें म्हणत असत ? हो स्वस्थ ऐका. यज्ञ चालू आहे; तेव्हां सर्व ऋषींनी ब्रह्मदेवाला प्रश्न केला:- पितामह ! स्वर्गवासी सर्व देवता येथें आहेत. आपण सर्व येथें तन्मय आहोत, परंतु येथे आनंद उल्हास म्हणण्यासारखा प्रसन्न दिसत नाहीं, याचें कारण काय ? गुरुमहाराज ! स्वर्गस्थ इंद्रादि देव, बृहस्पति प्रमुख ऋषिवर जेथें उपस्थित आहेत, ब्रह्मदेव जेथें यज्ञकर्ता, तेथें आनंद, उत्साह नाहीं असें कसे होईल ? वत्स ! प्रश्न खरा आहे. ब्रह्मदेवालाहि या ऋषींच्या प्रश्नाचा विस्मय वाटला, आणि म्हणाला, ऋषीहो ! हा यज्ञ बहुगुण आहे, सामान्य नाहीं, तेव्हां येथें कसची उणीव भासत आहे तें सांगा. तेव्हां ऋषि म्हणाले:-

अंजनीगीत

सर्व जगाला प्रमोददाती । जिचिया वचनें रंजति गिष्पति ।
आनंदाची मूर्तिमती ती । सरस्वती नाहा ॥१॥
ज्ञानजलाची निर्मल सरिता । आनंदामृत विश्वंभरिता ।
वाग्देवीविण विश्व, विधाता ! शून्य सकल गमतें ॥२॥

मग ? बाळांनो इतक्यांत असा चमत्कार झाला:-

साकी

मूर्तिमंत ते वेद करिति ते सरस्वतीच्या स्तवना ।
तन्मय झाले मुनिजन सारे ब्रह्मा तोषवि सुमना ॥
वाग्देवी प्रगटे । अवनी आनंदे लोटे ॥१॥

गुरुमहाराज ! वेदांनी कसें स्तवन केलें ? ऐकां स्वल्पांतच सांगतों:-

आनो दिवो बहत: पर्वतादा सरस्वती ।
यजमामन्तु यज्ञम् ॥  - (ऋग्वेद मं. ५ -४३)

आणि त्या वेळी,

इयं शुष्मोभि सखा इवा रुजात्सानें ।
गिरीणा तविषेभिरुर्भिभि: ॥ (ऋग्वेद मं. ६ -११)

वत्स ! अर्थ लावशील का ? गुरुमहाराज ! अर्थ असा होत असल्यास पहा -

साकी

पूज्य सरस्वती सुरलोकाहुनि सत्वर यज्ञीं येवो ।
महान गिरिवर उल्लंघुनियां जगता दर्शन देवो ॥१॥
वाग्देवी तैं पराक्रमानें कमलापारे गिरिशिखरें ।
तुडवुनि सारीं यज्ञमंडपीं प्रगटे स्वरुपें प्रखरें ॥२॥

शाबास ! अगदी यथार्थ. श्रुतीची अर्थव्युत्पत्ति लावण्यास बृहस्पतीचीहि मति मंदगतीच होत असते. गुरुमहाराज मग पुढें ? ऐका तेव्हां-

साकी

मुनिंच्या स्तवनें प्रसन्नवदना वाग्देवी सरस्वती ।
तीर्थरुपानें अखंड वसली मोक्षपुरी सुखदा ती ॥
यज्ञ सांग झाला । ब्रह्मा आनंदें रमला ॥१॥

गुरुमहाराज ! या सरस्वती नदीचा उगम ब्रह्म सरोवरापासून झाला आहे ना ? कौडिण्य ! ब्रह्मस्वरुप सरोवरापासूनच सरस्वतीचा जन्म आहे. वत्स ! सरस्वतीला ब्रह्मदेवाची मानसकन्या असें म्हणतात. कौडिण्य ! ब्रह्म हेंच मानस, मानस म्हणजे मन, आणि त्यापासून उत्पन्न झाली ती वाणी अथात्‍ सरस्वती. वत्स ! तुझे हे गडबडी बोल मला कळत नाहीत. तुझें अध्ययन वेदांचें आणि माझें तें साधें पुराण. बाळांनो कसचा वाद घेतां ? या सरस्वतीला सरिद्वरा म्हणतात; म्हणजे ही सर्व नद्यांत श्रेष्ठ आहे. इच्या जलांत अनंत तीर्थे असतात. पण बोला, आपला वाद विचार. गुरुमहाराज ! हा वत्स उगीच वाद घालीत असतो. आम्हीं म्हणतों सरस्वती ही ब्रह्मदेवाची कन्या, आणि हा म्हणतो ब्रह्मदेवाची माता, आणि काय म्हणतो ......
वत्स ! कसे काय तुझें म्हणणें ? तसें कांही नाहीं, महाराज ! उपनिषांत सरस्वतीचा स्तव आहे, त्यावरुन म्हटलें.
कसा काय उपनिषदाचा स्तव ? गुरुमहाराज !

वाड्ग मे मनसि प्रतिष्ठिता । मनो मे वाची प्रतिष्ठितम्‍ ।
आविरावीर्य एधी मे आविरोधी । .... (कौषितकि उपनिषत्‍)

वत्स ! मग कसा काय अर्थ लावलास ? गुरुमहाराज ! अर्थ असा दिसतो. मनापासून वाणीची प्रतिष्ठा, आणि सरस्वती ही स्वयंप्रकाशी आहे. हो अगदी यथार्थ. पण सरस्वतीला ब्रह्मदेवाची माता कशावरुन म्हटलें ? गुरुमहाराज ! सरस्वतीला !

"य: ब्रह्माच्युतशंकर: प्रभृतिभि: देवै: सदा वंदिता ।
सा मां पातु सरस्वती नि:शेष जाड्यापहा ॥"

शाबास ! पतंजल योगशास्त्रांत या सरस्वतीला सुषुम्ना असें म्हटलें आहे; गंगेला इडा, यमुनेला पिंगला आणि ही सुषुम्ना, यांच्या संगमाला योगीजन त्रिवेणीसंगम मानतात. गुरुमहाराज ! बरी आठवण झाली; योगशास्त्रावरचें आपलें व्याख्यान आणखी एकदां ऐकावें अशी अपेक्षा आहे. पहा -

पद (चाल - रामराय राज्याचा०)

चैतन्याची चक्रवर्तिनी दिव्यप्रकाशी कुंडलिनी ।
सोहं शब्दें गर्जत कैसी मोक्षबिजाची विमल खनी ॥१॥
उन्मनिचें लावण्य कसें तें यौवन अभिनव तूर्येचें ।
रुप कसें त्या योगिजनाच्या आत्पप्रभावी भार्येचें ॥२॥
सुवर्णकमलीं निलाकाश त्या गुहेमाजी कसें वसे ।
सत्वरजतमापासुनि मायाचक्र चालतें तरी कसें ॥३॥
संदेहाचें तम नाशुनियां योगशास्त्र तें मज पढवा ।
पदवंदन मी करितों भावें अनुग्रहानें मन वळवा ॥४॥

वत्स ! भारी सरस. अशी अपेक्षा असणें म्हणजे अर्धे ज्ञान संपादणें आहे; योगशास्त्रावरचीं केवळ व्याख्यानें ऐकून सिद्धि प्राप्त होत नसते. योगसाधनास कडक नियम पाळावे लागतात. कसले नियम ? गुरुमहाराज ! ऐका -

पद (चाल - नाही सुभद्रा या वा०)

योगी व्हावें ऐशी इच्छा जरि का होइ मनीं ।
रसनेची ती गोड लालसा टाकुनि द्यावि झणीं ॥१॥
निद्राभंगा व्यथित न व्हावें देहलालसा मुळिं न धरा ।
विषयवासना विषापरी ती चित्तापासुनि दूर करा ॥२॥
सद्‍गुरुचरणीं अद्वयभजनें लक्ष लावुनी सदा बसे ।
अनुग्रहाला पात्र असे मग योगसिद्धिला उशिर नसे ॥३॥

इतकेंच ना, गुरुमहाराज ? कौडिण्य ! वत्साला योग म्हणजे साधारणचस वाटतो. बरं, तूं आधीं काय म्हणत होतास तें सांग. तसें कांही नाहीं महाराज. हा वत्स उगीच वाद घालीत असतो; प्रत्येक वेळी वेदाचें सूक्त करतो पुढें; पुराणांतील कथांना म्हणतो तो रुपकात्मक अर्थात्‍ कल्पित. व्यासऋषीवरहि याची कोटी. वत्स ! असें काय म्हणतोस ? कौडिण्यच सांगेल, महाराज. कौडिण्य । माझें काय म्हणणें तें गुरुमहाराजांना यथार्थ निवेदन कर. यथार्थ नव्हे, यथाक्षर सांगतों. गुरुमहाराज ! काल आम्ही सहज पार्वतीपरिणय काव्य वाचीत होतों, त्यांत महादेव शंकरानें मदनाला भस्म केला अशी कथा आहे. मग वत्साचें काय म्हणणें ? हा म्हणतो, शंकर म्हणजे भक्तिज्ञानवैराग्यसंपन्न पुरुष, अर्थात्‍ योगी, यानें भ्रुमध्यस्थानांतील अग्निचक्रानें विषयवासनारुप मदनाचा म्हणजे कामविकाराचा नाश केला. म्हणतां आम्हीं काय म्हणावे ? हिमालयच्या पोटीं पार्वती जन्मास आली, ही कथाच खोटी तर. छे ! छे ! कौडिण्य । हिमालय नवमास गरोदर राहिला ही गोष्ट कोण खोटी म्हणणार ? हें पहा, गुरुमहाराज ! प्रत्येक कथेवर याचा आक्षेप. आणखी कोणत्या कथांवर याचा आक्षेप आहे ? वत्स जरा महत्वाकांक्षी आहे. गुरुमहाराज । शपथ, मला गर्वाचा अगदीं लवलेश नाहीं. वत्स ! महत्वाकांक्षेला गर्व म्हणत नाहींत. कौडिण्य ! सांग पाहूं पुढें आपल्या वादविनोदांत मला आनंदच आहे. गुरुमहाराज ! त्रिपुरासुराचा वध महादेव शंकरानें केला, ही प्रचलित कथा; तीहि म्हणतो रुपकात्मक. कौडिण्य ! कसचे कसचें रुपक म्हणतो ? सरळ सांग, मलाहि पण त्यांत बोध होऊं दे. गुरुमहाराज ! हा वत्स कसें म्हणतो पहा -

साकी

सत्व-रज-तमा या त्रिगुणाला त्रिपुरासुर हें म्हणती ।
जीवात्मा हा देवेंद्रचि का देहा स्वर्गचि गणिती ॥१॥

हं हं. मग पुढें ? ऐका, महाराज.

साकी

तमोग्रस्त ज्या जीवरक्षणा धर्मरुप शिव आला ।
प्रणवधनुष्या चिदाभासशर लावुनि युद्धा सजला ॥

काय मोठी कोटी ! बरं पुढें. पहा -

साकी

चरमवृत्ति ब्रह्मास्त्र योजुनी त्रिगुण-त्रिपुर दैत्याला ।
धर्मशंभुने वधुनी निर्मल जेवात्मा सोडविला ॥

बरं बाबा. आणखी कोणत्या कथांवर याची कोटी ? प्रत्येक कथेवर याची कोटी. (स्वगत) गुरुमहाराज आपल्याशीच हंसतात ते कां ?
कौडिण्य ? पुढें चालूं दे. गुरुमहाराज ! सर्व पौराणिक गोष्टींना हा म्हणतो रुपकात्मक. समुद्रमंथनावरहि याची कोटी. काय ! समुद्रमंथनावरहि कोटी ? सांग पाहूं. आम्हां वृद्धांना एकेक नवीनच गोष्टी ऐकाव्या लागतात. कौडिण्य ! लाजूं नकोस. ऐका महाराज. हा म्हणतो-

साकी

मन हा सागर शम ते सुरवर काम क्रोध दैत्यचि ते ।
अभ्यासचि हें मंथन मुक्ति अमृत जाणति ज्ञाते ॥
मायारुप तसें । मोहिनी जगता मोहितसे ॥१॥

वत्स ! कमाल आहे बाबा तुझी. कौडिण्य ! चालूं दे पुढें. गुरुमहाराज हंसतात आणि हा वत्सहि आपल्यपाशीं हंसत आहे. माझाच मूर्खपणा असेल. छे, छे, कौडिण्य ! मी तुझी थट्टा करीत नाहीं. बरं, पण एक सांग, तूं आधीं काय म्हणालास ? सरस्वतीबद्दल याचें काय म्हणणें ? गुरुमहाराज ! हा वत्स म्हणतो, सरस्वती ही ब्रह्मदेवाची माता, तीच कन्या, तीच पत्नी. आणखी काय म्हणतो, ब्रह्मदेव सरस्वतीच्या मागें लागला ! कौडिण्य ! मीच असें म्हणतों का ? आपलें मत्स्यपुराण वाचून सांग पाहूं, त्यांत असें आहे की नाहीं ?

अहो कष्ठतरं चै तदंगजागमनं विभो । कथं दोषमगमत्‍
कर्मणानेन पद्मभू: ॥"

वत्स ! तसें त्यांत आहे खरें. पण आम्हीं तसें बोलूं नये. त्यांत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाची निंदा नाहीं का होत ? मग, कौडिण्य ! पुराण पाठ कसें करणार ? बाळांनो कसचा वाद घेतां ? ऐका, देवांची कर्मे मनुष्यांप्रमाणें इंद्रियांनीं घडत नसतात, ती मानवबुद्धीच्या पलीकडची असतात. सरस्वती ही विधात्याची लाक्षणिक कन्या आहे. ब्रह्मदेव सरस्वतीशीं मोहित झाला या कथेत निराळाच अर्थ आहे. हो, गुरुमहाराज ! मी म्हणतों ही कथा रुपकात्मक आहे. बरं, तें असो, वत्स ! तुझा प्रश्न होता ? गुरुमहाराज ! कौडिण्यानें मध्येंच आपलें पुराण पुढें केलें. माझा प्रश्न योगशास्त्राबद्दल होता. वत्स ! तुझें म्हणणें गुरुमहाराजांना आवडणार नाहीं; पुराणग्रंथांना कमी मानणें सुज्ञपणाचें लक्षण नाहीं. कौडिण्य । मी पुराणग्रंथांस बराच मान देतों, पण देवीभागवत काय सांगत आहे पहा :

स्त्री शूद्र: द्विजबंधूनां न वेदश्रवणं मतं । तेषामेव
हितार्थाय पुराणानि कृतानि च ॥

म्हणजे, स्त्रिया, शूद्र आणि पतित ब्राह्मण यांस वेदांचा अधिकार नाहीं, त्यांकरतां पुराणें रचलेलीं आहेत. बाळांनो उगीच वाद घालूं नका, स्वस्थ ऐका. सर्व शास्त्रांत योगशास्त्र श्रेष्ठ आहे; योगसिद्धि झाली म्हणजे हा आपला वाद सहजच मिटणार आहे. गुरुमहाराज! योगशास्त्र पढविण्याचा अनुग्रह व्हावा हीच विनंति आहे. पण योगसिद्धि व्हावी कशी ? वत्स ! आपल्याप्रमाणेंच योगशास्त्रावर रुपक सांगतों -

साकी

ॐकाराचें धनु: करोनी चित्त बाण लावावा ।
ब्रह्मरुप तें निशाण लावुनि निश्चल मन सोडावा ॥
मन हें ब्रह्मत्वीं मिळतें । योगीहृदयां लखलखतें ॥१॥

गुरुमहाराज । याचा अर्थ आम्हांस भारी अगम्य आहे. योगशास्त्राचा अभ्यास करण्याची अपेक्षा आहे. वत्स ! भारी उत्तम. योगसाधनाची जर आपणास इच्छा आहे, तर सांगतो, सर्वाआधीं चित्तनिग्रहाची तयारी केली पाहिजे. कारण -

पद (चाल-उरला भेद न ज्या कांहीं०)

मन हें स्थीर न जरि होई । दुर्घट योग तयां पाहों ॥ध्रु०॥
सागर प्राशवेल सगळा । मेरु फोडवेल वहिला ॥
अग्निहि भक्षूं अवलीला । स्वर्गा आणवेल क्षितिला ॥
परंतु बाळा चंचल मन हें जिंकवे न कांहीं ।
लोकीं सुज्ञ देति ग्वाही ॥१॥

गुरुमहाराज ! इंद्रियसंग्रह झाल्यावर मनाची मोठीशी प्राज्ञा नाहीं असें म्हणतात ना ? वत्स ! हें सर्व स्वानुभवावांचून कळावयाचें नाहीं. असो. आतां पातंजल मुनीचा शिष्य कोत्स इकडे येणार आहे, त्याकडे त्या गुरुनें रचलेलें योगशास्त्र असणार. त्याचें आधीं अध्ययन करा, म्हणजे मग थोडक्यांतच कांही कूटें उकलून योगसिद्धींची तयारी करुं. बरं, पण आपण आज कसला पाठ केला ? हो आज ऋग्वेदाचा पाठ होता. कोणता स्तुतिपाठ होता ? आदित्यदेवतेचा महाराज. बरं. आधीं अदितिदेवतेचा स्तुतिपाठ होऊं द्या. बरं, महाराज.

देवेर्भि देवि अदिते अरिष्ट भर्मन आगाहि ।
अदिति: पातु अहंस: सदा वृधा ॥ (ऋग्वेद मंडल ८-१८)

वत्स ! अर्थ पाठ होऊं द्या, अर्थावांचून सारें निरर्थक. हो, तें खरं महाराज, पहा.

साकी

सर्वप्रिय ही देवी अदिति सुखदात्री जगताला ।
व्यत्यय आणूं शके न कोणी ईच्या वरदानाला ॥
पातकतमहरणी । जिची अत्यद्भुत करणी ॥१॥

भारी सरस. अर्थ म्हटला म्हणजे हेतुगर्भ असला पाहिजे. बरं, पुढें आदित्यदेवतेचा स्तुतिपाठ होऊं द्या. पहा, महाराज -
"वयं ते वो वरुण: मित्र अर्यमन स्याम्‍ इत्‍ रथस्य रथ्य: "
                        (ऋ.मं. ८-१९)

बस्स. सरळ अर्थ होऊं द्या. अर्थी तात्पर्य सज्जना. ऐका, महाराज. " हे वरुणा, हे मित्रा, हे अर्यमा, आम्ही तर तुमचेच आहों; तर आम्ही सद्धर्माचे प्रचारक होऊं असें करा." शाबास ! अगदीं वेदसूक्ताचें प्रतिबिंब. पण, गुरुमहाराज ! ह्या ऋचेचा स्पष्टार्थ मला कळला नाहीं. केवळ शब्दार्थ कळून उपयोग काय ? वत्स ! असें म्हणतोस ? शब्दार्थ तोच स्पष्टार्थ. तसं नाहीं, महाराज, आदित्य देवांना " आम्ही तुमचेच आहोंत" असं कशावरुन म्ह्टलें " ? ते देव आणि आम्ही मानव. हं हें काय तुला आतांच सांपडलें ? नाहीं महाराज, कालच्या पाठांतहि तसंच आहे. मग, काल कां विचारलें नाहींस ? बोल कालचा पाठ. हो, जरा घसरलों खरा. आतां पहा -
यज्ञो हीलो वओ अन्तर: आदित्या अस्तिमूलत ।
युष्मे इद्वो अपिस्मसि स जात्ये ॥" (ऋ. मं.८-१८).

सांग तर स्पष्ट अर्थ. पहा महाराज -

"आदित्यांनो, तुमच्या मनामध्यें स्तुतियुक्त यज्ञ चांगलाच भरतो, तर आम्हांवर कृपा करा, आम्ही तुमच्यापैकींच आहोंत, तुमच्या कुलांतीलच आहोंत. " अगदी बरोबर, मग संशय काय तो बोल. ऐका -

साकी

ज्ञानरवीला संशयतम हा उपरागचि समजावा ।
गुरुचित्ताला राग नये कधिं प्रश्नें अर्थ वळावा ॥
मन हें स्वच्छ असों द्यावें । संशयकिल्मिष त्यागावें ॥१॥

गुरुमहाराज ! संशय एकच, " आम्ही आदित्यांपैकीच आहोंत, आदित्य कुलांतीलच आहोंत" असें कसें म्हटलें, आणि हें स्तवन केलें कोणी ? हेंच तें, आधीं आत्मनिरीक्षणच झालें पाहिजे, आम्ही कोण हें तुमच्या लक्षांत नाहीं. तर बोल पुढचा पाठ. बरं महाराज, ऐका -

"येन वंसाम पृतनासु शर्धतस्‍ तरन्तो अर्य आदिश:"
                    (ऋ.मं. ८, ४९-१२)
पुरे, अर्थ सांग. अर्थ असा दिसतो महाराज:-
"आम्ही संग्रामामध्यें शत्रुसैन्याची धूळधाण उडवूण देऊं, आणी आम्ही जे आर्यजन ते तुझ्या आज्ञा बरोबर पाळूं."

वत्स ! आम्ही आर्यजन हें स्पष्ट आलें ना लक्षांत ? वेदांतील सूक्तें आर्य लोकांनींच रचलीं हें तुला समजलें ना ? हो, मग आम्ही आदित्य-कुळांतीलच झालों तर. वत्स ! आदित्याला अर्यमन्‍ असें वेदसूक्तांत आहे ना ? मग अर्यमाच्या वंशजांस आर्यम्‍ ही सुज्ञ लोकांची संज्ञा सयुक्तिकच आहे. म्हणून,

पद ( चाल-विराट वदनापासुनि०)

देव अर्यमा आदित्याचे वंशज त्यां आर्यचि म्हणती ।
स्वयंप्रभावें धन्य जाहले कीर्ती गाती सुर वरती ॥१॥
धर्मनीतिचें स्थान मनोहर आर्यावर्ताला वदती ।
श्रुतिस्मृतीचें आगर सुखकर अन्य न यासम त्रिजगतीं ॥२॥
हिमनग रत्नाकर रक्षिति जिस भारतभूमी मान - वती ।
स्वर्गसुखाला सोडुनि सुरवर आर्यभूमिला मानवती ॥३॥

गुरुमहाराज !  आर्य लोकांचे वसतिस्थान हेंच तर आर्यावर्त ? आणि वत्स ! काय संशय दिसतो तो स्पष्ट विचार. तसं नाहीं महाराज !
आर्य लोक उत्तर ध्रुवाकडून आले, असें बरेच वेदवेत्ते विद्वजनांचें सप्रमाण मत आहे. म्हणजे ? उत्तर ध्रुवाकडून आलें कीं उत्तर ध्रुवमंडळावरुन आले ? ध्रुवराजाचे वंशज झाल्यास सूर्यवंशीच झाले; उत्तानपाद राजाहि आर्यच. पण आपलें प्रमाण तें काय ? प्रमाण म्हणजे, ऋग्वेदांत उत्तर ध्रुवाकडील प्रदेशाची वर्णनपर सूक्तें आहेत. हा ! हा !  शाबास ! खासे वेदवेत्ते विद्वज्जन ! कौडिण्य ! आपल्या पुरानग्रंथांत कोठकोठची वर्णनें आहेत ? पुराणांत कैलास, वैकुंठ, क्षीरसागर येथील वर्णनें आहेत, स्वर्गांतील नंदनवन, नव्हे पाताळांतील नागनागिणींचीं वर्णनपर चरित्रे आहेत ना ? तर आर्य लोक क्षीरसागरांतून आले, की पाताळांतून वरती चढले ? पण गुरुमहाराज हीं वर्णनें कशीं निपजलीं ? वत्स ! कवींची कल्पना पवनालाहि मागें टाकते, हें तुला नाही का ठाऊक ? वेद हें महाकाव्यच आहे. कवीचें मन कधीं स्वर्गात तर क्षणांत पाताळांत; कधीं भूगर्भात तर कधीं ग्रहमंडळांत भ्रमण करीत असतें. हें आपले विद्वज्जन समजत नाहींत काय ? बरं, तूं आणखी काय म्हणालास ? मनांत संशय ठेवूं नये. गुरुमहाराज ! वेदसूक्तें जर आर्य लोकांनी रचलीं तर वेदांस अपौरुषेय असें कसें म्हणतात ? वत्स ! उत्तम प्रश्न. अपौरुषेय म्हणजे आकाशवाणीनें उत्पन्न झालें कीं काय ? अपौरुष शब्दाचा अर्थ अलौकिक पौरुष असा नाहीं का होत ? महानुभाव आर्य ऋषि हे अलौकिक पुरुष, त्यांनी रचलेलीं स्तोत्रें ज्यांत ग्रथित आहेत ते वेद अपौरुषेयच म्ह्टले पाहिजेत. असो; बरेंच विषयांतर झालें; होऊं द्या आपला वेदपाठ. बरं महाराज ! हा पहा इंद्रदेवतेचा स्तुतिपाठ.

"योद्धा असि कृत्वा शवसो तदंसना विश्वाजाताऽभिमज्मना ।
आत्वाऽयम्‍ अर्क: ऊतयेव वर्तति यं गौतमा अजीजनन्‍ ॥
                        (ऋ. मं. ८, ७७-४)
वत्स ! ऐक; वेदांचे पठण करणें आणि अर्थ समजून घेणें हें ब्राह्मणाचे मुख्य कर्तव्य आहे.

ब्राह्मणेन षडड्गो वेदोऽध्येयो ज्ञेयश्च"
असें निरुक्तशास्त्रांत आहे. गुरुमहाराज ! पहा, " तूं खरोखर योद्धाच आहेस; आपल्या पराक्रमानें, उत्कट बळाने, अद्भुत कृतीने आणि आपल्या झळाळीनें हें सर्व वस्तुजात पराजित करुन टाकलें आहेस. हा स्तोत्रघोष गौतमांना केला." (स्वगत) काय, हा इंद्रदेवतेचा स्तुतिपाठ ? आणि गौतमांनी केला ?  कधीं ? अहल्येनें मार्जार: म्हटल्यावर कीं यानें त्वज्जार: म्हटल्यावर ? वेदांतील इंद्र निराळा, पुराणांतील इंद्र निराळा आणि गौतममुनिहि निराळाच म्हटला पाहिजे. वत्स ! हा आपला कौडिण्य आपल्याशींच काय पुटपुटतो आहे ? बरं, पुढें चालूं दे, अर्थावर मात्र अलक्ष करुं नकोस. बरं महाराज हा पहा सोमराजाचा स्तव.

" अयं कृत्नुर अग्रभीतो विश्वजित्‍ इत्‍ सोम: "
                ( ऋ.मं. ८, ६८-१)

पुरे अर्थ होऊं द्या. हें पहा महाराज. हा सोमराजा मोठा कार्यकर्ता, कोणाला आकळला न जाणारा, विश्वाला जिंकणारा, फलांकुर उत्पन्न करणारा, काव्यस्फूर्ति देणारा आहे आणि "ऋषिर्विप्र काव्येन" म्हणजे "याच्या काव्यानें विप्र हा ऋषि होतो. "

शाबास भले वेदोनारायण; वत्स ! आपला वेदोक्त इंद्र स्वर्गावरील का क्षीरसागरांतील ? आणि हा सोमराज’, चंद्रमा का कैलासनाथ ? आणि हा सोमराजाचा स्तव बृहस्पतीने केला का? कौडिण्य ! वेदार्थाला दूषण देणे महादोषास्पद आहे. गुरुमहाराज सन्निध आहेत. वत्स ! झाला ना आजचा पाठ ? झाला महाराज. पण - हेंच तें, वत्स ! तुला पाहिजे तो प्रश्न कर. शिक्षणांत लाजभीड अगदीं उपयोगाचीं नाहीं. महाराज ! वेदांत बहुधा स्तुतिपाठच आहे तें काय ? परमेश्वराला स्तुतिच का प्रिय आहे ? हो, स्तुति ही सर्वांनाच प्रिय वाटत असते, पण स्तुति करावी ती परमेश्वराची, तो प्रभु स्तुतीस पात्र आहे. गुरुमहाराज ! श्रेष्ठ लोकांना स्तुतीचा कंटाळा असतो, असें म्हणतात ना ? हो, अगदी खरें आहे, पण बहुतेक लोकांच्या हृदयांत स्तवनप्रियता’ गुप्तपणें संचार करीत असते. तें असो. स्तुतींत सत्य, असत्य, सकाम, निष्काम असे भेद आहेत; बरं, उद्यां कसला पाठ आहे ? उपनिषदाचा, महाराज. बरं, कौडिण्य ! अर्थसादृश्यावर पूर्ण लक्ष ठेव. पण सांग, वत्स ! सरस्वतीसंबंधानें झालें ना समाधान ? हो, झालें महाराज; सरस्वती ही ब्रह्मदेवाची पत्नी, कन्या आणि माता. काय, वत्स ! असें कसे होईल ? सरस्वती ही वाणीची देवता, म्हणून तिला वाग्देवी म्हणतात. चौसष्ट कलांची स्वामिनी, चातुर्यार्थकलाकामिनी. अशी इची सुति करतात. मला असें वाटतें, महाराज -

साकी

आदि अनादि प्रणवरुपिणी सरस्वती ही पाहे ।
पूर्णब्रह्म चित्स्वरुप विधाता सत्य स्वरुपा राहे ॥
माया - ब्रह्म - समागम हा । लोकीं दाविति खेळ महा ॥१॥

शाबास, पण तुझा काय प्रश्न होता वेदविषयावर ? कौडिण्य ! बोल. तसें कांही नाहीं, महाराज, वेदांत म्हणतात परमेश्वराचें स्तवन केलेलें आहे, आणि हीं तर स्तोत्रें इंद्राचीं आणि चंद्राचीं. पुराणांतील कथा वाचल्या म्हणजे अगदी विपरीताभास. वत्स ! वेदांत काय इंद्राची आणि चंद्राचींच स्तोत्रें आहेत ? वेदांत अदिति, आदित्य, इंद्र, चंद्र, अग्नि, अश्विनोदेव, पृथ्वी, उषा इत्यादिकांची स्तोत्रें आहेत, महाराज. तर गुरुमहाराज ! परमेश्वराचें स्तवन तें कोठें राहिलें ? कौडिण्य ! इंद्र, चंद्र हीं कोणाचीं स्वरुपे मानतोस ? देह आणि अवयव हीं काय निराळीं असतात ? याचा अर्थ आम्हांस भारा अगम्य आहे, महाराज. तसें कांही नाहीं, थोडासा योगाभ्यास झाला म्हणजे अगदीं सुलभ वाटेल. बरं, पण आपले सहाध्यायीं कोठे दिसत नाहींत. गुरुमहाराज ! ते आपल्या व्यायामवाटिकेंत खेळत आहेत. हं, पण हा तिकडे कोण ? हा आपला पतंजल मुनीचा पट्टशिष्य कोत्स. काय, कोत्स ! क्षेमकुशल आहेस ना ? आतांच तुझी आठवण झाली होती. काय माझ्यावर अनुग्रह ! गुरुमहाराजांना माझी आठवण होणें म्हणजे मी जगांत धन्यच समजलों पाहिजे. बरं, आपले योगरत्नाकर पतंजल ऋषि सुखक्षेम आहेत ना ? त्यांचा काय संदेश आहे ? त्यांचा संदेश म्हणजे, महाशय दधीची मुनीचें कुशलवृत्तश्रवण, आपल्या गुरुकुलाचें वृत्तनिवेदन आणि आम्हावर आज्ञा अनुग्रह. भारी आनन्द. वत्स ! संध्यासमय होत आला ना ?
हो, कांहीच कळलें नाहीं. हा पहा -

(पद  (चाल-कळवावी विनंति०)

शांतकिरण तिमिरहरण जात अस्तमाना
प्राग्वधु ही नटुनिसजुनि खुलावे रंग नाना ॥ धृ०॥
संभ्रम हा दशदिशांस । चंद्रबिंब करि विकास ।
ब्राह्मणजन दिनकरास । करिति अर्ध्यदाना ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP