आर्या (गीति)

सद्धर्म सकर्म नीति भक्ति जिथें सर्वदा करी वसती ।
ईश्वर कृपाप्रसादें समृद्धा हे सदा असो जगती ॥१॥

प्रात:काळाचा समय; पूर्वदिशेच्या क्षितिजांतून रविबिंब जरा झळकत आहे, सरोवरांतील कमलांप्रमाणें भूमिदेवी हास्यरसाच्या स्वारस्यांत गढून गेली आहे, आपापल्या घरट्यांतून बाहेर पडणार्‍या पक्ष्यांप्रमाणें मनुष्यगण,स्वतंत्र आनंदचित्त फिरत आहे; लतावेलींवर प्रफुल्ल दिसणार्‍या कोमल पुष्पांप्रमाणें, विमल बालकें, बालरवीचा प्रकाश प्रसन्न चित्तानें न्याहाळीत आहेत; अशा वेळीं, सरस्वती नदीच्या वाळवंटावर विद्युल्लतेला लाजविणारी एक तरूणी स्त्री, आणि बालरवीला दिपविणारा एक बालकुमार, अशा त्रिगुणात्मक तीन व्यक्तीनीं, सरस्वतीचे तीर शोभूं लागलें; तेव्हां ..... आतां कसें करावें ?

पद (निजरुपइला०चाल)

हितगुज मुनिला सांगूं कीं । सत्य वृत्त तें कथुनि तयांला,
पूर्व स्मृति ती देऊं कीं ॥ दिव्य तपोबल उग्र रुपाला,
भिउनि परतुनी जाऊं कां । बालकुमारा नेउनि त्याचें
मस्तक चरणीं ठेऊं कीं ॥१॥

बाळ ! इकडेतिकडे जाऊं नकोस अं ? येथें क्रुर पशू असतात, मोठमोठे पक्षी असतात, ते तुला घेऊन जातील. जननी ! जलांतील मच्छापेक्षां, सुसरीपेक्षां हे काय मोठे असतात, त्यांची मला भीति दिसत नाहीं; अग, हे पशू, पक्षी नेऊन मला काय करतील ? बाळा ! हे पशुपक्षी, मच्छ कच्छांप्रमाणें नाहींत, ते मनुष्याला भक्षण करतात. मातोश्री ! मग हे मनुष्य हिंडतफिरतच नसतील, घरांतच कोंडून असतात कीं काय ? तर आम्हीं जलांतच राहिल्यास बरें. बाळ ! अद्याप तूं भूमीवरची शोभा पाहिलीच नाहींस, तुझ्यासारखे मनुष्य तू पाहिलेस, त्यांच्याशीं बोलला, चाललास म्हणजे तुला मच्छकच्छांची आठवणच होणार नाहीं; मनुष्यलोक सर्वांत उत्तम, आणि मनुष्यप्राणि सर्वांत श्रेष्ठ आहेत. जननी ! सर्वांत श्रेष्ठ म्हणजे ग कसे पशुपक्ष्यांपेक्षाहि श्रेष्ठ ? बाळ ! पशु, पक्षी, मच्छ, कच्छांपेक्षां मनुष्य हे श्रेष्ठ आहेत. त्यास ज्ञान ही अत्युतम देणगी परमेश्वरानें दिली आहे. मातोश्री ! तूं आतांच काय सांगितलेस, मनुष्याला पशु हे भक्षण करतात म्हणून कीं नाहीं ? मग श्रेष्ठाला कनिष्ठांनी भक्षावें, कनिष्ठांचे भय श्रेष्ठांनीं धरावें, तर हे श्रेष्ठत्व वरिष्ठच म्हटलें पाहिजे; जननी ! आणि काय म्हटलेंस, मनुष्यास ज्ञान ही देणगी परमेश्वरानें दिली आहे ती कशी ? ईश्वर म्हणजे सर्वांस सारखा असावा, तो सर्व प्राण्यांचा जनक, तर एकास का निराळी देत असतो देणगी ? बाळ तुझा आतां व्रतबंध झाला पाहिजे, विद्या संपादन केली पाहिजे, मग तुला सारें समजूं लागेल. जननी ! व्रतबंध म्हणजे ग काय, आणि विद्या संपादन म्हणजे कसें, आणि विद्या कशाकरतां ? बाळ ! व्रतबंधावांचून ब्राह्मणत्व येत नसतें, मनुष्य जन्मत: शूद्र असतो, ह्या संस्कारानें द्वीजत्व प्राप्त होतें, आणि विद्येवांचून ज्ञान प्राप्त होत नाहीं; विद्याहीन मनुष्य पशूप्रमाणें आहेत. मातोश्री ! काय ग मला सारा घोटाळाच सांगतेस. मनुष्य जन्मत: शूद्र असतो म्हणजे ब्राह्मणाचा पुत्र शूद्र आणि विद्याहीन मनुष्य मनुष्याला पशूप्रमाणें भक्षण करतो कीं काय ? आणि एक सांग, मनुष्याला ईश्वरानें ज्ञान ही देणगी दिली आहे असें म्हणतेस तर मग विद्या आणखी ती कशाला संपादावयाची ? बाळ ! मनुष्यांत चार वर्ण असतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र; एकांपेक्षां एक श्रेष्ठ आहेत, सर्वांत ब्राह्मण श्रेष्ठ. जननी ! मनुष्यांप्रमाणें, पशुपक्षांत श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद असतो का ? हो, बाळ ! पशूंत व्याघ्र, सिंह हे श्रेष्ठ आहेत, पक्षांत गरुड हा श्रेष्ठ आहे, व्याघ्राला सर्व पशू भीत असतात. तो बलवान्‍ आहे, तो गाई बैलांना भक्षण करीत असतो. मग, मातोश्री, बलवान तो श्रेष्ठ, भक्षण करतो तो श्रेष्ठ, भूमंडळावरची रचना उत्तमच म्हणावयाची. मनुष्यांत असेंच ना श्रेष्ठत्व ? बाळ ! आतां तूं भूमंडळावर फिरलास म्हणजे सारा चमत्कारच दिसणार, पशुपक्ष्यांची ओळख पटणार, वृक्षलतांची नांवें कळणार, गांव, शहरें, नद्या, पर्वत यांची शोभा दिसणार. जननी ! मनुष्यांस, पशूंत भिन्न भिन्न नावें असतात का ग ? बाळ ! प्रत्येक वस्तूला भिन्न भिन्न नांवें असतात, वृक्षांला, वेलींला,फुलांला, वनस्पतीला आणि लहान लहान जंतूंलादेखील नावें असतात, जलचरांसहि नांवे असतात. त्याला सामान्यनामें म्हणतात, म्हणजे प्रत्येक जातीची ओळख दाखवणारी नावें असतात. जननी ! अशीं ही प्रत्येक वस्तूची नांवे ठेवली तरी ग कोणी ? आणि ती कशीं ग कळतात ? बाळ ! तुला आतां कठिण दिसतें. तें जरासा लोकांचा परिचय झाला म्हणजे, अगदीं सुलभ वाटणार; मनुष्यांचीं नांवे कळणार; गांवांची, शहरांची, नद्यांची, पर्वतांचीं नांवे लक्षांत येणार, तीं विशेषनामें म्हणतात; प्रत्येक व्यक्तींची नांवे असतात, ती त्यांसच ठेवलेलीं असतात. मातोश्री ! तूं सारें साधेच म्हणतेस पण मला भारी कठिणच दिसतें. प्रत्येक व्यक्तीला असलेलीं नांवे विशेषनामे म्हणतेस, तर, पर्वत, नद्या, गांव, शहरें ह्याही यक्तीच तर, त्यांस कोणीं ग कशीं नांवे ठेवली ? बाळ ! उगीच वाद घालूं नकोस. व्रतबंध झाला, विद्या पढलास, लोकांत परिचय झाला, म्हणजे हें सारें आपोआपच समजूं लागणार; आतां तुला उघडा बागडा, फिरतां येणार नाहीं, वस्त्रे प्रावरणें घेतलीं पाहिजेत, अलंकार धारण केले पाहिजेत. काय ! जननी ! वस्त्रें प्रावरणें घेतली पाहिजेत, ती कशांकरतां ? आणि अलंकार म्हणतेस ते तरी कसचे ? वस्त्रे, अलंकार नसल्यास मनुष्य म्हणणार नाहींत कीं काय ? बाळ ! वस्त्रालंकारांनी मनुष्यास शोभा येते. मातोश्री ! परमेश्वरानें मनुष्यास ज्ञान दिलें, तसेंच वस्त्रालंकार त्यानें जन्मत:च कां दिले नाहींत ? त्यास काय भारी अवघड पडणार होतें ? देवाच्या कृतीवर ही अतिघाई नाही का होत ? बाळ ! छे ! आतां तूं मनुष्यलोकांत आलास, तर इतर लोकांप्रमाणेंच चाललें पाहिजे. लोकांच्या रीतीभाती ...
जननी ! काय ग, लोकांच्या रीतीभाती आणि खाल्ल्या पाहिजेत ? नको ग, मला ही सारी मनुष्यलोकांची कटकट. आम्ही स्वस्थ जलांतच जाऊन राहूं या पाहूं. तेथें वस्त्र नकोत. अलंकार नको, विद्या, व्रतबंध कांहीएक नको आहे; हीं भूमीवरचीं विशेषनामें, सामान्यनामें, शिकतां शिकतां जन्मच नको नको असा होऊन जाईल. बाळ ! तूं भारी कोवळा आहेस; मनुष्यजन्म फार उत्तम आहे, आणि आर्यावर्तात मिळणें अतिदुर्लभ; बरें असो. त्या वृक्षाखालीं पाहिलेंस ना ? जननी ! काय ग तेथें आहे, कोण एक निजल्यासारखा बसला आहे तो, तो मनुष्य का पशु ? छे ! बाळ ! तसें म्हणूं नकोस, ते महान्‍ तपोनिधि ऋषि आहेत, ते समाधि लावून बसले आहेत ते तुझे जनक आहेत. जननी ! जनक म्हणजे ग काय ? बाळ ! त्या ऋषीचा तूं पुत्र आहेस. मातोश्री ! तुझाच ना ग मी पुत्र ? आणि कितिएकांचा पुत्र ? बाळ ! भारी कोंवळा आहेस, आतां त्यांच्याजवळ जा, त्यांना नमस्कार कर, ते तुझा व्रतबंध करतील, विद्या पढवतील; पण सांभाळ अं. तेथें झाडींत, सर्पासारखे विषारी प्राणी असतात, ते तुला दंश करतील; ते लहानच दिसतात पण फार भयंकर ! जननी ! काय ग सांगतेस, लहानच प्राणी म्हणतेस आणि त्यांचे भय धर म्हणतेस तें कसें ? मनुष्यलोक भितात का त्यांना ? पशूप्रमाणें भक्षण करतात कीं ते मनुष्यास ? बाळ ! सर्प भक्षण करीत नाहींत, त्यांचा दंश झाला म्हणजे मनुष्याच्या देहांत विष चढतें, आणि मरण येतें. मातोश्री ! पशू मनुष्यास भक्षण करतात,म्हणून त्यांस भ्यावें, सर्प दंश करतात म्हणून भ्यावें, मग मनुष्यानीं कशाला जगांत रहावें ? मनुष्य सर्वांत श्रेष्ठ, मनुष्यजन्म भारी उत्तम म्हणतेस तर तो सर्वांस भिऊन पळण्यासच तर ना ? अशा भयंकर भूमंड्ळांत कोण ग वास करणार ? पण जननी ! असे प्राणी परमेश्वरानें कशाला ग निर्माण केले ? एकमेकांस मारुन खाण्यास कीं काय ? बाळ ! त्या ऋषिवर्याची समाधि उतरत आली, त्यांजवळ जा आणि त्यांस नमस्कार कर. जननी ! तूं येतेस ना बरोबर ? बाळा ! त्या ऋषीजवळ जाण्यास मला भय वाटतें, पहा -

पद (चाल-दिसली पुनरुपि०)

उग्र तपोनिधि ऋषिवर त्यांना, नावडते स्त्री चित्ताला ।
जिवन्मुक्त ते जगतीं असती तुच्छ मानुनी वित्ताला ।
नित्य निरंजनि लाउनि दृष्टि निरंतरा निर्जनिं वसती ।
शाप देउनी भस्म करिति ते वाटे लोकां बहु भीती ॥१॥

जननी ! त्यांना स्त्रिया आवडत नाहींत म्हणजे पुरुष तरी आवडतात का ? स्त्रियांनां ते मनुष्यच मानीत नाहींत नसतील तर ! आणि काय म्हटलीस, शाप देऊन भस्म करतात म्हणजे, मनुष्यास पशूंप्रमाणे भक्षण करतात का सर्पाप्रमाणें दंशच करुन मारुन टाकतात ? ऋषींचेंही आहे तर लोकांस भय ? किती तर ही भयंकर ही पृथ्वी ! आणि येथें वास करणारे मनुष्यही भारीच भयंकर ! पण जननी ! एक सांग बरें, मनुष्य मनुष्यास मारीत नाहींत ना ? बाळाचे विचार विचित्रच असतात. बाळ ! मनुष्यानें मनुष्यास मारल्यास महापाप असतें. त्यास राजाकडून भयंकर दंड होत असतो, मनुष्यासच नव्हे मनुष्यानें पशूंस मारल्यासदेखील पातक आहे; युद्धांत मारल्यास मात्र पाप नाहीं. जननी ! युद्ध म्हणजे ग काय ? आणि तें कशाकरतां करतात ? बाळाच्या प्रश्नाचें भारीच कौतुक वाटतें. बाळ ! राजेलोक, परराज्यें घेण्याकरितां एकमेकांवर युद्धें करतात, आणि त्यांचे एकेक शूर, हजारों लोकांचे प्राण घेतात. बरेच तर हे राजेलोक, इतर लोकांनी मनुष्यास मारलें तर हे महान शासन करतात, आणि हे हजारों लोकांचे प्राण घेतात; मग ते मनुष्य व्याघ्रच म्हणावयाचे; भारीच श्रेष्ठ तर ही भूमंडळावरची रीति आणि कृति. आणि हे ऋषि तर त्यांच्याहूनहि श्रेष्ठ, वरिष्ठ ! बाळ ! हळूच बोल. ही पहा त्या ऋषिवर्याची समाधि उतरत आली. आतां ते आपल्याशींच काय बोलतात, तें येथें झाडाच्या आड राहून ऐकून घेऊं देवाची लीला भारी विचित्र आहे, हें कांहीं खोटें नाहीं. मी कोण, केलें काय, आणि झालें काय; माझे ज्ञान, माझी विद्या, माझे आचरण पाहून सर्व लोक माझे चरण वंदूं लागले, महायोगी पातंजल मुनि, यांनी तर आपल्या योगशास्त्रावर व्याख्या करण्यास सांगितले; जैमिनी, महामुनि तर मीमांसाशास्त्रावर पसंति मागतात. तो हा दधीचि -

पद (चाल-नीरक्षीरालिंगन०)

विषयकर्दमीं लोळत पडला, भ्रंश जाहला बुद्धीचा ।
मनोधैर्य तें लोपुनि गेलें भंग होय तपशुद्धीचा ॥
इंद्रियनिग्रह त्याग जाहला वैराग्या विग्रह आला ।
इहपरलोका सार्थचि मुकलों निंद्य जाहलों जगताला ॥
गुरुकुल महिमा ऐकुनि आले विप्रबाळ मम तपोवना
नच दाखवतें मज मुख त्यांना शून्य भासते मज अवनी ॥१॥

काय, होऊं नये तें झालें, घडूं नये तें घडलें, पण मानव जन्माचें सार्थक्य होण्यास पाहिजे होतें तेंहि दुरावलें :

पद (चाल-सदर)

स्वर्गसुखाचें सूत्र पवित्रचि पुत्रवदन नच पाहियलें ।
विषयविषातें प्राशियलें परि पितर ऋणा नच फेडियलें ॥
झाली आशा पूर्ण निराशा श्रीपरमेशा तारि मला ।
प्रपंच ना, परमार्था मुकलों, घोर अनर्थी हा पडला ॥१॥

आतांच ह्या बाळाची भेट झाल्यास, ऋषिवर्य थेट आनंदात समेट होतील .... बाळ ! जरा त्या आंब्याखालीं पडलेलीं थोडीशीं फळें घेऊन ये पाहूं; वृक्षावर चढूं नकोस अं ? जननी ! वृक्षावरची फळे काढल्यास वृक्ष काय दंश करतात, का शाप देऊन भस्म करतात ? आणि याला काय आंबा म्हणतात ग ? हें सामान्यनाम का विशेषनाम ? आणि तुला हें कोणी सांगीतलें ? आणि या प्रत्येक झाडांना निराळ्याच प्रकारचीं फळें कशीं ग असतात ? हा काय चमत्कार, सरस्वतीच्या तीरावर, अद्‍भुत, अपूर्व मायावी स्त्रियांनीं, माझ्या देहाची, नव्हे सार्‍या जन्माची, राखरांगोळी केली; कपिल, याज्ञवल्क्य या ऊर्ध्वरेत्या मुनींच्या पंक्तीत बसण्याचा मान जाऊन, मान खालीं घालण्याचा प्रसंग आला, अपमानाचें लांच्छ्न लागलेंले वदन जनांस दाखवूं नये म्हणून, या निर्जन तीर्थावर देहाचें विसर्जन व्हावें या करतां, आधिव्याधिरहित शुद्ध समाधि घेत राहिलों, तेथेंहि मनुष्यासारखी चाहूल मला भूल पाडण्यास खुळखुळ करीत आहे ती कां ? ...... परमेश्वरा ! माझ्याकडून घडलेलें महापातक, माझ्या देहाचा घात केल्यावांचून कसें राहील ? कृपाघना ! दयाळा ! या पापापासून मुक्त करण्यास तुझ्यांवाचून कोण समर्थ आहे ? बाळ ! झाडावर कां चढलांस ? भूमीवरचीच फ्ळें गोड असतात. जननी ! हीं झाडें कशीं ग निपजतात ? बाळ ! ही आपल्या नदीच्याच जलानें वाढतात. मातोश्री ! मग आपल्या जलांत कशी ग झाडें नाहींत ? फळेंहि नाहींत. या निर्जन क्षेत्रांत कोण हा बालक !

साकी

बाल रवीसम बालक कोमल, बोल सुधेच्या धारा ।
आकर्षुनि मन्मनास धरितो करित वना सुविहारा ॥
मायाविभ्रम हा । नव नव दावी खेळ महा ॥१॥

पण याच्या भाषणाचा अर्थ काय ? मंजुळ आवाज तर स्त्रियांसारखाच दिसतो आहे, व्यक्ति मात्र व्यक्त दिसत नाहीं; स्त्रियांच्या मधुर गायनाने पाषाणाच्या शिळा विरघळून जातात असें म्हणतात, हें सार्थच आहे; वाटतें, पार्वतीदेवीच्या गायनानेंच मानससरोवरासारखीं सरोवरें निर्माण झालीं; यांत आश्वर्य नाहीं. बाळ ! खालीं ये, इतकी फळें कोण खाणार ? जननी ! हीं फळें, मला, तिलोत्तम माशाला दिलीं पाहिजेत. काय, या बाळाचे बिनमोल बोल, याच्या शब्दांचा अर्थ, शर्त केली तरी, तर्कात येत नाहीं. या बाळाचे जननवृत्त कोण कथन करील; कोण तें जलांतर, आणि तिलोत्तम मासा तो कोण ? हा ! हा, या बाळाचें वदन तर नयनज्योतीस चलनवलन करण्यास देतच नाहीं, धन्य भाग्य याच्या जनकाचें ! -

पद (चाल - सतनु करावा०)

कुंदकुसुमसम दंतपंक्ति त्या, मंद हास्य शशिवदनीचें ।
गाल गुलाबी लाली पाहुनि सौख्य गमे नंदनवनिचें ॥
चपल हरिणसम पळत दिसे हा कांति रवीची देहाला ।
सत्य भासतें पडतों आतां फिरुनि वळी या मोहाला ॥१॥

बाळ ! जरा, खाली यें, हा पहा सूर्य किती वर चढला. मातोश्री ! सूर्य वरती चढला म्हणून मी कां खालीं यावें ? वरती चढेल तो खालती पडेल. हा ! पुष्कळ मनोनिग्रह केला तरी, मनाचा आग्रह सुटत नाहीं. किती तरी या बाळाचें तात्विक भाषण ! आतां तर -

साकी

वाटे द्यावें आलिंगन त्या धाउनि सुंदर बाळा ।
उतावीळ मन ओढी घ्याया चुंबन चंद्र मुखाला ॥
संशयतम परि तो । चित्तीं विभ्रम भर भरितो ॥१॥

बाळा ! जरा खालीं ये, अरे ब्राह्मणांनीं झाडावरती चढूं नये, असा शास्त्रार्थ आहे, जरा घसरशील तर देहास भारीच त्रास पडतील. मग, मातोश्री ! ब्राह्मणास फळें का शूद्रानीं आणूण द्यावी ? ते घसरुन पडतील तर ब्राह्मणास त्रास होणार नाहींत ? ब्राह्मणानींच केली का शास्त्रें ? का शूद्रानी ? काय, हा बाळ ब्राह्मणकुमार ? आणि असे न्यायतत्व कोणाच्या तोंडांत येईल ? मनोवृत्ति तर हेंच ठरवितात. बाळ ! हा पहा, तिलोत्तम मासा आणि जलोद्गार मगर, वाळवंटावर येऊं लागले पहा. हं, आले लक्षांत, परमेष्टि ब्रह्मदेवानें माझ्याचकरतां ही मायावी सृष्टि निर्माण केली आहे, निसर्गावर खड्ग उपसलें, मनुष्याची उत्पत्ति मनुष्यापासून व्हावी, पशूंपासून पशू निपजावे, मच्छांपासून मच्छ व्हावें, असा सृष्टीचा नियम विधात्यानें मोडून टाकला, श्रेष्ठांनी नियमभंग केल्यावर कनिष्ठांचे आचरण अनिष्टच होणार. बाळ ! ये जरा, वेळ बराच झाला, ही पहा आनंदवती मगरीदेखील वरती आली. हा, हा, या पुत्राचा जन्म निश्चयात्मक जलचरांपासून, मच्छांपासून असो वा मकरांपासून असो, पण जलांतहि ब्राह्मण, क्षत्रिय, ही वर्ण व्यवस्था कोणी निर्माण केली ? ब्राह्मणपुत्र हें तर नि:संशय; ही अद्भुत, अपूर्व रचना, चतुराननानेंच केली का ? हें तर आश्चर्यच भासतें. पण हेंच काय-सारीच माया ....

पद (चाल-मम सुत०)

जलांतरी फुलबागचि फिरली । कोणी कधीं तरी पाहियली ॥
नदीवरी खेळति कीं ललना । कोणी आणियलें तें ध्याना ॥
गायनिं प्रकटति दीपमाला । कोणी पाहियले ते डोळां ॥
ब्रह्मचर्या ढांसळोनि मम । व्यथित मति केली ।
धात्या, इच्छा नच पुरली ॥१॥

बाळ ! ये, ये, वेळ बराच झाला. हा ! हा ! --

साकी

एकाएकी गुप्त जाहला बाळ जळांतरी गेला ।
मन्मन ओढुनि नेलें सहजीं, चपल विमल रंगेला ।
जडली हे आधी । झाली व्यर्थ समाधी ॥१॥

आतां नकोच हें जग, अशा ह्या पापमय जगांत वास्तव्यच करणें नको. परमेश्वराच्या सन्निध राहून त्याची एकनिष्ठ सेवा करावी, हाच एक शेवटचा मार्ग.
शांति: शांति: !

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP