साकी

पंचतत्वमय सत्वरुपि जो जगदात्मा हृषिकेशी ।
सृष्टिचक्र जो चालवि नियमें मायातित अविनाशी ॥
सुखकर तो होवो । जगता सुसंस्कृती देवो ॥१॥

शाबास ! वैजयंती, शाबास ! किती बुद्धिमान, देवादिकांनीं तोंडांत बोटेंच घालावी ! इतके चातुर्य माझ्यांत असेल, असें मला वाटलेंच नाही; देवेंद्र रत्नपरीक्षक; अलंबुषेला उगीच पुढें केली, कोणाच्या धीरावर, तर वैजयंतीच्या; माझ्या बुद्धीची, चातुर्याची महति त्याला पूर्ण माहीत होती. आतां पहा -

पद (चाल - शिवलि बरें झालें०)

खचित मला गमलें, आतां । महेंद्रचिंतानल शोषावा  
सागर मी बनलें । आतां ॥ शक्ति मुनीची सर्व भंगली ।
तपोतेजता दग्ध जाहली । अलंबुषा देवीच्या सुगळीं ।
पदकचि मी झालें । आतां ॥१॥

आतां पहा -

गुरुकुल सारें धुडकुनि देतें । तपोवनाचें उपवन करितें ।
शचिदेवीच्या नांवे येथें । बाग नवी रचितें । आतां ॥२॥

काय पहा, ते ऋषि म्हणजे खदिरांगार, सूर्यमंडळावर जाववेल पण त्या मुनींजवळ जाणें म्हणजे भस्मच होणें; तेज तरी किती प्रखर, जणूं काय सारें जग भस्मच होऊन जाईल. ते ऋषि, सरस्वतीच्या तीरावर असले म्हणजे नदीचें शीतल जल लाल झाल्यासारखें दिसूं लागतें. आम्ही तर  -

पद (चाल-नंदनवन देवीनें०)

सरस्वतीतचि स्नाना करितां पाहुनि मुनिच्या त्या नयनां ।
कंप भरे किति ताप बाधती वरती करवे नच वदना ॥
गायनवादन सर्वहि हरलें थरथर कांपे तैं रसना ।
अलंबुषा देवीचा गेला धीर सोडुनी कधिंच मना ॥१॥

बोलायला सारें सुलभ पण प्रसंग आला म्हणजे अंग होतें धैर्यभंग; काय पहा.

पद (चाल-अलख चटा०)

पाहुनियां दिव्यतेजधारि ते मुनी ।
भीतीची बीज बसे चपल मन्मनीं ॥
बुद्धीचा होय र्‍हास । न सुटे तैं वदनिं श्वास ।
जाळिल कीं त्रिजगास । शाप देउनी ॥१॥

मग केलें काय, सरस्वती देवीचें केलें स्तवन : देवी सरस्वती !

पद (चाल -  नंदनवन देवीने०)

सरस्वतीदेवी तुज भावें माळ मनोमय कमलांची ।
अर्पितसों ही सप्रेमानें लाज राख या अबलांची ॥
मुनितप दुर्भेद्यचि दुर्गाला वज्रपाणि तो बहु भ्याला ।
गलितधैर्य या आम्ही बाला लागतसों तव चरणाला ॥
वरदाती तूं विश्वदीपिका सरिद्वरा जगत्रयजननी ।
इच्छित वरदानातें देउनि मुक्त करीं मुनिभयांतुनी ॥१॥

काय तरी चमत्कार, सरिद्वरा सरस्वती, आम्हां स्त्रियांची-अप्सरांची अभिमानी-भगिनी किती तरी तिचें तेज !

पद (चाल-बायांनो द्या सोडोनी०)

चिद्रूप ब्रह्मिंची दुहिता । लावण्यजलाची सरिता ॥
पाहुनी दिव्यरुपखाणी । हृदयाचें झालें पाणी ॥
धरुनियां स्वयें निज पाणी । आलिंगुनि दावी ममता ॥१॥

भीति तर किती भीति, ऋषीच्या तपोतेजानें शापवन्हींत भस्म होऊं ही एक भीति; जगज्जननी सरस्वती, आलिंगन देण्यास सरसावते तिच्या सन्निध जावें तरी कसें ? ती आम्हां अप्सरांस अस्पृश्य मानील. ही तर मोठी भीति. आम्ही कीं नाही. कितीहि प्रौढी सांगितल्या, तरी आमचे दोष आम्हांला मागे ओढतातच, पण देवी सरस्वतीनें:

पद (चाल - बायांनो द्या०)

धरुनियां स्वयें निज हृदयीं । बोलाचें माले न होई ।
ह्द्बता विचारुनि घेई । लाजवी गुणें नवनीता ॥२॥

अलंबुषा झाली गर्भगळीत, मी तर अगदीं भयचकित; जिव्हा उचलत नाहीं, हात हालत नाहींत, डोळे अधीर आणि कर्ण बधिर. तेव्हां,

पद (चाल-सदर०)

कुरवाळुनि बोले देवी । निज अमृतकर शिरिं ठेवी ॥
प्रेम तें अमोलिक दावी । पूज्य जी स्वयें त्रिजगता ॥३॥

पण हें मीं कोणाशी बोलतें आहें ? माझ्याच देहाशी; तें का ? हें अरण्यगायन ऐकणार तरी कोण ? तसें नाहीं, तडागांत जल तुंबले खरें. झालें, सरस्वतीचें अभय वरदान तर मिळालेंच; अलंबुषेला म्हटलें, आतां मनाचा धीर कर आणि गायनाचा गजर उडवून दे, राग, उपराग, भार्या, मूर्च्छना, यांचा तनाना सारखा चालूं दे. हा पहा संध्याराग, नभोनील आगारांत रांगतो आहे आणि संध्याकाळ, रविशशीच्या संधिकाळांत खुलतो आहे. आपल्या त्या षडज्‍, गांधार सुरांस तनखा दिला म्हणजे सुरासुरांच्या उरास विळखा बसतोच आहे, मग मुनीच्या नेत्रांस कसा अंधार करणार नाहीं ? ही पहा वसंताने कशी बहार उडविली आहे ती.

पद [चाल - नंदनवन देवीनें०]

सरस्वतीच्या जलीं मनोहर पुष्पवाटिका नव रचिली ।
गुलाब चंपक पारिजात या तरुपंक्तींनीं नदि भरली ॥
बकुल मालती पुष्प सुगंधें भ्रमर गुंजती चहूंकडे ।
वाटे तेव्हां मुनिमन नगिंचे ढांसळोनियां पडति कडे ॥१॥

कितीही सांगितलें, भाकितलें तरी अलंबुषेला धीरच होईना, तुंबराचा तुंबरा दिला हातांत, पण काय उपयोग ? शूरत्वावांचून तरवार कशी वार करील ? इतक्यांत,

पद [ चाल - रुचती का तीर्थ०]

मुनिवर ते स्नानसंध्याकार्यार्थी पातले ।
नवरचना पाहुनीयां विस्मितसे भासले ।
नासाग्रीं लावुनीयां दृष्टी तैं बैसले ।
नच बघवे रुप त्यांचें मन माझें खळबळे ॥१॥

सरस्वतीच्या वरप्रसादानें, त्या ऋषींच्या तेजाचा दाह आम्हांला बाधा करणार नाहीं, इतका जरी मनाला धीर आला, तरी नदीच्या जलावर ती येण्यास देह बधिर झाल्यासारखा दिसूं लागला; तेव्हां,

सरस्वतीचें गुप्तलिंगन अलंबुषा देवीला ।
सांगे मुनिंच्या मनोललाटा विषयगंध लेवविला ॥
गायनशर हाणी । ठेवीं निश्चल मन वाणी ॥१॥

काय पहा, सरस्वतीच्या जळावर, बसणें, उठणें, विहरणें म्हणजे भूमीवरच्याप्रमाणें, ही दिव्य कला, आम्हां अप्सरांनाच साध्य, म्हणून भारीच गर्व होता, पण तो सर्व या ऋषींनी मोकलून दिला; ते मुनि, नदीजलाला स्पर्श न करतांच अंतराळांत पादुकांनी झपाझप उडतात, मग तर आमची गाळणच उडाली; ते ऋषि जितके येतात आम्हांजवळ, तितकी होते आमची पळापळ -----
अरे, पण विसरलें, सरस्वतीचें चित्र घेण्यास चुकलें, शचीदेवीच्या वस्तुसंग्रहालयांत, हें चित्र विचित्रच होणार होतें ........ नाहीं, ती दैदिप्यमान्‍ मूर्ति माझ्या हृदयांतून कशी निघून जाईल ? सरस्वतीचें चित्र कसें बसें रेखीनच, पण तें दिव्य तेज कसें काढवेल ? होंईल, त्या चित्राला विद्युत्प्रकाश दिला तर कांही अंशी होईल. हा, हा, काय तरी तिचें रुप:-

पद (चाल - सतनु करावा पुन्हां०)

अधोवदन तो मदन जाहला पाहुनि जिचिया स्वरुपाला ।
लाज घेत तो शशांक गगनीं अपत्र प्रवाहीं मग लपला ॥
अस्ता गेला वासरमणि परि तारागण नच ये वरता ।
ग्रहगण सारा निष्प्रभ दिसला प्रकट भासवी वन्हिलता ॥१॥

चित्र कसें तरी रेखीनच, पण त्या देवीचे मनमोहक बोल कसे दाखवतां येतील ?

पद (चाल-सदर)

मनमोहक ते सुधारसाहुनि गोड शब्द त्या श्रवणपंथीं ।
मनोमया त्या तारेंतुनियां जाऊनि हृदया द्रव करिती ॥
वाटे अमृत वर्षावचि का भोगावतीचा शितल झरा ।
वाणि नव्हे ती खाणिच भासे अर्थप्रसव तो दिव्य हिरा ॥२॥

त्या सरस्वतीचें, तेजोमान रुप, आणि अमृतमधुर वाणी स्वर्गांगनांना दाखवून कुतूहल करण्यास पाहिजच होतें. आणि तें प्रदर्शन पाहण्याकरतां, वैकुंठविलासी लक्ष्मी आणि कैलासनिवासी पार्वती, या देवी येऊन गर्वहीन होऊन गेल्या असत्या; आणि ब्रह्मदेवाला तर तसें स्वरुप निर्माण करण्यास अभिनव विद्युत मनोमय मूस ओतावी लागणार होती; आणि माझें भूमंडळावर आगमनाचें सार्थक्य अगणितच झाले असतें. पण करावें कसें ? ..... हं, आलें लक्षांत, वैजयंतीच्या कल्पनासृष्टींत काय काय भरले आहे तें परमेष्टीच्याहि अदृष्टी खास असणार नाहीं. आतां पहा. -

साकी

चित्रकलेचें मर्म जाणता तमहारी भास्कर तो ।
ध्वनिवाहकता वायुदेव हें कार्य सहजची करितो ॥
त्यांना सांगुनियां । करितें बहुविध खेळाया ॥१॥

बरें, पण, अंतिम कार्य साध्य होण्यापूर्वीच का ह्या सार्‍या मनाच्या कल्पना ? दृश्यसृष्टींत आणि कल्पनासृष्टींत कल्पनांतीत अंतर; तर हे सारे बोल, फोलच आहेत. त्यां ऋषीचें आम्हांजवळ आगमन आणि आम्ही करतों पलायन; मग यांत साधन तें काय साधणार ? उभयतांच्या संगमावाचूंन कृतकृर्माला यश तरी कसें येणार ? असो. आतां तरी झालें तें कांहीं कमी झालें नाहीं -

साकी

वीणावादन गायन परिसुनि नागापरि मुनि डोले ।
अलंबुषादेवीच्या लीलांवरती लावुनि डोळे ॥
संध्या सोडुनियां । टकमक बघति रुपकाया ॥१॥

एकावर एक चिंता, चिंतेच्या गर्तेत एकदां मन पतन पावलें म्हणजे मग मुक्त होण्याचें साधनच मिळत नसतें, हें खरें; शांत, दांत विषयविरत मुनीशीं सामना; मग, कामना, वासना यांचा नायनाटच झाला पाहिजे. अलंबुषा म्हणते, ऋषीच्या शापवन्हींत भस्म होऊन जाऊं, तर त्यांच्या तपोभंगाची दुष्ट वासना मनांत काय म्हणून आणलीस ? अंगसंगावांचून तपोभंग करण्यास अनगाचें अंतरंग निराळेंच झालें पाहिजे ..... हो,पण येथें वेळ किती होतो, हें तर अगदीं कळत नाहीं, हा पहा -

पद (चाल - व्हावा लाभ तुझा०)

संध्याराग कसा खुलवी । प्राग्वधु शोधित जात रवी ॥
गगनीं कांचनरस भरला । सागर पवनें खवळविला ॥
निशापति तारागण बाहे । सरिताजल कौतुक पाहे ॥
मुनीचा शिष्यवर्ग सगळा । संध्याकर्मी रत झाला ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP